बंजारा या जातसमूहाच्या जगण्याचे सूक्ष्म वास्तव, संज्ञा प्रवाही चित्रण डॉक्टर प्राध्यापक युवराज पवार यांचा कथासंग्रह "शिकार" नुकताच वाचण्यात आला. या कथासंग्रहाचे प्रकाशन चेतक ग्रुप प्रकाशक यांनी प्रकाशित केले असून प्रस्तावना डॉ.फुला बागुल यांची लाभली आहे. या कथासंग्रहाची प्रथम आवृत्ती ३० सप्टेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे.कथासंग्रहाचे मूल्य फक्त २१० रुपये असून यातल्या सर्वच कथा या व-हाडी बंजारा भाषेमध्ये बंजारा समाज समूहांची ओळख दाखविणाऱ्या,आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत. खरेतर बंजारा लोक जीवन म्हणजे सांस्कृतिक दस्तऐवज आहे.
वास्तव,आशयसमृद्धी, बंजारा समूहाचे लोकजीवन, त्यांचा चालीरीती, त्यांचे कष्ट, प्रत्यकारी जिवंत प्रसंगवर्णने, वेगवान कथानक, भाषा प्रयोग,अशा अनेक वैशिष्ट्यामुळे बंजारा साहित्यात, तांडा साहित्यात "शिकार" हा कथासंग्रह वेगळा दिसून येतो. वाचकाला सर्वच कथा काळजाला भिडणार्या आहेत. डॉक्टर युवराज पवार यांच्या शिकार या कथेतील अनेक कथांना,अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. वृत्तपत्रे, मासिके इत्यादी मधून प्रकाशित झालेल्या पुरस्कार प्राप्त कथा असून वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत.
जुळी या कथा वाचकाला वाचनाची ओढ लावणारी आहे. वाचकाला कथेमध्ये स्वतः असल्याचा अनुभव होतो. जुळी या कथेमध्ये गीता आणि सिंधूची मैत्री प्रेरणादायी दाखवलेली आहे. या कथेमध्ये बाप हा सुधारणा प्रिय व सकारात्मक विचारांचा पूजक आहे. सातवी मुलगी झाली असली तरी तो मनःपूर्वक आपल्या मुलीचे स्वागत करतो. बंजारा लोकसमुह हा प्रचंड दारिद्र्य, बंजारा स्त्रियांचे जीवन,या कथेतून व्यक्त केले आहे. कथेतील बाप हा स्त्री भ्रूणहत्येला विरोध करतो. बाळांतपण करायला आलेल्या पार्वतीबाईला सुदाम भ्रुणहत्या करू देत नाही. मुलाच्या हव्यासा पोटी लिंग तपासणी करणार्यांच्या आजच्या पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही कथा खूप काही शिकवून जाते.
भटक्यांचे साहित्य हा शब्दप्रयोग अलीकडे रूढ होतोय. अशाच भटक्या जमाती पैकी एक 'फासेपारधी' या समूहाच्या लोकांचे हलाखीचे जीवन, चित्रित करणारी 'पाल' ही कथा आहे. या कथेमध्ये आजही उपेक्षित असलेल्या पारधी समाजाचे जीवन, फासेपारधी यांचे दुःख, दारिद्र्य, त्यांचा जीवनसंघर्ष प्रा.डॉ.युवराज पवारांनी अतिशय सुरेखपणे रेखाटले आहे. वीतभर पोट भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या कथेततून दिसून येतो. जंगलातून लाव्ह-या,तितर पक्षी पकडून ते विकण्यासाठी फासेपारधी बाईचा संघर्ष, तिची होणारी ससेहोलपट या कथेत दिसून येते. १०० रुपयेसाठी फासेपारधी बाईचा संघर्ष जवळून पाहता येतो. फासेपारधी यांना शिकार नेहमीच मिळते असे नाही. तेव्हा त्यांची होणारी दैना या कथेतून पाहायला मिळते.
'रासुंडा' या कथेतील शिकला-सवरलेला दिलू सुधारणावादी विचारांचा आहे. शेती रासुंडा केल्याने पिकत नाही तर घाम गाळून कष्ट केल्याने,खत-मुत घातल्याने, शेतीची मशागत केल्याने पिकते असे ठणकावून सांगणारा दिलू देव धर्माच्या नावाखाली रासुंडा करायला तयार होत नाही. कर्ज काढून रासुंडा करू देत नाही. अंधश्रद्धेची मूठमाती करून बापाच्या विरोधात जाऊन हुंड्यासाठी ठेवलेली बोकडं बाजारात विकून येतो.पेरणीच्या तयारीला लागतो. या कथेवरून दांड्याचे मागासलेपण परंपरेविरुद्धचा संघर्ष दिसून येतो.
'अंगठा' या कथेत ग्रामीण जीवनाचे राजकारण दिसून येते. मतदानासाठी भीक घालणारी लोकं, या अडल्यानडल्या वेळी कशी आडवे येतात? कशी कोकणात? आणि संधीचा कसा फायदा घेतात? हे दाखविले आहे. शिवा नाईकाच्या सुनेला शेतात साप चावला त्यावेळी घाबरून गेलेला शिवा नाईक गावातल्या सरपंचाकडे सुनेला जीपमध्ये टाकून दवाखान्यात नेण्यासाठी हात जोडून विनंती करतो. तेंव्हा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्याच पक्षाला मतदान कर म्हणून सांगणारा राजकारणी सरपंच शिवा नाईकाला अंगठा मागतो. तोही परिस्थितीमुळे हतबल झालेला शिवा नाईक आपल्या गरोदर सुनेला वाचविण्यासाठी कोऱ्या कागदावर अंगुठा लावतो. ग्रामीण जीवनातले राजकारणी लोकं व त्यांचा दबाव या कथेतून दिसून येतो.
'शिकार' ही कथा या कथासंग्रहातील उत्कृष्ट कथा आहे. शिकार करून आपले जीवन चरितार्थ चालविणाऱ्या लोक समूहाची वेदना या कथेतून दिसून येते. शिकल्या सवरलेल्या तुकारामला शिकूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे तो पारंपारिक शिकारी व्यवसायाकडे वळतो. शिकार करणाऱ्या लोकांचे सूक्ष्म वर्णन, मानव विरुद्ध बळी जाणारा पशू हा संघर्ष खूप चपखलपणे डॉक्टर पवारांनी हे विदारक सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी भेदरलेले डुक्कर शेवटी व्यवस्थेचा बळी ठरते.
'परीक्षा' या कथेतील हरी स्वतः शिकलेला नसतानाही मुलगा नाही म्हणून दुःख न करता मुलांपेक्षा सर्वस्व मानणाऱ्या त्याच्या मुली रूपाली व दीपालीला रक्ताचं पाणी करुन रात्रंदिवस कष्ट करून, स्वतःच्या मुलींना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहणारा हरी अचानक थ्रेशरच्या मशीन मध्ये जाऊन अपघाती मरण पावतो. पण वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिपाली आपल्या बापाचा मुडदा घरात पडलेला असताना परीक्षेला जाते. ही घटना सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे.मन हेलावून टाकणारी ही सत्य घटना आहे. आपल्या बापाचे शोक करत बसण्यापेक्षा बापाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी,समाजाच्या जाचक रूढी परंपरांना बाजूला सारून दिपाली परीक्षा देण्यासाठी जाते.हे खरंच मोठ्या धाडसाचे व कौतुकाचे एक क्रांतीकारी पाऊल ठरते.
'शाळा' या कथेत संस्थेवर असलेला आनंदा मास्तर बिन पगारी दिवस काढून मेताकुटीला त्याचा जीव येतो. पंधरा वर्ष एक रुपया पगार न देता राबराबून घेणारा संस्थाचालक शेवटी आनंदाचा अपमान करतो. त्यामुळे नोकरी सोडून आनंदा वडिलांचा परंपरागत व्यवसाय म्हणजेच चांभाराचा व्यवसाय करण्यासाठी बापाची खुंटीला अडकवलेली चपला शिवण्याची पिशवी घेऊन दोन पैसे कमावण्यासाठी निघतो. या कथेमध्ये आनंदा मास्तरचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा ठरतो.
'तांड्यातली बाई' या कथेतून तांड्याला आलेले आत्मभान, प्रस्थापितांविरोधात निवडणूक लढवणे व ती जिंकणे हा परिवर्तनाचा धागा या कथेतून दिसून येतो. निवडणुकीत दिली जाणारी प्रलोभने, ताणतणाव, जाती समूहाचे दबावगट, सामाजिक समानतेच्या मागणीमुळे होणारा विद्रोह ही कथा दर्शविते. डॉक्टर प्राध्यापक युवराज पवार यांनी तांड्यावरचे हलाखीचे जीवन अनुभवले आहे. त्यामुळे बंजारा समाजात बोलली जाणारी बंजारी भाषा त्यातील संवाद, त्यातले सूक्ष्म वर्णन, सहज हाताळण्याची त्यांची हातोटी, वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वाचण्याची उत्सुकता वाढवते. दांड्याच्या साहित्यात 'शिकार' हा कथासंग्रह आपला ठसा उमटवणारा 'कोहिनूर' आहे. यात शंकाच नाही.
लेखक डॉ. प्रा. युवराज पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!
समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/ कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
No comments:
Post a Comment