धुळ्याच्या प्रसिद्ध लेखिका /कवयित्री/ प्राध्यापिका त्रिशिला साळवे यांचा ललितलेखसंग्रह नुकताच वाचनात आला. या ललित लेखसंग्रहाचे मुखपृष्ठ पती-पत्नींच्या नात्यांमधील प्रेम,जिव्हाळा,त्यांनी भावना अभिव्यक्त करणाऱ्या जोडप्यांचे चित्र अतिशय देखणे आहे. या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी केले असून याची प्रथमावृत्ती ५ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाली आहे. या ललित लेखसंग्रहाचे मूल्य फक्त १६० रुपये आहे पण यातील अनुभव प्रत्येक स्त्री मनाला स्वतःच्या ढाच्यात बसवून जणू माझेच आयुष्य आहे.आणि माझ्याच घरातला संवाद आहे. असं प्रत्यक्ष वाचनाची अनुभूती वाचताना लक्षात येते. मलपृष्ठावर प्रकाश मारुती तोटेवाड यांनी पाठराखण अतिशय सुंदर शब्दात केली आहे. पुस्तकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट व दर्जेदार आहे.
लेखिका त्रीशिला साळवे यांच्या सहजीवनातील अनुभव, स्त्रीने समजून घेण्याची भूमिका, संसार चालवत असताना जोडीदाराच्या आवडीनिवडी, जोडीदाराला समजून घेण्याची भूमिका, स्त्री जीवनात पेलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, स्त्री मनाची चालू असलेली घालमेल, तिच्या भावना,नाजूक कळी सारखे तिचं मन, सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावर होणारी जाणीव, संसार वेलीवर लागलेली फुले, जणू सारं काही मौनातील अर्थ मधून व्यक्त होते. वाढत्या वयाबरोबर समजदारीतून, निरागसतेतून, निस्वार्थीपणातून,शब्दाशिवाय फक्त मौनातून लेखिका न्याहाळत असते. साध्या साध्या गोष्टींची हौस जोडीदाराकडून पूर्ण करून घेण्यात तिला जीवनाचा खरा आनंद मिळतोय. स्वतःच्या आवडीनिवडी पेक्षा जोडीदारांनी केलेली निवड लेखिकेला अधिक प्रिय वाटते.जोडीदाराच्या सहवासातून मिळालेलं प्रेम त्यातून निर्माण झालेली जाणीव, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका लेखिका अगदी बिनधास्तपणे मांडताना दिसते.
बालपणी माहेर अतिशय अप्रूप वाटणारी वधू एक दिवस माहेर सोडून चिमणीसारखी उडून जाते. नवऱ्या कडील नात्यांमध्ये गुंतून जाते. त्याच घराला माझं घर म्हणून राहते. नवऱ्याचं सुख ते तीच सुख होऊन बसतं. छोट्या-छोट्या सुखांच्या क्षणांनी हरखून जाते. स्वकर्तृत्वाची जाणीव सदैव ठेवूनच स्वतःचे सर्वस्व सहजपणे अर्पण करत असते. प्रत्येक स्त्रीला तीचं सौभाग्याचं लेणं असलेले मंगळसूत्र तिच्या प्राणापेक्षा सुद्धा अधिक प्रिय असते. ते जेव्हा हरवतं तेव्हा लेखिकेची होणारी दमछाक त्यावर पतीने मारलेली प्रेमाची फुंकर खूपच सुंदर मांडली आहे. नवऱ्याने दिलेल्या सोन्याचं मंगळसूत्र लेखिकेला अधिक प्रिय वाटू लागतं कारण ते खऱ्या समर्पणातून, जाणिवेतून, कोणत्याही सामाजिक बंधनाशिवाय, आंतरिक ओढीने दिलेलं असतं नव्हे तर तो त्याच्या हातांनी गळ्यात घालतो. हीच आठवण लेखिकेला जगण्याची उर्मी देऊन जाते.
नवरा-बायकोच्या नात्यातला गोडवा अतिशय सरळ साध्या सोप्या शब्दांत व्यक्त करणारी हळव्या मनाची त्रिशिला स्वतःच्या संसारसुखाबरोबरच प्रत्येक स्त्री जातीचे मन नकळतपणे गुंतवित जाते. पती-पत्नींच्या नात्यांमध्ये संवाद किती महत्त्वाचा आहे. हे लेखिका तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करते. स्त्री किती पटकन रागाला येते. तेवढीच समंजससुद्धा असते. तेवढीच प्रेमळ असते. तिच्या मनात मात्र काहीच नसतं. पण माणूस सुद्धा अगदी शांतपणे सहन करतो हे सारं लेखिका नमूद केल्या शिवाय राहत नाही. सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्याची अतिशय चिंता वाटणारी लेखिका त्या विचारानेच तिचं मन सैरभैर होतं आणि मनातील अर्थ शोधायला निघतात तिचे शब्द.
सहजीवनसाथी तिची पदोपदी काळजी घेणाऱ्या वडिलांसारखा भासतो लेखिकेला. तर कधी मित्रांसारखा. पतीच्या साथीमुळे स्वतः किती बिनधास्त आहे हे लेखिका खुशाल सांगून टाकते. ना तिला भूतकाळाची आठवण. ना वर्तमानाची वेदना.ना भविष्याची काळजी. नाजूक नात्यांचा हळवेपणा लेखिका हळुवारपणे मांडण्याचा प्रयत्न करते. पतीचा विरह तर सोडाच पण त्याची कल्पनाही लेखिकेला करवत नाही.आज समाजामध्ये आपण पाहतो पती नसलेल्या स्त्रीला समाज जगूच देत नाही. व्यभिचाराचे ओरघडे ओढल्याशिवाय. स्वतः पण दूर जाण्याची भीती वाटते म्हणून फक्त ओंजळभर प्रेम हटाने आपल्या नवऱ्याकडे मागणारी लेखिका शेवटी संवेदनशील मनाची एक स्त्रीच आहे. सोबत निवांत वेळ घालवण्यासाठी चाललेली तिची धडपड वाखाणण्याजोगी आहे.पिक्चरला जाता आले नाही तरीही न रागावता, सुखी संसाराची स्वप्न बघणारी स्त्री खरंच ग्रेट आहे.परमेश्वराने विश्वातील सर्वात सुंदर कलाकृती अधिक वेळ देऊन निर्मिलेली सुंदर भेट म्हणजे स्त्री. हळव्या नाजूक मनाच्या स्त्रीचं मन सांभाळणे फार जोखमीचे काम असतं. हे पुस्तक वाचल्यानंतर समजतं. निवांतपणाची व्याख्या धावणा-या आयुष्यात खूप मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न लेखिका करते. विश्वास शब्दांचा अर्थ खूप छान पद्धतीने लेखिका सांगण्याचा प्रयत्न करते. शब्दांचा अर्थ हा शब्द उच्चारण्याच्या लकबीवर आणि तो शब्द कोणत्या माणसाने कोणत्या परिस्थितीत उच्चारला आहे यावर अवलंबून असतो.पती-पत्नीच्या नात्यामध्ये विश्वास किती महत्त्वाचा असतो. हे जीव तोडून सांगण्याचा अट्टहास करायला लेखिका विसरत नाही.
सहजीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात आपण पैशाच्या मागे लागून मानसिक समाधान तर हरवत नाही ना याची भीती बाळगणारी लेखिका आपलं मत खंबीरपणे मांडते. पैसा म्हणजे सर्वस्व नसतच मुळी. माणसाचं जीवन कसं असावं ? कसं जगावं? हे लेखिका खूपच मार्मिकपणे मांडत जाते. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात असतो. त्याचप्रमाणे पत्नीला यशस्वी व्हायचे असेल तर पतीची खंबीर साथ किती महत्त्वाची असते? हे तूच माझी प्रेरणा या भागांमधून लेखिका सांगते. तू फक्त माझाच आहेस हे हक्काने बजावून सांगणारी बायको त्याची खरी मैत्रीण होऊ पाहते. आणि तू बदलू नकोस म्हणून सांगायलाही लेखिका विसरत नाही. मनमोकळेपणाने संवाद साधणाऱ्या, मोकळ्या मनाच्या लेखिकेला सहजीवन साथीचे मौन नकोसे वाटते. त्याला बोलते करण्याच्या नादात लेखिका मौनातील अर्थ शोधत असते.
सहजीवनाची दहा वर्षे उलटून गेल्यावरही परत अनोळखी बनवूया असा आग्रह धरणारी लेखिका स्वतःचं अस्तित्व विसरून जोडीदाराच्या सागरात विलीन होण्याचा प्रयत्न करत जीवनाचा निखळ आनंदाचा शोध घेते. वरवरच्या सुखाना बळी न पडता खरे प्रेम शोधण्याचा निरागस प्रयत्न वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. पुढचे सर्व भाग वाचण्याची उत्कंठा निर्माण करतात.प्रत्येक तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावे असेच पुस्तक म्हणजे "मौनातील अर्थ" हा वाचनात आला तरच जीवनाला खरा अर्थ येईल यात शंकाच नाही. या ललितलेखसंग्रहाचे एकूण ५४ भागांमध्ये विश्लेषण केलेले आहे. मौनातील अर्थ हा सर्वच तरुण-तरुणींनी आवर्जून वाचावा असाच ललित लेखसंग्रह आहे.
लेखिकेला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!
समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम.
No comments:
Post a Comment