सौ सुमनताई व्यंकटराव पवार चाकुर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद (माहेर व्हंताळ) येथील ग्रामीण भागातली कवयित्री यांचा 'आभाळ पेलताना' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ स्त्रीमनाला ध्येयाचे पंख लावून उंच आकाशात भरारी घेणारे आहे. त्या पुढे आभाळ ठेंगणे वाटावे असेच साजेसे चित्र साकारले आहे. स्त्री मनाला स्फूर्ती देणारे असेच चित्र आहे. पहिला जीवनाच्या वाटेवर आणि दुसरा आभाळ पेलताना प्रकाशक काव्यमित्र प्रकाशन पुणे,राजेंद्र श्रीमंत सगर यांनी प्रकाशित केलेला देखणा काव्यसंग्रह. मलपृष्ठावर सुमन ताई यांचा अल्पपरिचय तर अंतरंगी प्रेरणास्थान त्यांचे पती व्यंकटराव पवार,अभिप्राय राम सदानंद सनातन (माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माहूर )व डॉक्टर नीला सत्यनारायण यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहाची पहिली प्रथमावृत्ती ११ मार्च २०१८ ला प्रकाशित झाली.
ग्रामीण भागातली कवयित्री संसार गाडा सांभाळून जेमतेम अकरावीपर्यंत शिक्षण झालेली पण मनातले भाव कागदावर उमटवत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत सर्व महिलांना प्रेरणा देणारा काव्यसंग्रह तयार झाला. सुमन ताईंना बालवयापासूनच गायनाची आवड असल्याने कवितेला चालना मिळाली. गायन आणि कविता एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्याला गाण्याचा छंद असतो त्याच्या मुखात कविता खेळत असते फक्त त्याला शब्दालंकाराचा साज चढवून शब्दबद्ध करता आली पाहिजे.
"स्त्री शिक्षणाचा पाया रोवुनी
पुण्यात पहिली शाळा काढूनी
कष्ट घेतले फुले कुटुंबानी
आदर्श घ्यावा सावित्रीचा
उध्दार झाला स्त्रीजातीचा
उगवला दिवस तव जयंतीचा...!!"
विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक पहिलीच कविता सुमंनताईंनी शब्दांजली अर्पण केली. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणा-या फुले दांपत्यांनी अपार त्रास सहन करत पुण्यात आनेक शाळा काढल्या असून त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. आय.पी.एस ते आय.ए.एस पर्यंत आणि विमान चालकापर्यंत महिलांनी बाजी मारली आहे. प्रगतीचे पंख लावूनी जणूकाही आभाळ पेलत आहेत. असे कवयित्रीला वाटते अशा थोर सावित्रीचा आदर्श प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे सावित्रीमाईमुळेच स्त्री जातीचा उध्दार झाला असे कवयित्रीला वाटते.
टी.व्ही आला घरोघरी
अभ्यासाला आळस करी
नव युवकांना नम्र विनंती
अभ्यासावर लक्ष द्या जास्ती...!!
आज प्रत्येक घरात टीव्ही किंवा मोबाईलच्या आहारी लहान मुले-मुली गेलेली दिसत आहेत. आई-वडील दोघेही सर्विसला असतात. मुले शाळेतून लवकर घरी येतात आणि टी.व्ही.च्या समोर बसतात. सर्व चॅनल्स कार्टूनचे लावून बसतात वाचन आणि अभ्यास याकडे आजची पिढी काळजीपूर्वक लक्ष देत नाही म्हणून कवयत्री नम्र विनंती करते की अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.
सारा संसार स्त्रियाविणा
कसा भासे उदास
तुझ्याविना कोण फिरविल
मायेचा हात
क्षणाची पत्नी ग तू
अनंत काळाची माता
उमलण्याआधीच कळीचा
घोट का गं घेता?
संवेदनशील मनाच्या कवयित्रीला मुली गर्भातच मारण्याचं दुःख होतं सारा संसार स्त्रीयांमुळेच फुलतो. स्त्रीया नसणाऱ्या घराकडे पाहवले पण जात नाही.ना त्या घराला चैतन्य राहत नाही. स्त्रीशक्तीला ओळखा. स्त्री ही एका क्षणाची पत्नी असली तरी ती अनंत काळाची माता असते. तिच्यामुळेच घराला घरपण येतं. घर अंगण फुलून येतं. तिच्यामुळे सर्वांना मायेचा हात फिरतो तिची अनेक रूपे आहेत. ती कोणाची पत्नी, तर कोणाची आई, कुणाची बहीण तर कुणाची मावशी, कोणाची आत्या तर कोणाची मामी तर कोणाची आजी अशा अनेक रूपात स्त्री दिसते. मग तिला उमलण्याआधीच त्या कोवळ्या मुलीचा घोट का घेता? तिला गर्भातच का मारता? असा सवाल आपल्या लेखणीतून कवयित्री कळकळीने करते.
दोन मनाचे मिलन,पडले लग्नाचे बंधन
पती पाहिजे पण सासू-सासर्यांची अडचण
माय लेकराची नाळ कोण तोडू शकत नाही
आज कालच्या मुलींना काहीच कसे कळत नाही
नाटकी सोंगे करून असे काही जमत नाही...!!
आज कालच्या मुलींना नवरा पाहिजे पण सासू-सासरे म्हणलं की नको वाटतं.मुलगी माहेर सोडून सासरी गेल्यावर सासर हेच माहेर बनतं पण काही मुलींना सासू-सासरे नकोसे वाटतात. चार-सहा महिने झाले की लगेच सासू-सासऱ्यांचा पासून विभक्त राहतात. माय लेकराची नाळ तोडून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात किंवा शहरात जाऊन राहतात आणि तिथेच आपला संसार थाटतात.सासू-सासरे अडचण वाटतात मग त्यांना कोणी वृद्धाश्रमात पाठवतात म्हणून कवयित्री म्हणजे आजकालच्या मुलींना काहीच कसं कळत नाही. नाटकी सोंगे करून काही जमत नाही ...अशा ओळीतून विभक्त राहणाऱ्या मुलींना आपल्या ओळीतून कवयित्रीने चांगलेच फटकारले आहे.
स्वतः सासू-सासर्यांची सेवा करणारी कवयित्री खूपच हळव्या मनाची आहे. त्यांनी रेशीम धागा या कवितेतून भावा बहिणीचे उत्कट प्रेम, नात्यांचे महत्त्व सांगितले आहे,तर मजेशीर भारुड सुद्धा वाचावंसं वाटतं, हिंदू-मुस्लीम ऐक्य दाखवणारा संवाद पण छानच रचला आहे. पूर्वी आजोळी किती धम्माल मस्ती होती हे दिस आजोळीचे या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.तर बलसूर वळण रस्त्यावर कडदोरा गावचे भाविक एका भजनासाठी जात असताना अपघातात मरण पावतात त्यांच्याबद्दल शब्दांची सुमनांजली आपल्या काव्यातून अर्पण करणारी कवयित्री हळव्या मनाची नक्कीच आहे. या काव्य संग्रहातल्या सर्व रचना प्रेम, संस्कार, वळण लावणाऱ्या, आपुलकीची ओळख असणाऱ्या, मनाला यशाचे पंख लावून गगन भरारी घेणाऱ्या आहेत. या पुस्तकाचे मूल्य फक्त शंभर रुपये आहे.पण यातल्या कविता खूप प्रेरणादायी आहेत.
कवयित्रीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
समीक्षिका लेखिका संपादिका शिक्षिका कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशीम
मो.९७६७६६३२५७
No comments:
Post a Comment