*इजू एक धगधगती संघर्षगाथा. पुण्याच्या हनुमाननगर झोपडपट्टीतला आकी-आबाचा लाडका इजू वेळप्रसंगी फक्त पाणी पिऊन झोपणारा इजू. परिस्थितीला दोष न देता अंधारलेल्या आयुष्याला कष्टाचा मुलामा देत उजेडाच्या दिशेने जाणारा इजू .तर कधी बाल वयात हसून खेळून बालपण न घालवता कोवळ्या वयातील भावंड सांभाळण्याची जिमेदारी घेणारा इजू. दोन पैसे मिळवण्यासाठी भल्या पहाटे लवकर उठून पेपर टाकणारा, दूध पॉकेट पोचवणारा, बिगारी काम सुट्टीच्या दिवसांत करून दोन पैसे स्वाभिमानाने मिळवणार्या इजूचे आत्मचरित्र वाचकाला जगण्याची उमेद व प्रेरणा देऊन जाते.
पुणे जिल्ह्यातील विजय वडवेराव यांचे आत्मचरित्र इजू नुकताच वाचनात आले या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ शिक्षणाची जबरदस्त इच्छाशक्ती असणाऱ्या बालपणीच्या इजूचे आहे. सारवलेल्या हिरव्यागार जमिनीवर कोळशाचा बोरू करून आकी-आबा, शाळा असे लिहिणाऱ्या छोट्या मुलाचे म्हणजेच विजय वडवेराव यांच्या बालपणीचे आहे. अतिशय सुंदर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार सर यांनी चित्रित केले असून प्रकाशन परीस पब्लिकेशन पुणे यांनी केले आहे. जबरदस्त मुखपृष्ठ व उत्कृष्ट बांधणी असणाऱ्या या पुस्तकाची प्रथमावृत्ती २८ डिसेंबर २०२० रोजी प्रकाशित झाली. या आत्मकथनाचे मूल्य केवळ ४०० रुपये असून यातील जिद्द व संघर्ष प्रत्येक मालकाला प्रेरणा देणारी आहे.
आजच्या काळातील कवी,लेखक, संगीतकार, गीतकार, गझलकार,शिक्षक, एक बाप,एक मुलगा अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या विजय वडवेराव यांना आज सगळे जण ओळखतात पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी खाल्लेल्या खस्ता, त्यांची उपासमार, त्यांची गरिबी, त्यांचा संघर्ष प्रत्येक बालकाला प्रेरणादायी टॉनिक आहे. या पुस्तकाला प्रस्तावना म्हणजे लेखकाचे बाबा यांचा फोटो तर शुभेच्छा आमदार अमोल मिटकरी साहेबांच्या, तसेच महापौर मुरलीधर ओहोळ साहेब यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. तसेच विशालराजे बोरे वृत्तप्रतिनिधी, मुंबई दूरदर्शन यांच्याही शुभेच्छारुपी आशीर्वाद लाभला आहे. मलपृष्ठावर जन्मदात्या आकीने पाठराखण केली आहे. अगदी तिच्याच बोलीभाषेत तिच्याच लिपीमध्ये जगातली सर्वात ग्रेट लिपी आकीची लाभणं हे सुद्धा इजूचं मोठे भाग्यच आहे.
ज्या ठिकाणी देशातील पहिली मुलींच्या शाळेची सुरुवात झाली. ज्या फुले दाम्पत्यांने फुले असूनही काटे वेचिले आयुष्यभर. अशा सावित्री ज्योतिबाची शाळा ज्या वाड्यात भरत होती तो वाडा म्हणजे भिडे वाडा. आज समाजाकडून, शासनाकडून दुर्लक्षित झालेला होता. भिडेवाड्याची आत्मकथा... 'भिडे वाडा बोलला' या कवितेच्या माध्यमातून जगासमोर मांडणारे भिडे वाड्याची स्वच्छता करणारे आज भिडेवाडाकार म्हणून ओळखले जातात. विजय वडवेराव यांचे यापूर्वीचे 'वेशीवरचा दगड' (कवितासंग्रह) चंद्रही पेटेल, अक्षरबाग मधाळी(गझलसंग्रह) असे 2 गझलसंग्रह, बाभळीचा काटा (कवितासंग्रह )असे एकूण चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रत्येक पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार साहित्य निर्माण करून विजय वडवेराव हे साहित्यशिल्पकार ठरले आहेत.
कवी विजय वडवेराव यांचे कुटुंब मूळ मराठवाड्यातल्या धाराशिव( उस्मानाबाद) जिल्ह्यातील मसला खुर्द गावचे आहेत.ज्या मातीने लेखकाच्या वडिलांना पोसले त्याच मातीचा गंध त्यांच्या प्रत्येक शब्दांला आहे. दुष्काळामुळे वडवेरावांचं कुटुंब उपजीविका भागविण्यासाठी पुण्याला स्थाईक झाले.इजू वर उत्तम संस्कार करणारी त्याची आकीआबासोबत होते. संस्काराचं पांघरून, गरिबीचं अंथरूण, घरात खाणारी तोंडं जास्त आणि कमावणारे हात म्हणजे इजूचे बाबा व आकी काबाडकष्ट करून, रक्ताचे पाणी करून इजूला घडवलं. कापडात बांधून नेलेली चतकोर भाकर शाळेत इतर मुलं हसू नये म्हणून मुलांपासून दूर जाऊन मिरचीचा ठेचा व भाकर खाणारा आहे.जो गरिबी पुढे कधीच हतबल झाला नाही, कधी वाम मार्गाने गेला नाही, हे आजच्या इजूचं फलित आहे.
लेखकांनी इजू या आत्मकथनात गावाकडची साधी सोपी सरळ बोलीभाषा वापरल्यामुळे इजू हे आत्मकथन वाचताना थेट काळजाला भिडते आणि डोळ्यातून अश्रू तराळते. पण प्रत्येक शब्द न् शब्द काळजाला जाऊन भिडतो त्यामुळे प्रत्येक भाग वाचकाला वाचण्याची उत्कंठा वाढवून ठेवतो.विजू जणूकाही आपल्या समोरच दिसतो. त्याचं बालपण,त्याचं तरुणपण, त्यांनी केलेली कष्टाची कामं, साक्षात डोळ्यांसमोर एखाद्या पिक्चर प्रमाणे चित्र उभे राहते.खरतर इजू वर एखादा पिक्चर व्हायला पाहिजे. तसं झालं तर तीस वर्षाचा प्रवास तीन तासात बसवणं अवघडच पण चित्ररूपाने जर प्रदर्शित झाला तर सर्वात जास्त आनंद मलाही होईल. कारण वाचताना मला त्याचा अनुभव आला आहे. विजू वाचून जेवढं वाचकाचं मन हळहळतं, कसं कळवळतं असेल? याची कल्पनाच करायला नको.
बालपणी मूल जेंव्हा शाळेत जाते.तेंव्हा ते पार गांगरून जाते. त्याला मायेचा आधार आवश्यक असतो. लोकरे मॅडमचा प्रेमळ स्वभाव इजूला खूप आवडतो. कधीकधी तर आकीच्या रूपातच त्यांना पाहतो.इजूचे बालपण, बालपणीचे शिक्षक, मित्र, सवंगडी, शाळेच्या समोर पेरू विकणाऱ्या आजी, कॉलेज, नातीगोती,इजूची शाळा आणि तिचा हात धरून चाललेली गरिबी, संकटाला न घाबरणारी आकी, काबाडकष्ट करणारा आबा, परिस्थितीवर मात करत संघर्ष करणारा इजू.प्रत्येक भाग वाचून इजूच्या वेदना, कष्ट, दुःख, हाल-अपेष्टा इजूचं मन मारुन जगणं. मरण यातना भोगल्या सारखंच जीनं वाचून माणसाला माणुसकी कळते. गरिबी काय असते ते समजते. गरिबीचे चटके सोसणाऱ्या इजू आकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करतो आणि शेवटी सरकारी नोकरीला लागतो. प्रथम नियुक्ती शिक्षकांची म्हणून जेव्हा बीड जिल्ह्यात रुजू होतो तेंव्हा जातीपातीचा राजकारणावरून इजूला त्रास लोकशाहीत संविधानाची मान मर्यादा बाजूला ठेवते. शेवटी तिथून राजीनामा देऊन पुणे जिल्ह्यात जॉईन होतो.एक वेळ फाटकी चड्डी घालून शाळेत जाणारा इजू अंगात शाळेचा ड्रेस ही फुलं असताना भावाचा शर्ट अर्ध्या रस्त्यात ाण्यात बुचकळून अर्ध ओला अंगात घालत पळत शाळेला जाणारा इजू आजच्या अभ्यास न करणाऱ्या,बापाच्या जीवावर बुलेट घेऊन फिरणाऱ्या मुलांना चुंबकाच्या दिशादर्शक काट्याप्रमाणे दिशादर्शक ठरतो. आज आपण पाहतो आई वडील घरात अडचण नको म्हणून वृद्धाश्रमात आई-वडील नेऊन ठेवणार्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं,इजूचं आकी आबावरचं प्रेम मानवाच्या मेंदूतल्या मुंग्या जाळणारं आहे.
कॉलेज वयातली मुलं अनेक रंगीबेरंगी कपडे घालून स्वप्नांच्या दुनियेत माय -बापाच्या जीवावर उड्या मारत बुलेट गाडीवरून फिरणाऱ्या मुलांच्या घोळक्यात इजू उन्हाळ्याच्या सुट्टीत अंगभर कामाला जाऊन दोन पैसे कमावणारा स्वाभीमानाने ताठ जीवन जगणारा आहे. पण कधी कोणाकडे लाचारीने भीक मागितली नाही ना कधी गैर काम केले नाही. आज त्याच इजूने मान मर्यादा एक आदर्श शिक्षक, गझलकार,संगीतकार, गायक, कवी, लेखक अशा अनेक भूमिकेत आहे.जो आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे.एका कष्टकरी मजुरांच्या मुलांनं ज्या दिवशी नवीन कार घेतली. त्या दिवशी आकी दहा- दहा किलोमीटर पायी पायपीट करणाऱ्या आकीला इजून आपल्या कारमध्ये बसवलं. असा संस्कारी पुत्र फक्त स्वतःसाठी न जगता आजूबाजूच्या,परिस्थितीने हतबल झालेल्या अनेक मुलांना मदतीचा हात देतो. इतर इजूना मदत करण्यासाठी आव्हान करतो. आज या इजू ला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले पण ज्या इजूनी भोगलेले गरिबी,कष्ट, दुःख, वेदना तसूभरही कमी न होता इजूच्या रूपात आत्मकथन तयार झालं. आत्मकथन लिहीताना इजूला असह्य यातना होत असल्या तरी इंगळी डसल्याप्रमाणं इजूने झेलत सहन करत आज खंबीरपणाने इजू आत्मकथन जगासमोर ठेवलं.
खरंच आजच्या काळातील तरुणांना जे व्यसनाच्या आहारी गेले अशा तरुणांना प्रेरणा देऊन जाणार आत्मकथन आहे. अनेक इजू वर प्रकाश टाकणारे आत्मकथन सर्वांनी आवर्जून वाचावे असेच आहे.
लेखक/ कवी /विजय वडवेराव यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .....!!
इजू खरेदीसाठी संपर्क क्रमांक.9075159142
समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
कु.मीनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
तालुका- जिल्हा वाशिम
पीन ४४४५०५
No comments:
Post a Comment