*बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे- "पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांचे गाणी"*
बुलढाणा जिल्ह्यातील कवी रामदास लक्ष्मण राजेगांवकर यांचा "पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांची गाणी" हा बालकविता संग्रह नुकताच वाचण्यात आला. अतिशय सुंदर असे मुखपृष्ठ, दर्जेदार बांधणी असलेला आणि विद्यार्थ्यांनी कितीही हाताळले तरी टिकणारा, उत्तम दर्जाचे मुखपृष्ट असणारा बालकवितासंग्रह...मुखपृष्ठावर नावाला साजेसे, बालकांना बालवयात जंगलातले प्राणी काऊ, चिऊ, खूप आवडतात. सर्व प्राणी पक्षी असलेले बोलकी चित्रे मुखपृष्ठावर आहेत. तसेच अंतरंगात ही रंगीत चित्रे आहेत लहान बालकांना रंगीत चित्र त्यातल्या त्यात कार्टून चे चित्रं खूप आवडतात. या कवितासंग्रहाला प्रस्तावना कवी गणेश भाकरे यांची असून एकूण ४३ पानांचे हे अगदी लहान मुलं संपूर्ण वाचून काढेल अशी पृष्ठसंख्या आहे. अगदी चार-पाच वर्षाच्या मुलांना त्यांच्या अवतीभोवती दिसणारे कुत्रा, मनीमाऊ, काऊ इ. अनेक प्राण्या-पक्षांचे निरीक्षण करायला, त्यांच्याबरोबर खेळायला आवडते. एखादे लहान मूल पाच सहा वर्षाचे रडत असले तरी त्यांना झाडावरचे पक्षी किंवा मनीमाऊ दिसली की क्षणातच त्यांचे रडणे थांबते. प्राण्या पक्ष्यांच्या गोष्टी आजी किंवा आजोबा कडून ऐकायला लहान मुलांना खूप आवडते. पण आज धावत्या युगामध्ये फार कमी कुटुंबामध्ये आजी-आजोबा दिसतात. बरीच कुटुंब नोकरीच्या निमित्ताने शहरात राहतात. कांही मुलांच्या वाट्याला आजी-आजोबांचे प्रेमच मिळत नाही. आई-वडील दोघेही नोकरीला असतात त्यामुळे योग्य त्या वयामध्ये योग्य ते संस्कार घडत नाहीत.घरातील ते मुल एकलकोंडे किंवा हट्टी बनत जाते. त्यामुळे तासनतास मोबाईलवर गेम खेळणे किंवा टीव्हीवर सतत कार्टून बघत असते अशा लेकरांसाठी रामबाण उपाय म्हणजे असे बालकवितासंग्रह त्यांच्या हाती देणे.
कवी रामदास राजेगांवकर हे हाडाचे शिक्षक असल्यामुळे त्यांनी बालकांचे भावविश्व काय असते? याचा चांगलाच अभ्यास कविमनाच्या प्राथमिक शिक्षकाला अवगत आहे. संवेदनशील मनाच्या शिक्षकातला कवी जेंव्हा जागा होतो. तेव्हा अशा बालकवितासंग्रहाचा जन्म होतो. आणि खरंच "पक्षीआणि प्राणी गाऊ त्यांची गाणी" हा एकमेव कवितासंग्रह असा आहे.यामध्ये सर्व कविता या प्राणी व पक्षावरच आहेत. हेच या बालकवितासंग्रहाचे खास वैशिष्ट्य आहे.या बालकविता संग्रहाचे प्रकाशन समिक्षा पब्लिकेशन, पंढरपूर येथील प्रवीण भाकरे सरांनी अतिशय सुंदररित्या केले आहे.या कवितासंग्रहाचे प्रकाशन २५मे २०२० रोजी झाले असून त्याची किंमत फक्त शंभर रुपये आहे. पण यातील कविता खूप अनमोल आहेत.बालमनाला प्राणिमात्र बद्दल आवड निर्माण करणारे आहे. बाल विश्वाशी निगडीत असणारे आहेत.
आजच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात लिखाण होत आहे.अनेक सामाजिक, पारंपारिक आणि वेगवेगळ्या विषयावर लिखाण होत असताना दिसते आहे. पण बाल कविता करणारे कवी राजेगांवकर सरांसारखे कवी फार कमी प्रमाणात दिसतात. खरं तर बालकविता जेवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या होताना आज दिसत नाहीत.
मी आहे चिमणी
भुरे भुरे माझे अंग
दोन पंख आहेत मला
पाय मानेला तोच रंग....!!
कवी रामदास राजेगांवकर यांची अत्यंत साधी, सोपी, सरळ भाषा बालकांच्या पसंतीस उतरण्याजोगी आहे.वरील पंक्तीमध्ये मी आहे चिमणी जणूकांही चिमणीच बोलत आहे. असे वाटते आहे.मी आहे चिमणी भुरे भुरे माझे अंग येथे चिमणी चा रंग भुरा असतो आणि चिमणीला दोन पंख असतात. चिमणीचे पाय आणि मानेला पण तोच रंग असतो हे कवि प्रकर्षाने सांगतो. दारात येणारी चिऊताई बाळाची खास दोस्त आहेत हे कवी सांगण्याचा प्रयत्न करतो.
मी आहे कावळा
रंग माझा काळा
दिवसभर चरून चरून
चारा आणतो बाळा
कोणी मला नाही शिवत
तिरस्कारच सगळा
पण पितरांना तृप्त करण्या
मला लावतात लळा...!!
जणूकांही कावळा लहानग्या चिमुकल्यांना बोलतोय. कावळ्याचा रंग काळा असतो. याची जाणीव सुद्धा कवी करून देतोय आणि दिवसभर चरून चरून बाळांसाठी चारा कावळा आणतो. यावरील ओळीतून प्राणीमात्रांवर,पक्षांवर, दया करावे हा संस्कार बाल मनांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न कवी करतो. कावळा म्हणलं की कोणी समाजामध्ये त्याला मानाचे स्थान देत नाहीत. कुणी सहसा कावळ्याला शिवत नाहीत अशी खंत कावळ्याच्या मनातली कवितेच्या माध्यमातून कवी बोलून दाखवतो आहे. पण स्वार्थी माणूस मात्र आज त्याच कावळ्यांना पितरं जेवू घालण्यासाठी मात्र आग्रहाने आमंत्रित करत असतो.आज काही लोकं पितरं जेवू घालण्यासाठी कावळ्याची वाट पाहत असतात. कावळ्यांना आवाज देऊन बोलावत असतात आणि हे स्वार्थी वृत्तीची माणसं काम संपलं की वर्षभर कोणा कावळ्याला येऊन सुद्धा घेत नाहीत अशी कावळ्याची खंत शब्दांच्या माध्यमातून कवी व्यक्त करतो.
मी आहे गाय
सर्वांना मी आवडते
तुम्हाला व बाळाला
माझे दूध देते
टाकाऊ पदार्थ माझे
सर्व उपयोगी पडते
मलमूत्र शेणाचे
शेतीला खत बनते....!!
लहान बालकांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच गाय हा प्राणी आवडत असतो. कारण गायीचे दूध हे फार पौष्टिक असते.त्यामुळे लहान बालकांची हाडे मजबूत होतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ज्या घरात गाय आहे. त्या घरातील लहान मुलं आणि घरातील माणसं आजारी पडत नाहीत. याचे शास्त्रीय कारण असे आहे की गाईच्या दुधात फॅट कमी आहे. आणि पौष्टिक तत्त्व जास्त असते. म्हणून लहान बाळ सुद्धा हंबा म्हणून हाक मारते. गाय सर्वांना आवडते.गाईचे दूध आईसारखे बालकांचे पोषण करते. गायीच्या मलमूत्रापासून शेणखत तयार होते. गाईची प्रत्येक गोष्ट उपयोगी पडते.गाय मेल्यानंतर सुद्धा तिच्या कातड्यापासून पूर्वी पादत्राणे बनवत असत. इतके महत्त्व गायीचे जणू जणूकांही गायच बोलते आहे अशा साध्या शब्दांत कुठलाही अविर्भाव न आणता, कोणतेही मोठेपण न घेता लहान बालकांच्या पचनी पडेल अशा शब्दांत कवी सांगण्याचा प्रयत्न करतो.
बाल कविता लिहिणे इतके साधे कामं नाही. त्यासाठी कवीला सुद्धा बालवयातच जाऊन लिहावे लागते. बालकांच्या इतकच लहान व्हावं लागतं हे मात्र ते रामदास राजेगावकर सरांना लिलया जमलेले आहे. पोपट,कोंबडा, बदक, बगळा, मैना, कबूतर, कोकिळा, मोर,तनमोर, सुगरण, टीटवी, घुबड,वटवाघुळ,घार, गरुड, म्हैस, बकरी, मेंढी, घोडा,मांजर, सिंह, हत्ती, ससा, कुत्रा, गाढव,लांडगा, वाघ अशा एकूण ४५ कविता ह्या प्राणी पक्षांवरच केलेल्या आहेत. या कवितांना गाण्याच्या रूपात सुद्धा गाऊ शकतो. प्रत्येक कवितेतून प्रत्येक प्राणी-पक्ष्यांचे आगळ वेगळं रुप, त्यांचे महत्त्व, माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे.
खरं तर आजच्या काळात काऊ, चिऊच्या गोष्टी घरातील मोठी मंडळी सांगत नाहीत. त्यामुळे लहान मुलं सुद्धा हाती मोबाईल घेऊन बसते. सुक्ष्म निरीक्षण ठेवून पहा अगदी लहान लहान चार -पाच वर्षापासूनची मुलं युट्युब वर नानी तेरी मोरनी को मोर ले गया बाकी जो बचा था काले चोर ले गया | अशी कार्टून चित्र असलेली गाणी, कथा बघत असतात. पण बालकांना जर पुस्तकांची गोडी लावायची असेल तर अशा कार्टून्सचित्र युक्त बालकविता करणे फार गरजेचे आहे. बालकविता फार मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. तरच ते लहान मुलं आपोआप पुस्तकांशी मैत्री करायला लागतं.लहान मुलांना चित्र खूप आवडतात. म्हणून चित्ररूप असलेली पुस्तकं सुद्धा खूप आवडतात. त्यामुळे पुस्तक वाचण्याची गोडी सुद्धा वाढेल यात तिळमात्र शंका नाही.
बालकवी रामदास राजेगांवकर सरांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा. त्यांच्या हातून अनेक बालकवितासंग्रहाची निर्मिती होवो. हीच सदिच्छा... सर्व बालक-पालक यांनी आवर्जून वाचावा. असाच हा काव्यसंग्रह बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा बालकवितासंग्रह म्हणजे "पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांची गाणी" होय.
*समीक्षिका, लेखिका, शिक्षिका, कवयित्री*
*कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.परि. प्राथ. शाळा कोकलगाव*
*ता. जि. वाशिम*
*मोबाईल- ९७६७६६३२५७*
No comments:
Post a Comment