Monday, 29 March 2021

पुरस्कार

Sunday, 28 March 2021

शेतीमातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे 'आम्ही माणसं मातीचे'

 *शेती मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे आम्ही माणसं मातीचे*

     भारत हा कृषीप्रधान देश आहे.बळीराजा शेतामध्ये राबराब राबतो. उन्हातानात रात्रंदिवस कष्ट उपसतो. म्हणून अख्या जगाला अन्न मिळते. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतकरी आहेत म्हणून सारी दुनिया आहे.शेतकऱ्याला त्याची काळी माती त्याला मायीसारखी वाटते. शेती शेतकऱ्याचा जीव की प्राण असतो. विदर्भाच्या मातीत जन्मलेले अमरावती जिल्ह्यातील व-हाडी कवी गजानन मते यांचा 'आम्ही माणसं मातीचे' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ शेती- मातीचे आहे. शेतातली झोपडी, झाड,बैलगाडीचे चाक असे सुंदर मुखपृष्ठ आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस, अमरावती यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ५ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता शेती-मातीशी नाळ जोडणा-या आहेत.
         शेतकऱ्यांचे स्वप्न फुलवणाऱ्या, शेतकऱ्याच्या घामाने भिजलेल्या, पावसाचे महत्व सांगणाऱ्या, कुणब्याचं जीणं सांगणाऱ्या,धान्याला कोंब फुटतं, मृगाचा पाऊस,जेंव्हा पालवी फुटते, मृगाचा पाऊस, फुले, बापू तुझ्या देशात, माय, आभाय, आंबा, माती माय रुसलेली,आम्ही माणसं मातीचे अशी मातीचा कळवळा असणारा कुणब्याला माती म्हणजे त्याची माय समजून लिहिलेल्या सर्वच कविता शेती मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत कष्टकऱ्यांचे जीणं-मरणं सांगणा-या आहेत.
        
           "रोज घरचाच कसा 
           आला पाऊस पावना 
           पापणीत साठवून 
           सखी बसली साजना...!!

            आठवात पावसाच्या 
             होती धरती अबोल 
             तुवा भिजोल्या वाटेन
             कशी सावरू मी तोल...!!

              कवळ्या फांदीले आली 
              आता कवळीच पान 
              थेंब झेलताना गाती 
               हिरव्या संसाराच गाणं....!!"

          शेतकरी ज्याची देवासारखी वाट पाहतो, ज्याच्यावर शेती अवलंबून असते अशा पावसाची आतुरतेने वाट बघणारा शेतकरी पावसाला  पाहुना म्हणतो. पावसाच्या आठवणीत धरणीमाय अबोल होऊन बसते. पावसाची आतुरता, ओढ,धरणीमायला लागली आहे. पावसाने भिजलेल्या वाटेनं तिचा तोल कशी सावरू या विचारांनी धरणी वाट पाहत बसली आहे.तुझ्या पावसानं मी तृप्त होणार आहे.तुझ्यामुळेच झाडाच्या फांदीला कोवळी पानं फुटतील आणि पावसाचा प्रत्येक थेंब झेलताना हिरव्या संसाराचं गानं गातील असे शेतकरी प्रिय असणारा कवी गजानन मते यांना वाटते. शेतीवरचे निसर्गावरच प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दांशब्दातून भरभरून ओसंडत आहे.
             कवी गजानन मते सरांच्या सर्वच कविता अस्सल वऱ्हाडी भाषेमध्ये असल्याने 'आम्ही माणसं मातीचे' हा कवितासंग्रह व-हाडी मेवा आहे. साधी, सरळ, सोपी,व-हाडी भाषा, प्रत्येक कवीता गेय स्वरूपात मांडण्याचा गजानन मते सरांचा हातखंडा दिसून येतो. कांही कविता सहा अक्षरी, तर काही कविता अभंग प्रकारात असल्याने एक वेगळाच साज घातल्या सारख्या भासतात तर काही कविता अष्टाक्षरी या काव्या प्रकारांमध्ये येतं असल्याने आणखीनच खुलून दिसत आहेत.कवी गजानन मते सरांना मनाच्या शेतीवर शब्दांची पेरणी करायला सुरेख जमतं.

            पाणी ना पाऊस
            चिंता कास्तकारा
            हमसून रडे 
            वावराचा धुरा....!

             बिना भरोशाचं 
             कुणब्याचं जीन
             मांडतो बेरीज
             होते उणं-उणं....!!

          व-हाडी मातीचा गंध कवी गजानन मते सरांच्या प्रत्येक शब्दांतून येताना दिसतो. ना कुणाची प्रस्तावना ना कुणाच्या शुभेच्छा. प्रत्येक कविता कवीने बळीराजाच्या ओटीत धान्य भरावं तसं भरले आहेत. कुणाब्याला समर्पित केले आहे.स्वार्थी माणसानेच आज  वृक्षतोड करून निसर्गाची भयानक हानी करून ठेवली आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर कधी पडतच नाही. पावसाची वाट बघणारा शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत बसतो. वेळेवर पाऊस पडला नाही तर चिंता करीत बसतो. शेतकऱ्याला झोप लागत नाही की अन्न गोड लागत नाही. त्याला फक्त पावसाची ओढ लागते. पाऊस पडल्यावर वावराचा( शेताचा) धुरा (बांध ) रडत बसतो. शेतकऱ्याचे जीवनच पावसावर अवलंबून असते.ते जीवन बीन भरोशाचे असतं म्हणजे पाऊस पडेल की नाही याची खात्री नसते. बेरीज मांडत बसला तर राहतं उणं उणं. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा पावसाच्या भरोशावर कर्ज काढून व्याजानं पैसा काढून खत बियाणं साहित्य घेतो. शेत पिकल्यावर परत करू या आशेन का होईना हिंमत धरतो. पण पावसाने जर दगा दिला तर शेतकरी कर्जापायी स्वतःला फास लावायलाही मागं पुढं बघत नाही. शेतकऱ्याच्या जीवाची आर्त हाक कवीने मांडली आहे.

                 सूर्य तळपत आला 
                 हिवं खात पाणी पित
                 वारा सुसाट सुटला 
                 धूळ-माती उडवित....!!

                  आला फुलून पळस
                  शेत-शिवारास लाली
                  सुकलेल्या डोंगराला 
                  हसू फुटलेलं गाली......!!

                   किती सोकू दे जमीन 
                   हारू नको धर तग
                   ऊन वारा तुफानात 
                   सांगे पळस तू जग.....!!

          वरील गोळीतून कवी गजानन मते यांचे शेतकऱ्यावरील नितांत प्रेम व आदर दिसून येते. कडक उन्हाळ्यात सूर्य आग ओकत आहे. अशी उन्हाची तीव्रता असताना इतकी गर्मी विदर्भात असते. वारा बेभान सुटतो. धूळ माती तुडवत याच वसंत ऋतूमध्ये पळस फुलून आला आहे . त्याच पळसाच्या फुलावरची शिवाराला सुद्धा लाली चढली आहे. उन्हाळ्यात कितीही तापलं, डोंगर सुकली तरी पळस मात्र हसत शेतात उभा आहे. पाऊस नाही पडला तर दुष्काळ येतो. जमीन सुकून जाते. पण तू बळीराजा तू हरू नकोस धीर सोडू नकोस. त्यातूनसुध्दा तुफानामध्ये पळस  जगायला सांगते .असल्या तप्त उन्हात पळस डोलाने रंग उधळीत उभा असतो.तसे माणसाने ताठ उभं राहून कष्ट करून जगले पाहिजे. पळस सुद्धा माणसाला तू असं जग म्हणून सांगतो.

        तुझी माय माती | माझी माय माती |
        कुठे जातीपाती | पांघरता ||

       साऱ्या मानवाची माय म्हणजे माती. माणसाचा जन्म जरी आईच्या पोटी घेतला पण शेवटी मनुष्य मातीतच जाणार आहे. या काळ्या माईकडे कधीच भेदभाव नसतो. तिला सारी लेकरे एक समान असतात. तिच्याकडे कोणती जातपात नसते. ना कोणता धर्म नसतो. सर्वांचा रंग एकसारखाच असतो. सर्व सर्वांचे रक्त लालच असते मग मानवाने का भेदभाव करावा असे कवी गजानन मते वरील वरील ओळीतून व्यक्त होताना दिसतात.
                  कवी गजानन मते यांच्या कविता शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, कष्ट करायला लावणाऱ्या,निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या, समतेचे महत्त्व विशद करणा-या,कुणब्याचं  जिने-मरणं, दुःख, दुष्काळ , अवर्षण विषद करणाऱ्या, गावाची ओढ लावणाऱ्या, वास्तवता मांडणाऱ्या, माय मराठीची महती सांगणाऱ्या, देश धर्मासाठी प्राण पणाला लावणाऱ्या, सर्वच कविता वाचकांच्या थेट काळजाला जाऊन भिडणा-या आहेत.
        
            कवी गजानन मते सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!
आम्ही माणसं मातीचे पुस्तक खरेदीसाठी संपर्क.
९४२००७६८६७

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 24 March 2021

संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे-इजू

 *संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे-इजू*

*इजू एक धगधगती संघर्षगाथा. पुण्याच्या हनुमाननगर झोपडपट्टीतला आकी-आबाचा लाडका इजू वेळप्रसंगी फक्त पाणी पिऊन झोपणारा इजू. परिस्थितीला दोष न देता अंधारलेल्या आयुष्याला कष्टाचा मुलामा देत उजेडाच्या दिशेने जाणारा इजू .तर कधी बाल वयात हसून खेळून बालपण न घालवता कोवळ्या वयातील भावंड सांभाळण्याची जिमेदारी घेणारा इजू. दोन पैसे मिळवण्यासाठी भल्या पहाटे लवकर उठून पेपर टाकणारा, दूध पॉकेट पोचवणारा, बिगारी काम सुट्टीच्या दिवसांत करून दोन पैसे स्वाभिमानाने मिळवणार्‍या इजूचे  आत्मचरित्र वाचकाला जगण्याची उमेद व प्रेरणा देऊन जाते.
        पुणे जिल्ह्यातील विजय वडवेराव यांचे आत्मचरित्र इजू नुकताच वाचनात आले या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ शिक्षणाची जबरदस्त इच्छाशक्ती असणाऱ्या बालपणीच्या इजूचे आहे. सारवलेल्या हिरव्यागार जमिनीवर कोळशाचा बोरू करून आकी-आबा, शाळा असे लिहिणाऱ्या छोट्या मुलाचे म्हणजेच विजय वडवेराव यांच्या बालपणीचे आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार सर यांनी चित्रित केले असून प्रकाशन परीस पब्लिकेशन पुणे यांनी केले आहे. जबरदस्त मुखपृष्ठ व उत्कृष्ट बांधणी असणाऱ्या या पुस्तकाची प्रथमावृत्ती २८ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित झाली. या आत्मकथनाचे मूल्य केवळ ४०० रुपये असून यातील जिद्द व संघर्ष प्रत्येक मालकाला प्रेरणा देणारी आहे.
        आजच्या काळातील कवी,लेखक, संगीतकार, गीतकार, गझलकार,शिक्षक, एक बाप,एक मुलगा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या विजय वडवेराव यांना आज सगळे जण ओळखतात पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी खाल्लेल्या खस्ता, त्यांची उपासमार, त्यांची गरिबी, त्यांचा संघर्ष प्रत्येक बालकाला प्रेरणादायी टॉनिक आहे. या पुस्तकाला प्रस्तावना म्हणजे लेखकाचे बाबा यांचा फोटो तर शुभेच्छा आमदार अमोल मिटकरी साहेबांच्या, तसेच महापौर मुरलीधर ओहोळ साहेब यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. तसेच विशालराजे बोरे वृत्तप्रतिनिधी, मुंबई दूरदर्शन यांच्याही शुभेच्छारुपी आशीर्वाद लाभला आहे. मलपृष्ठावर जन्मदात्या आकीने पाठराखण केली आहे. अगदी तिच्याच बोलीभाषेत तिच्याच लिपीमध्ये जगातली सर्वात ग्रेट लिपी आकीची  लाभणं हे सुद्धा इजूचं मोठे भाग्यच आहे.
        ज्या ठिकाणी देशातील पहिली मुलींच्या शाळेची सुरुवात झाली. ज्या फुले दाम्पत्यांने फुले असूनही काटे वेचिले आयुष्यभर. अशा सावित्री ज्योतिबाची शाळा ज्या वाड्यात भरत होती तो वाडा म्हणजे भिडे वाडा. आज समाजाकडून, शासनाकडून दुर्लक्षित झालेला होता. भिडेवाड्याची आत्मकथा... 'भिडे वाडा बोलला' या कवितेच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे भिडे वाड्याची स्वच्छता करणारे आज भिडेवाडाकार म्हणून ओळखले जातात. विजय वडवेराव यांचे यापूर्वीचे 'वेशीवरचा दगड' (कवितासंग्रह) चंद्रही पेटेल, अक्षरबाग मधाळी(गझलसंग्रह) असे 2 गझलसंग्रह, बाभळीचा काटा (कवितासंग्रह )असे एकूण चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रत्येक पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार साहित्य निर्माण करून विजय वडवेराव हे  साहित्यशिल्पकार ठरले आहेत.
           कवी विजय वडवेराव यांचे कुटुंब मूळ मराठवाड्यातल्या धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्यातील मसला खुर्द गावचे आहेत.ज्या मातीने लेखकाच्या वडिलांना पोसले त्याच मातीचा गंध त्यांच्या प्रत्येक शब्दांला आहे. दुष्काळामुळे वडवेरावांचं कुटुंब उपजीविका भागविण्यासाठी पुण्याला स्थाईक झाले.इजू वर उत्तम संस्कार करणारी त्याची आकीआबासोबत होते. संस्काराचं पांघरून, गरिबीचं अंथरूण, घरात खाणारी तोंडं जास्त आणि कमावणारे हात म्हणजे इजूचे बाबा व आकी काबाडकष्ट करून, रक्ताचे पाणी करून इजूला घडवलं. कापडात बांधून नेलेली चतकोर भाकर शाळेत इतर मुलं हसू नये म्हणून मुलांपासून दूर जाऊन मिरचीचा ठेचा व भाकर खाणारा आहे.जो गरिबी पुढे कधीच हतबल झाला नाही, कधी वाम मार्गाने गेला नाही, हे आजच्या इजूचं फलित आहे.
          लेखकांनी इजू या आत्मकथनात गावाकडची साधी सोपी सरळ बोलीभाषा वापरल्यामुळे इजू हे आत्मकथन वाचताना थेट काळजाला भिडते आणि डोळ्यातून अश्रू  तराळते. पण प्रत्येक शब्द न् शब्द काळजाला जाऊन भिडतो त्यामुळे प्रत्येक भाग वाचकाला वाचण्याची उत्कंठा वाढवून ठेवतो.विजू जणूकाही आपल्या समोरच दिसतो. त्याचं बालपण,त्याचं तरुणपण, त्यांनी केलेली कष्टाची कामं, साक्षात डोळ्यांसमोर एखाद्या पिक्चर प्रमाणे चित्र उभे राहते.खरतर इजू वर एखादा पिक्चर व्हायला पाहिजे. तसं झालं तर तीस वर्षाचा प्रवास तीन तासात बसवणं अवघडच पण चित्ररूपाने जर प्रदर्शित झाला तर सर्वात जास्त आनंद मलाही होईल. कारण वाचताना मला त्याचा अनुभव आला आहे. विजू वाचून जेवढं वाचकाचं मन हळहळतं, कसं कळवळतं असेल? याची कल्पनाच करायला नको.
                बालपणी मूल जेंव्हा शाळेत जाते.तेंव्हा ते पार गांगरून जाते. त्याला मायेचा आधार आवश्यक असतो. लोकरे मॅडमचा प्रेमळ स्वभाव इजूला खूप आवडतो. कधीकधी तर आकीच्या रूपातच त्यांना पाहतो.इजूचे बालपण, बालपणीचे शिक्षक, मित्र, सवंगडी, शाळेच्या समोर पेरू विकणाऱ्या आजी, कॉलेज, नातीगोती,इजूची शाळा आणि तिचा हात धरून चाललेली गरिबी, संकटाला न घाबरणारी आकी, काबाडकष्ट करणारा आबा, परिस्थितीवर मात करत संघर्ष करणारा इजू.प्रत्येक भाग वाचून इजूच्या वेदना, कष्ट, दुःख, हाल-अपेष्टा इजूचं मन मारुन जगणं. मरण यातना भोगल्या सारखंच जीनं वाचून माणसाला माणुसकी कळते. गरिबी काय असते ते समजते. गरिबीचे चटके सोसणाऱ्या इजू आकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करतो आणि शेवटी सरकारी नोकरीला लागतो. प्रथम नियुक्ती शिक्षकांची म्हणून जेव्हा बीड जिल्ह्यात रुजू होतो तेंव्हा जातीपातीचा राजकारणावरून इजूला त्रास लोकशाहीत संविधानाची मान मर्यादा बाजूला ठेवते. शेवटी तिथून राजीनामा देऊन पुणे जिल्ह्यात जॉईन होतो.एक वेळ फाटकी चड्डी घालून शाळेत जाणारा इजू अंगात शाळेचा ड्रेस ही फुलं असताना भावाचा शर्ट अर्ध्या रस्त्यात ाण्यात बुचकळून अर्ध ओला अंगात घालत पळत शाळेला जाणारा इजू आजच्या अभ्यास न करणाऱ्या,बापाच्या जीवावर बुलेट घेऊन फिरणाऱ्या मुलांना चुंबकाच्या दिशादर्शक काट्याप्रमाणे दिशादर्शक ठरतो. आज आपण पाहतो आई वडील घरात अडचण नको म्हणून वृद्धाश्रमात आई-वडील नेऊन ठेवणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं,इजूचं आकी आबावरचं प्रेम मानवाच्या मेंदूतल्या मुंग्या जाळणारं आहे.
          कॉलेज वयातली मुलं अनेक रंगीबेरंगी कपडे घालून स्वप्नांच्या दुनियेत माय -बापाच्या जीवावर उड्या मारत बुलेट गाडीवरून फिरणाऱ्या मुलांच्या घोळक्यात इजू उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगभर कामाला जाऊन दोन पैसे कमावणारा स्वाभीमानाने ताठ जीवन जगणारा आहे. पण कधी कोणाकडे लाचारीने भीक मागितली नाही ना कधी गैर काम केले नाही. आज त्याच इजूने मान मर्यादा एक आदर्श शिक्षक, गझलकार,संगीतकार, गायक, कवी, लेखक अशा अनेक भूमिकेत आहे.जो आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे.एका कष्टकरी मजुरांच्या मुलांनं ज्या दिवशी नवीन कार घेतली. त्या दिवशी आकी दहा- दहा किलोमीटर पायी पायपीट करणाऱ्या आकीला इजून आपल्या कारमध्ये बसवलं. असा संस्कारी पुत्र फक्त स्वतःसाठी न जगता आजूबाजूच्या,परिस्थितीने हतबल झालेल्या अनेक मुलांना मदतीचा हात देतो. इतर इजूना मदत करण्यासाठी आव्हान करतो. आज या इजू ला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले पण ज्या इजूनी भोगलेले गरिबी,कष्ट, दुःख, वेदना तसूभरही कमी न होता इजूच्या रूपात आत्मकथन तयार झालं. आत्मकथन लिहीताना इजूला असह्य यातना होत असल्या तरी इंगळी डसल्याप्रमाणं इजूने झेलत सहन करत आज खंबीरपणाने इजू आत्मकथन जगासमोर ठेवलं.
           खरंच आजच्या काळातील तरुणांना जे व्यसनाच्या आहारी गेले अशा तरुणांना प्रेरणा देऊन जाणार आत्मकथन आहे. अनेक इजू वर प्रकाश टाकणारे आत्मकथन सर्वांनी आवर्जून वाचावे असेच आहे.
            लेखक/ कवी /विजय वडवेराव यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .....!!

इजू खरेदीसाठी संपर्क क्रमांक.9075159142

समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
कु.मीनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
तालुका- जिल्हा वाशिम
पीन ४४४५०५
मो.9767663257

Saturday, 20 March 2021

बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे 'माझे गाणे आनंदाचे'

 बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा बालकवितासंग्रह म्हणजे-'माझे गाणे आनंदाचे'

        लहान मुलांना गाणी, गोष्टी आणि खेळ खूप आवडतात. अगदी बाळं लहान असल्यापासून आई बाळाला आपल्या मांडीवर घेऊन अंगाई म्हणत असते. त्यामुळे बाळ मांडीवर झोपी जाते. एखादं मूल रडत असेल तर त्याच्या समोर कोणी गाणं म्हटलं तर मूल लगेचच रडायचे थांबते. गाण्याकडे लक्ष केंद्रित होते. बोबड्या स्वरात अंगणवाडीत बडबड गीत म्हणणाऱ्या बालकांना खूप छान छान गाणी येतात. त्यातल्या त्यात प्राणी-पक्ष्यांचे जास्त आकर्षण असते. प्राणी-पक्षांवरचे गीत लगेचच तोंडपाठ होतात. अशाच गीतांचा खजिना म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कवी डॉ. कैलास दौंड यांचा काव्यसंग्रह 'माझे गाणे आनंदाचे' हा बालकविता संग्रह नुकताच वाचनात आला. या बालकाव्य संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर, देखणे व बोलक्या स्वरूपाचे आहे.आनंदाने नाचणारी, बागडणारी मुलांचे चित्र सुरेखपणे धर्मराज आव्हाड सर यांनी रेखाटले आहेत. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अनुराधा प्रकाशन पैठण, औरंगाबाद यांनी केले असून पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड,मुंबई यांनी केली आहे. या संग्रहाची प्रथम आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२० ला म्हणजे बालदिनी झाले असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ पन्नास रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता बालकांना वाचनाची गोडी लावणा-या आहेत.
           कवी डॉ. कैलास दौंड यांनी आजवर मोठ्यांसाठी ललित,गद्य ,कादंबरी,कथा असं खूप लिहिलं यांची बरीच साहित्यसंपदा आहे. ४ काव्यसंग्रह, ३ कादंबऱ्या, १ ललित लेखसंग्रह, १ बालकाव्यसंग्रह,१ बालकथासंग्रह अशी एकूण त्यांची ११ पुस्तके प्रकाशित आहेत. पण बालकांसाठी मात्र त्यांचे एकही पुस्तक नव्हतं.पण बाल कविता लिहिलेल्या होत्या त्यामुळे 'माझे गाणे आनंदाचे' हा बालकवितासंग्रह बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा व बालकांना वाचनाची गोडी निर्माण करणारा आहे.
         विद्यार्थ्यांना आवडणारे माळरान, डोंगर, फुले, परी, पाऊस, पक्षी,सूर्योदय, स्वच्छता, आभाळ, माझे गाव, स्वप्नातील शाळा, गट्टी फू, थोडे फिरायला जाऊ, माझे आनंदाचे गाणे, शिवाशिवीचा खेळ इत्यादी बालकविता बालकांच्या नाजूक अंतर्मनाला हळुवारपणे स्पर्श करणाऱ्या बालकांचे मन गुंतविणा-या वाचनप्रिय आहेत. त्यात प्रत्येक कवितांमध्ये सुंदर सुंदर चित्रे रेखाटली असल्याने बालकांचे देहभान विसरल्याशिवाय राहणार नाही.

                 झाली सकाळ 
                 पडलं ऊन 
                 आळस गाणं
                  जाऊ द्या जुणं
                  मोकळं रानं
                  दूरच दूर 
                  पाखरं गाणं
                  ऐकूया सूर
                  सोन्याचं ऊन
                  आलया दारी 
                  घाम गाळून
                   करू न्याहरी...!!

         वरील ओळीतून अगदी साध्या शब्दांत पंचाक्षरी मध्ये केलेली दौंड यांची कविता बालकांना साद देऊन जाते. खूप काही शिकवून जाते. सकाळी पडलेलं कोवळं ऊन आळस झटकून काढायला शिकवते. आकाशाचे, सूर्याचे निरीक्षण करायला शिकवते. मोकळं रान दूरच दूर म्हणजे पहाटेच्या समयी मोकळ्या रानी पक्षांची गाणी,पक्षांचा आवाज, चिमण्यांचा चिवचिवाट,पोपटी मैना,कोकीळेची मंजुळ गाणी, कावळ्याची कावकाव इत्यादी नादमयी सूर बालकांना ऐकायला मिळते. सोन्यासारखं ऊन दारी आल्यावर माणसाने कामाला लागलं पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे.घाम गाळलं पाहिजे.मगच न्याहारी म्हणजे सकाळचा नाष्टा केला पाहिजे अशी शिकवण देणारी कविता सानथोरांसह मनाला भावते.
        
        चाफ्याचे झाडं वाट पाहुन थकली 
        पूजेला फुलं त्यानं खाली टाकली.

            वरील ओळींमधून निसर्गाची अदभूत किमया, निसर्गसौंदर्य, डॉ. कैलास दौंड जवळून ओळख करून देतात. सोबतीला चित्र असल्यामुळे कविता आणखीन खुलल्या आहेत. कवी कैलास दौंड यांच्या प्रत्येक कवितेतून निसर्गसौंदर्य झऱ्याप्रमाणे खळखळून वाहत आहे. चाफ्याच्या झाडाला आलेला बहर वाट पाहून फुले थकले आणि सकाळी पूजेसाठी खाली टाकली.बहुतांश फुले सकाळी उगवतात. सकाळी सकाळी आई आपल्या बाळाला उठवायला येते. तेंव्हा आईचा स्पर्श बालकांना मोरपिसासारखा वाटतो. असं प्रत्येक बालकांच्या ठायी असलेले भावना कवी डॉ.कैलास दौंड अगदी सराईतपणे मनाने बालक होऊनच लिहीत आहेत. असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

            गच्चीवर जेव्हा झोपली मुलं 
           आकाश अलगद खाली आलं 
           अनुभवविश्व मग झालं खुलं 
            चांदण्यांची झाली मोहक फुलं
            ऐकून मुले पेंगू लागली 
             नक्षत्र नावे सांगू लागली 
             गाव शहर की जणू बेट दिसतं 
             आकाश किती मोठ्ठं असतं
             मात्र प्रत्येक रात्री भासतं नवं
             रोज निरखून बघायला हवं...!!

          रात्रीला मूल अंगणात किंवा गच्चीवर झोपले की त्यांना खुलं आकाश खाली आल्यासारखं वाटतं अनोखं विश्व त्यांच्यासमोर खुलं होतं. संपूर्ण आकाश चांदण्यांनी भरलेलं पाहून बाल मनाला आनंद होतो. आकाशाकडे,चंद्राकडे बोट दाखवून बाळं खुणावत असते. चांदण्या जणू त्याला फुलासारख्या वाटायला लागतात. पण ही अजब दुनिया शहरातल्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या बालकांना पाहायला मिळत नाही कारण फ्लॅटमध्ये चार भिंतीच्या आतच विश्व असतं. बालपणीची खरी मजा ग्रामीण भागातच. चांदण्यांनी आकाश जणू बेट दिसतं आणि मोठ्ठं वाटायला लागतं.प्रत्येक रात्री नवीनच दिसतं पण त्यासाठी रोज रात्री आकाश निरखून बघायला हवं असं कवीमनाला वाटते.
           लहान बालकांना आई-बाबा इतकेच आजी-आजोबा प्रिय असतात. आजी आजोबा त्यांना खूप आवडतात कारण सर्वात जास्त लाड आजी-आजोबा करतात. आजी आजोबा छान छान गोष्टी सांगतात. आजी छान छान गाणी म्हणते. बोटाला धरून शाळेत नेते. म्हणून तर म्हणतात 'बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' बालपणीचे खेळ खूप भन्नाट असतात.लहान मुलांचे रुसणे, फुगणे सुद्धा खूप छान असते. प्रत्येकाला आपलं बालपण आठवायला लागतो आणि नकळत 'माझे गाणे आनंदाचे' हे बालकाव्य वाचल्यावर वाचक ही बालवयातच गुंतत जातो. बालपणीच्या आठवणींना नवीन उजाळा मिळतो म्हणून प्रत्येक कविता आनंदाची आहे.उत्साहाची आहे.
          कवी डॉ. कैलास दौंड यांची बालकाव्यप्रतिभा कांही औरच आहे. एका वेगळ्या शैलीची आहे. कुठल्याही अलंकारिक भाषेचा वापर न करता, सरळ साधी भाषा, भाषेमध्ये भरलेले निसर्गसौंदर्य, बालकांचे भावविश्व, बालकांच्या बालविश्वाशी संबंधित कवितेनुसार रेखाटलेली सुरेख चित्रे, भाषेची मधुरता,आपुलकी भाव, बालकांचे गाव, माती,इवले इवले फुलं, फुलपाखरं, सर्व पक्षी, रंगांची ओळख,आकाश निरीक्षण,पाऊस, वारा,गारा,कागदाच्या होड्या,खेळ अगदी मोजक्या शब्दांत बालमनाला पेलेल, आवडेल अशा शब्दांमध्ये व्यक्त होण्याची कला डॉ. कैलास दौंड यांना निसर्गात:च मिळाली आहे. फक्त प्रत्येक पालकांनी अशी वाचन प्रिय असणारी पुस्तक आपल्या बालकांना देऊन संधीच सोनं करावं इतकच.
       कवी कैलास दौंड यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!

समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता. जि. वाशिम
मो.9767663257

Tuesday, 16 March 2021

शरद कवठेकरांच्या वेदनेचा हुंकार म्हणजे निष्पर्ण वेदना'

 *शरद कवठेकरांच्या वेदनेचा हुंकार म्हणजे-निष्पर्ण वेदना*

             आपल्या मनातली वेदना जेव्हा बोलून दाखवता येत नाही. तेंव्हा कवितेचा जन्म होतो. कवीचं मन तसंच असतं.तो निराशेकडून -आशेकडे नेणारा,अंधाराकडून- प्रकाशाकडे नेणारा, असत्याकडून -सत्याकडे नेणारा एक मार्ग असतो. तोच खरा आत्मविश्वास असतो.  निष्पर्ण झालेल्या वृक्षाला नवीन कोवळी पर्ण फुलावीत. अगदी त्याप्रमाणेच कवीचे शब्द शब्दबद्ध होतात आणि कवितेचा जन्म होतो. अशाच वेदनेचा हुंकार म्हणजे पुण्याचे ज्येष्ठ कवी शरद कवठेकर सर यांचा काव्यसंग्रह 'निष्पर्ण वेदना'  हा नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर पर्ण नसलेल्या वृक्षासोबत वेदना मांडणारे आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन यांनी १ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित केले आहे. नावाला साजेसे सुंदर चित्र प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून प्रस्तावना आदित्य अ. जाधव यांची लाभली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता स्वतःचा शोध घ्यायला लावणा-या आहेत.

       कुठे वृक्ष तर कुठे  हिरवळलेली वाट 
       याच वाटेवरून गेल्या कित्येक दिवसापासून चालतोय
        स्वतःच्याच मर्जीन हा मार्ग निवडलाय
        कधी एकटाच चाललो तर कधी समूहात
        रस्ता हरवलो तरीसुद्धा
         वाट तुडवतच राहिलो
         खाच-खळगे मागे टाकत राहिलो न
         पुढे पुढे जातच राहिलो 
         अगदी सराईतपणे....!!

           वाटेसाठी चालणं नसते. चालण्यासाठी वाट असते. या उक्तीप्रमाणे कवी शरद कवठेकर  स्वतःच स्वतःची वाट शोधीत निघाला आहे. कित्येक दिवसापासून.. 'जो थांबला तो संपला' या उक्तीप्रमाणे कवी कधीच थांबत नाही. मनात एक आशेचा किरण घेऊन एकटाच चालला आहे. कधी हरवतो तरीसुद्धा. कधी चालणं थांबत नाही. ती वाट तुडवीत प्रकाशाच्या शोधात अविरतपणे चालू आहे. चालताना वाटेत असंख्य खाच-खळगे लागतात. आयुष्याच्या चढ-उतारावर सुद्धा सुख दुःख झेलीत जावे लागते. अगदी त्याप्रमाणेच कवी पुढे पुढे जातोय. अगदी सराईतपणे. आयुष्यात कसलीही तक्रार न करता, रूक्ष वाट टाळून हिरवळलेली वाट शोधत. आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी आयुष्याचा खडतर प्रवास अविरतपणे कवी शोधत शोधत पुढे पुढे जातो आहे. पण मनामध्ये प्रचंड आशावाद ठेवून जन्म-मृत्यूचा अर्थ लावीत सुखाचे क्षण वेचीत, जखडलेला श्वास त्या मूक समाधीवर जन्ममृत्यूच्या प्रतिबिंबातला काळोख त्याचा अर्थ उलगडत. सत्याची साक्ष देत देहातला हुंकार ग्वाही देत, कवी नवा अर्थ शोधतो आहे.
          
       झाडाच्या शेजारी झाडं
       इकडे झाडं तिकडे फक्त झाडेच झाडे 
        गावात झाडे ,जंगलात झाडे
        वस्तीत झाडे,मनात झाडे 
        झाडं हळुवार हिरवीगार सावली धरतात एकमेकांवर
        झाडं कधी हल्लाबोल करत नाहीत
         कधी कोणाची चेष्टा करत नाहीत
         कधी दुसऱ्या झाडावर घाव घालत नाहीत.

           वरील ओळींमधून कवी झाडाचे महत्व सांगतो आहे.आज स्वार्थी माणूस मात्र झाडांच्या कत्तली करत सुटला आहे.पूर्वी सर्वत्र झाडेच झाडे दिसायची. गावात झाडे वस्तीत झाडे, मनात झाडे. झाडं माणसाला फक्त सावलीच नाही तर अनेक औषधं सुद्धा देतो. पाने, फुले, फळे, डिंक इत्यादी बरोबरच शुद्ध,मोकळी ताजीतवानी हवा देतो. झाड कधी हल्लाबोल करत नाही. मी तुला इतके दिले असं कधीच म्हणत नाही. झाड कुणाची चेष्टा करत नाही. कधी दुसऱ्या झाडावर घाव घालत नाही. झाड सदैव परोपकारी असतं. माणसाने सुद्धा झाडासारखं वागलं तर असा सवाल कवीमनाला पडतो आहे.

         बंद क्षितीजाच्या तटबंदी ओलांडून 
         संथ श्वासाचा झरा
         अलगत अलगत पार करत 
          ढगांचे वांझपण सोबती घेत 
          ती आली.... 
          कांही निष्पर्ण वेदना घेऊन आली 
           माझ्याशी फितुरी करत करत आली 
           गाभा-यातला पाचोळा तुडवत आली
           तो श्वासाचा झरा 
            त्या निष्पर्ण वेदना...!!

          मानवी मन देहाच्या तटबंदी ओलांडून सतत फिरत असतं. सोबतीला संथ श्‍वास असतोच. मनामध्ये असलेली 'ती' ला  शोधत निघतो. ती येते खरी पण काही निष्पर्ण वेदना घेऊन. कवी मनाशी फितुरी करत नाजूक कोवळ्या मनाचा गाभारा तोडून. न दिसणाऱ्या निष्पर्ण वेदना देऊन जाते.
          कवी शरद कवठेकर यांच्या सर्वच कविता मुक्तछंदातल्या असल्या तरी लाघवी आहेत. भाषेच्या सौंदर्यापेक्षा, सत्याने गुंफलेलल्या आहेत.मानवी मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करणार-या आहेत. अर्थ शोधणा-या आहेत. साद घालणा-या आहेत. वरवरच्या अविर्भावात जगण्यापेक्षा अस्तित्वाचा शोध घेणा-या आहेत. कविता वाचकाला भुरळ घालणाऱ्या आणि विचार करायला लावणार्‍या, जीवनाचा अर्थ शोधणा-या आहेत.

          दगडाचा देव आणि आम्ही ह्या
          दगडी देवालाच फुले वाहतो 
          दगडालाच तेलातूपानं न्हाऊ घालतो
          दगडाला गोडधोडाचा नैवेद्य 
          आणि आम्ही मात्र उपाशीच 
           प्रत्येकाचाच दगड वेगवेगळा 
           कुणाचा दगड मंदिरात तर 
           कुणाचा दगड उघड्या बोडक्या
           माळरानातल्या कुठल्याशा झाडाखाली
           दगडाची पूजा... दगडाला शेंदूर बुक्का
           या दगडांच्या देशात माणूस ही झालाय दगडं...!!

         वरील ओळीतून अगदी खोल अर्थ असणार्‍या पण डोळस भावना संवेदनशील मनाचा कवी शरद कवठेकर म्हणतो दगडाचा देव आणि आम्ही दगडाच्या देवाला फूले घालतो. दगडालाच तेलातूपान न्हाऊ घालतो. दगडालाच गोडधोडाचा नैवेद्य दाखवतो, पण आम्ही मात्र उपाशी आज आपण पाहतो मंदिराच्या बाहेर कितीतरी मुलंबाळं, अपंग, उपाशीपोटी बसलेले वृध्द दिसतात आणि त्याच मंदिरात दगडाच्या मूर्तीवर कितीतरी दूध ओतले जाते. सर्वच्या सर्व दूध वाया जाते पण भुकेल्या बाळाला कोणी तेच दूध देत नाही. कारण माणूस ही दगड झालाय माणसाचं मन सुद्धा दगडासारखं झाले अशी खंत कवी शरद कवठेकर व्यक्त करताना दिसतात.
      जखम, आर्त क्षण, प्रश्नचिन्ह, बेभान, मनातले भाव,मी, अंधार, आठवणी, आपल्यातलाच कुणीतरी, रिकामी ओंजळ, वेदना, आठवणीची पाखरं, बिंब भावनांचे, जळकं रान, दुःखाचा पाऊस इत्यादी कविता माणसाचा शोध आणि बोध घ्यायला शिकवणा-या आहेत. वास्तववादी विचारांच्या आहेत.डोळसपणे सत्य सांगणा-या आहेत. प्रत्येक कवितेचं स्वतंत्र विश्व आहे. प्रत्येक कवितेत एक वेदना आहे. एक हुंकार आहे.प्रत्येक कविता विचार देऊन जाते आणि विचार करायला भाग पाडते.

          कवी शरद कवठेकर यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....!!

समीक्षिक /लेखिका /शिक्षिका /कवयित्री 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
तालुका -जिल्हा वाशिम
मो.9767663257

Sunday, 14 March 2021

जीवनाचा वेध घेणाऱा काव्यसंग्रह म्हणजे-जीवन संघर्ष

 *जीवनाचा वेध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवन संघर्ष*

             जो माणूस जीवनात संघर्ष करतो. तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जीवनात खूप संघर्ष केला म्हणून ते यशस्वी व्यक्ती ठरले. सांगली जिल्ह्यातले कवी नवनाथ रणखांबे यांचा जीवन प्रवास हाच एक जीवन संघर्ष आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या शिकवणी पासून प्रेरणा घेऊन तथागत बुद्धांच्या समतामूलक अष्टांग मार्गाने प्रेरित होऊन,अन्यायमूलक व्यवस्थेशी संघर्ष करत,शोषणमुक्त,भयमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा देते आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अहंकाराला मूठमाती देतो. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे अतिशय सुंदर, गरुड भरारी घेणाऱ्या गरुड पक्षाचे आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शारदा प्रकाशन ठाणे यांनी केले असून प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर शहाजी कांबळे यांची लाभली आहे. प्राध्यापक दामोदर मोरे सरांनी पाठराखण केली असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ८० रुपये आहे पण यातल्या सर्वच कविता जीवनाचा वेध घेणा-या आहेत.
          कवी नवनाथ रणखांबे सरांचे जीवन अतिशय संघर्षमय झाले असून त्यांचे वडील बाबासाहेबांच्या विचारांनी भारावून गेले असल्याने शैक्षणिक वाटचालीत बारकाईने लक्ष दिले. घरात शैक्षणिक वातावरण निर्माण केले. पोटाची भूक भागविण्यासाठी वेळप्रसंगी मोलमजुरी केली आणि ज्ञानाची भूक भागविण्यासाठी थोरामोठ्यांची पुस्तके वाचून घेतली. चरित्रे सांगून मुलांसमोर विचारवंताचा आदर्श ठेवला आणि मुलांना प्रोत्साहन देत गेले. आज वाढत्या तंत्रज्ञानाच्या या ग्लोबल दुनियेत आजची मुले पुस्तके हाताळताना दिसत नाहीत. सतत हातात स्मार्टफोन घेऊन रात्रंदिवस गेम खेळताना दिसतात. परिस्थिती कशीही असो त्यावर मात करून पुढे जाता आले पाहिजे. कवी नवनाथ रणखांबे यांच्या काव्यसंग्रहातून हेच दिसून येते.

             माय तुला मी पाहिलंय...
             माय तुला मी पाहिलंय... 
             अन्यायांनी पेटलेल्या 
              गेहिच्या परक्यांनी
              तुझ्या गेहाला बेघर केलंय
              अन उसवलं घरदार 
              आभाळ फाटले....
              माय तुला मी पाहिलंय.... माझ्या स्मृतीने...

              वरील ओळीतून कभी नवनाथ रणखांबे यांनी त्यांच्या आईचा जीवनसंघर्ष स्वतः पाहिला आहे. अनुभवला आहे.कवीने अन्यायाविरुद्ध त्यांची आई लढताना पाहिले आहे. घराचे वेगळे होताना... आभाळ फाटताना, वेदना होताना पाहीलंय. कवीच्या आजींनी जमीन गहाण ठेवलेली आईने संघर्ष करून सोडवून घेतली. वेळ प्रसंगीमोलमजुरी केली. कष्टातून स्वप्ने फुलवली. अन्यायाला जाळण्यासाठी कवीला वकील केले. संघर्षमय प्रवास कवी आपल्या लेखणीने शब्दबद्ध करतो कवितेच्या रूपात... इतरांनीही प्रेरणा घेण्यासाठी.. माय तुला मी पाहिलंय याकवितेतून संवेदनशील मनाचा कवी व्यक्त होतो.
         कवी नवनाथ रणखांबे सरांच्या सर्वच कविता मुक्तछंदातल्या असल्या तरी इतरांना प्रेरणा देणार्‍या, न्याय व हक्काने दाद मागणाऱ्या आहेत.वास्तवाचे दर्शन घडवणा-या आहेत. संघर्षमय जीवनाची वेदना मांडणा-या आहेत. अन्यायाविरुद्ध पेटून उठणा-या या कविता दिसून येतात.
       
          वाढल्या अडचणी , ढळलेला तोल 
           बिघडला क्रम, अवर्षण गोल
           सजीवांना जीवन संघर्ष संकटे 
           अडचणीने आवळला फास जगण्याचा 
           तारांबळ उडाली जिवांच्या जगण्याची....!!

        मानवाच्या अतिस्वार्थी वृत्ती मुळे आज जंगलाचा ऱ्हास होतोय. मोठमोठी जंगले संपुष्टात येत आहेत. कित्तेक वृक्ष तोडून तिथे सिमेंट काँक्रीटच्या टोलेजंग इमारती होत आहेत.त्यामुळे निसर्गाचे चक्र पार बदलून गेले आहे. समतोल ढळला आहे. त्यामुळे अडचणी वाढल्या. अवर्षणाचा सामना मानवाला आज करावा लागत आहे. प्रत्येक सजीवाचे जीवन संकटात सापडले आहे. वन्यप्राणी जीवन नष्ट होत चालले आहे. सजीवांना संघर्ष करावा लागत आहे. वन्य पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे. अशी आर्त हाक पेशाने वकील असणाऱ्या पण संवेदनशील मनाच्या कवीने आपल्या काव्यातून मुर्दाड मने झालेल्या माणसांना देतो आहे.

                  बा माझा ओरडला 
                  लेका आज पासून तुझी
                  शिक्षण हीच आई 
                  करियर हाच बा
                  मुंबई हीच पंढरी
                  परत आला माघारी
                  तर तंगड तोडीन
                  करिअर करून आल्यावर 
                   पारावर तुझा बॅनर लावीन
                   चावडीवर सत्कार ठेवीन
                    वाजत-गाजत मिरवणूक काढीन...

          वरील ओळींमधून नवनाथ रणखांबे यांच्या वडिलांचे त्यांच्या शिक्षणावर असलेले बारीक लक्ष दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अगदी त्याचप्रमाणे कवीचे वडीलही कवीला खडसावून सांगतात की शिक्षण ही तुझी आई आणि करियर हा तुझा बा तू मुंबईला जा परत माघारी येऊ नकोस. परत घरी आलास तर तंगड म्हणजे पाय तोडून टाकीन आणि करियर करून आलास तर गावच्या पारावर तुझा बॅनर लावीन. चावडीवर सत्कार करीन. वाजत गाजत तुझी मिरवणूक काढीन. कष्टकरी बाप आपल्या लेकराला योग्य वयात योग्य दिशा दाखवतो. वेळ प्रसंगी घरातून काढून देतो. केवळ आपल्या मुलाने करिअर करून स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून. समाजात ताठ मानेनं जगावं अशी ज्या बापाची तळमळ होती त्याचा लेक आज शिकून वकील झाला आहे. ही अभिमानास्पद बाब वाखाणण्याजोगी आहे.
           कवी नवनाथ रणखांबे यांच्या प्रत्येक कवितेतून संघर्ष दिसून येतो.त्यांची कविता पान सुपार्‍या खाऊन टप-यावर थांबणा-या, मोटरसायकलवरून इकडून तिकडे बोंबलत फिरणाऱ्या तरुणाईला प्रेरणा देणा-या आहेत. जगायला शिकवणाऱ्या, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या, माय बापाचं ऋण व्यक्त करणाऱ्या, विषमतेची दरी बाजूला सारणाऱ्या, मानवतेला पोसणाऱ्या, उपाशी पोटाची व्यथा मांडणाऱ्या, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता शिकवणाऱ्या, जातीचे मळभ दूर लोटणा-या, माणसाला माणसाशी माणसासारखं जगायला शिकवणाऱ्या, आत्मीयतेचा शोध घेणाऱ्या, माणसाला शहाणपण शिकवणा-या, अन्यायावर प्रहार करणाऱ्या, लेखणीच्या धारदार शस्त्राने प्रहार करणाऱ्या, जीवनाचा वेध घेणाऱ्या एकूण ४६ कविता जीवन संघर्ष करायला शिकवणा-या आहेत. सर्वांनी आवर्जून वाचाव्यात अशाच आहे.
               कवी नवनाथ रणखांबे सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!

समीक्षिका/लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
 कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Saturday, 13 March 2021

meenakshinagraleblogspot.com: सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्का...

meenakshinagraleblogspot.com: सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्का...: सर फाऊंडेशन चे वाशीम जिल्हा नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर कारंजा  - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व म...

सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर...

सर फाऊंडेशन चे वाशीम जिल्हा नारीशक्ति सन्मान पुरस्कार जाहीर
कारंजा  - स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन अर्थात सर फाऊंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त वाशीम जिल्ह्यातील आठ  कर्तृत्ववान शिक्षिकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ति सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे,अशी माहिती वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे
व जिल्हा समन्वयक  गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे यांनी दिली.लवकरचं कोव्हिड परिस्थितीचा  विचार करुन नियम पाळुन पुरस्काराचे  ऑनलाइन वितरण होणार आहे. शिक्षिका म्हणून कार्य करत असताना शाळा स्तरावर विविध नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून अध्यापन,सामाजिक कार्यातील सहभाग व कोविड काळातील योगदान याचा विचार करुन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.यावर्षीच्या वाशीम जिल्हा पुरस्कार विजेत्या
मंजुषा लहाबर कारंजा,मिनाक्षी नागराळे वाशिम
,प्रा.सविता मोरे मंगरुळपीर,
उषा हाडे रिसोड,
आश्विनी कुलकर्णी मानोरा,
गीता खंदारकर मालेगांव,
नीशा खुमकर कारंजा,
व श्वेता पळशीकर वाशिम
यांची निवड झाली आहे. ही निवड वाशीम जिल्हा महिला समन्वयक  
कु.नीता तोडकर खाडे व जिल्हा समन्वयक गोपाल खाडे व विजयकुमार रौराळे
यांनी ह्या निवडसमितीत काम पाहले. निवडीबद्दल सर फाऊंडेशनचे महिला राज्य समन्वयक सौ. हेमा शिंदे(वाघ),  राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

खरी विद्येची देवता सावित्रीमाई फुले...

 *खरी विद्येची देवता- सावित्रीमाई फुले*

ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म बाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. 
            सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
             १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.

           शिका शिका रे विद्या शिका
           मनूचे काही ऐकू नका !
           कोणी मागे राहू नका 
            विद्या शिकूया ज्ञान घेऊया 
             एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!

                या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.

           फुले असूनी काटे वेचिले
           घेतला शिक्षणाचा ध्यास 
            तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
          आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!

               सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
                 जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
            ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या. 

          धोंडे मुले देती| नवसा पावती|
         लग्न का करती | नारी नर ||
    
                दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
         
             तुझ्या कार्याचा वेलू 
             मी गगनाला नेईन
             तुझ्या विचारांचे गुट्टी
            मी विद्यार्थ्यांना देईन

              तुझ्या कार्याची भाऊ
              किती गाऊ गौरवगाथा 
              धन्य धन्य ती साऊ 
             तुझचरणी विनम्र माझा माथा...!!

       जय ज्योती....
          जय क्रांती....
            जय सावित्रीमाई....!!

*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७

Wednesday, 3 March 2021

शिवा काशिद (स्वराज्याचा मावळा)

*शिवा काशीद*



शिवा काशीद हो वीर

होते ते प्रतिशिवाजी

रयतेच्या सुखासाठी

लावी जिवाजी हो बाजी....!



दिसायला हुबेहुब

शिवराय दिसायचे

शिवा काशीद पाहून

सारे जन फसायचे.....!



सिद्दी जोहरने त्यास

शिताफीने पकडले

नाही तो खरा शिवाजी

सिद्दी मगच कळाले....!



पोशाखही शिवाजीचा

शिवा काशीद सजले

गड विशाळगडी म्हणे

महाराज पोहचले.....!



काशीदांना पकडले

खूपसली तलवार

सिद्दी जोहरचा राग

जाला होता अनावर....!



पन्हाळगडाच्या खाली

समाधीचे घे दर्शन

शिवा काशीद मावळा

मन होईल प्रसन्न.....!



शूरवीर काशीदांना

करी मानाचा मुजरा

इतिहास घडवला

शिवा काशीद रे हिरा...!!



नेबापूरी हो स्मारक

शिवाजीने रे बांधले

यशवंत मुलग्यास

अधिकारी हो नेमले...!!



स्वराज्यासाठीच दिले

काशीदने बलिदान

गुप्तहेर खास होते

त्यांनी अप्रिले हो प्राण....!!



हिरा एक गमावला

प्रति शिवाजी हो गाजे

सिद्दी कंटाळून गेला

नाही सापडले राजे...!!

कवयित्री/लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
(ही कविता 'स्वराज्याचे मावळे' या ऐतिहासिक काव्यसंग्रहात प्रकाशित असून नागराळे यांच्या फेसबुक,वृत्तपत्र व ब्लॉगवर प्रकाशित झालेली आहे.कविता आवडल्यास मुळ लेखकाच्या नावाने फॉरवर्ड करावी.... कोल्हापूरचा अजित सावंत स्वत:ला शिवभक्त म्हणणा-या चोरट्याने स्वत:च्या नावावर खपवण्याचा प्रकार उघडीस आला आहे...कायद्याने कॉपी राईट चा गुन्हा दाखल होऊ शकतो याची दक्षता घ्यावी) 










Tuesday, 2 March 2021

उडनपरी-कालची 'ती' आणि आजची 'ती' भारताची सुवर्णकन्या - हिमा दास

*उडणपरी-कालची 'ती' आणि आजची 'ती'*

*भारताची सुवर्णकन्या-हिमा दास-गोल्डन गर्ल*

            पूर्वीचा एक काळ होता. त्या काळात स्त्री फक्त चूल आणि मूल करत होती. सावित्रीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षण मिळत नसे. शिक्षणाची मक्तेदारी फक्त उच्चवर्णीयांकडेच होती. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अखंड समर्पक सेवेमुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेताना आपल्याला दिसत आहेत.आजच्या सावित्रीच्या लेकींनी आकाश कवेत घेतले आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी हे जग व्यापून टाकलं आहे.
      
            "आकाशाला कवेत घे 
            अशी तू भारतीय नारी 
             प्रयत्नांनी घे गरुडभरारी 
             दे उद्याला यशाची ललकारी....!!"

     या वरील उक्तीप्रमाणे कालची 'ती' ने आजच्या 'ती' ला  पार बदलून टाकले आहे. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये अनेक स्त्रियांनी बाजी मारलेली आहे. आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे -काल परवाच उडीसा सरकारने जिल्हा (डीएसपी) पोलिस उपअधीक्षक बनवले आहे. असे जिचे कर्तुत्व, भारताची उडानपरी,भारताची सुवर्णकन्या म्हणून अख्ख्या जगाला जी ची ओळख झाली ती 'हिमा दास' होय. जिला गोल्डन गर्ल म्हणून आज ओळखले जाते. ही भारताची पहिली सुवर्णकन्या ठरली आहे. ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू, जागतिक स्पर्धेतील पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पूनिया यांच्या मागोमाग आता गोल्डन गर्ल 'हिमा दास' हिच्यामुळे जगात भारताची मान या सावित्रीच्या लेकीमुळे आज अभिमानाने उंचावली आहे.
            हिमा दास हिचा जन्म ९ जानेवारी २००० मध्ये  आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी या छोट्याशा गावात झाला. तिचे वडील रणजीत दास आणि आई जोनाली दास हे भात शेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. तिचे शिक्षण धिंग पब्लिक स्कूलमध्ये झाले. लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पण श्याम शुक्ल हक यांच्या सूचनेवरून हिमा दास ने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रशिक्षक शहा यांनी तिच्या नागाव स्पोर्ट्स असोसिएशन च्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमादास नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली. आणि तिने या क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली.ही स्पर्धा २०१८ मध्ये 'आशियाई क्रीडा स्पर्धेत' महिला ४०० मीटर धावणे मध्ये रोपे पदक मिळविले. या स्पर्धेत मिश्र रिले ४×४०० मीटर मध्ये रोप्य पदक मिळविले.आणि २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला रिले ४×४०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तेंव्हा भारत सरकारने हिमा दास यांना अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांनंतर IAAF जागतिक २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला ४०० मीटर मध्ये हिमाने एक सुवर्णपदक जिंकले.आणि २०१९ मध्ये विविध स्पर्धेमध्यें खालीलप्रमाणे यश संपादन केले.

पदक.            २०१९मधील विविध स्पर्धा.            महिला 
सुवर्ण          पोझनान ॲथलेटिक्स.                      २००मीटर
                                       
 सुवर्ण         कुत्नो ॲथलेटिक्स स्पर्धा, .        २०० मीटर
                   पोलंड महिला 

सुवर्ण            टाबोर स्पर्धा,                    महिला २०० मीटर
                     चेक प्रजासत्ताक

सुवर्ण           क्लादनो स्पर्धा,               महिला २०० मीटर
                    चेक प्रजासत्ताक 


 सुवर्ण           नोव मेस्टो ग्रांप्री, 
                    चेक प्रजासत्ताक            महिला ४०० मीटर

     अशा अनेक स्पर्धेत एकूण सहा सुवर्णपदक व दोन रोप्य पदक मिळवणारी हिमा दास ने बालपणीचे स्वप्न पूर्ण केलं.

        "जिंकण्याची उमेद हवी 
        हरण्याची तमा नसावी
        सातत्य व प्रयत्नांनी 
         जिंकण्याची जिद्द असावी....!!"

                  अशा प्रसिद्ध धावपटू हिमा दास ला २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये आसाम पोलीस विभागात वयाच्या एकविसाव्या वर्षी पोलीस विभागात उपअधीक्षक डीएसपी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लहानपणी पाहिलेले पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न आज अखेर यशस्वी झालं. कालची 'ती' आज 'पोलीस अधिकारी पदावर' फक्त तिच्या कर्तृत्वाने सिद्ध झाली आहे. हिमा दास यांना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. गुवाहाटीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला त्या वेळी हिमादास म्हणाल्या "मी लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा होती मी हे स्वप्न पाहिलं होतं. शालेय दिवसापासूनच मला पोलिस अधिकारी व्हायचं होतं. माझ्या आईचे देखील हेच स्वप्न होतं. आई मला दुर्गापूजेच्या काळात खेळ म्हणून बंदूक घ्यायची आई म्हणते "पोलिसांची कामे करून मी चांगले माणूस बनावं"
            हिमा दासचं जेवढं कर्तृत्व तेवढंच दातृत्व सुद्धा दिसून येते. हिमा दास ने पहिला पगार कोरोना संकट काळासाठी आसाम सरकारला दान देणार आहे. इतकच नाही तर २०१८ मध्ये हिमा दास चा अपघात झाला. त्यावेळी तिला  जबर दुखापत झाली होती. तरी १८ महिन्यांच्या कालावधीनंतर हिमा दास ने पुन्हा खंबीरपणे आपले ध्येय साध्य करण्यासाठी, नवीन ऊर्जेने उभी राहिली. पहिल्या स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.इंडियन ग्रा.पी. २ च्या महिला गटात तीने हे यश मिळविले. आसाम मध्ये जेव्हा पूरस्थिती आली होती. तेंव्हाही हिमाने अर्धा पगार पूरग्रस्तांसाठी मदत केली होती. एका शेतकर्‍याच्या मुलीने खूप संघर्ष करीत सामाजिक व स्पोर्ट्स क्षेत्रात देशाचे नाव जगात मोठे केले. या हिमा दास ला कुणी उडनपरी म्हणून ओळखतं, तर कुणी सुवर्णकन्या म्हणून ओळखतं, तर कुणी गोल्डन गर्ल म्हणून ओळखतं...

            "ध्येय साध्य करण्यासाठी 
              उत्तुंग भरारी घेऊया 
              परिस्थितीवर मात करण्या
               बाणा करारी ठेऊया....!!"

      आजच्या काळातील तरुण मुला-मुलींनी हिमादास चा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा करारी बाण्याच्या सावित्रीच्या लेकीला, सुवर्णकन्येला, गोल्डन गर्लला मानाचा मुजरा...
खरं तर हा उत्सव तिच्या आत्मसन्मानाचा उत्सव फक्त एका दिवसाचा नसून सदैव तिच्या अस्मितेचा, तिच्या करारी बाण्याचा उत्सव ३६५ दिवस मनवला गेला तरी तोडकेच....!!

सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

लेखिका/समिक्षिका/शिक्षिका/संपादिका/कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७