प्राजक्ताचा सडा अंगणात सर्वत्र पसरतो आणि चोहिकडे सुगंध ज्याप्रमाणे दरवळत राहतो. अगदी तसाच निसर्गसौंदर्याने भरभरून नटलेला काव्यसंग्रह म्हणजे पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती भिसे यांचा दुसरा काव्यसंग्रह 'प्राजक्त' होय. कवयित्री प्रीती भिसे यांचा काव्यसंग्रह खर्याखुर्या प्राजक्ता प्रमाणेच मनमोहक असून वाचकांच्या जीवनात देखील आनंद पेरणारा, वाचकांचे मंदिर सुगंधित करणारा हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अॅंन्ड डिस्ट्रीब्युटर्स सासवड, पुणे यांनी १ मार्च २०१९ रोजी प्रकाशित केला असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ शंभर रुपये असले तरी प्रत्येक कविता या शब्द सौंदर्याने नटलेल्या वाचकाच्या मनाला गारवा देणा-या आहेत. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे प्राजक्ताची फुले असणारा प्राजक्त निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवतो. वाचकाला वाचनाची गोडी वाढवून जातो.
कवयित्री प्रीती भिसे या अत्यंत श्रद्धाळू, मायाळू असल्याने त्यांनी शब्द फुलांची परडी सुरुवातीलाच गणेश वंदना ने केली आहे. प्राजक्ताचे फुल जरी नाजूक असले तरी संध्याकाळी पडणारा प्राजक्ताचा सडा पाहून मन हर्षित झाल्याशिवाय राहत नाही. प्रा:त काळी उठल्याबरोबर अंगणात प्राजक्ताचा सडा पाहून जसं मन सुगंधित होते त्याच प्रमाणे प्रीतीताईंच्या कविता वाचून मन सुगंधित होते.
अल्पायुषी प्राजक्त असा आहे सुंदर देखणा
श्रीहरीसही मोहवितो हा नाजूकही तेवढा
दुसऱ्यासाठी सुगंधित अविरत घालतो तो सडे
बागेतून प्राजक्त कसा गं सुवासिक दरवळे...!!
प्राजक्ताचं फूल जेवढं नाजूक आहे. तेवढेच अल्पायुष्यी आहे. पण प्राजक्ताच्या सुगंधाने संपूर्ण परिसर सुगंधित होतो. देवाला सुद्धा खूप आवडतो. तेवढाच नाजूकही असतो. नुसत्या वाऱ्याच्या झुळकेनेसवे प्राजक्ताचा सडा अंगणी पडतो. त्याचा सुवास सर्वांना मोहून टाकतो. वरील ओळीतून कवयित्री प्रीती भिसे व्यक्त होताना दिसतात.
वाटे माझिया मनाला, स्वच्छंदी पाखरू व्हावे
माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे
दाराच्या जवळ जुई, सुगंधी प्रसन्न वाटे
अंगणात सुबकशी, रांगोळी नक्षी थाटे
आईची प्रेमळ हाक,आनंद नभी न मावे
माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे...!!
संवेदनशील मनाच्या कवयित्री प्रीती भिसे यांचे मन सदैव माहेरच्या अंगणात घिरट्या घालताना दिसून येतं. कवयित्रीला स्वच्छंदी पाखरू होऊन सतत माहेरी जावं वाटतं. माहेरच्या अंगणात दाराच्या जवळ असलेल्या जुईचा सुगंध घेतल्यावर कवयित्रीला प्रसन्न वाटतं. अंगणातली सुबक अशी रांगोळीची नक्षी कवितेच्या मनात घर करून राहते. त्यात आईची प्रेमळ हाक ऐकल्यावर कवित्री प्रीती भिसे यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणून कवयित्रीचे मन सारखं माहेरच्या अंगणी गिरट्या घालताना दिसतं.
कवयित्री प्रितीताई जेवढी निर्मळ तेवढी स्वच्छंदी पाखरू असल्यासारखी आहे. त्यांनी अनेक कविता माती, आकाश, प्रेम, सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या, वेली, झाडे, पशू, पक्षी, डोंगर, वसुंधरा इ.वर केलेल्या आहेत.त्यामुळे कवयित्री प्रीती भिसे यांचे सृष्टीशी खूप छान जवळचे नाते आहे. कवयित्री जेवढ्या हळव्या मनाची आहे. तेवढीच श्रद्धाळू ,मायाळू आहे. हे पहिल्या कवितेतूनच दिसून येते. कवयित्रीला भारत माते विषयी खूप प्रेम आहे.खूप आदर आहे,खूप अभिमान आहे.
कवयित्री प्रितीताई भिसे यांचा 'जीवनाच्या पायवाटेवर' हा पहिला काव्यसंग्रह वाचकाच्या खूप पसंतीस उतरला आहे. जीवनाच्या पाय वाटेवरून चालताना त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्राजक्त वाचकांच्या पसंतीस उतरणारा आहे. कारण त्यांच्या अनेक कविता छंदबद्ध वृत्तामध्ये असल्याने चार चॉंद या काव्यसंग्रहाला लागले आहेत. जेवढ्या कविता वृत्तबद्ध किंवा लगावली मध्ये लिहिली जाते. तेवढी कविता सर्वोत्तम व दर्जेदार बनतील यात संशय नाही. या काव्यसंग्रहात कवयित्रीने अनेक छंद वृत्तामध्ये गझल लिहिल्या आहेत.कवयित्री प्रीती ताईंना निसर्ग सौंदर्या प्रमाणेच शब्द सौंदर्याची देणगी परमेश्वराकडून मिळालेली आहे.
आभाळाचे पंख लावू
प्रयत्नांना देव मोका
यश शिखरा भिडून
उंच जाई माझा झोका...!!
वरील अष्टाक्षरीमधून गरूडा प्रमाणे उंच भरारी घेणाऱ्याला जमिनीचं ओझं नसतं त्याप्रमाणे प्रितीताईना आभाळाचे पंख लावून प्रयत्नांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी उंच झोका घ्यायचा आहे. अशी जिद्द प्रितीताई यांच्या अष्टाक्षरी ओवीतून दिसून येते. जिद्द चिकाटीला गुरु मानणारी कवयित्री प्रेरणेला साथीदार करून साहित्याचा कल्पतरू बनू पाहात आहे. अहंकारा विषयी अत्यंत चीड असणारी कवित्री संवेदनशील ही तितकीच आहे. त्यांची सांजवेळ,आयुष्यात साथीचे स्थान, फुलाला सुगंध मातीचा, तुळस, शब्द मनोरा, रविकिरण, निवांत क्षण, स्वप्नातली सृष्टी, सृष्टीसौंदर्य निसर्गाचे,नववधू, आठवणी, तुझ्या मुळे बहरलं नातं, अवनी,आकाश यासारख्या कविता अत्यंत वाचनीय होऊन वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येताना दिसतात. काही अष्टाक्षरी काव्य कधी शेलकाव्य, कधी शिरोमणी काव्य, तर कधी गजल होऊन तर कधी भुजंगप्रयात, आनंदकंद तर कधी आनंद ज्वाला वृत्त, उद्धव मात्रा वृत्त, पादाकुलक वृत्त असे वेगवेगळ्या मात्रा वृत्तात मांडण्याचा वेगळाच हातखंडा कवयित्री प्रीती ताईंचा दिसून येतो.
कवयित्री प्रितीताई चे अनेक रचनातून त्या धार्मिक असल्याचं दिसून येतं. प्रीती ताईच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना जरी प्रदीर्घ असली तरी मुद्देसूद व काव्यसंग्रहाला न्याय देणारी आहे. प्रस्तावना सौ.मीरा भागवत मीतेश्री यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक विजय काकडे, बारामती यांनी मोजक्या शब्दांत पण सुरेखपणे मांडली आहे. या काव्यसंग्रहात एकूण 61 कविता असून त्या प्राजक्त च्या रूपाने सृष्टी सौंदर्यात व साहित्यात वाचकाला शब्द सौंदर्याने नकळत प्राजक्ता सारखा फुलवीत सुगंधित करणा-या आहेत.
कवयित्री सौ.प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
No comments:
Post a Comment