Wednesday, 10 February 2021

गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह म्हणजे-'गावठी गिच्चा'

 *गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह म्हणजे- गावठी गिच्चा*

              सांगली जिल्ह्याचे कर्नाळ गावचे सुपुत्र लेखक सचिन वसंत पाटील यांचा 'गावठी गिच्चा' गावच्या मातीची ओढ लावणारा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे, ग्रामीण भागातील घरे, शेतावर जाणारा शेतकरी,त्याची बैलजोडी, बैलगाडी, शेतावर जाणाऱ्या बायका, आणि चिखलात पाय रोवून उभी असलेली व एका पायात काटा रुतलेली लक्ष्मी असे सुंदर मुखपृष्ठ वाचनासाठी उत्सुकता निर्माण करणारे आहे. या कथासंग्रहाचे प्रकाशन तेजश्री प्रकाशन पुणे यांनी केले असून याची प्रथमावृत्ती १६ नोव्हेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे. डॉक्टर तारा भवाळकर यांनी पाठराखण केली असून मूल्य केवळ दोनशे रुपये आहे.पण यातल्या सर्वच कथा वाचकाला वेड लावणाऱ्या आहेत.
              लेखक सचिन पाटील यांचा पहिला कथासंग्रह सांगावा, दुसरा कथासंग्रह अवकाळी विळखा. ज्याला अनेक साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गावठी गिच्चा हा त्यांचा तिसरा कथासंग्रह आहे. ज्याला पंचतत्व सेवा प्रतिष्ठान सांगलीचा पुरस्कार नुकताच मिळालेला आहे. प्रत्येकाला सर्वात प्रिय आपला गाव असतो. मग तो शहरात राहायला गेलेली व्यक्ती असो किंवा गावात राहणारी व्यक्ती असो.गाव म्हणलं की त्याचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण गावाच्या मातीत त्याचं बालपण गेलेलं असतं. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याला बालपणीच्या आठवणी, गावातले खेळ, गावातले रस्ते, गावातलं बालपण, बालपणीची मौज-मजा, गावातले चौक, देऊळ,रस्ते,कट्टे, गावची नदी,बोराची झाड, गाई म्हशीचे गोठे, दुकाने सर्व आठवल्याशिवाय राहत नाही.
             लेखक सचिन पाटील यांच्या गावात फेरफटका मारण्यापुर्वीचा भाग वाचताना त्यांचे कर्नाळ गाव जणूकांही नजरेसमोर उभे राहते. वाचकाला वाचताना जणू आपण त्या गावात प्रत्यक्ष गेल्याची अनुभूती येते.लेखक सचिन पाटील यांची अस्सल ग्रामीण भाषा, मध्ये मध्येच बोलीभाषेतून मारलेला गावराणी विनोद, वाचकाला हसवून जातो. त्यांची गावाकडची साधी, सरळ, सोपी भाषा वाचकाला भुरळ पाडणारी आहे. गावाकडची साधीभोळी पण मनाने श्रीमंत असणारी माणसं, एकमेकांच्या मदतीला जाणारी, नात्यातला आपलेपणा ओळखणारी, जिवाभावाची माणसं,गावाकडची शुद्ध, मोकळी हवा, गावातली कमी शिकलेली पण आपुलकीचा झरा वाहणारी मोकळ्या मनाची माणसं हे सारं अनुभवायला मिळतं. आजही जेंव्हा कोरोना आला तेंव्हा शहराकडची बहुतांश लोकांनी आपला गाव गाठला. कधी नव्हे ते गावाकडे न जाणारी मंडळी गावचा रस्ता धरली. शेवटी आपला गावच बरा... असं वाचकाला वाटून जातं. गावठी गिच्चा या काव्यसंग्रहातील सर्वच कथा गावच्या माणसांच्या आहेत त्यामुळे त्या जिव्हाळ्याच्या आपुलकीच्या वाटतात.
                'उमाळा' या कथेतील पुष्पा अक्का जरी स्वभावाने फटकळ असली तरी तिच्या प्रेमाचा उमाळा रामभाऊनांच नव्हे तर समस्त वाचकांना बहीण-भावाच्या नात्याविषयी प्रेम, जिव्हाळा,आपुलकी, आदर,व्यक्त करणारा वाटतो. भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक वाटते. बहिण कितीही रागात असली तरी तिच्या मनातले प्रेम ती  दाखवत नाही आणि लपवत ही नाही. भावाने बहिणीची केलेली विचारपूस आणि बहिणीने भावा बद्दलचे प्रेम. तिच्या प्रेमाचा उमाळा,बहिणीचे पाणी लागेल म्हणून दिलेला आशीर्वाद वाचकाला वेड लावून जाते.
             दंगल या कथेमध्ये रेशम ची डिलिव्हरी जवळ आलेली, दंगलीत सर्वत्र कडकडीत बंद असताना त्यांना मदत करणारा ख्रिश्चन धर्माचा जेकब अॅटोवाला आपल्या जिवाचा आटापिटा करून स्वतःच्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी निघतो.  वाटेत त्याला मदत करणारा पुढारी कार्यकर्ता राजू हा हिंदू असून देवासारखा मदतीला धावून येतो.आणि अॅम्बुलन्सची व्यवस्था करतो.जातीय दंगली पेटलेली असतानाही हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन असे धर्म वेगळे असले तरी त्यांच्यातली ही माणुसकी जिवंत असल्याचे ऐक्य साधणारी कथा खूप काही शिकवून जाते.
           सुली या कथेमध्ये सोळा-सतरा वर्षाची सुली स्वतःचं तरुणपण जपण्यासाठी, शील जपण्यासाठी रात्रभर कोपीत जागी राहते. आई गावाला गेलेली आणि बाप उसाच्या गाडीवर गेलेला सुलीच्या जवानी वर वखवखलेल्या नजरेने बघणारा मुकादम, कारखान्यावरची टवळी पोरं अचानक अंधाऱ्या रात्री सुलीच्या घरा भोवती घिरट्या घालणाऱ्या वासनांध नजरा, पळणाऱ्या पावलांचा आवाज ऐकून घाबरून गेलेली सुली कुडाला अडकवलेला कोयता स्वयंसंरक्षणासाठी हातात घेऊन झोपी जाते. आजच्या काळातील स्त्रियांना स्वयं संरक्षणाचे धाडस दाखवून जाणारी ही कथा अंगावर शहारे आणणारी आहे.डोरलं या कथेत कष्ट करणारी सवी नवरा मेल्यावर परिस्थितीने हतबल होते. पतसंस्थेच्या कर्जापायी आत्महत्येचा विचार करते पण पोटच्या गोळ्यासाठी तो विचार बाजूला सारून परिस्थितीशी दोन हात करायला शिकते. वासनांध असलेला नामदेव सावकाराचे पैसे घेणे सवीच्या सद्सदविवेक बुद्धीला पटत नाही. त्यासाठी तिच्या नवऱ्याचं डोरलं विकायला तयार होते आणि आत्मसन्मानाने जगायला शिकते. माणूस परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. हे ही कथा शिकवून जाते.
           गावचे स्टॅन्ड ही कथा वाचकाला खूप हसायला लावते. शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. ग्रामीण भागात आजही लालपरी म्हणजेच एसटीची वाट पाहणारे लोकं आणि त्यांची एसटीत चढण्याची घाई डोळ्यांसमोर दिसते. अभ्यास न करता पास व्हावे म्हणून मारुतीला नवस बोलणारा साहेब.  शेवटी नापास होतो मग त्याच्या लक्षात येतं की देव काय पास करत नाही. पास होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. सायब्याचे डोळे खाडकन उघडतात आणि तो अभ्यासाला लागतो.साहेब ही कथा अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे. लेखक सचिन पाटील म्हणजे या कथेतील साहेब पाटलाचा दोस्त जो खूप अभ्यास करणारा असतो. आजच्या काळात चकवा म्हणजे अंधश्रद्धा कशी असते? हे सांगण्यासाठी डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी चकवा ही कथा अंधश्रद्धेची मुठमाती करणारी आहे. 
             आदर्श गावात तंटामुक्ती योजना कशी सफल होते? हे तंटामुक्ती या कथेतून कळते. बारीकसारीक तंटे व गावकऱ्यांनी त्यातून काढलेला मार्ग वाखाणण्याजोगा आहे. टोमॅटो केचप विनोदी कथा वाचताना वाचकाचे भान हरपल्याशिवाय राहत नाही. नवरा-बायकोच्या प्रेमाची व त्यांच्यात उडणाऱ्या खटक्यांची सरमिसळ म्हणजे गावठी गिच्चा ही कथा शेवटी वाचकाला विचार करायला भाग पाडते. नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकाला कसं समजून घ्यायचं?  हे कळत नकळत शिकवून जाते.
              ग्रामीण साहित्यातले लेखक सचिन पाटील यांचा गावठी गिच्चा  या कथासंग्रहात एकूण १२ कथा वाचकाला वाचनाची ओढ लावणार्‍या आहेत. त्यांची साधी सरळ भाषा हृदयाला भिडणारी आहे. सर्वच कथेमध्ये वाचक स्वतः असल्याची अनुभूती तर येतेच शिवाय ग्रामीण भागातल्या गावचे चित्र नजरेसमोर उभे राहते. ही ताकद अस्सल गावरानी, गावाची ओढ असलेल्या, अपंगावर मात करणाऱ्या, मनाला आशेचे पंख लावणाऱ्या व सर्वांच्या पसंतीस गावठी गिच्चा उतरविण्यास भाग पडणाऱ्या दमदार उत्कृष्ट लेखनशैलीची उपजत कला असलेल्या ध्येयवेड्या लेखक कथाकार सचिन पाटील यांना कौतुकाची थाप देणा-या आहेत.
          पुढील वाटचालीसाठी लेखक सचिन पाटील यांना भरभरून शुभेच्छा....

समिक्षिका,लेखिका, शिक्षिका,कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

 पुस्तकाचे नाव-गावठी गिच्चा
 लेखक-सचिन वसंत पाटील
 प्रकाशक-तेजश्री प्रकाशन पुणे
 एकूण कथा- १२
मूल्य-२०० रूपये
लेखकाचा मोबाईल नंबर-८२७५३७७०४९

Tuesday, 9 February 2021

प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे- प्रेमकमळ

 *प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रेमकमळ होय*

         बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, लेखक, प्राध्यापक देवबा पाटील यांचा प्रेमाने ओतप्रोत भरलेला, प्रेमाने सुगंधित करणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रेमकमळ. प्रेमकमळ हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर, तळ्यांमध्ये अनेक प्रेम कमळांनी भरलेले आहे. त्याच तळ्यात प्रेम करणारे दोन बदक व भोवताली निसर्गाचा अनमोल खजिना म्हणजे नानाविध सुगंधी फुलांनी भरलेला मळा मनाला भुरळ घालणारा आहे. काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित झाली आहे.या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सूर्यकांत तायडे यांनी लिहिली आहे. तर प्रकाशन कृष्णायन प्रकाशन पुणे यांनी केले असून याचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे.पण यातील सर्वच कविता प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या आहेत
           प्रेम हेच जीवन.प्रेमानेच घराला घरपण येते. प्रेमाने जीवन सुगंधित होते. प्रेमाने जीवनाला खरा अर्थ येतो. प्रेमाची अनेक रूपे आहेत. हे रूपच जीवनाचे सौंदर्य. खरे अलंकार आहेत. आई-वडिलांचे मुलामुलींवरील प्रेम, आजी-आजोबांचे नातवंडावरील प्रेम, पती-पत्नींचे एकमेकांवरील प्रेम, बहिण भावाचे अतूट प्रेम,भावा-भावा वरील प्रेम,मित्रमैत्रिणीचे अपार प्रेम, देशावरील प्रेम, प्रियकर-प्रेयसीचे प्रेम,  ईश्वरावरील निस्सीम प्रेम अशा प्रेमळ भाव वरच हे जग चालले आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने बोललेलंच आवडतं. राग कोणालाही नकोसाच आहे. याचा अर्थ प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे.
            कवी प्रा.देवबा पाटील यांचे अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. ते त्यांच्या कवितेत युवकांना, तरुणांना आवाहन करीत आहे. ते म्हणतात... 

          हे युवका ! तोडुनी बंधने सारी 
          गरुडासारखी मार भरारी 
          विशाल गगनावरी 
          ये घेऊनी तारका भुवरी...!!

           आजच्या तरुण पिढीला कवी आवाहन करतो की हे युवका तू सारी बंधने तोडून टाक आणि गरुडासारखी भरारी घे. विशाल गगनावरी जाऊन एकदा आकाश कवेत घे. तारका भुवरी आण म्हणजेच तारखा प्रमाणे देदीप्यमान यश संपादन कर. अनिष्ट प्रथा बाजूला सारून देशावर प्रेम कर. देशासाठी जग आणि वेळ आली तर देशासाठी बलिदान दे. सिंहासारखी झेप घे. आणि समाजाचे धुर्त कोल्हे आहेत त्यांच्या मानगुटीवर जाऊन बस. अशा लबाड लांडग्यांना वठणीवर आण. त्यासाठी तू स्वतः एक आदर्श व्यक्ती हो. असे आजच्या पिढीला जी पिढी गोवा, गुटखा खाण्यात सिगारेट  ओढण्यात आणि रिकामी बोटं मोबाईलवर खेळत असलेल्या तरुण पिढीला कवी कळकळीने सांगतो आहे.

              आजची कन्या 
              उद्याची माता 
              कन्या ही संस्कृती 
              तीही भाग्यविधाता...!

              आजची नंदिनी 
               भावी संस्कारखाण
               आपल्या घराची 
               तीही आहे शान....!!

               कन्या धनाची पेटी
               कन्या ही परीस 
               कन्या आपला अंश 
               तिला ही करा वारस....!!

            आज आपण मुलगा मुलगी एकसमान जन म्हणती खरे, पण मुलीच्या नावावर प्रॉपर्टी हव्या तितक्या प्रमाणात केली जात नाही. एकदा मुलीचे हात पिवळे केले की झालं. मुलगी म्हणजे परक्याचं धन असं मानणारे लोकं आजही समाजात चांगुलपणाचा मुखवटा घालून फिरत असतात. आजची जी कन्या आहे तीच उद्याची माता आहे. तीच खरी संस्कृती आहे. तीच संस्काराची खान आहे.कन्याच आपल्या घराचा मान शान आणि अभिमान आहे. कन्या रुपी परिस जिथे जाईल तिथे प्रेम, वात्सल्य,जिव्हाळा निर्माण होतो. तीच धनाची पेटी आहे.  तीच आपला अंश आहे. तिलाही नियमाने आपल्या घराचा वारस करायला हवे.असे कवी सांगितल्या शिवाय राहत नाही.

               प्रेम असावे स्वच्छ
               प्रेम नसावे जाळणारे
               प्रेम असावे हसवणारे 
              आयुष्याचं सोनं करणारे....!!

                सत्य प्रेम वाढवी आत्मशक्ती
                शुद्ध प्रेमाची असावी आसक्ती 
                शरीराकर्षण नसते शुद्ध प्रेम 
                परस्पर जिव्हाळ्याचे खरे प्रेम...!!

                माणसाचं प्रेम शुद्ध असावे,पवित्र असावे तरच ते चिरकाल टिकतं. अन्यथा खोटा आव आणून प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करणारे तोंडावर पडतात. त्यांचा खरा चेहरा एक दिवस समाजासमोर येतो. त्यामुळे प्रेमात दिखावा नको. प्रेम डोहातल्या स्वच्छ पाण्यासारखं असावं. प्रेम एकमेकांना उभारी देणार, विश्वासानं जोडणारं,एकमेकांना जीव लावणारं असावं, मग ते प्रेम आधार देणारं असावं ते प्रेम शेजाऱ्या-शेजाऱ्याचे असोत की नातेवाईकांचं असो. प्रेम जाळणारे नसावे, प्रेम एकमेकांना हसविणारे, फुलविणारे आणि आयुष्याचं सोनं करणारे असावे.
               प्रेमाला उपमा नाही म्हणतात अगदी तसेच प्रेम व्यक्त करायला आणि प्रेमावर लिहायला बोलायलाही शब्द तोकडेच पडतात. दोन जीव एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे जरी ते बोलू शकत नसले तरी डोळ्याने प्रेमभाव व्यक्त करणारी असतात. तर काही जण फक्त मनाने बोलणारी असतात. हृदयाने हृदयाला जोडणारे प्रेम असावे. प्रेमामुळेच मानवाला खरी ऊर्जा व आत्मशक्ती मिळते. प्रेम जसे जगायला शिकवते तसेच विरहात मरायला देखील तयार होते. पण शुद्ध प्रेम असले तरच ते चिरकाल टिकतील. प्रेमात फक्त शरीर आकर्षण नकोत तर परस्पर जिव्हाळ्याचे खरे प्रेम असावे असे कवीला वाटते.
               कवीने पावसाचे धरणीशी असलेले प्रेम, नदीचे सागराशी असणारे प्रेम, सहचारिणीशी असणारे प्रेम, कोवळ्या कळ्यांवरचे अविरत प्रेम, सखी बरोबरचे प्रेम, कल्पनाविस्तारातील प्रियसीचे प्रेम, फुलपाखरांचे फुलावरील प्रेम, पक्ष्यांचे झाडावरील प्रेम,भारतीय प्रेमदिवस, सूर्याचे उषेवरील प्रेम, व्यथा, फुल, सहचारिणी, मोर, लांडोर, स्त्री-पुरुष,भारतीय पत्नी, प्रेमांकुर, प्रेमाची नानाविध रूपे, स्वप्नात धुंद करणारे प्रेम, एक होती मोहिनी इ.कविता प्रेमभाव व्यक्त करणाऱ्या व प्रेमरसानं चिंब भिजवणाऱ्या मानवी मनाला मोहिनी घालणाऱ्या आहेत.
         प्रेमकमळ या काव्यसंग्रहात एकूण ७२ प्रेमावरच्या कविता, प्रेमाची साद घालणाऱ्या आणि प्रेमाने सुगंधित करणाऱ्या अशाच आहेत.कवी लेखक प्रा.देवबा पाटील यांना पुढील काव्य लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा.

समिक्षिका, लेखिका, शिक्षिका, कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
मो.9767663257

Sunday, 7 February 2021

ग्रामीण मातीशी नाळ जोडणारा कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं

*ग्रामिण मातीशी नाळ जोडणारा कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं*

            उस्मानाबाद जिल्ह्यातील आई तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळजापूर जवळच्या मंगरूळ या खेड्यात जन्मलेले लेखक रत्नाकर कमलाकर उपासे यांचा 'बदबदीची सोनपावलं' हा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. मंगरूळ या गावाला कुशीत घेत हरणाई नदी पश्चिमेकडून दक्षिणेला वाहत जाते. या नदीलाच बदबदी असे म्हणतात.कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर हरणाई नदी जी पाण्याने भरलेली आहे.त्यालाच बोलीभाषेतून बदबदी म्हणत असावेत. अशा नदीचे चित्र, पाण्यावर तरंगणारे सोनपावलं म्हणजेच बदबदी नदीशी नाळ जोडणाऱ्या, जिव्हाळ्याच्या व्यक्तींचे ठसे आहेत.असे बोलके मुखपृष्ठ मनाला ओढ लावणारे आहे. याचे प्रकाशन  १० जानेवारी २०२० रोजी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे प्रकाशित झाले आहे.याचे मूल्य फक्त १५० रूपये आहे. पण यातील कथा व्यक्तिचित्रणात्मक कथातून माणसाच्या स्वभावाचे सूक्ष्म निरीक्षण व बोलीभाषा असल्यामुळे या सर्वच कथा वाचनीय आहेत.
                मंगरूळ या खेड्यात बालपण व्यतीत केलेल्या लेखक रत्नाकर उपासे यांची ग्रामीण  मातीशी घट्ट नाळ जोडलेली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उपासे सरांनी बालवयापासूनच ग्रामीण जीवनाचे अनुभव घेतलेले आहेत. माणसांच्या वृत्ती- प्रवृत्तीची जाणीव अत्यंत प्रगल्भ झालेली आहे. आणि त्यातूनच साकारलेला हा कथासंग्रह विविधता आणि वेधक ता जोपासणारा आहे. या कथेमध्ये येणाऱ्या व्यक्ती मनाने धनवान आहेत. प्रत्येक कथेत वाचक स्वतः असल्याची अनुभूती घेतो. वाचकाला प्रत्यक्षदर्शी त्याच्या समोरच सारे घडत आहे अशा सर्व कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
               हसमुख नागाचा म्हातारीची साधलेला संवाद वाचकाची गोडी वाढवतो. नागाची कष्ट करण्याची जिद्द आळशी माणसाला रामबाण उपाय दर्शविणारी आहे. मंगरूळ चे गंधर्व म्हणजे देसाई काका यांच्यातला उत्तम दर्जाचा कलाकार व कलाकारातील उपस्थित गुणांचे दर्शन घडवणारी कथा वयोमर्यादेला पार करून कला जिवंत करणारी आहे. त्यात सिंधूचे पात्र वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे.बिनधास्त एकनाथचे जीवन त्याला जीव लावणारी त्याची बायको ठकू आणि मोहोळ मारण्यात तरबेज असलेला एकनाथ यांच्या कथा खूप काही शिकवून जातात. अस्सल मराठवाड्याची मराठी भाषा, लकब, नुसत्या, कवा -कवा, म्हटलं, जाऊ, हाय, म्हणंजी अशा अनेक शब्दांतून गावरानी गोडवा दर्शविल्याशिवाय राहत नाही.
                 माणुसकीचे दर्शन घडवणारा कयलू आबा त्यांचा स्वभाव व मुक्या प्राण्यांविषयी अपार आदर असलेला कयलू आबा लेखकाने खूप मार्मिकपणे कथेत रंगवलेला आहे. लेखकाची साधी सरळ भाषा मनाला भुरळ घालणारी आहे. बड्या हिंमतीचा कयलू आबा यांची कथा वाचकाला प्रत्यक्षदर्शीचा अनुभव देणारी आहे. हे सर्व जणूकाही वाचकाच्या समोरच घडते आहे असे वाचकाला वाटते. मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी मायाळू गिरीजा ही कथा खुप वाचनीय अशी आहे. मालकाच्या हाताखाली शेतावर काम करणारी गिरीजा तिचा प्रामाणिकपणा आणि तिची कष्ट करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे.
                 काकीची लोकांना आपलेसे करण्याची कला काकी या कथेतून दिसून येते. जीवनात कितीही संकटं आली तरी हार न मानता त्याला सामोरं जाण्याचं बळ काकी कडून शिकावं. वय साठीच्या पुढे गेलं तरी कष्ट करण्याची तयारी या कथेतून दिसून येते. हरहुन्नरी नवनाथ या कथेतून शेतकऱ्याला असलेली बैलाची जाण, अहोरात्र कष्ट करणारा शेतकरी त्यांची साधी राहणी अतिशय उत्कृष्टपणे मांडली आहे. बैलजोडी असो की बाजार असो शेतकऱ्याला व्यवहारिक ज्ञान किती महत्त्वाचे आहे हे या कथेतून प्रकर्षाने जाणवते.
                लेखक रत्नाकर उपासे यांची ग्रामीण मातीशी नाळ जुळल्याने बदबदी काठावर येणाऱ्या मनाने श्रीमंत असणाऱ्या अस्सल ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातल्या माणसांचा मायाळूपणा आपुलकी भाव माणसाप्रति जिव्हाळा,साधी राहणी पण उच्च विचार त्यांची बोलीभाषा त्यांचे ग्रामीण भागातील जीवन जगण्याची कला, शेतकऱ्याची अपार मेहनत, अस्सल गावरान मेवा प्रमाणे फार सुरेखपणे मांडली आहे. बदबदीकाठची सोनपावलं हे पुस्तक हातात घेतल्यावर प्रत्येक कथा हृदयाला भिडून पुढच्या कथेची ओढ लावीत जातात.
                 एकनाथचे धाडस, त्याचे कौटुंबिक जीवन, कयलू आबाचे प्राण्यांविषयीचे प्रेम, त्यांचा अस्सलपणा, मायाळू गिरीज्याची कष्ट करण्याची तयारी, मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारी व सत्याची कास धरून राहणारी गिरीजाचे खरंच कौतुक वाटते. काकीचे धाडस, काम करण्याची तयारी,डगमगून न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी वाखाणण्यासारखी आहे. दिसायला साधा जरी असला तरी प्रत्येक गोष्टीत असलेला हरहुन्नरी नवनाथ आणि कोणत्याही गोष्टीवर मात करणारा सिल्या यांच्या सर्व कथा ग्रामीण भागातले दर्शन घडवणाऱ्या व वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या आहेत.
          बदबदीकाठची सोनपावलं या कथासंग्रहातील सर्वच कथा वाचनीय आहेत. या कथासंग्रहात एकूण आठ कथा ग्रामीण मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत. लेखक रत्नाकर उपासे यांची लेखणी ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीशी समरूप होणारी आहे.प्रत्येक कथा वाचक वाचताना देहभान विसरून जातो.वाचतानाचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. सर्व वाचकांनी आवर्जून वाचावा असाच कथासंग्रह म्हणजे बदबदीकाठची सोनपावलं हा कथासंग्रह होय.

           लेखक रत्नाकर उपासे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

लेखिका शिक्षिका समीक्षिका कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि. प्राथमिक शाळा. कोकलगाव
ता. जि. वाशिम
मो.9767663257

Saturday, 23 January 2021

शापित भूमीतून साकारले हिँदवी स्वराज्य...

Wednesday, 6 January 2021

*निसर्गावर प्रेम करायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे- सृष्टीकाव्य*

*निसर्गावर प्रेम करायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे -सृष्टीकाव्य*

          पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री, निसर्गप्रेमी असलेल्या माधुरी काकडे यांचा सृष्टीकाव्य हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे, सृष्टीचे रक्षण मानवांनी केले पाहिजे, दोन हातामध्ये पृथ्वी धरल्याचे चित्र विचार करायला लावणारे आहे. बाजूने पाणी आणि हरित वने ही सृष्टी वरची खरी संपत्ती दर्शविणारे चित्र आहे.जंगले टिकले तरच जंगलातले प्राणी राहतील. असा त्रिवेणी संदेश देणारे मुखपृष्ट आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे यांनी १८ फेब्रुवारी २०२० रोजी केले आहे. या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर विनिता आपटे यांची असून याचे मूल्य फक्त शंभर रुपये आहे पण यातील कविता निसर्गावर भरभरून प्रेम करायला लावणाऱ्या आहेत.
             निसर्गावर भरभरून प्रेम करणारी कवयित्री माधुरी काकडे या राष्ट्रीय हरित सेना शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कार्याने आणखीन प्रेरित झाल्या. त्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम असतात. त्याच दृष्टीने सृष्टी कवयित्रीशी बोलती झाली. वसुंधरेचे वैभव पाहून वसुंधरेवरच लिहिण्याचा ठाव संवेदनशील मनाच्या कवयित्री माधुरी काकडे यांनी घेतला. त्यांच्या निसर्ग प्रेमातले भाव शब्द लेखणीतून मोराच्या नृत्याप्रमाणे, इंद्रधनुच्या अनेक रंगात न्हावून, श्रावण सरीत चिंब भिजवत, वसंताच्या बहराने डुलत, कोकिळेची सुंदर तान घेत, तर कधी वाऱ्याची मंद झुळूक बनून, फुलांचा सुगंध दरवळत नेत सर्वांसमोर सृष्टी काव्याच्या रूपाने सादर झाल्या.
              आज आपण पाहतो प्रत्येक वर्षी शासनामार्फत 'झाडे लावा झाडे जगवा' अभियान राबवले जाते. अनेक झाडे लावली जातात.वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन, वृक्षसंगोपन केले जाते. तरीही बऱ्याच प्रमाणात वृक्षतोड होते. रस्ते रुंदीकरण असोत किंवा स्वार्थाने बरबटलेल्या मानवाकडून अनेक वर्ष लाखो वृक्षतोड केली जाते.त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि ऋतूचक्रा प्रमाणे वेळेवर पाऊस पडत नाही. तेव्हा मानवाला दुष्काळाचा सामना करावा लागतो. हाच जीवघेणा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतो आणि शेतकरी आत्महत्या वाढतात. मानवाचा पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बिघडत चालले आहे. त्याला अनेक घटक जबाबदार आहेत. काव्यसंग्रहाच्या सुरुवातीलाच पहिली कविता एका झाडाची आत्मकथा कवितेच्या रूपात मांडत मानवाला मानवाची चूक लक्षात आणून देण्याचे काम कवयित्री करण्याचा प्रयत्न करते.

                  कोणाचे तरी भरावे पोट 
                  म्हणून अन्न तयार करत होते 
                  प्राणवायू करून तयार 
                  देहात प्राण भरत होते.....!!

       एका झाडाची आत्मकथा कवितेच्या माध्यमातून वाचताना नकळत मानवाने ही रडावे असे ते झाड रडत होतं. या वाक्यावरून रडायला येतं. आतल्याआत झुरत होतं पाणी पाणी करत होतं. झाडाला होणाऱ्या वेदना अतिशय मार्मिक शब्दात कवयित्री मांडते. झाड स्वतःसाठी कधीच जगत नाही. सदैव दुसऱ्यासाठी जगत असतं. झाडाला लागणारी फळ,फुलं, आणि औषधी वनस्पती,त्याचा देह म्हणजे लाकूड तो सुद्धा काही ना काही इंधन म्हणून देऊन जाते. झाडाचे प्रत्येक अवयव मानवाच्या उपयोगी पडते. मानवाचे पोट भरावे म्हणून झाड जगत असतं सर्वांना सर्वस्व देण्यासाठी झाड जगतं.इतकंच नाही तर झाड प्राणवायू तयार करतो.त्यावर माणूस जगतो झाडामुळेच तर आज माणूस जिवंत राहू शकतो. असं कवयित्री कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करते.

           हो मी पृथ्वी बोलते 
          जरा घेणार का ऐकून
          राहवत नाही आता मला 
          हे सांगितल्या वाचून 

          अब्जावधी वर्षाचं वय माझं 
          सुखात होते मी पूर्वीपासून
           एवढ्यातच तर आला माणूस 
           त्यांना पुरत घेतलं त्रासून....!!

                  पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम मी पृथ्वी बोलतेय या ओळीतून माणसाला विचार करायला लावणारे आहेत. माणूस माणसाच्या स्वार्थापोटी वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर वारंवार करत चालला आहे. त्यामुळे माझं जरा ऐकून घेणार का ? माझं दुःख सांगितल्याशिवाय राहवत नाही. माझं वय अब्जावधी वर्षांचे आहे.मी पूर्वी सुखात होते. जेव्हापासून मानवानी मोठमोठ्या कारखान्याची घाण पाणी, नद्या नाल्यांमध्ये टाकून प्रदूषण तयार केलं. वृक्षतोड सुरू झाली जंगले नष्ट झाली.ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यांनी माझा पृथ्वी जीव पुरता गुदमरून गेला आहे. या मानवानं मला त्रासून टाकला आहे. अशी पृथ्वीची कळकळीची हाक कवयित्री मारते आहे.

                  वसुंधरेची करितो घुसमट 
                 खोदून खोदून केले भुस्कट 
                 बुद्धिमान तू सर्वात पण 
                 मनी टोचतो हा सल....!! 

                  वापराचे भान ठेवू
                  संकल्प करू हा चल
                  मानवा रे आजपासून
                  जपून वापरू जल.....!!

               पूर्वीच्या काळी सर्वत्र विहिरी दिसत होत्या पण आज प्रत्येक घरांमध्ये बोरवेल आहे. माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी जमिनीला बोरवेल घेण्यासाठी छिद्र करून टाकली आहेत.जणू जमिनीची चाळणी करून टाकली आहे. सर्वात बुद्धीमान प्राणी म्हणुन मनुष्याची ओळख आहे. पण मनुष्य स्वतःच्या स्वार्थापोटी निसर्गाची हानी करतोय याचे दुःख हळव्या मनाच्या कवयित्री माधुरी काकडे यांना वाटते. त्यासाठी त्या समस्त जनतेला आवाहन करतात की पाणी वापराचे भान ठेवा मनी संकल्प करा आजपासून प्रत्येकाने पाणी जपून वापरा." जल है तो कल है " या उक्तीप्रमाणे भविष्यात पाण्याची कमतरता भासू द्यायची नसेल तर आजच पाण्याचा जपून वापर करावा असे ठणकावून कवयित्री सांगतात.
                  निसर्गप्रेमी कवयित्री माधुरी ताईच्या सर्वच कविता सृष्टीच्या संहाराचा इशारा देत, निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या आहेत. पाण्याचा जपून वापर वसुंधरेचे भरभरून प्रेम, पर्यावरणाची होणारी हानी, ग्लोबल वॉर्मिंगचे संकट,वाढणारे प्रदूषण,नवनवीन कारखान्यामुळे होणारे प्रदूषण, वृक्षतोड, जंगलतोड त्यामुळे वन्य जीवनाची होणारी ससेहोलपट, प्राणीजीवन, विस्कळीत, टोलेजंग इमारती मुळे होणारी जंगलतोड, शेतकरी,शेततळ्याचा सूकर मार्ग, निसर्गावर मात करण्यासाठी सुचवलेले उपाय, पर्यावरणावर हानीवर होतं असलेली खंत, शब्दांच्या माध्यमातून कवयत्री काकडे करतात. सुखवैभव, दृष्टी, नाळ, दुर्दशा,झाडे,गरज,का, सायकल, स्वप्न, दुष्काळ, मानवा, कोंडी, जरा बदलूया,निष्ठुर या सर्व कविता विचार करायला लावणा-या आहेत. प्रत्येक व्यक्तीने आवर्जून वाचावा असाच सृष्टीकाव्य हा काव्यसंग्रह नक्कीच निसर्गावर भरभरून प्रेम करायला लावणारा आहे.

           कवयित्री माधुरी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७