*प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रेमकमळ होय*
बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, लेखक, प्राध्यापक देवबा पाटील यांचा प्रेमाने ओतप्रोत भरलेला, प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रेमकमळ. प्रेमकमळ हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर, तळ्यांमध्ये अनेक प्रेम कमळांनी भरलेले आहे. त्याच तळ्यात प्रेम करणारे दोन बदक व भोवताली निसर्गाचा अनमोल खजिना म्हणजे नानाविध सुगंधी फुलांनी भरलेला मळा मनाला भुरळ घालणारा आहे. काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित झाली आहे.या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सूर्यकांत तायडे यांनी लिहिली आहे. तर प्रकाशन कृष्णायन प्रकाशन पुणे यांनी केले असून याचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे.पण यातील सर्वच कविता प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत
प्रेम हेच जीवन.प्रेमानेच घराला घरपण येते. प्रेमाने जीवन सुगंधित होते. प्रेमाने जीवनाला खरा अर्थ येतो. प्रेमाची अनेक रूपे आहेत. हे रूपच जीवनाचे सौंदर्य. खरे अलंकार आहेत. आई-वडिलांचे मुलामुलींवरील प्रेम, आजी-आजोबांचे नातवंडावरील प्रेम, पती-पत्नींचे एकमेकांवरील प्रेम, बहिण भावाचे अतूट प्रेम,भावा-भावा वरील प्रेम,मित्रमैत्रिणीचे अपार प्रेम, देशावरील प्रेम, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम, ईश्वरावरील निस्सीम प्रेम अशा प्रेमळ भाव वरच हे जग चालले आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने बोललेलंच आवडतं. राग कोणालाही नकोसाच आहे. याचा अर्थ प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे.
कवी प्रा.देवबा पाटील यांचे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. ते त्यांच्या कवितेत युवकांना, तरुणांना आवाहन करीत आहे. ते म्हणतात...
हे युवका ! तोडुनी बंधने सारी
गरुडासारखी मार भरारी
विशाल गगनावरी
ये घेऊनी तारका भुवरी...!!
आजच्या तरुण पिढीला कवी आवाहन करतो की हे युवका तू सारी बंधने तोडून टाक आणि गरुडासारखी भरारी घे. विशाल गगनावरी जाऊन एकदा आकाश कवेत घे. तारका भुवरी आण म्हणजेच तारखा प्रमाणे देदीप्यमान यश संपादन कर. अनिष्ट प्रथा बाजूला सारून देशावर प्रेम कर. देशासाठी जग आणि वेळ आली तर देशासाठी बलिदान दे. सिंहासारखी झेप घे. आणि समाजाचे धुर्त कोल्हे आहेत त्यांच्या मानगुटीवर जाऊन बस. अशा लबाड लांडग्यांना वठणीवर आण. त्यासाठी तू स्वतः एक आदर्श व्यक्ती हो. असे आजच्या पिढीला जी पिढी गोवा, गुटखा खाण्यात सिगारेट ओढण्यात आणि रिकामी बोटं मोबाईलवर खेळत असलेल्या तरुण पिढीला कवी कळकळीने सांगतो आहे.
आजची कन्या
उद्याची माता
कन्या ही संस्कृती
तीही भाग्यविधाता...!
आजची नंदिनी
भावी संस्कारखाण
आपल्या घराची
तीही आहे शान....!!
कन्या धनाची पेटी
कन्या ही परीस
कन्या आपला अंश
तिला ही करा वारस....!!
आज आपण मुलगा मुलगी एकसमान जन म्हणती खरे, पण मुलीच्या नावावर प्रॉपर्टी हव्या तितक्या प्रमाणात केली जात नाही. एकदा मुलीचे हात पिवळे केले की झालं. मुलगी म्हणजे परक्याचं धन असं मानणारे लोकं आजही समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरत असतात. आजची जी कन्या आहे तीच उद्याची माता आहे. तीच खरी संस्कृती आहे. तीच संस्काराची खान आहे.कन्याच आपल्या घराचा मान शान आणि अभिमान आहे. कन्या रुपी परिस जिथे जाईल तिथे प्रेम, वात्सल्य,जिव्हाळा निर्माण होतो. तीच धनाची पेटी आहे. तीच आपला अंश आहे. तिलाही नियमाने आपल्या घराचा वारस करायला हवे.असे कवी सांगितल्या शिवाय राहत नाही.
प्रेम असावे स्वच्छ
प्रेम नसावे जाळणारे
प्रेम असावे हसवणारे
आयुष्याचं सोनं करणारे....!!
सत्य प्रेम वाढवी आत्मशक्ती
शुद्ध प्रेमाची असावी आसक्ती
शरीराकर्षण नसते शुद्ध प्रेम
परस्पर जिव्हाळ्याचे खरे प्रेम...!!
माणसाचं प्रेम शुद्ध असावे,पवित्र असावे तरच ते चिरकाल टिकतं. अन्यथा खोटा आव आणून प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करणारे तोंडावर पडतात. त्यांचा खरा चेहरा एक दिवस समाजासमोर येतो. त्यामुळे प्रेमात दिखावा नको. प्रेम डोहातल्या स्वच्छ पाण्यासारखं असावं. प्रेम एकमेकांना उभारी देणार, विश्वासानं जोडणारं,एकमेकांना जीव लावणारं असावं, मग ते प्रेम आधार देणारं असावं ते प्रेम शेजाऱ्या-शेजाऱ्याचे असोत की नातेवाईकांचं असो. प्रेम जाळणारे नसावे, प्रेम एकमेकांना हसविणारे, फुलविणारे आणि आयुष्याचं सोनं करणारे असावे.
प्रेमाला उपमा नाही म्हणतात अगदी तसेच प्रेम व्यक्त करायला आणि प्रेमावर लिहायला बोलायलाही शब्द तोकडेच पडतात. दोन जीव एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जरी ते बोलू शकत नसले तरी डोळ्याने प्रेमभाव व्यक्त करणारी असतात. तर काही जण फक्त मनाने बोलणारी असतात. हृदयाने हृदयाला जोडणारे प्रेम असावे. प्रेमामुळेच मानवाला खरी ऊर्जा व आत्मशक्ती मिळते. प्रेम जसे जगायला शिकवते तसेच विरहात मरायला देखील तयार होते. पण शुद्ध प्रेम असले तरच ते चिरकाल टिकतील. प्रेमात फक्त शरीर आकर्षण नकोत तर परस्पर जिव्हाळ्याचे खरे प्रेम असावे असे कवीला वाटते.
कवीने पावसाचे धरणीशी असलेले प्रेम, नदीचे सागराशी असणारे प्रेम, सहचारिणीशी असणारे प्रेम, कोवळ्या कळ्यांवरचे अविरत प्रेम, सखी बरोबरचे प्रेम, कल्पनाविस्तारातील प्रियसीचे प्रेम, फुलपाखरांचे फुलावरील प्रेम, पक्ष्यांचे झाडावरील प्रेम,भारतीय प्रेमदिवस, सूर्याचे उषेवरील प्रेम, व्यथा, फुल, सहचारिणी, मोर, लांडोर, स्त्री-पुरुष,भारतीय पत्नी, प्रेमांकुर, प्रेमाची नानाविध रूपे, स्वप्नात धुंद करणारे प्रेम, एक होती मोहिनी इ.कविता प्रेमभाव व्यक्त करणाऱ्या व प्रेमरसानं चिंब भिजवणाऱ्या मानवी मनाला मोहिनी घालणाऱ्या आहेत.
प्रेमकमळ या काव्यसंग्रहात एकूण ७२ प्रेमावरच्या कविता, प्रेमाची साद घालणाऱ्या आणि प्रेमाने सुगंधित करणाऱ्या अशाच आहेत.कवी लेखक प्रा.देवबा पाटील यांना पुढील काव्य लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.
समिक्षिका, लेखिका, शिक्षिका, कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
मो.9767663257
No comments:
Post a Comment