Thursday, 31 December 2020

*स्त्री मनाचे गूढ उकलत जाणारे ललित लेखसंग्रह म्हणजे "मौनातील अर्थ"...!*

 *स्त्रीमनाचे गूढ उकलत जाणारे ललितलेखसंग्रह म्हणजे- मौनातील अर्थ*

           धुळ्याच्या प्रसिद्ध लेखिका /कवयित्री/ प्राध्यापिका त्रिशिला साळवे यांचा ललितलेखसंग्रह नुकताच वाचनात आला. या ललित लेखसंग्रहाचे मुखपृष्ठ पती-पत्नींच्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा,त्यांनी भावना अभिव्यक्त करणाऱ्या जोडप्यांचे चित्र अतिशय देखणे आहे. या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी केले असून याची प्रथमावृत्ती ५ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाली आहे. या ललित लेखसंग्रहाचे मूल्य फक्त १६० रुपये आहे पण यातील अनुभव प्रत्येक स्त्री मनाला स्वतःच्या ढाच्यात बसवून जणू माझेच आयुष्य आहे.आणि माझ्याच घरातला संवाद आहे. असं प्रत्यक्ष वाचनाची अनुभूती वाचताना लक्षात येते. मलपृष्ठावर प्रकाश मारुती तोटेवाड यांनी पाठराखण अतिशय सुंदर शब्दात केली आहे. पुस्तकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार आहे.
                 लेखिका त्रीशिला साळवे  यांच्या सहजीवनातील अनुभव, स्त्रीने समजून घेण्याची भूमिका, संसार चालवत असताना जोडीदाराच्या आवडीनिवडी, जोडीदाराला समजून घेण्याची भूमिका, स्त्री जीवनात पेलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, स्त्री मनाची चालू असलेली घालमेल, तिच्या भावना,नाजूक कळी सारखे तिचं मन, सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर होणारी जाणीव, संसार वेलीवर लागलेली फुले, जणू सारं काही मौनातील अर्थ मधून व्यक्त होते. वाढत्या वयाबरोबर समजदारीतून, निरागसतेतून, निस्वार्थीपणातून,शब्दाशिवाय फक्त मौनातून लेखिका न्याहाळत असते. साध्या साध्या गोष्टींची हौस जोडीदाराकडून पूर्ण करून घेण्यात तिला जीवनाचा खरा आनंद मिळतोय. स्वतःच्या आवडीनिवडी पेक्षा जोडीदारांनी केलेली निवड लेखिकेला अधिक प्रिय वाटते.जोडीदाराच्या सहवासातून मिळालेलं प्रेम त्यातून निर्माण झालेली जाणीव, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका लेखिका अगदी बिनधास्तपणे मांडताना दिसते.
                बालपणी माहेर अतिशय अप्रूप वाटणारी वधू एक दिवस माहेर सोडून चिमणीसारखी उडून जाते. नवऱ्या कडील नात्यांमध्ये गुंतून जाते. त्याच घराला माझं घर म्हणून राहते. नवऱ्याचं सुख ते तीच सुख होऊन बसतं. छोट्या-छोट्या सुखांच्या क्षणांनी हरखून जाते. स्वकर्तृत्वाची जाणीव सदैव ठेवूनच स्वतःचे सर्वस्व सहजपणे अर्पण करत असते. प्रत्येक स्त्रीला तीचं सौभाग्याचं लेणं असलेले मंगळसूत्र तिच्या प्राणापेक्षा सुद्धा अधिक प्रिय असते. ते जेव्हा हरवतं तेव्हा लेखिकेची होणारी दमछाक त्यावर पतीने मारलेली प्रेमाची फुंकर खूपच सुंदर मांडली आहे. नवऱ्याने दिलेल्या सोन्याचं मंगळसूत्र लेखिकेला अधिक प्रिय वाटू लागतं कारण ते खऱ्या समर्पणातून, जाणिवेतून, कोणत्याही सामाजिक बंधनाशिवाय, आंतरिक ओढीने दिलेलं असतं नव्हे तर तो त्याच्या हातांनी गळ्यात घालतो. हीच आठवण लेखिकेला जगण्याची उर्मी देऊन जाते.
               नवरा-बायकोच्या नात्यातला गोडवा अतिशय सरळ साध्या सोप्या शब्दांत व्यक्त करणारी हळव्या मनाची त्रिशिला स्वतःच्या संसारसुखाबरोबरच प्रत्येक स्त्री जातीचे मन नकळतपणे गुंतवित जाते. पती-पत्नींच्या नात्यांमध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे. हे लेखिका तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करते. स्त्री किती पटकन रागाला येते. तेवढीच समंजससुद्धा असते. तेवढीच प्रेमळ असते. तिच्या मनात मात्र काहीच नसतं. पण माणूस सुद्धा अगदी शांतपणे सहन करतो हे सारं लेखिका नमूद केल्या शिवाय राहत नाही. सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्याची अतिशय चिंता वाटणारी लेखिका त्या विचारानेच तिचं मन सैरभैर होतं आणि मनातील अर्थ शोधायला निघतात तिचे शब्द.
                    सहजीवनसाथी तिची पदोपदी काळजी घेणाऱ्या वडिलांसारखा भासतो लेखिकेला. तर कधी मित्रांसारखा. पतीच्या साथीमुळे स्वतः किती बिनधास्त आहे हे लेखिका खुशाल सांगून टाकते. ना तिला भूतकाळाची आठवण. ना वर्तमानाची वेदना.ना भविष्याची काळजी. नाजूक नात्यांचा हळवेपणा लेखिका हळुवारपणे मांडण्याचा प्रयत्न करते. पतीचा विरह तर सोडाच पण त्याची कल्पनाही लेखिकेला करवत नाही.आज समाजामध्ये आपण पाहतो पती नसलेल्या स्त्रीला समाज जगूच देत नाही. व्यभिचाराचे ओरघडे ओढल्याशिवाय. स्वतः पण दूर जाण्याची भीती वाटते म्हणून फक्त ओंजळभर प्रेम हटाने आपल्या नवऱ्याकडे मागणारी लेखिका शेवटी संवेदनशील मनाची एक स्त्रीच आहे. सोबत निवांत वेळ घालवण्यासाठी चाललेली तिची धडपड वाखाणण्याजोगी आहे.पिक्चरला जाता आले नाही तरीही न रागावता, सुखी संसाराची स्वप्न बघणारी स्त्री खरंच ग्रेट आहे.परमेश्वराने विश्वातील सर्वात सुंदर कलाकृती अधिक वेळ देऊन निर्मिलेली सुंदर भेट म्हणजे स्त्री. हळव्या नाजूक मनाच्या स्त्रीचं मन सांभाळणे फार जोखमीचे काम असतं. हे पुस्तक वाचल्यानंतर समजतं. निवांतपणाची व्याख्या धावणा-या आयुष्यात खूप मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न लेखिका करते. विश्वास शब्दांचा अर्थ खूप छान पद्धतीने लेखिका सांगण्याचा प्रयत्न करते. शब्दांचा अर्थ हा शब्द उच्चारण्याच्या लकबीवर आणि तो शब्द कोणत्या माणसाने कोणत्या परिस्थितीत उच्चारला आहे यावर अवलंबून असतो.पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास किती महत्त्वाचा असतो. हे जीव तोडून सांगण्याचा अट्टहास करायला लेखिका विसरत नाही.
               सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण पैशाच्या मागे लागून मानसिक समाधान तर हरवत नाही ना याची भीती बाळगणारी लेखिका आपलं मत खंबीरपणे मांडते. पैसा म्हणजे सर्वस्व नसतच मुळी. माणसाचं जीवन कसं असावं ? कसं जगावं? हे लेखिका खूपच मार्मिकपणे मांडत जाते. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो. त्याचप्रमाणे पत्नीला यशस्वी व्हायचे असेल तर पतीची खंबीर साथ किती महत्त्वाची असते? हे तूच माझी प्रेरणा या भागांमधून लेखिका सांगते. तू फक्त माझाच आहेस हे हक्काने बजावून सांगणारी बायको त्याची खरी मैत्रीण होऊ पाहते. आणि तू बदलू नकोस म्हणून सांगायलाही लेखिका विसरत नाही. मनमोकळेपणाने संवाद साधणाऱ्या, मोकळ्या मनाच्या लेखिकेला सहजीवन साथीचे मौन नकोसे वाटते. त्याला बोलते करण्याच्या नादात लेखिका मौनातील अर्थ शोधत असते.
            सहजीवनाची दहा वर्षे उलटून गेल्यावरही परत अनोळखी बनवूया असा आग्रह धरणारी लेखिका स्वतःचं अस्तित्व विसरून जोडीदाराच्या सागरात विलीन होण्याचा प्रयत्न करत जीवनाचा निखळ आनंदाचा शोध घेते. वरवरच्या सुखाना बळी न पडता खरे प्रेम शोधण्याचा निरागस प्रयत्न वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. पुढचे सर्व भाग वाचण्याची उत्कंठा निर्माण करतात.प्रत्येक तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावे असेच पुस्तक म्हणजे "मौनातील अर्थ" हा वाचनात आला तरच जीवनाला खरा अर्थ येईल यात शंकाच नाही. या ललितलेखसंग्रहाचे एकूण ५४ भागांमध्ये विश्लेषण केलेले आहे. मौनातील अर्थ हा सर्वच तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावा असाच ललित लेखसंग्रह आहे. 
    लेखिकेला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७

Saturday, 26 December 2020

*विद्यार्थ्यांच्या शारिरिक, बौद्धिक, मानसिक कौशल्यांचा विकास करणारे पुस्तक म्हणजे - चला खेळूया,शिकूया*

 *विद्यार्थ्यांच्या शारिरिक, बौद्धिक, मानसिक कौशल्यांचा विकास करणारे पुस्तक म्हणजे - चला खेळूया,शिकूया*

           पुण्याचे लेखक सोपान बंदावणे यांचे चला खेळूया शिकूया हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास साधला तरच सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल.soundmindin a sound body  या उक्तीप्रमाणे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आणि निरोगी शरीर ठेवायचे असेल तर खेळ फार आवश्यक आहे. खेळामुळे शरीर चपळ बनते. बुद्धी तल्लख होते आणि शरीरातील रक्ताचे रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. शरीरातील स्थूलपणा नाहीसा होतो. ताजेतवाने वाटते. यासाठी मैदानी खेळ, बैठे खेळ आणि मनोरंजनात्मक खेळ खेळणे फार आवश्यक आहे.
             आज प्रत्येक मूल मोबाईलच्या आहारी गेलेले दिसते. बऱ्याच मुलांना खेळ खेळायला नको पण टिव्ही कार्टून आणि मोबाईलच्या खेळांमध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे बालकांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा भयंकर वाढलेला दिसतो. लहान मुलांना mindly fresh ठेवायचे असेल तर प्रत्येक पालकांनी, शिक्षकांनी असे पुस्तक स्वतः वाचावेत व मुलांना भेट म्हणून द्यावेत. वेळात वेळ काढून किमान दररोज एक तरी खेळ मुलांसोबत खेळला पाहिजे.
                   लेखक सोपान बनवणे यांच्या चला खेळूया शिकूया या पुस्तकाचे प्रकाशन राज्य साधन केंद्र पुणे यांनी प्रकाशित केली आहे. याची प्रथमावृत्ती आक्टोबर २०१७ ला झाली आहे.मुखपृष्ठावर सांघिक खेळ खेळणारी मुले रेखाटली आहेत. आतील चित्र खेळा व मैदानी आकृत्यांसह आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.या पुस्तकाचे मुल्य फक्त शंभर रुपये जरी असले पण त्यातील खेळ विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाला चालना देणारे आहेत.
              राज्य साधन केंद्र पुणे या संस्थेअंतर्गत साक्षर भारत या कार्यक्रमातील विविध पातळीवरील घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात चला खेळूया शिकूया यातील खेळाचा समावेश करण्यात आला आहे.या पुस्तकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट असून पुस्तकाची मांडणी मनोरंजनात्मक खेळ,शर्यती (स्पर्धात्मक खेळ ),अभ्यास खेळ व सावलीतले खेळ या चार टप्प्यात केली आहे.मनुष्याला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याच प्रयत्नांची पायाभरणी अशा खेळातून होत असते. मुले मैदानात जिंकण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतात. स्वतःला विसरून अधिक पुढे जायचे अधिक प्रगती करण्यासाठी धडपडतात. हीच प्रेरणा पुढे मुलांना यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते. यासाठी उदाहरण म्हणजे गल्लीगोळा मध्ये क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर साऱ्या जगाला माहिती आहे.त्यानेच भारताची मान जगात उंच केली. मग एखाद्या मुलांने म्हटले मला सचिन व्हायचे तर फारसे वावगे ठरणार नाही.बालपणीचे प्रयत्नच यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. खेळामुळे हार-जीत चा सामना करण्याचे धाडस निर्माण होते.तेच धाडस जीवनाचा संघर्ष यश-अपयश पचवायला शिकवते. जे मुले अभ्यासात हुशार नसतात. त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तो न्यूनगंड दूर करायचा असेल तर खेळ फार आवश्यक आहे.
                     शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी खेळ म्हणले की एकदम आवाज जोरात काढून टाळी वाजवून आनंद व्यक्त करतात.हुर्रर रे.. करत चेहरे उल्हासित होतात.प्रत्येक बालकाला खेळ फार आवडतात.सोपान बंदावणे सरांनी मनोरंजनात्मक खेळ लिहिलेले आहेत.त्यामध्ये राम राम पाहुणे, राम-रावण,कोंबडी व कोंबडीची पिल्ले,हम भी बाजार जायेंगे, वर्तुळाचा राजा, आज्ञापालन, वाघ-शेळी, चपळ कोण, पोलीस कोठडी, विमानतळ,चल माझ्या घरी, भारत किसका हैं| माझा भाऊ सापडला, कोळी आणि मासा इत्यादी अनेक खेळ विद्यार्थ्यांचे फक्त मनोरंजनच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास घडवणारे आहेत. आज्ञापालन या खेळांमध्ये श्रवण कौशल्य विकसित होऊन आज्ञापालनाची सवय लागेल.
                 काठी शर्यत,अडथळा शर्यत अशा अनेक शर्यती किंवा स्पर्धात्मक खेळ घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागेल. सहकाऱ्याला मदत करण्याची वृत्ती वाढीस लागेल. अडथळा शर्यती मुळे काम लक्षपूर्वक करण्याची सवय लागेल. बोगदा शर्यती मुलांची सांघिक भावना वाढीस लागेल. बटाटा शर्यतीमुळे कोणतेही काम घाईने न करता संयमाने जिंकता येते याचा अनुभव येईल. वर्तुळ युद्ध मध्ये स्वतःच्या ताकदीचा अंदाज येईल.बंडू पुढे की चेंडू पुढे या खेळामुळे झेलणे,पळणे हे कौशल्य प्राप्त होते.अभ्यास खेळामुळे वाचन विकास होईल. अभ्यासाची सवय लागेल.शब्दसंग्रह वाढवूया या खेळामुळे अध्ययन अध्यापनातला कंटाळा किंवा थकवा दूर होईल. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल. स्मरणशक्तीला चालना मिळेल. उलटे अंक म्हणूया या खेळामुळे स्मरणशक्ती वाढीस लागून दृढीकरण होईल.
           सावलीतले खेळ यामध्ये चित्र पूर्ण करा या खेळामुळे चित्रकला सुधारण्यास मदत होईल.निरीक्षणशक्ती वाढीस लागेल. दुसऱ्यांची स्वतःची तुलना करता येईल. खाऊचा डबा या मनोरंजन मनोरंजनात्मक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल. लेखक सोपान बंदावणे सर यांनी लिहिलेले चला खेळूया शिकूया या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल. विद्यार्थ्यांची सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे खेळ- मुलांना भरपूर खेळ खेळू दिल्याने त्यांचा शारीरिक,बौद्धिक, मानसिक विकास होईल. त्यामुळे असे पुस्तक प्रत्येक शाळेत असणे. प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांकडे असणे फार महत्त्वाचे आहे. 
             लेखक सोपान बंदावणे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 22 December 2020

*स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

 *स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

          पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ.प्रीती प्रकाश भिसे यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह वाचनात आला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर एका स्त्रीचे चित्र आहे. प्रत्येक स्त्री त्या चित्रांमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. असे देखणे मुखपृष्ठ असून त्याचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन पुणे यांनी केले असून प्रस्तावना नागपूरच्या मीरा मितेश्री यांची लाभली आहे. तर मलपृष्ठावर शितल कुलकर्णी व प्रवीणा कुलकर्णी यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २ ऑक्टोबर २०२० ला झाले असून त्यात ५७ कविता आहेत. प्रत्येक स्त्रीची अनुभूती माझी स्वतःची सहानुभूती आहे.असे वाटणा-या कविता  स्त्रीमनाला स्पर्शून जाणा-या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण त्याचे मूल्य पैशात न मोजता येणारे आहे.
            बालपणी असणारी गोड मुलगी जशी मोठी होत जाते. तिच्या आयुष्याचे पाने अलगदपणे उघडत प्रत्येक गोष्टीत सहभागी होत. बालपणीचा आनंद लुटत अनेक सण समारंभ साजरे करत हळूहळू एक एक पाऊल पुढे सरकते. सासरी गेल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. विविधांगी जीवन जगत घरातल्या प्रत्येकाची काळजी घेत, थोरामोठ्यांचा आदर, कुटुंबाची जिम्मेदारी, मुलं-बाळं, नातेवाईक, मित्रपरिवार अशा अनेक पैलूंनी तिचं आयुष्य सुगंधित होऊन जातं. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वेगळा अनुभव अनुभवत पुढे जाते. अशीच एक कविमनाची गोड स्त्री म्हणजे प्रीती भिसे.
          
                   हिरवाईने नटली वसुंधरा 
                   उधळत मुक्त स्वरूप 
                    पेटवून प्रदूषणाची ठिणगी 
                     मानव करतो तिला कुरूप...!!

             निसर्गावर भरभरून प्रेम करणारी कवयित्री वसुंधरेचे तोंड भरून कौतुक करताना दिसते.हिरवळ कोणाला आवडणार नाही असा एकही माणूस जगाच्या पाठीवर दिसणार नाही. डोंगर-दऱ्या,नद्या-नाले, ओढे,आसमंनती पसरणारा धुंद गारवा, इंद्रधनु ही सर्व निसर्गाची मुक्त उधळण आहे. निसर्ग मानवाला भरभरून देतो पण या उलट माणूस प्रदूषण करून निसर्गाची घडी बिघडवतो. झाडे, जंगल तोडून निसर्गाची हानी करतो. इतक्या सुंदर निसर्गाला हावरट वृत्तीचा माणूसच कुरूप करतो असे कवयित्रीला वाटते.

                 समाजात या सुंदरतेला बहुमान 
                आंतरिक सौंदर्याची झुलती कमान 
                लग्नाच्या बाजारात गोर्‍या रंगाचे मोल
                 नाही बघत गुण कितीही असले अनमोल...!!

           सुंदरता कोणाला आवडत नाही.प्रत्येकालाच आवडते. सुंदरता ही प्रत्येक गोष्टीत लपलेली आहे फक्त ती सौंदर्य शोधणारी नजर पाहिजे. सौंदर्य हे निसर्गात तर, कोणाच्या काव्यात,तर कोणाच्या अभंगात तर कोणाच्या पूजनात,कोणाच्या कलेत तर कोणाच्या पाककलेत, तर कोणाच्या खेळात, तर कोणाचे देशाची सेवा करण्यात लपलेले आहे. आज समाजात जरी सुंदरतेला मान असेल पण आंतरिक सौंदर्य पण माणसाचे सुंदर असले पाहिजे. नाहीतर लग्नाच्या बाजारात गो-या रंगाला महत्त्व देणारी माणसं तया व्यक्तीचे आतले गुण कसे आहेत? हे मात्र पाहत नाही. मनुष्य दिसायला जरी काळा असला तरी चालतो पण त्याच्या आंतरिक सौंदर्य, त्याच्यातले गुण चांगले असले पाहिजेत. असे हळव्या मनाच्या कवयित्री वाटते.कवयित्री बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला जास्त महत्त्व देते.

           शिक्षकी पेशा 
           सन्मान देशा 
           घडवी गुरू 
           भविष्य रेषा 
            गुरू आदर
            मनी सादर
           गुरुची दीक्षा 
           ज्ञान जागर....!!

            देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक म्हणजे गुरू होय. गुरूच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक मुलाचे भवितव्य गुरु घडवतो. म्हणून शिक्षकी पेशाला देशात सर्वोच्च मान आहे.गुरु विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो म्हणून सर्वांनी गुरूचा आदर करावा. गुरुला वंदावे.गुरुबद्दल मनात सदैव आदर असावा कारण तोच ज्ञानाचा जागर आहे. गुरूंना मान सन्मान दिला पाहिजे. गुरू मुळेच प्रत्येकाचे आयुष्य घडत असते.याची जाणीव कवयित्री आपल्या पंचाक्षरी कवितेच्या ओळीतून देते.

             उमलते अंकुर प्रवेश 
             घडला ओळख कवी 
             संदीप खरे नामक 
             उजळला हा रवी......!!

             आजच्या काळातील प्रसिद्ध कवी संदीप खरे हे कवयित्रीचे आदर्श आहेत. संदीप खरे यांच्या अनेक कविता कवयित्रीच्या मनात घर करून राहतात. अनेक काव्य पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. पुण्यगौरव,झीगौरव, काव्यदीप पुरस्कार, आद्यकवी, मुकुंदराज, बालगंधर्व  इत्यादी पुरस्कारांमध्ये संदीप खरे यांनी बाजी मारली.त्यांचा चित्रपट दमलेल्या बाबांची कहाणी व त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व कवयित्रीला खूप आवडते त्यांच्या साहित्याची कवयित्री दीवानी आहे. आयुष्यावर बोलू काही संदीप खरे यांचे अत्यंत गाजलेली कविता कवयित्रीला खूप आवडते. म्हणून कवयित्री आपल्या शब्द सुमनांमध्ये संदीप खरे यांना  गुंतवले शिवाय राहत नाही.

             मराठी भाषेचे अग्रगण्य 
             कवी, लेखक,नाटककार 
             जाणिवेत ते आत्मनिष्ठ
             उत्तम समीक्षक नी कथाकार...!!
      
                  मराठी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या कविता कवयित्रीला खूप भावणाऱ्या आहेत. त्यांच्यामुळे मराठी भाषेला मान मिळाला आहे. वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,नाटककार,लेखक,कथाकार,व समिक्षा असणारे वि.वा.शिरवाडकर म्हणजेच टोपणनाव  "कुसुमाग्रज" यांना गुरुस्थानी मानणारी कवयित्री प्रीती की तिच्या कवितेतून मानाचा मुजरा करते.
           आजच्या युगात ऑनलाइन व्यवहार करणारे, घरपोच होम डिलिव्हरी ने मोठ्या शॉपिंग मॉल्स मधून  वेगवेगळ्या वस्तू आज सहज घरपोच मागवत आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराची मजा कवयित्री दिलखुलासपणे आपल्या काव्यातून मांडते.त्याचबरोबर व्यायामाचे महत्त्व ही सांगते. स्पर्धेच्या युगात थांबला तो संपला पण क्षणभर विश्रांती किती महत्त्वाची आहे हे नमूद करायला कवयित्री अजिबात विसरत नाही. 
                    जीवनाच्या पायवाटेवर आलेली विविध अनुभूती आपल्या अनेक छंदमय येणाऱ्या प्रकारात सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न कवयित्री करते.जीवनाच्या पायवाटेवर या कवितासंग्रहातील कविता जगायला शिकवणाऱ्या, जीवनाचा अर्थ शोधणार्‍या, प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या, दातृत्वाची शिकवण देणाऱ्या, अध्यात्माची आवड जपणाऱ्या,  सण आणि संतांचा महिमा सांगणा-या,निसर्गावर भरभरुन प्रेम करणा-या, भक्तीरसात तल्लीन होणाऱ्या, सर्व वाचकांच्या पसंतीस उतरणा-या अशाच आहेत.
         कवयित्री प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा...!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Saturday, 19 December 2020

बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

 *बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

         पुण्याचे कवी रमेश जाधव सर यांचा काव्यसंग्रह "नाते मनाशी मनाचे" नुकताच वाचनात आला.आज धावपळीच्या युगात सर्वजणच खूप व्यस्त झाले आहेत. सारे जग झपाट्याने धावताना दिसते.धावत्या युगाबरोबर नातेवाईकांना सुद्धा पूर्वीसारखा वेळ नाही. सर्वजण आपापल्या कामात अत्यंत व्यस्त दिसत आहेत. तेव्हा मन हलके करण्यासाठी कित्येक वेळा कवी मनाशीच बोलतो आहे.आपल्या मनातले भाव मनालाच जणूकाही सांगतो आहे. तेच भाव शब्दबद्ध केलेत कवी रमेश जाधव यांनी. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर पांढऱ्या शुभ्र फुलांचे चित्र आहे. जणू काही ते कवीचे मनच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन घनश्याम पाटील असून त्यांचीच काव्यसंग्रहाला साजेशी,सुरेख प्रस्तावना आहे. तर मलपृष्ठावर अमरावतीच्या लेखिका पल्लवी चौधरी यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता बंद हृदयाची स्पंदने खोलणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती २४ जुलै २०१६ ची असून मूल्य फक्त ८० रुपये आहे. पण यातील कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत.

            अडगळीत पडलेल्या आयुष्याला 
            दिली एक नवी दृष्टी 
            दिसली नव्या आयुष्यात 
            सकारात्मक सुष्टी 
             काढून टाकली नकारात्मक घाण
             फुलणार मनाची रान....!!

          वरील ओळी खूप काही सांगून जाणा-या आहेत. माणसाचं आयुष्य जर उसवले असले तरी त्याला नवा दृष्टिकोन आला तर नव्या उमेदीने जगता येतं तरच मानवाच्या आयुष्याच सोनं होतं.तर त्यासाठी माणसांने सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच नवीन ऊर्जा तयार होईल व मनातले मळभ दूर होतील. माणसाने आयुष्यात कितीही संकटे आली तर ती पेलून धरता आली पाहिजे.त्यातून बाहेर पडता आले पाहिजे. मनातले सर्व नकारात्मक विचार काढून टाकता आले पाहिजे. आपले अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. मनातली घाण काढून टाकल्या नंतरच आपल्या मनाचं रान फुलणार आहे. आणि आयुष्य डुलणार आहे. असं कवी रमेश जाधव यांना वाटतं. 

                अंधाराच्या साम्राज्यात 
                हाती काही लागत नाही 
                आपलेच हात रिकामी असल्यावर 
               कोण आपले स्वागत करीत नाही....!!

             आज सर्वत्र श्रीमंतीचा, गर्वाचा अंधार पसरलेला दिसतो. स्वार्थाने बरबटलेली माणसं पाहायला मिळतात. जर एखाद्याचे काही काम असेल तरच ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला गोड बोलण्याचा प्रयत्न करते. काम संपलं की "गरज सरो आणि वैद्य मरो" अशीच अवस्था लोकांची होते. अशा वातावरणात जर गेलं तर आपल्या हाती काहीच लागत नाही आपल्या जवळ धन, पैसा, संपत्ती नसेल तर आपल्याला कुणीच बोलत नाही.आपल्याकडे पैसा नसला आपण अडचणीत असलो तर कोणीच आपले स्वागत करीत नाहीत असे कवी म्हणतो आहे.

                     अंतरीच्या वेदनांचे
                     किती आणि कसे आवरू हुंदके
                    सुपीक नात्यांवर 
                     गैरसमजाचे पडलेत खंदके....!!

           अंतर्मनाला जर वेदना झाल्या तर त्याच्या जखमा लोकांना दिसत नाहीत.मनावर अनेक आघात होऊन  दुःखाचे हुंदके दाटून येतात आणि नातलग  यांच्यामध्ये गैरसमज होऊन मनाच्या रानाला भेगा पडतात. मन व्याकुळ होतं आणि वेदनेची जाणीव मनात जाळं बनून राहते. असे संवेदनशील मनाच्या कवीला वाटते.

               मी गेल्यावर कोणी रडू नका 
               कडू-गोड आठवणी काढू नका 
                नको ती रक्षा सावडणे
                तेंव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे 
                नको ते दहावा, तेराव्याचे विधी 
                 त्यापेक्षा अनाथाश्रमात द्या निधी....!!

             मरणाला प्रत्येक जण भितो. आज आपण पाहतो पण हळव्या मनाचा कवी मोठ्या धाडसाने स्वतःची अंतयात्रा काव्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी मेल्यानंतर रडू नका. माझी आठवण काढू नका. माझी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम ठेवत बसू नका. तेंव्हा खरी गरज आहे. माझ्या कुटुंबाला आधार देण्याची,त्यांना सावरण्याची ते करा. माझे दहावे, तेराव्याच्या विधीवर पैसा खर्च करू नका. त्यापेक्षा तोच पैसा अनाथ आश्रमात द्या. जुन्या रूढी-परंपरांना आणि अंधश्रद्धा ठेवणाऱ्या अनेक पद्धतींना आळा घालण्यासाठी आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न कवी रमेश जाधव सरांनी केलेला आहे. आज अंत्यविधी वर किती तरी लोक पैसा खर्च करतात. तो न करता त्याचा उपयोग समाजासाठी करावा अनाथ आश्रमाला तोच निधी देण्यात यावा असे कवीला वाटते.

                 हल्ली शिक्षणाचा मांडलाय बाजार 
                डोनेशनचे आकडे ऐकून पालक झाले बेजार...!!

              सत्य परखडपणे मांडणारे कवी रमेश जाधव सर म्हणतात आज गल्लीबोळामध्ये शाळा काढून शिक्षणाचा बाजार मांडलाय.खाजगी दुकाने शाळाचं नवरूप घेऊन ठाण मांडून बसल्या आहेत. स्वार्थापोटी गोरगरीब जनतेला लुबाडत आहहेत. एल.के.जी पासून पालक प्रवेश घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभा राहून भली मोठी फी भरून आपल्या मुलाला शाळेत पाठवत आहेत. इतकेच नाही तर पुन्हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी संस्थाचालकाच्या घशात भरमसाठ पैसा ओतून डिग्र्या घेत आहेत. पुढे तेच पालक लग्नाच्या बाजारात शिक्षणाचा सर्व पैसा वसूल करतात.त्याच्या स्वरूपात अशी अशी टीका केली आहे. आणि ती रास्तच आहे. आज खासगी संस्थांची फीस गगनाला भिडली आहे. तिच्याकडे पाहून भल्याभल्या लोकांचे होश उडून जातात. दोन दोन लाख एका एका वर्षाची फीस आहे. अशा शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मानसिकतेला जर आळा घालायचा असेल तर सर्वांनी त्याचा विचार करावा. असे कवी आवर्जून सांगतो आहे.

           कवी रमेश जाधव यांच्या कविता सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या, समाजहित जपणाऱ्या,मनांची गुंफण करणाऱ्या, हळव्या मनास आधार देणाऱ्या,अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणाऱ्या, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या, वास्तवाचे भान ठेवणाऱ्या, गैरसमजाचे जाळे दूर करणाऱ्या, वृद्धा विषयी सहानुभूती असणाऱ्या, पोलिसांविषयी आदर असणाऱ्या, मनाशीच मनाचे नाते सांगणाऱ्या....सर्व कविता अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत. बंद हृदयाची स्पंदने खोलत जाणा-या आहेत.
        प्रत्येक मानवी मनाने मनातूनच वाचावा असाच हा काव्यसंग्रह आहे..कवी रमेश जाधव सरांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा....!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 16 December 2020

कधी उघडेल शाळा...!!

 *कधी उघडेल शाळा*

कधी जाणार कोरोना
कधी उघडेल शाळा
गेले वर्ष हे निघून
येते आठवण बाळा....!!

शाळा पडलिया ओस
नाही करमत आता
येते याद चिमण्यांची
जेव्हा शाळेत मी जाता...!!

केल्या बोलक्या ह्या भिंती
पण लागत नाही लळा
डोळे डोकावून पाही
कधी फुलेल हा मळा....!!

पाखरांची किलबिल
कधी ऐकाया येईल
कधी येतील पाखरे
कधी कोरोना जाईल....!!

वाट पहाते मॅडम
कधी लेकरं येतील
माझी चिमणी पाखरं
हसतील नाचतील....!!

नाही करमत आता
जिव झाला खूप बोरं
कानी येतो तो आवाज
किलकिलणारी पोरं.....!!

खरं सांगू का बाळांनो
मज लागलाय लळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा....!!

कधी वाजेल ती घंटा
आई म्हणे पळा पळा
चिमुकल्या पावलांनी
कधी फुलेल हा मळा....!!

जरी ऑनलाईन शाळा
नाही ती रे खरी मजा
कोरोनाचा हाहाकार
वाटे जिवालाच सजा...!!

थोडा धीर धर बाळा
एक दिवस येईल
जसा आला तसा बघा
असा कोरोना जाईल....!!

खाली खाली वर्गखोल्या
मज बोलतीया शाळा
कुठं हरवली बाळं
माझ्या घेवून ये बाळा....!!

सारे उदासवाने हो
कधी उघडेल ताळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा.....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

अशी मायेची माणसं...!!

अशी मायेची माणसं


अशी मायेची माणसं
कुठं गेलीत निघून
जीव कासावीस होई
फोटो तयांचा बघून....!!

कोण फिरवील हात
मन येतसे भरून
कोण करील गं लाड
गेले दिवस सरून......!!

उसावल्या त्या नात्यांना
कोण शिवून देईल
कसे स्वार्थाने भरले
कधी समज येईल.....!!

कसा ओढतोय जीव
आईवडीलांचा फार
किती खाऊनिया खस्ता
सोसलासा सारा भार ....!!

नाही वेळ कुणा आज
नाही राहिले ते प्रेम
बदलली ती माणसं
सारे झाले आता सेम....!!

काळवेळ बदलला
आपुलकी रे दिसेना
नात्यानात्यांतच तेढ
माणुसकी ना वसेना...!!

नशिबाचा खेळ सारा
जन्मदाते हिरावले
येई सदा आठवण
डोळे आज पाणांवले....!!

अशी मायेची माणसं
पुन्हा कधी भेटतील
साचलेल्या दुःखासही
कधी कवेत घेतील...!!

किती देऊ आर्त हाक
कधी परत येणार
दुरावल्या या जिवाला
कधी जवळ घेणार.....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

Tuesday, 15 December 2020

बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे- "धाडसी राम"

 *बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे "धाडसी राम"*

         बुलढाणा जिल्ह्यातील प्राध्यापक देवबा पाटील सर यांची धाडसी राम ही बाल कादंबरी नुकतीच वाचनात आली. या बालकादंबरीच्या मुखपृष्ठावर धाडसी असणाऱ्या मुलांचे चित्र म्हणजेच राम चित्र आहे.बालपणी जर मुलांना धाडसाच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या कथा सांगितल्या किंवा बालकथा संग्रह,कादंबरी वाचण्यास दिली तर उद्याचे भावी नागरिक,उद्याची भावी पिढी जी आज बालके आहेत.त्यांना मोबाईलच्या दुनियेतून थोडेसे बाजूला सारून वाचावयास दिले तर नक्कीच भावी पिढीमध्ये धीटपणा, खंबीरपणा,धाडस येईल यात शंकाच नाही. या कादंबरीची द्वितीय आवृत्ती २३ ऑक्टोबर २०१४ ला प्रकाशित झाली. या कादंबरीचे प्रकाशन कादंबिनी प्रकाशन,जळगांव यांनी केले असून त्याची ४८ पुष्ठे आहेत.याचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण यातील प्रसंग आणि रामच्या धाडसाच्या कथा लाखमोलाच्या आहेत.
             लेखक,कवी,शिक्षक असा त्रिवेणी संगम असणारे प्राध्यापक देवबा पाटील यांची एकूण बत्तीस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक साहित्याला नानाविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भौतिक शास्त्राच्या बी.एस.सी अभ्यासक्रमाची २१ इंग्रजी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या "धाडसी राम" या बालकादंबरीला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व सौ कुसुमावती भीमराव जाधव बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीवर प्राध्यापक देवा पाटील यांची निवड झाली आहे. 
            छत्रपती शिवरायांना जिजाऊ मॉंसाहेबांनी बालपणी शूरवीरांच्या, पराक्रमाच्या,शौर्याच्या, रामायण महाभारतातल्य कथा सांगितल्या त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर बनले.जगात शूर वीर म्हणून ओळखले जातात. इतकेच नाही तर एका वीर पुरुषाची आई म्हणून साऱ्या जगाला जिजाऊ माँसाहेब ठाऊक आहेत. अगदी त्याप्रमाणेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसाला निर्जीव खेळणे किंवा टेडि देण्यापेक्षा धाडसी राम सारखे बालकादंबरी भेट दिले तर मुलांना वाचनाची गोडी लागेल.  आज-काल काही मुलं आई-वडील घरी नसले की घरात पण जात नाहीत.भितात.. भीती वाटते असं म्हणतात. स्वप्नात रडतात, बोलतात इत्यादी विचित्र प्रकार घडतात.आजच्या काळातील लहान मुलांना तर पारंपारिक खेळच माहिती नाहीत. सुरपारंब्याचा खेळ, लपंडाव, विटी दांडू खेळणे,लगोरी खेळणे असे किती तरी खेळ कालबाह्य होत चालली आहेत कारण घरातले लहान मुलं टीव्हीवरील कार्टून्स मोबाईल वरील गेम्स मध्येच गुंतलेली आहेत. मैदानी खेळ,व्यायाम, कुस्ती,दंडबैठका इ.गोष्टीकडे  मुलांना व पालकांना वेळच नाही. म्हणून पालकांनी जागृत होण्याची, आपल्या मुलांच्या आरोग्याकडे, त्याच्या व्यायामा कडे ,त्याच्या खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजकाल मुलांची आई म्हणते झाडावर चढू नकोस पडशील. पडशील हा शब्द उच्चारून) भीती घालून दिल्यामुळे खरंच भ्यायला लागते आणि मग पुन्हा तो झाडावर चढण्याचा प्रयत्न  करत नाही शहरातल्या तर बहुतांश मुलांना झाडावर चढता येत नाही.
           या बाल कादंबरीतला राम सारंगपूर गावचा असून त्याची आई राधाबाई व वडील शामराव हे फार परोपकारी वृत्तीचे असतात.कोणालाही संकटात मदत करणारे, आदर्श कुटुंब होते. रामच्या बालपणी खरोखरच रामला चांगले वळण लावण्यासाठी रामचे आई-वडील खूप प्रयत्न करायचे. आई शूरवीरांच्या,शिवरायांच्या गोष्टी कथा सांगायची,संस्कारक्षम गाणी,कविता ,श्लोक पाठ करून घ्यायची त्यामुळे रामचे शब्द सुधारू लागले.बुद्धी तल्लख होत.गेली रामची आई जास्त शिकलेली नव्हती परंतु रामचा घरचा अभ्यास पूर्ण करून घ्यायची. रामच्या वडिलांचे ही गावातल्या शाळेत चांगले योगदान असायचे.
            चाणाक्ष धाडसी रामचे वडील शामराव आणि पारंपारिक व्यायामाची गोडी लावण्यासाठी रामला योगासने प्राणायाम दंड-बैठका,सूर्यनमस्कार,धावणे इत्यादी गोष्टींमध्ये पारंगत केले. धावण्यांमध्ये तर राम कोणालाच ऐकत नसे. शरीर चपळ बनण्यासाठी राम खूप व्यायाम करू लागला. ग्रामीण भागातला राम आई-वडिलांसारखंच परोपकारी वृत्तीचा होता. इतकेच नाही तर खूप संवेदनशील मनाचा होता एकदा शेतातील कपिला गायीचे वासरू रामला लंगडताना दिसले. छोट्याशा वासराच्या खांद्यावरून पोटावरून हात फिरवत फिरवत रामने हळूच वासराच्या खुरात शिरलेला काटा काढला त्यामुळे प्राणिमात्राविषयीचे रामचे प्रेम प्रेम दिसून येते.एकदा राम शेतातील हौदात पडला तेव्हा तेच वासरू उडी मारून रामचा जीव वाचवतो. त्यानंतर रामला पोहणे शिकण्याची उत्कंठा वाढत जाते. आणि राम चांगल्या पट्टीचा पोहणारा होतो सारंगा नदीच्या शेजारी काही बायका धुणं धुण्यासाठी गेल्या असताना त्यातील एका बाईचे मुल नदी शेजारी खेळता-खेळता पाय घसरून नदित पडते. आणि बुटकुळ्या खात असते.त्यावेळी प्रसंगावधानी राम पळण्यात चपळ असलेला पळत जाऊन त्या मुलाचे प्राण वाचवतो अशा धाडसी रामचे गावात सर्वत्र कौतुक होते.
             एक वेळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले . पळत सुटणाऱ्या चोराला पकडण्यासाठी राम एक युक्ती करतो. आणि त्या व्यक्तीमुळे चोराला पकडले जाते त्यामुळे संपूर्ण गाव रामचे कौतुक करतात हा किस्सा लहान मुलांसाठी खूप धाडस निर्माण करणारा व पुढील गोष्टी वाचण्यासाठी उत्कंठा निर्माण करणारा आहे.एखाद्या लहान मुलाने कसे राहावे त्याने कोणकोणते खेळ खेळावेत यासाठी ही बालकादंबरी म्हणजे धाडसी वृत्तीचा जणू खुराकच आहे.
            रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीवरून गोफणीने दगड मारून चोरांना पिटाळून लावणाऱ्या राम व त्याचे सर्वच किस्से कौतुक करण्यासारखे आहेत‌.इतकेच नाही तर गुणवत्ता झालेल्या माकडांना पिटाळून लावण्यासाठी राम नी केलेली भज्याची युक्ती खूप प्रशंसनीय आहे जे काम गावातील भल्याभल्यांना जमले नाही ते काम धाडसी राम करून दाखवतो.गावच्या पाण्यात टाकीत विष टाकणारा माणूस फक्त त्यामुळे कसा पकडतो.असे रामच्या अनेक किस्से बालकांची उत्कंठा वाढवणारे व वाचनाला गोडी लावणारे आहेत.
           वेदपुरच्या डोंगरात राम व त्याचे सवंगडी धबधबा पाहण्यासाठी जातात तिकडे माणसांची वर्दळ मुळीच नव्हती.तितक्यात अतिरेकी येऊन बंदुकीचा धाक दाखवून राम व त्याच्या मित्रांना अतिरेक्यांची टोळी पकडून नेते. एका अंधारकोठडीत हात-पाय बांधून डांबून रामला टाकतात. रात्र झालेली असते मुलांना भूक लागून व्याकुळ झालेले असतात तेव्हा राम ने केलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे.रामने आपल्या तोंडाने दुसऱ्या मुलाच्या हाताची दोरी सोडून एकमेकांच्या दोऱ्या सोडून मुलांचा मनोरा करून त्यावर चढून राम बंद कोठडीच्या झरोक्यातून बाहेर पडतो रात्रभर चालत चालत पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतो पहाट होण्याअगोदर पोलिसांना सोबत घेऊन राम त्याच्या मित्राकडे पोहोचतो पोलिसांनी चौफेर वेढा  घालून पळवलेल्या सर्व मुलांना सुखरूप सुटका करतात सर्व मुलांच्या जीवात जीव आला पण पोटात कावळे ओरडत होते पोलीस इन्स्पेक्टरने ५० बिस्कीटचे पुढे नेले होते ते सर्व मुलांना थर्मास मधला चहा आणि बिस्कीट खायला देतात ही बातमी सारंगपूर गावामध्ये वाऱ्यासारखी पसरते.सगळे धाडसी रामचे कौतुक करतात व त्याच्या स्वागतासाठी वाट पाहत असतात तितक्यात पोलिसांची गाडी गावात येते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसतो तेवढाय इस्पेक्टर येतात.धाडसी रामजी खूप कौतुक करतात आणि राम चे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले जाईल अशी घोषणा करतात.
       आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी "धाडसी राम"ही बाल कादंबरी वाचली तर नक्कीच विद्यार्थ्यांना दुसऱ्याला मदत करण्याची भावना वाढीस लागेल आणि आपली सुद्धा भावी पिढी मोबाईलच्या महाजालात न पडता धाडसी  बनेल यात शंकाच नाही त्यासाठी सर्व पालक शिक्षक यांनी अशी पुस्तके मुलांना भेट म्हणून द्यावीत. प्राध्यापक देवबा पाटील यांचा साहित्यिक प्रवास असाच अविरतपणे चालू राहावा यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा

*समीक्षिका लेखिका संपादिका शिक्षिका कवयत्री*
*कु.मीनाक्षी पांडुरंग नागराळे*
जिल्हा प.प्राथ. शाळा कोकलगाव 
*तालुका -जिल्हा वाशिम*

Saturday, 12 December 2020

जगण्याचे सामर्थ्य देणाऱा काव्यसंग्रह म्हणजे-आयुष्याच्या पानावर.

 जगण्याचे सामर्थ्य देणारा काव्यसंग्रह म्हणजे- आयुष्याच्या पानावर*

      पुण्याचे ज्येष्ठ कवी अरुण पुराणिक यांचा नुकताच प्रकाशित झालेला "आयुष्याच्या पानावर" हा काव्यसंग्रह वाचनात आला. कवी अरुण पुराणिक हे हाडाचे शिक्षक भावी पिढी घडवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणारे, सेवानिवृत्ती नंतर २८ वर्षांनी म्हणजे वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यावर कवितेच्या प्रेमात पडले. हे फार महत्वाचे आहे. आयुष्यात जे कांही अनुभव आले त्यातूनच अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन आयुष्याची पानं उलगडत आपले अनुभव शब्दांच्या माध्यमातून कवितेच्या रूपात मांडणारे कवी अरुण पुराणिक यांच्या कविता माणसाला संकटा समोर हतबल न होता जगण्याचे सामर्थ्य देऊन जातात.
        संग्रहाचे मुखपृष्ठ खूप विचार करायला लावणारे पण वास्तवाचे सत्य दर्शन करणारे आहे.त्यावर एक रिकामी खुर्ची आहे आणि खिडकीत दोन पक्षी आहेत. पक्षी कसला तरी वीचार करत खिडकीतून बाहेर डोकावत आहेत. मानवाचे आयुष्य ही असेच असते. प्रत्येकाला एक दिवस आपली खुर्ची सोडावी लागते.प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावाच लागतो हे अंतिम सत्य आहे.
            कवी अरुण पुराणिक यांनी अनेक संकटांचा सामना करत साहित्य क्षेत्रामध्ये वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर कवितासंग्रह काढणारे पहिलेच कवी असावेत. आयुष्य संपत आल्यानंतर आयुष्याच्या पानांवर कडू-गोड,सुख-दुखत आठवणी, त्याग,विरह, प्रेम आलेले सर्व अनुभव प्रत्येक पानावर उमटवत गेले. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २०सप्टेंबर २०२० ला आर्या प्रकाशन पुणे यांनी केले असून या काव्यसंग्रह मध्ये एकूण ६० कविता आहेत. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्राध्यापक विजय काकडे पुणे यांची असून या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे.पण यातली प्रत्येक कविता खुप आशयघन व मानवाला जगण्याचे सामर्थ्य देणारी आहे.या काव्यसंग्रहाची सुरुवात गणरायाला शब्द सुमने अर्पण करून ते थेट विसावा घेई पर्यंत आहेत.

            विचारात देव | देव आचारात |
            देवा आधारात | कल्याणात ||

     या वरील अभंगाच्या ओळीतून देव कोठे आहे? असा जर कोणाला प्रश्न पडत असेल तर देव माणसाच्या विचारात आहे. देव माणसाच्या आचारात आहे. देव माणसांत आहे. देवळाबाहेर जर एखादा मुलगा भुकेने व्याकूळ होऊन बसला असेल आणि  त्याच मंदिरात लोकं देवावर दुधाचा अभिषेक करत असतील तर त्याला काही अर्थ नाही. खरा देव हा माणसात लपला आहे. ते ओळखा आणि अडचणीत असलेल्या माणसांला आधार द्या. तरच देव तुम्हांला पावेल. त्यातच तुमचे कल्याण आहे... असे कवीला वाटते.

           चारा चोचीत पिलांच्या चिमणी देई.
           गोठ्यात वासरांना चाटतात गाई 
           उपमा कशाची देऊ वात्स्ल्यमूर्ती आई...!!

        जशी चिमणी आपल्या पिलांसाठी रानावनात भटकून चोचीत चारा आणते. तशाच गोठ्यातल्या गाई व ममत्वपूर्ण आपल्या वासरांना चाटतात.अगदी त्याप्रमाणेच आपणाला जन्म देणारी आई वात्स्ल्याची खरी मूर्ती आहे. या वात्स्ल्यमुर्ती आईला कशाची उपमा देऊ ? आईचे उपकार कधीही न फिटणारे आहेत. या वरील ओळींमधून कवींनी मर्मदर्,शी प्रेमरूपी वात्सल्याचे दर्शन घडवले आहे. संवेदनशील मनाचा कवी अप्रतिम शब्दरचना करूणरसात काव्य करतो.

               स्थायिभाव हा अविरत सेवा
               भक्कम पाया आदर्श विचारांचा 
               शस्त्र म्हणून घेतले सदविचारा
               शिक्षक असा मी समाज घडविता...!!

              प्रत्येक माणसांचा एक स्थायीभाव असतो. त्यात प्रेम,राग, हेवा,मत्सर,आपुलकी, जिव्हाळा,त्याग, सेवा इत्यादी गुण माणसांच्या ठायी असतात. पण कवि अरुण पुराणिक यांचा स्थायीभाव म्हणजे अविरत सेवा हे त्यांचे व्रत आहे. हा गुण त्यांच्या ठायी ठासून ठासून भरलेला आहे. त्यांच्या आयुष्याचा भक्कम पाया म्हणजे त्यांचे आदर्श विचार. त्यांच्या जोरावर ते आयुष्याची पाने अलगदपणे पलटवीत आहेत. सदविचारांना कवीने शस्त्र म्हणून हाती घेतले आहे. ज्या माणसांच्या ठायी सद् विचार आहेत तो मनुष्य कधीही पराभूत होऊ शकत नाही. ते एक शस्त्र आहे. सद्गुणांचे शस्त्र ज्याच्या हाती असेल तो कधीच भरकटणार नाही.गुन्हे करणार नाही. भ्रष्टाचार करणार नाही. सद् विचारांच्यांच वाटेने जाणार आणि हा बदल फक्त एक शिक्षक करू शकतो. असाच मी एक शिक्षक आहे. समाज घडविणारा असे कवी मोठ्या अभिमानाने सांगतो.

               बहारदार हरित वृक्ष
               देतात प्राणवायू 
                त्यांच्याच कृपेने 
               लाभते मानवास आयु....!!

                 हरित वृक्ष माणसाला प्राणवायू देतात. त्याच बरोबर पाने, फुले-फळे,अनेक औषधे देतात. हरित वृक्ष नसते तर मानवाला ऑक्सिजन मिळाले नसते. त्यासाठी सर्वांनी वृक्ष लावायला पाहिजे. त्यांचे जतन, संगोपन, आणि संवर्धन केले पाहिजे.त्याच्याच कृपेने मानवाला हे आयुष्य मिळाले आहे असे कवीला वाटते.निसर्गावर भरभरून प्रेम करणारा कवी आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो.
          कवी अरुण पुराणिक यांच्या कविता निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या,वेळेचे महत्व सांगणाऱ्या,देशाप्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या,क्रांतिकारकांबद्दल ऋण व्यक्त करणाऱ्या, माणसांत  देव शोधायला सांगणाऱ्या, देवावर श्रद्धा असणार्‍या,बहिणींशी नाते जोडणाऱ्या,मित्रत्वाचे प्रेम सांगणाऱ्या,कर्तव्यनिष्ठा, साहित्य व संस्कृती जपणाऱ्या, त्यागी जीवन जगणाऱ्या, संकटावर मात करून नव्या उमेदीने जगण्याचे सामर्थ्य देणाऱ्या कविता थेट काळजाला भिडणा-या आहेत. आयुष्य कसं जगावं यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे आयुष्याच्या पानावर.

    कवी अरुण पुराणिक यांना पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा...!!

समीक्षिका लेखिका शिक्षिका कवयित्री 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
तालुका जिल्हा वाशिम
मो.९७६८६६३२५७

Friday, 11 December 2020

बालकांच्या भावविश्र्वाशी नाते जोडणारा बालकवितासंग्रह म्हणजे पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांची गाणी होय...

*बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे- "पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांचे गाणी"*


         बुलढाणा जिल्ह्यातील कवी रामदास लक्ष्‍मण राजेगांवकर यांचा "पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांची गाणी" हा बालकविता संग्रह नुकताच वाचण्यात आला. अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ, दर्जेदार बांधणी असलेला आणि विद्यार्थ्यांनी कितीही हाताळले तरी टिकणारा, उत्तम दर्जाचे मुखपृष्ट असणारा बालकवितासंग्रह...मुखपृष्ठावर नावाला साजेसे, बालकांना बालवयात जंगलातले प्राणी काऊ, चिऊ, खूप आवडतात. सर्व प्राणी पक्षी असलेले बोलकी चित्रे मुखपृष्ठावर आहेत. तसेच अंतरंगात ही रंगीत चित्रे आहेत लहान बालकांना रंगीत चित्र त्यातल्या त्यात कार्टून चे चित्रं खूप आवडतात. या कवितासंग्रहाला प्रस्तावना कवी गणेश भाकरे यांची असून एकूण ४३ पानांचे हे अगदी लहान मुलं संपूर्ण वाचून काढेल अशी पृष्ठसंख्या आहे. अगदी चार-पाच वर्षाच्या मुलांना त्यांच्या अवतीभोवती दिसणारे कुत्रा, मनीमाऊ, काऊ इ. अनेक प्राण्या-पक्षांचे निरीक्षण करायला, त्यांच्याबरोबर खेळायला आवडते. एखादे लहान मूल पाच सहा वर्षाचे रडत असले तरी त्यांना झाडावरचे पक्षी किंवा मनीमाऊ दिसली की क्षणातच त्यांचे रडणे थांबते. प्राण्या पक्ष्यांच्या गोष्टी आजी किंवा आजोबा कडून ऐकायला लहान मुलांना खूप आवडते. पण आज धावत्या युगामध्ये फार कमी कुटुंबामध्ये आजी-आजोबा दिसतात. बरीच कुटुंब नोकरीच्या निमित्ताने शहरात राहतात. कांही मुलांच्या वाट्याला आजी-आजोबांचे प्रेमच मिळत नाही. आई-वडील दोघेही नोकरीला असतात त्यामुळे योग्य त्या वयामध्ये योग्य ते संस्कार घडत नाहीत.घरातील ते मुल एकलकोंडे किंवा हट्टी बनत जाते. त्यामुळे तासनतास मोबाईलवर गेम खेळणे किंवा टीव्हीवर सतत कार्टून बघत असते अशा लेकरांसाठी रामबाण उपाय म्हणजे असे बालकवितासंग्रह त्यांच्या हाती देणे.
           कवी रामदास राजेगांवकर हे हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी बालकांचे भावविश्व काय असते? याचा चांगलाच अभ्यास कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाला अवगत आहे. संवेदनशील मनाच्या शिक्षकातला कवी जेंव्हा जागा होतो. तेव्हा अशा बालकवितासंग्रहाचा जन्म होतो. आणि खरंच "पक्षीआणि प्राणी गाऊ त्यांची  गाणी" हा एकमेव कवितासंग्रह असा आहे.यामध्ये सर्व कविता या प्राणी व पक्षावरच आहेत. हेच या बालकवितासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे.या बालकविता संग्रहाचे प्रकाशन समिक्षा पब्लिकेशन, पंढरपूर येथील प्रवीण भाकरे सरांनी अतिशय सुंदररित्या केले आहे.या कवितासंग्रहाचे प्रकाशन २५मे  २०२० रोजी झाले असून त्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे. पण यातील कविता खूप अनमोल आहेत.बालमनाला प्राणिमात्र बद्दल आवड निर्माण करणारे आहे. बाल विश्वाशी निगडीत असणारे आहेत.
              आजच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात लिखाण होत आहे.अनेक सामाजिक, पारंपारिक आणि वेगवेगळ्या विषयावर लिखाण होत असताना दिसते आहे. पण बाल कविता करणारे कवी राजेगांवकर सरांसारखे कवी फार कमी प्रमाणात दिसतात. खरं तर बालकविता जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या होताना आज दिसत नाहीत.

            मी आहे चिमणी
            भुरे भुरे माझे अंग 
             दोन पंख आहेत मला 
             पाय  मानेला तोच रंग....!!

   कवी रामदास राजेगांवकर यांची अत्यंत साधी, सोपी, सरळ भाषा बालकांच्या पसंतीस उतरण्याजोगी आहे.वरील पंक्तीमध्ये मी आहे चिमणी जणूकांही चिमणीच बोलत आहे. असे वाटते आहे.मी आहे चिमणी भुरे भुरे माझे अंग येथे चिमणी चा रंग भुरा असतो आणि चिमणीला दोन पंख असतात. चिमणीचे पाय आणि मानेला पण तोच रंग असतो हे कवि प्रकर्षाने सांगतो. दारात येणारी चिऊताई बाळाची खास दोस्त आहेत हे कवी सांगण्याचा प्रयत्न करतो.

              मी आहे कावळा 
              रंग माझा काळा 
               दिवसभर चरून चरून 
               चारा आणतो बाळा
               कोणी मला नाही शिवत
               तिरस्कारच सगळा
               पण पितरांना तृप्त करण्या
                मला लावतात लळा...!!

     जणूकांही कावळा लहानग्या चिमुकल्यांना बोलतोय. कावळ्याचा रंग काळा असतो. याची जाणीव सुद्धा कवी करून देतोय आणि दिवसभर चरून चरून बाळांसाठी चारा  कावळा आणतो. यावरील ओळीतून प्राणीमात्रांवर,पक्षांवर, दया करावे हा संस्कार  बाल मनांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न कवी करतो. कावळा म्हणलं की कोणी समाजामध्ये त्याला मानाचे स्थान देत नाहीत. कुणी सहसा कावळ्याला शिवत नाहीत अशी खंत कावळ्याच्या मनातली कवितेच्या माध्यमातून कवी बोलून दाखवतो आहे. पण स्वार्थी माणूस मात्र आज त्याच कावळ्यांना पितरं जेवू घालण्यासाठी मात्र आग्रहाने आमंत्रित करत असतो.आज काही लोकं पितरं जेवू घालण्यासाठी कावळ्याची वाट पाहत असतात. कावळ्यांना आवाज देऊन बोलावत असतात आणि हे स्वार्थी वृत्तीची माणसं काम संपलं की वर्षभर कोणा कावळ्याला येऊन सुद्धा घेत नाहीत अशी कावळ्याची खंत शब्दांच्या माध्यमातून कवी व्यक्त करतो.

                मी आहे गाय 
                सर्वांना मी आवडते
                तुम्हाला व बाळाला 
                 माझे दूध देते 
                 टाकाऊ पदार्थ माझे
                 सर्व उपयोगी पडते 
                  मलमूत्र शेणाचे 
                  शेतीला खत बनते....!!

       लहान बालकांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच गाय हा प्राणी आवडत असतो. कारण गायीचे दूध हे फार पौष्टिक असते.त्यामुळे लहान बालकांची हाडे मजबूत होतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ज्या घरात गाय आहे. त्या घरातील लहान मुलं आणि घरातील माणसं आजारी पडत नाहीत. याचे शास्त्रीय कारण असे आहे की गाईच्या दुधात फॅट कमी आहे. आणि पौष्टिक तत्त्व जास्त असते. म्हणून लहान बाळ सुद्धा हंबा म्हणून हाक मारते. गाय सर्वांना आवडते.गाईचे दूध आईसारखे बालकांचे पोषण करते. गायीच्या मलमूत्रापासून शेणखत तयार होते. गाईची प्रत्येक गोष्ट उपयोगी पडते.गाय मेल्यानंतर सुद्धा तिच्या कातड्यापासून पूर्वी पादत्राणे बनवत असत. इतके महत्त्व गायीचे जणू जणूकांही गायच बोलते आहे अशा साध्या शब्दांत कुठलाही अविर्भाव न आणता, कोणतेही मोठेपण न घेता लहान बालकांच्या पचनी पडेल अशा शब्दांत कवी सांगण्याचा प्रयत्न करतो.
             बाल कविता लिहिणे इतके साधे कामं नाही. त्यासाठी कवीला सुद्धा बालवयातच जाऊन लिहावे लागते. बालकांच्या इतकच लहान व्हावं लागतं हे मात्र ते रामदास राजेगावकर सरांना लिलया जमलेले आहे. पोपट,कोंबडा, बदक, बगळा, मैना, कबूतर, कोकिळा, मोर,तनमोर, सुगरण, टीटवी, घुबड,वटवाघुळ,घार, गरुड, म्हैस, बकरी, मेंढी, घोडा,मांजर, सिंह, हत्ती, ससा, कुत्रा, गाढव,लांडगा, वाघ अशा एकूण ४५ कविता ह्या प्राणी पक्षांवरच केलेल्या आहेत. या कवितांना गाण्याच्या रूपात सुद्धा गाऊ शकतो. प्रत्येक कवितेतून प्रत्येक प्राणी-पक्ष्यांचे आगळ वेगळं रुप, त्यांचे महत्त्व, माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे.
           खरं तर आजच्या काळात काऊ, चिऊच्या गोष्टी घरातील मोठी मंडळी सांगत नाहीत. त्यामुळे लहान मुलं सुद्धा हाती मोबाईल घेऊन बसते. सुक्ष्म निरीक्षण ठेवून पहा अगदी लहान लहान चार -पाच वर्षापासूनची  मुलं युट्युब वर नानी तेरी मोरनी को मोर ले गया बाकी जो बचा था काले चोर ले गया | अशी कार्टून चित्र असलेली गाणी, कथा बघत असतात. पण बालकांना जर पुस्तकांची गोडी लावायची असेल तर अशा कार्टून्सचित्र युक्त बालकविता करणे फार गरजेचे आहे. बालकविता फार मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. तरच ते लहान मुलं आपोआप पुस्तकांशी मैत्री करायला लागतं.लहान मुलांना चित्र खूप आवडतात. म्हणून चित्ररूप असलेली पुस्तकं सुद्धा खूप आवडतात. त्यामुळे पुस्तक वाचण्याची गोडी सुद्धा वाढेल यात तिळमात्र शंका नाही.
         बालकवी रामदास राजेगांवकर सरांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. त्यांच्या हातून अनेक बालकवितासंग्रहाची निर्मिती होवो. हीच सदिच्छा... सर्व बालक-पालक यांनी आवर्जून वाचावा. असाच हा काव्यसंग्रह बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा बालकवितासंग्रह म्हणजे "पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांची गाणी" होय.

*समीक्षिका, लेखिका, शिक्षिका, कवयित्री* 
*कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे* 
*जि.परि. प्राथ. शाळा कोकलगाव*
*ता. जि. वाशिम* 
*मोबाईल- ९७६७६६३२५७*

Sunday, 6 December 2020

तिमीरातुनी तेजाकडे नेणारा महाकाव्यसंग्रह म्हणजे- "समतेचे महाकाव्य"*

*तिमीरातुनी तेजाकडे नेणारा महाकाव्यसंग्रह म्हणजे- "समतेचे महाकाव्य"*

       भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ५००० कवितांचा देशातील सर्वात मोठा आणि महान ग्रंथ म्हणजे "समतेचे महाकाव्य"होय. याचा पहिला खंड नुकताच वाचनात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता इतिहास अखंड जगाला ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे. महामानव डॉ.बाबासाहेबांना मानवंदना देणारा,स्तुत्य उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. हा उपक्रम प्रशासकीय अधिकारी, कवी, पत्रकार, शिक्षक व नागरिक या सर्वांनी राबविलेला उपक्रम म्हणजे समतेचे महाकाव्य हा ग्रंथ जेंव्हा हाती आला माझा माथा नकळत झुकला आणि प्रणाम करून कपाळाला लावला.मी फार भाग्यवान आहे. की माझी कविता या महान ग्रंथात समाविष्ट झाली. या उपक्रमांमध्ये खारीचा वाटा का होईना होता आले हे मी माझे भाग्यच समजते.
          समतेचे महाकाव्य या महान काव्यसंग्रहाचा पहिला खंड याचे मुखपृष्ठ अतिशय देखणे त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र त्यावर सुवर्णाक्षरांनी जणू लिहिलेले समतेचे महाकाव्य असे नाव अतिशय देखणे आणि दुहेरी कव्हरचे मुखपृष्ठ असून याची पहिली आवृत्ती १४ एप्रिल २०२० रोजी १४ ठिकाणी प्रकाशित करण्यात आली. या महाकाव्यसंग्रहाचे प्रकाशन सुज्योन अॅग्रो एन्टरप्रायझेस कोथरुड,पुणे येथे झाले असून मूल्य फक्त ६०० रूपये आहे, पण यातील अर्थगर्भित रचना दशलाखमोलाच्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे विषमता आणि अन्याय जाळून टाकण्यासाठी पेटलेला एक धगधगता अग्निकुंडच. देशातले सर्वात जास्त शिक्षण घेणारे, अनेक डिग्र्या पदव्या घेणारे, संविधानाचे शिल्पकार, पुस्तक प्रेमी,पुस्तकांसाठी घर बांधणारे, न्याय,समता,बंधुता पेरणारे, ग्रंथप्रेमी,विश्वरत्न बाबासाहेबांचा इतिहास म्हणजे तिमिरातुनी तेजाकडे नेणारा तेजोमय प्रकाश -महाकाव्य संग्रह म्हणजे "समतेचे महाकाव्य" होय.डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देणारा स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमाची मूळ संकल्पना जिल्हाधिकारी राजेश खवले साहेब यांनी मांडली. ती मूर्त रूपात साकारण्यासाठी उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, तहसीलदार विजय लोखंडे,जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, तहसीलदार राहुल तायडे, तहसीलदार प्रताप वाघमारे,ज.वि. पवार प्राध्यापक डॉ. भास्कर पाटील यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेला हा महान ग्रंथ.
          समतेचे महाकाव्य या ग्रंथांचा हा पहिला खंड यात एक हजार कवितांचा समावेश आहे.असे एकूण पाच खंड तयार करण्याचा मानस वरील सर्व प्रशासकीय अधिकारी यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय खूप मोठा,विशाल, व्यापक आहे आणि तो काव्यरूपात मांडणे हे फार मोठे जिकिरीचे आणि आव्हानात्मक आहे.एखादे  ग्रंथ जे सांगू शकत नाही ते विचार एक कविता सांगू शकते. इतकी ताकद काव्यमय रुपात असते. या काव्यसंग्रहाला शुभेच्छा माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील, माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,माननीय संजय धोत्रे, अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर,पालकमंत्री माननीय बच्चू कडू,मा.खासदार भावनाताई गवळी,या. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब,दिग्दर्शक राजदत्त, अभिनेता मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ इत्यादी मान्यवरांच्या शुभेच्छा आहेत.
        हजारो वर्षापासून गुलामगिरी मध्ये कितपत पडलेल्या समाजाला जागं करून त्यांना गुलामगिरीची जाणीव करून देऊन अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे,गुलामगिरीच्या शृंखला तोडून,न्यायाचे,समतेचे गीत गाण्यासाठी हातातल्या लेखणीची तलवार करून लढणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर सर्व राज्यातून कवितांची सलामी देण्यात आली आहे.

   जयभीम, जयभीम दलितांच्या नाथा
   माणुसकीच्या देवा तू आमचा त्राता....!!

        या मंगेश पाडगावकरांच्या ओळी थेट काळजात शिरणाऱ्या आहेत.त्यांनी महामानवाला माणुसकीचा देव म्हटले आहे. तूच आमचा त्राता आहेस. तूच आमचा त्रास कमी करणारा आहेस अशी हाक दिली आहे.

     भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना
    आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना...!!

         या ओळीतून सुरेश भट यांनी भिमरायाला आपल्या शब्दांची शब्द सुमने अर्पित केली आहे. त्यांनी मानवंदना आपल्या शब्दांतून दिली आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. आज आमच्या अंतरातून ही मानवंदना देत आहोत. असे कवी म्हणतो आहे.

      जग बदल घालुनी घाव | सांगून गेले मला भीमराव |  
      गुलामगिरीच्या या चिखलात | रुतून बसला का ऐरावत ||

          या अण्णाभाऊ साठे यांच्या ओळी काळजाला स्पर्शून जाणा-या आहेत. मला भीमरायांनी सांगून गेले. जग बदलायचे असेल तर तुला घाव घालावे लागेल तरच या गुलामगिरीच्या चिखलातून तू बाहेर पडू शकशिल.नाहीतर एखादा हत्ती चिखलात कसा बसतो? तसा तु ही बसशिल.. इतकी ताकद शब्दांची आहे.दुष्कृत्यांचा मूकनायक, झुंजार तू भीमा, युगंधरा,आव्हान,हे महामानवा, तुझ्या सावलीत वावरताना, वादळातील दीपस्तंभ,रमा थापते भाकर, भिमाचे विचार, भीमा तुझ्या जन्मा ने बाळा, संघर्ष पाण्यासाठी ,भिमसुर्या,आमची मशाल, तो प्रवर्तक,वाचून मोठे व्हा ! भारतीय संविधान, विश्वरत्न, ज्ञानाचा झरा, प्रकाश दीप,मुके बोलू लागले अशा अनेक कविता काळजाला थेट भिडणा-या आहेत.
         डॉ. बाबासाहेबांचा अखंड प्रवास सांगणाऱ्या, सागरापेक्षा विशाल असणा-या आहेत.हा  प्रवास काव्यात व्यक्त करणे हे साधे काम नाही. कवी फ. मु. शिंदे म्हणतात मुळात कविता करणे इतकी साधी गोष्ट नाही. एखादी घटना गोष्टीत सांगणे सोपे पण कवितेत मांडणे तेवढे सोपे नाही. जेव्हा आभाळ फाटते तेव्हा कादंबरीचा जन्म होतो. जेव्हा जमीन फाटते तेंव्हा कथेचा जन्म होतो. आणि जेव्हा काळीज फाटते तेव्हा कवितेचा जन्म होतो... अशा तब्बल पाच हजार कवितांचा संकल्प खरंच कौतुकास्पद आहे. प्रशंसनीय आहे.प्रत्येक घरात असावा व आग्रहाने वाचावाच असा ग्रंथ हा (काव्यसंग्रह) म्हणजे "समतेचे महाकाव्य" होय. पुढील खंडासाठी खूप खूप शुभेच्छा....

समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७