हे जीवन सुंदर आहे.या ओवी प्रमाणे खरंच जीवन खूप सुंदर आहे. मानवी जीवनात अनेक चढ-उतार येतच असतात. फक्त संकटे, संघर्ष पेलता आले पाहिजे. संघर्षा शिवाय सुख नाही. संघर्ष विना जीवन नाही. ज्यांनी जीवनात अनेक खस्ता खाल्ल्या. त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला. आपले जीवन स्वर्गाहुनी सुंदर बनवू शकतो. फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. दृष्टिकोन सकारात्मक असला की मानवी मनाला नवीन ऊर्जा मिळते. आणि तिची ऊर्जा सकारात्मकतेकडे घेऊन जाते. अशाच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणाऱ्या कवयित्री म्हणजे सांगली जिल्ह्याच्या मनीषा रायजादे( पाटील )यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह म्हणजे काव्यमनीषा वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २० मार्च २०२१ रोजी प्रथमावृत्ती प्रकाशित झाली. प्रकाशक वैभव धनावडे यांनी प्रकाशित केले असून प्रकाशन साहित्यसंपदा प्रकाशन, मुंबई यांनी केले आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १३०/ रुपये असून यातल्या कविता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लावणा-या आहेत यात शंकाच नाही.
काव्यमनीषा या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे प्रातःसमयी नैसर्गिक दर्शन घडवणारे सुमेध कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर साकारले आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्रख्यात ज्येष्ठ गझलकार व कवी ए.के. शेख यांची लाभली असून पाठराखण व शुभेच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी. वीरा राठोड यांच्या लाभल्या आहेत.
प्रत्येक माणसाला एक सुंदर, संवेदनशील मन असतं. निसर्गाने ती देणगी सर्वांनाच दान दिलेली आहे. भेट दिलेली आहे. त्या मनाला योग्य वळण लावून त्यावर चांगले संस्कार केले तर जिवनाचं सोन झाल्याशिवाय राहत नाही. कवयित्री मनीषा रायजादे या पेशाने शिक्षिका जरी असल्या तरी त्या संवेदनशील मनाच्या कवयित्री सुद्धा आहेत. ज्यातून प्रेम, कारुण्य, सद्भावनेचा स्त्राव त्यांच्या कवितेतून दिसून येतो. कवितेवर त्यांची निस्सीम भक्ती, प्रेम आहे. सांगली जिल्ह्यातल्या( देशींग) हरोली या छोट्याशा गावच्या ग्रामीण भागातल्या कवयित्री. त्यामुळे शेती-माती, सगेसोयरे, माणसातले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणूसपण, नात्यांचे बंध, जिवाभावाच्या मैत्रिणी, निसर्ग, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी, माय-मातीचा घट्ट ओलावा या सार्यांनी कवयित्री मनीषा रायजादे यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. त्यामुळेच त्यांचा काव्यमनीषा बहरत आला.
अलगत स्वप्नांना असे
सजवणारा कवी मी
भावना कोमल शब्दांत
फुलवणारा कवी मी....!!
समाजाच्या अनेक व्यथा
परखडपणे मांडतो मी
समतेसाठी, न्यायासाठी
झगडणारा अविरत कवी मी..!!
संवेदनशील मनाच्या कवयित्री मनीषा रायजादे आपल्या स्वप्नांना अलगत आपल्या कवितेमध्ये सजवणारी कवयित्री आहे. कवयित्री स्वतःच्या भावना कोमल शब्दांत कवितेच्या माध्यमातून व्यक्त करते. इतकेच नाही तर समाजाच्या अनेक व्यथा परखडपणे मांडते. समतेसाठी, न्यायासाठी सतत झगडणारी कवयित्री म्हणजे मनीषा रायजादे होय. हे वरील ओळीतून दिसून येते.
दिव्यातील तेजोमय तेवणारी वात
सार्याच दुःखावर करतसे मात
हळुवार नाती सारी तीच फुलवते
दोन कुळांचा उद्धार मुलगीच करते...!!
मुलगी दिव्यातील तेजोमय वात असते. मुलगी सगळ्या दुःखावर मात करणारी असते.मुलगी आई-वडिलांना खूप जीव लावते. मुलगी सासरी जरी गेली तरी तिथून सगळे नाते फुलवते. एक मुलगीच मुलगी, आई, पत्नी, सासू,नणंद, जाऊ, वहिनी, आत्या, बहीण, अशी अनेक रुपे फुलवीत असते. इतकेच नाही तर मुलगी माहेर आणि सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते. सासरच्या मंडळींनाही सर्वांची मर्जी सांभाळून तिथेच सगळेच नाते फुलवते.असे वरील ओळीतून कवयित्री मनीषा रायजादे व्यक्त होतात.
जीवन असे संघर्ष
सुख दुःखाचा हा खेळ
हसत हसत घालायचा
जीवनाचा सुंदर मेळ...!!
कवयित्री मनीषा रायजादे पाटील यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.सहज सुंदर आहे. जीवनात संघर्ष हे करावेच लागतात.त्याशिवाय जीवन सुखी होत नाही. संघर्षाशिवाय जीवन नाही. संघर्ष व हर्ष हे दोन्ही सुख-दुःखाचे खेळ आहेत.अशा सुंदर जीवनाचा मेळ बनवायचा असेल तर हसत हसत जीवन जगता आले पाहिजे. दु:खाला कवटाळून न बसता दु:खाला सुखाची झालर लावून जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी दुःखाला न घाबरता धैर्याने जगता आले पाहिजे. असे कवयित्री मनीषा रायजादे यांना वाटते.
कवयित्री मनीषा रायजादे यांना शेतकर्याबद्दल केवढी आपुलकी आहे. हे बळी पिकवितो मोती या रचनेतून दिसून येते. शेती आणि शेतकरी यांच्या विषयी सखोल ओलावा दिसून येतो. ग्रामीण जीवन जगायला कवयित्रीला आवडते. ग्रामीण जीवन किती सुंदर असतं? ते ग्रामीण जीवन या रचनेतून चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.कवयित्री साहित्याची गोडी जोपासत, निसर्गाशी मैत्री करत, जीवनाच्या वाटा शोधत, महाराष्ट्राचे गीत गात, गझलेचा हात धरून, पावसात त्याला शोधत, स्त्रीच्या जन्माचे महत्व सांगत, शब्दांची थोरवी गात, शब्दांच्या प्रेमात पडणारी कवयित्री मनीषा वास्तवाचे भान राखीत वास्तव चित्र आपल्या कवितेच्या प्रगल्भतेतून दिसून येते.
वाट अहंकारानेच
विनाशाची तो चालतो
जन्मदात्या आई बापा
वृद्धाश्रमी तो धाडतो...!!
आजच्या ग्लोबल दुनियेत माणुसकी वरचेवर पार विरून जात आहे. स्वतःच्या आईवडिलांना आजकालची मुलं सांभाळत नाहीत. अहंकाराने जगणारी मुलं जन्मदात्या आई बापाला वृद्धाश्रमी पाठवत आहेत. हे आजच्या समाजातील भयान वास्तव कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून वरील ओळीतून चित्रीत करताना दिसून येत आहेत.कवयित्री मनीषा रायजादे यांच्या हरवली माणुसकी, जनसेवा, मी एक, माय मराठी,सासर झाले माहेर, बाप माझा, पंढरीची वारी, स्वाभिमान, जीवनाचे गणित, घे जरासे, सावित्रीच्या लेकी,वृद्धांना मिळावे हक्काचे घर या सर्व कविता अत्यंत वाचनीय आहेत कवयित्रींनी अत्यंत साधी सरळ भाषेचा वापर करून कविता अष्टाक्षरी, गजल, अभंग, षडाक्षरी, ओवी, लावणी इत्यादी प्रकारात गेय स्वरूपात लिहिल्याने वाचकांच्या पसंतीस उतरणा-या आहेत.
कवयित्री मनीषा रायजादे यांच्या कविता जीवन जगायला शिकवणाऱ्या, स्वाभिमान जागवणा-या, ग्रामीण भागातले दर्शन घडवणाऱ्या, निसर्गाशी नाते जोडणा-या, आई-वडिलांची सेवा शिकवणाऱ्या, देवावरची श्रद्धा जोपासणाऱ्या, वास्तव सांगणाऱ्या,प्रेम रसाने बहरलेल्या, संस्कार पेरणाऱ्या, जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या, माय मराठीची महती सांगणाऱ्या, अशा सर्वच कविता काळजाचा ठाव घेणाऱ्या एकूण ६८ कविता आहेत.
सर्वांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे काव्यमनीषा होय. कवयित्री मनीषा रायजादे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका /कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव
ता. जि. वाशिम
No comments:
Post a Comment