Saturday, 20 March 2021

बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे 'माझे गाणे आनंदाचे'

 बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा बालकवितासंग्रह म्हणजे-'माझे गाणे आनंदाचे'

        लहान मुलांना गाणी, गोष्टी आणि खेळ खूप आवडतात. अगदी बाळं लहान असल्यापासून आई बाळाला आपल्या मांडीवर घेऊन अंगाई म्हणत असते. त्यामुळे बाळ मांडीवर झोपी जाते. एखादं मूल रडत असेल तर त्याच्या समोर कोणी गाणं म्हटलं तर मूल लगेचच रडायचे थांबते. गाण्याकडे लक्ष केंद्रित होते. बोबड्या स्वरात अंगणवाडीत बडबड गीत म्हणणाऱ्या बालकांना खूप छान छान गाणी येतात. त्यातल्या त्यात प्राणी-पक्ष्यांचे जास्त आकर्षण असते. प्राणी-पक्षांवरचे गीत लगेचच तोंडपाठ होतात. अशाच गीतांचा खजिना म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कवी डॉ. कैलास दौंड यांचा काव्यसंग्रह 'माझे गाणे आनंदाचे' हा बालकविता संग्रह नुकताच वाचनात आला. या बालकाव्य संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर, देखणे व बोलक्या स्वरूपाचे आहे.आनंदाने नाचणारी, बागडणारी मुलांचे चित्र सुरेखपणे धर्मराज आव्हाड सर यांनी रेखाटले आहेत. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अनुराधा प्रकाशन पैठण, औरंगाबाद यांनी केले असून पाठराखण प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड,मुंबई यांनी केली आहे. या संग्रहाची प्रथम आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२० ला म्हणजे बालदिनी झाले असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ पन्नास रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता बालकांना वाचनाची गोडी लावणा-या आहेत.
           कवी डॉ. कैलास दौंड यांनी आजवर मोठ्यांसाठी ललित,गद्य ,कादंबरी,कथा असं खूप लिहिलं यांची बरीच साहित्यसंपदा आहे. ४ काव्यसंग्रह, ३ कादंबऱ्या, १ ललित लेखसंग्रह, १ बालकाव्यसंग्रह,१ बालकथासंग्रह अशी एकूण त्यांची ११ पुस्तके प्रकाशित आहेत. पण बालकांसाठी मात्र त्यांचे एकही पुस्तक नव्हतं.पण बाल कविता लिहिलेल्या होत्या त्यामुळे 'माझे गाणे आनंदाचे' हा बालकवितासंग्रह बालकांच्या भावविश्वाशी नाते जोडणारा व बालकांना वाचनाची गोडी निर्माण करणारा आहे.
         विद्यार्थ्यांना आवडणारे माळरान, डोंगर, फुले, परी, पाऊस, पक्षी,सूर्योदय, स्वच्छता, आभाळ, माझे गाव, स्वप्नातील शाळा, गट्टी फू, थोडे फिरायला जाऊ, माझे आनंदाचे गाणे, शिवाशिवीचा खेळ इत्यादी बालकविता बालकांच्या नाजूक अंतर्मनाला हळुवारपणे स्पर्श करणाऱ्या बालकांचे मन गुंतविणा-या वाचनप्रिय आहेत. त्यात प्रत्येक कवितांमध्ये सुंदर सुंदर चित्रे रेखाटली असल्याने बालकांचे देहभान विसरल्याशिवाय राहणार नाही.

                 झाली सकाळ 
                 पडलं ऊन 
                 आळस गाणं
                  जाऊ द्या जुणं
                  मोकळं रानं
                  दूरच दूर 
                  पाखरं गाणं
                  ऐकूया सूर
                  सोन्याचं ऊन
                  आलया दारी 
                  घाम गाळून
                   करू न्याहरी...!!

         वरील ओळीतून अगदी साध्या शब्दांत पंचाक्षरी मध्ये केलेली दौंड यांची कविता बालकांना साद देऊन जाते. खूप काही शिकवून जाते. सकाळी पडलेलं कोवळं ऊन आळस झटकून काढायला शिकवते. आकाशाचे, सूर्याचे निरीक्षण करायला शिकवते. मोकळं रान दूरच दूर म्हणजे पहाटेच्या समयी मोकळ्या रानी पक्षांची गाणी,पक्षांचा आवाज, चिमण्यांचा चिवचिवाट,पोपटी मैना,कोकीळेची मंजुळ गाणी, कावळ्याची कावकाव इत्यादी नादमयी सूर बालकांना ऐकायला मिळते. सोन्यासारखं ऊन दारी आल्यावर माणसाने कामाला लागलं पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे.घाम गाळलं पाहिजे.मगच न्याहारी म्हणजे सकाळचा नाष्टा केला पाहिजे अशी शिकवण देणारी कविता सानथोरांसह मनाला भावते.
        
        चाफ्याचे झाडं वाट पाहुन थकली 
        पूजेला फुलं त्यानं खाली टाकली.

            वरील ओळींमधून निसर्गाची अदभूत किमया, निसर्गसौंदर्य, डॉ. कैलास दौंड जवळून ओळख करून देतात. सोबतीला चित्र असल्यामुळे कविता आणखीन खुलल्या आहेत. कवी कैलास दौंड यांच्या प्रत्येक कवितेतून निसर्गसौंदर्य झऱ्याप्रमाणे खळखळून वाहत आहे. चाफ्याच्या झाडाला आलेला बहर वाट पाहून फुले थकले आणि सकाळी पूजेसाठी खाली टाकली.बहुतांश फुले सकाळी उगवतात. सकाळी सकाळी आई आपल्या बाळाला उठवायला येते. तेंव्हा आईचा स्पर्श बालकांना मोरपिसासारखा वाटतो. असं प्रत्येक बालकांच्या ठायी असलेले भावना कवी डॉ.कैलास दौंड अगदी सराईतपणे मनाने बालक होऊनच लिहीत आहेत. असा भास झाल्याशिवाय राहत नाही.

            गच्चीवर जेव्हा झोपली मुलं 
           आकाश अलगद खाली आलं 
           अनुभवविश्व मग झालं खुलं 
            चांदण्यांची झाली मोहक फुलं
            ऐकून मुले पेंगू लागली 
             नक्षत्र नावे सांगू लागली 
             गाव शहर की जणू बेट दिसतं 
             आकाश किती मोठ्ठं असतं
             मात्र प्रत्येक रात्री भासतं नवं
             रोज निरखून बघायला हवं...!!

          रात्रीला मूल अंगणात किंवा गच्चीवर झोपले की त्यांना खुलं आकाश खाली आल्यासारखं वाटतं अनोखं विश्व त्यांच्यासमोर खुलं होतं. संपूर्ण आकाश चांदण्यांनी भरलेलं पाहून बाल मनाला आनंद होतो. आकाशाकडे,चंद्राकडे बोट दाखवून बाळं खुणावत असते. चांदण्या जणू त्याला फुलासारख्या वाटायला लागतात. पण ही अजब दुनिया शहरातल्या फ्लॅट मध्ये राहणाऱ्या बालकांना पाहायला मिळत नाही कारण फ्लॅटमध्ये चार भिंतीच्या आतच विश्व असतं. बालपणीची खरी मजा ग्रामीण भागातच. चांदण्यांनी आकाश जणू बेट दिसतं आणि मोठ्ठं वाटायला लागतं.प्रत्येक रात्री नवीनच दिसतं पण त्यासाठी रोज रात्री आकाश निरखून बघायला हवं असं कवीमनाला वाटते.
           लहान बालकांना आई-बाबा इतकेच आजी-आजोबा प्रिय असतात. आजी आजोबा त्यांना खूप आवडतात कारण सर्वात जास्त लाड आजी-आजोबा करतात. आजी आजोबा छान छान गोष्टी सांगतात. आजी छान छान गाणी म्हणते. बोटाला धरून शाळेत नेते. म्हणून तर म्हणतात 'बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' बालपणीचे खेळ खूप भन्नाट असतात.लहान मुलांचे रुसणे, फुगणे सुद्धा खूप छान असते. प्रत्येकाला आपलं बालपण आठवायला लागतो आणि नकळत 'माझे गाणे आनंदाचे' हे बालकाव्य वाचल्यावर वाचक ही बालवयातच गुंतत जातो. बालपणीच्या आठवणींना नवीन उजाळा मिळतो म्हणून प्रत्येक कविता आनंदाची आहे.उत्साहाची आहे.
          कवी डॉ. कैलास दौंड यांची बालकाव्यप्रतिभा कांही औरच आहे. एका वेगळ्या शैलीची आहे. कुठल्याही अलंकारिक भाषेचा वापर न करता, सरळ साधी भाषा, भाषेमध्ये भरलेले निसर्गसौंदर्य, बालकांचे भावविश्व, बालकांच्या बालविश्वाशी संबंधित कवितेनुसार रेखाटलेली सुरेख चित्रे, भाषेची मधुरता,आपुलकी भाव, बालकांचे गाव, माती,इवले इवले फुलं, फुलपाखरं, सर्व पक्षी, रंगांची ओळख,आकाश निरीक्षण,पाऊस, वारा,गारा,कागदाच्या होड्या,खेळ अगदी मोजक्या शब्दांत बालमनाला पेलेल, आवडेल अशा शब्दांमध्ये व्यक्त होण्याची कला डॉ. कैलास दौंड यांना निसर्गात:च मिळाली आहे. फक्त प्रत्येक पालकांनी अशी वाचन प्रिय असणारी पुस्तक आपल्या बालकांना देऊन संधीच सोनं करावं इतकच.
       कवी कैलास दौंड यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!

समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता. जि. वाशिम
मो.9767663257

No comments:

Post a Comment