प्रा. सौ संगीता पवार (काळणे) विदर्भ महाविद्यालय बुलढाणा यांचा "गाठी ऋणानुबंधाच्या" हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. संगीता पवार हे नांव महाराष्ट्रातल्या स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मराठी माणसाला परिचयाचा आहे. सौ संगीता ताईंचे मराठी नेट-सेट चे पेपर प्रकाशित असून मराठी विषयाच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर पाठमोर्या शरीराने उभी असलेली स्वमग्न स्वतःच्याच विश्वात रममाण होणारी,स्वतःचा शोध घेणाऱ्या स्त्रीचे अतिशय सुंदर चित्र रेखाटलेले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चिन्मय प्रकाशन औरंगाबाद यांनी केले असून त्याचे मूल्य फक्त शंभर रुपये आहेत.पण यातल्या प्रत्येक कविता या प्रत्येक स्त्रियांच्या मनाच्या वेध घेणाऱ्या आहेत. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्राचार्य डॉक्टर गोविंद गायकी यांच्या लाभलेल्या आहेत.
हळव्या मनाची कवयित्री आपल्या भावनांचे बंध शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करते. ज्या मातीत जन्मलेल्या समाजाशी असलेले ऋणानुबंध कवयित्री आपल्या शब्दांतून व्यक्त होते. शब्द हेच प्रत्येक स्त्री मनाची खरी ताकद असते. अभिव्यक्त होण्यासाठी आणि त्याच शब्दांच्या साहाय्याने हृदयाची शाही करून प्रेमाच्या लेखणीने कवियत्री लिहिण्याचा प्रयत्न करते.ईश्वराने सर्वात सुंदर व अधिक परिश्रम करून बनवलेली कलाकृती म्हणजे स्त्री... तिच्या भावना, प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, उदारता, वीरता, श्रमप्रतिष्ठा, मान,मर्यादा या सर्व गोष्टी भरभरून दिल्या आहेत. संसाराचा गाडा हाकत दोन हात करण्याची तयारी, तेवढी ताकत सहनशीलता स्त्रीयांमध्ये खूप असते. स्वतःचा संसार सुखाचा व्हावा यासाठी छोट्या-छोट्या असणा-या इच्छा पूर्ण व्हाव्यात असे तिला वाटत असते. मुलीचे लग्न होऊन मुलीची जेव्हा स्त्री होते तेव्हा तिच्यावर अनेक जबाबदार्या येऊन पडतात त्यातही तिचं मन कुठेतरी नवर्याने आपल्याला वेळ द्यावा. आपलं कौतुक करावं असं तिला वाटत असतं.
कर्तव्य करण्यात
व्यवहार करण्यात
अखंड बुडालेला तू
आणि तुझा अमूल्य वेळ
काळजी करू नकोस
मागत नाही मी....!!
पतीवर घरातल्या अनेक जबाबदाऱ्या असतात. नवरा-बायको जरी संसार रथाची दोन चाकी असले तरी घराची संपूर्ण जबाबदारी पुरुषावर असते. अनेक महत्वाची काम तोच करत असतो. आणि या कामाच्या व्यापात मध्ये त्याच्याकडे तिच्यासाठी द्यायला वेळ कमी पडतो. हळव्या मनाची कवयित्री म्हणते तू काळजी करू नकोस. तुझा अमुल्य वेळ मी मागत नाही...मी मलाच माझी समजूत घालीन तू तुझे कर्तव्य पूर्ण कर.
बाई किती गं
धैर्याची नी धीराची तू
उगाच नाही तुला
पृथ्वीची उपमा देत....!!
"स्त्री" म्हणजे सहनशक्ती. स्त्रियांचा जन्म झाल्यापासून अनेक गोष्टी तिला सहन कराव्या लागतात.. स्त्रियांना धैर्याने राहावा लागते. प्रत्येक गोष्ट तिलाच समजून घेऊन घरातल्या प्रत्येकाची काळजी करत असते ती. म्हणजे स्त्री म्हणून स्त्रीला पृथ्वीची उपमा देण्यात आलेली आहे...
म्हणतात ना पुरुष कर्ता
संसाराचे ओझे वाहतो सर्वदा
म्हणून का त्यांनी फाशी घ्यावी?
सर्व कर्ज आणि ओझी
तुझ्यावर सोडावी?
तरी तू उभी राहतेस
न खचता जगण्याचे बळ एकवटून
सरकारच्या मदतीशिवाय
नातेवाईकांच्या वशिल्याशिवाय
पिलांना नवी उभारी देत आणि
कर्जाचा डोंगर पेलत
तेव्हा का नाही कुठे ऐकू येत
एका शेतकरी स्त्रीचा आत्महत्या?
खरंच बाई तू धीराची गं...!!
पुरुष घराचा आधारस्तंभ.घराचा कर्ता जरी म्हणून ओळखला जातो तरी सा-या संसाराचा भार घरातल्या पुरुषावर असतो.म्हणून का त्याने कर्जाला घाबरून फाशी का घ्यायची ? सर्व कर्ज मागे बायकोच्या डोक्यावर ठेवून जेव्हा घरधनी निघून जातो. तरी सुद्धा त्या घरातील ती स्त्री पती मरण पावला म्हणून आपली मुलं वाऱ्यावर सोडून देत नाही. समाज तिला जगू देत नाही. नातेवाईक कोणी मदतीला धावत नाही. तरीसुद्धा ती डगमगत नाही. कर्जाचा डोंगर घेऊन काबाडकष्ट करून जगते आणि आपल्या पंखाखाली आपल्या मुलांना घेऊन त्यांना माय आणि बापाचे दोघांचे प्रेम देण्याचा प्रयत्न करते. अशी कितीतरी उदाहरणं आज समाजात पाहायला मिळतात. तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलं का कर्जाला कंटाळून एका शेतकरी स्त्रीने आत्महत्या केल्याचं? नाही ना नाहीच करू शकत. कारण ती खूप धीराची आहे. धाडसी आहे. आपले लेकरं दुसऱ्याच्या जीवावर टाकून जाणे तिला पसंत नसते म्हणून ती लढत राहते तिची लढाई.तीच अगदी एकटी असूनपण असे कवयित्रीला वाटते.
संवेदनशील मनाच्या कवयित्रीला समाजातील प्रत्येक घटकाची जाणीव आहे. गरीबी, दुःख पाहून तिचं मन हळहळते. स्वातंत्र्याला अर्थ काय?, कर्जबाजारी, आंतरजातीय विवाह,शेतकऱ्यांचे जीवन, आत्महत्या इत्यादी कविता काळजाला स्पर्श करणा-या आहेत. तर प्रेमभाव, चित्तचोर, भिंत,तूच सांग, सुकुमार कळी, गुंता, गोंधळ, प्रेम या कवितेच्या माध्यमातून मनातले प्रेमभाव व्यक्त करणाऱ्या आहेत. नात्यातला गोडवा प्रेमाची थाप, आपुलकी, निष्ठा जपत घरातल्या जबाबदाऱ्या पेलत शब्दांचे शब्दांना माधुर्यात व्यक्त होणं कवयित्रीला फार सुरेखपण जमतं.नव्हे तिची ती कलाच आहे. निसर्गाने तिला दिलेलं वरदानच आहे.या काव्यसंग्रहात एकूण साठ कविता आहेत. प्रत्येक कविता ही स्त्री मनाला स्पर्शून जाणाऱ्या व जणू त्या कांही आपल्याच आहेत.अशा वाटणाऱ्या आहेत. प्रत्येक स्त्रीयांनी व्यक्त होण्यासाठी शब्दांचा सहारा घेणे फार गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने वाचावा असाच हा काव्यसंग्रह आहे....
कवयित्री सौ.संगीता पवार यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७