Friday, 26 February 2021

शिवा काशिद (स्वराज्याचा मावळा)

*शिवा काशीद*



शिवा काशीद हो वीर

होते ते प्रतिशिवाजी

रयतेच्या सुखासाठी

लावी जिवाजी हो बाजी....!



दिसायला हुबेहुब

शिवराय दिसायचे

शिवा काशीद पाहून

सारे जन फसायचे.....!



सिद्दी जोहरने त्यास

शिताफीने पकडले

नाही तो खरा शिवाजी

सिद्दी मगच कळाले....!



पोशाखही शिवाजीचा

शिवा काशीद सजले

गड विशाळगडी म्हणे

महाराज पोहचले.....!



काशीदांना पकडले

खूपसली तलवार

सिद्दी जोहरचा राग

जाला होता अनावर....!



पन्हाळगडाच्या खाली

समाधीचे घे दर्शन

शिवा काशीद मावळा

मन होईल प्रसन्न.....!



शूरवीर काशीदांना

करी मानाचा मुजरा

इतिहास घडवला

शिवा काशीद रे हिरा...!!



नेबापूरी हो स्मारक

शिवाजीने रे बांधले

यशवंत मुलग्यास

अधिकारी हो नेमले...!!



स्वराज्यासाठीच दिले

काशीदने बलिदान

गुप्तहेर खास होते

त्यांनी अप्रिले हो प्राण....!!



हिरा एक गमावला

प्रति शिवाजी हो गाजे

सिद्दी कंटाळून गेला

नाही सापडले राजे...!!

कवयित्री/लेखिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
(ही कविता 'स्वराज्याचे मावळे' या ऐतिहासिक काव्यसंग्रहात प्रकाशित असून नागराळे यांच्या फेसबुक,वृत्तपत्र व ब्लॉगवर प्रकाशित झालेली आहे.कविता आवडल्यास मुळ लेखकाच्या नावाने फॉरवर्ड करावी.... कोल्हापूरचा अजित सावंत स्वत:ला शिवभक्त म्हणणा-या चोरट्याने स्वत:च्या नावावर खपवण्याचा प्रकार उघडीस आला आहे...कायद्याने कॉपी राईट चा गुन्हा दाखल होऊ शकतो याची दक्षता घ्यावी) 










प्रसंगावधानी सिमा

प्रसंगावधानी सिमा*

        एका गावात रमेश व त्याची बायको सिमा राहत होते.रमेश बॅंकेत सर्व्हिसला होता...त्याला नोकरी निमित्त आई वडील गावाला सोडून शहरात राहत होता.पण रमेश खूप समजदार मुलगा होता.त्याला बायको पण तशीच समजदार मिळाली होती...मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं ते रमेश आणि सिमा ला पण कळाले नाही.सिमा अत्यंत शांत ,सुस्वभावी,हसमुख सुंदर मुलगी होती.रमेश दिसायला खूप सुंदर होता .त्यामुळे सिमाच्या आईवडीलांनी पण लग्नाला लगेचच होकार दिला.बॅंकेत नोकरी असल्याने रमेशने स्वत:चा फ्लॅट शहरात घेतलेला होता.दोघे पती-पत्नी खूप आनंदाने राहत होते.सुखाचा संसार चालला होता.रमेश कधी कधी सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्रांना आपल्या घरी बोलावून नाष्टा,कधी जेवण अधूनमधून द्यायचा.त्याचा बोलका स्वभाव मित्रांना जवळ खेचून आणायचा.
         सिमाच्या हाताला पण भारी चव होती.एकसे बढकर एक पदार्थ करून रमेशला डबा द्यायची.मधल्या लंच ब्रेक मध्ये रमेश जेवायला मित्रांमध्ये जायचा तेंव्हा सर्वत्र भाजीचा घमघमाट सुटायचा आणि लोकांच्या तोंडाला आपोआपच पाणी सुटायचे...प्रत्येकाला आपला डबा रमेश शेअर करायचा.सर्व मित्र रमेशला म्हणायचे." यार तू खूप लकी आहेस तुला सिमा वहीनीसारखी बायको मिळाली आहे..." तुझी किती काळजी घेते सिमा वहीनी...दररोज,धुतलेले शुज,ईस्त्रीचे कपडे,हवं नको ते पहाते आणि जेवायला नानाविध प्रकार...यार तुझी खूप मजा आहे. तेव्हा रमेश आपल्या आईवडीलांचे कष्ट आठवायचा...रमेश आपल्या आईवडीलांना सोबत राहण्यासाठी खूप विनवणी करायचा.पण त्याच्या आई-बाबांना शहरात अधिक करमत नसे.त्यांना त्यांचा गाव,गावातला दगडाचा टुमदार वाडा,गायी.म्हशी,नोकरचाकर यातून नकोसे वाटायचे...!
             बघता बघता रमेशच्या लग्नाला एक वर्ष होवून गेले.आणि एक दिवस पहाटे पहाटे सिमा झोपेतून उठली.आणि तिला अचानक धडाधड उलट्या व्हायला लागल्या.रमेशला काहीच समजत नव्हते काय झाले.तो खूप घाबरून गेला.सिमाला खूप अशक्तपणा आला होता.रमेशने त्या दिवशी बॅंकेत सुट्टी टाकली.आणि सिंहाला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेला.सिमाला डॉक्टरांनी अॅडमिट केलं.आणि रक्त,लघवी तपासायला पाठवली.तेवढ्यात खूप काळजीत असलेल्या रमेशला पाहून डॉक्टर साहेब आनंदाने म्हणाले.काळजी करण्याचे कारण नाही.रमेशराव गोड आनंदाची बातमी आहे.तुमच्या घरी नविन पाहुणा येणार आहे.रमेश व सिंहाला खूप आनंद झाला.गावाकडेही बातमी गेली....
           बघता बघता दिवस सरले...सुखाचे दिवस जायला काही वेळ नाही.एकदिवस मध्यरात्रीच अचानक सिमिला प्रसुतीच्या वेदना होवू लागल्या.रमेशने स्वत:च्या फोरव्हीलर गाडीत टाकून अवघ्या १० मिनिटांत सिमाला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला.रमेशला एकीकडे बाप होण्याचा आनंद आणि दुसरीकडे सिमाला होणारा त्रास तो पार हादरून गेला होता.सुखरू सिमाची सुटका व्हावी म्हणून देवाला हात जोडून प्रार्थना करत होता.थोड्याच वेळात नर्सने रमेशला आत बोलावले आणि एका सुंदर कन्येला रमेशच्या हातावर ठेवत नर्स म्हणाली.अभिनंदन सर... तुम्ही खूप नशिबवान आहात तुमच्या घरी कन्यारूपाने लक्ष्मी जन्माला आली आहे.रमेश भरल्या डोळ्यांनी त्या गोंडस राजकुमारी कडे बघत नकळत रमेशचे आपले ओठ नाजुक नवजात बालिकेच्या कपाळावर अलगद ठेवले.स्वर्गसुखाचा परमोच्च आनंदाची अनुभूती रमेश घेत होता.रमेश खूप खुश होता.सिमालाही घरी बहीण नसल्यामुळे मुलगी झाली म्हणून खूप खूश होती.रमेशला पण बहीण नसलेल्यामुळे रमेशचे आई-वडील ही खूश झाले होते.
               सुखाचे दिवस भरभर जात होते.एक दिवस सिमा रमेशला म्हणाली अहो आपल्या परीचा वाढदिवस आपण आपल्या गावी करूयात.तुमची मित्रमंडळी तर कायमच असते.आपण आई बाबांकडे त्यांच्या नातीचा बर्थडे करूयात.मी माझ्या पण आई बाबाला तिकडेच बोलावते.रमेशने लगेचच होकार दिला.आजच्या काळात सासुसा-यांकडे चला म्हणणा-या मुली कमीच आहेत याचे नवल रमेशला वाटत होते.रमेशपेक्षा जास्त सिमाला सासुसासरे व गावाकडचे वातावरण जास्त आवडत होते.दुस-या दिवशी स्त्रिया व रमेशने सर्व खरेदी करून ठेवली.रमेश सिमाला म्हणाला...मी आज माझी ड्युटी करून येतो मग संध्याकाळी निवांत जावूया गावाला...सिमाने सर्व तयारी करून कपड्यांची बॅग भरून घेतली.पहिल्याच मुलांचा पहिला वाढदिवस तो ही गावाला करायचा म्हणून सिमा खूप खूश होती.संध्याकाळी जेवणं आटोपून रमेश गाडीच्या डिकीत सर्व सामान व्यवस्थितपणे ठेवून सिमा आणि रमेश गावाला निघाले. प्रवास दूरचा असल्याने सिमा वारंवार रमेशला म्हणत होती.गाडी सावकाश चालवा.रमेश व सिमाच्या गप्पा जोरात रंगल्या होत्या.रमेश सिमाला सांगत होता की या ड्युटीमुळे कसा दिवस जातो आणि कशी रात्र संपते काही कळतच नाही.बघता बघता आपल्या संसाराला दोन वर्ष झाली आणि दोन हाताचे सहा हात झाले.आपण आपल्या परीला खूप शिकवायचं,तिला कलेक्टर करायची माझी इच्छा आहे.सिमा ही रमेशचं आपल्या लेकीवर किती जीव आहे हे पाहून आनंदित होती.
           आता रात्र खूप झाली होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.सर्वत्र रातकिड्यांचा आवाज कानठळ्या बसेपर्यंत ऐकू येत होत्या.बाळ झोपलं होते सिमाच्या कुशीत...सिमाला ही नकळत डोळा लागला होता.रात्रभर गाडी चालवून रमेशची पाठ दुखत होती.मध्ये मध्येच रमेशला गुंगी चढत होती.डोळे खूप दुखत होते.तरी सिमा म्हणाली होती अहो.एखाद्या ढाब्यावर गाडी थांबवा आणि दोन तास गाडीतच झोपूया.थोडी झोप झाली म्हणजे बरे वाटेल.रमेशला वाटलं कशाला रस्त्याने वेळ करायचा? म्हणून रमेश सिमाला म्हणाला तू काळजी करू नको.पहाटेचा कुंद गारवा रमेशच्या अंगाखांद्याला लागत होता.मध्येमध्येच डोळे आपोआप झाकत होते.तरीही स्टेरिंग सुरूच होतं.सिमाची मात्र आता झोप उडाली होती.तीच लक्ष्य रस्त्यावर समोरच होतं.पहाट झाली होती.आता रस्त्यवरचे हळूहळू अंधुकपणे दिसत होतं.रमेश गाडी चालवत होता.अचनक गाडी रस्त्याच्या डाव्या दिशेने गेल्याची सिमाला जाणवली.समोर विहीर दिसत होती.आणि गाडीचा ब्रेक लागत नव्हता.क्षणात होत्याचं नव्हतं होणार या भितीने सिमाच्या काळजात लख्खं झालं.तेवढ्यात सिमा जोरात ओरडली.आणि आपल्या हाततल्या बाळाला गाडीच्या काचातून बाहेर फेकली.दुस-या क्षणी गाडी दाणकन विहिरीत गेली.विहीर तुडुंब पाण्याने भरलेली होती.सिमाच्या गाडीत पाणी शिरलं.रमेशला गाडीचं दार निघत नव्हतं.किमान तो तरी बाहेर निघून पोहला असता.सिमाचा जीव वाचवला असता.पण एका क्षणात काळाने सिमा व रमेशवर झडप घातली.दोघेही नाकातोंडात पाणी शिरून गाडीतच तडफडून मेले होते.सकाळ झाल्यामुळे लगेचच गावच्या कडच्या लोकांची गर्दी झाली.पोलिस आले....मृतदेह बाहेर काढले....बाळं गवतात पडले होते...जोरजोरात रडल्याचा आवाज ऐकून सर्वजण तिकडे पळाले.बाळ सुखरूप होते.पण बाळांचे आई-वडील बाळाचा पहिला वाढदिवस पहायला नव्हते.या घटनेनं बघ्यांच्याही डोळ्यांत पाणी तरळलं.पोलीस अधिका-याने पंचनामा केला आणि रमेशच्या घरच्यांना बोलावून घेतले... पोलिस म्हणाले रडु नका काका तुमची सून प्रसंगावधानी होती म्हणून तिने मरण डोळ्यासमोर असताना आपल्या मुलीला काचेच्या खिडकीतून बाहेर फेकले..नाहीतर हे गोंडस बाळंसुध्दा आज आपल्यामध्ये नसते.बाळाला लगेचच हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.

लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

बंजारा समाजाचे वास्तव मांडणारा कथासंग्रह म्हणजे -'शिकार'.

 *बंजारा समाजाचे वास्तव मांडणारा कथासंग्रह म्हणजे -"शिकार"*

           बंजारा या जातसमूहाच्या जगण्याचे सूक्ष्म वास्तव, संज्ञा प्रवाही चित्रण डॉक्टर प्राध्यापक युवराज पवार यांचा कथासंग्रह "शिकार" नुकताच वाचण्यात आला. या कथासंग्रहाचे प्रकाशन चेतक ग्रुप प्रकाशक यांनी प्रकाशित केले असून प्रस्तावना डॉ.फुला बागुल यांची लाभली आहे. या कथासंग्रहाची प्रथम आवृत्ती ३० सप्टेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे.कथासंग्रहाचे मूल्य फक्त २१० रुपये असून यातल्या सर्वच कथा या व-हाडी बंजारा भाषेमध्ये बंजारा समाज समूहांची ओळख दाखविणाऱ्या,आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत. खरेतर बंजारा लोक जीवन म्हणजे सांस्कृतिक दस्तऐवज आहे.
            वास्तव,आशयसमृद्धी, बंजारा समूहाचे लोकजीवन, त्यांचा चालीरीती, त्यांचे कष्ट, प्रत्यकारी जिवंत प्रसंगवर्णने, वेगवान कथानक, भाषा प्रयोग,अशा अनेक  वैशिष्ट्यामुळे बंजारा साहित्यात, तांडा साहित्यात "शिकार" हा कथासंग्रह वेगळा दिसून येतो. वाचकाला सर्वच कथा काळजाला भिडणार्‍या आहेत. डॉक्टर युवराज पवार यांच्या शिकार या कथेतील अनेक कथांना,अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. वृत्तपत्रे, मासिके इत्यादी मधून प्रकाशित झालेल्या पुरस्कार प्राप्त कथा असून वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत.
                 जुळी या कथा वाचकाला वाचनाची ओढ लावणारी आहे. वाचकाला कथेमध्ये स्वतः असल्याचा अनुभव होतो. जुळी या कथेमध्ये गीता आणि सिंधूची मैत्री प्रेरणादायी दाखवलेली आहे. या कथेमध्ये बाप  हा सुधारणा प्रिय व सकारात्मक विचारांचा पूजक आहे. सातवी मुलगी झाली असली तरी तो मनःपूर्वक आपल्या मुलीचे स्वागत करतो. बंजारा लोकसमुह हा प्रचंड दारिद्र्य, बंजारा स्त्रियांचे जीवन,या कथेतून व्यक्त केले आहे. कथेतील बाप हा स्त्री भ्रूणहत्येला विरोध करतो. बाळांतपण करायला आलेल्या पार्वतीबाईला सुदाम भ्रुणहत्या करू देत नाही. मुलाच्या हव्यासा पोटी लिंग तपासणी करणार्‍यांच्या आजच्या पिढीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही कथा खूप काही शिकवून जाते.
            भटक्यांचे साहित्य हा शब्दप्रयोग अलीकडे रूढ होतोय. अशाच भटक्या जमाती पैकी एक 'फासेपारधी' या समूहाच्या लोकांचे हलाखीचे जीवन, चित्रित करणारी 'पाल' ही कथा आहे. या कथेमध्ये आजही उपेक्षित असलेल्या पारधी समाजाचे जीवन, फासेपारधी यांचे दुःख, दारिद्र्य, त्यांचा जीवनसंघर्ष प्रा.डॉ.युवराज पवारांनी अतिशय सुरेखपणे रेखाटले आहे. वीतभर पोट भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या कथेततून दिसून येतो. जंगलातून लाव्ह-या,तितर पक्षी पकडून ते विकण्यासाठी फासेपारधी बाईचा संघर्ष, तिची होणारी ससेहोलपट या कथेत दिसून येते. १०० रुपयेसाठी फासेपारधी बाईचा संघर्ष जवळून पाहता येतो. फासेपारधी यांना शिकार नेहमीच मिळते असे नाही. तेव्हा त्यांची होणारी दैना या कथेतून पाहायला मिळते.
             'रासुंडा' या कथेतील शिकला-सवरलेला दिलू सुधारणावादी विचारांचा आहे. शेती रासुंडा केल्याने पिकत नाही तर घाम गाळून कष्ट केल्याने,खत-मुत घातल्याने, शेतीची मशागत केल्याने पिकते असे ठणकावून सांगणारा दिलू देव धर्माच्या नावाखाली रासुंडा करायला तयार होत नाही. कर्ज काढून रासुंडा करू देत नाही. अंधश्रद्धेची मूठमाती करून बापाच्या विरोधात जाऊन हुंड्यासाठी ठेवलेली बोकडं बाजारात विकून येतो.पेरणीच्या तयारीला लागतो. या कथेवरून दांड्याचे मागासलेपण परंपरेविरुद्धचा संघर्ष दिसून येतो.
           'अंगठा'  या कथेत ग्रामीण जीवनाचे राजकारण दिसून येते. मतदानासाठी भीक घालणारी लोकं, या अडल्यानडल्या वेळी कशी आडवे येतात? कशी कोकणात? आणि संधीचा कसा फायदा घेतात? हे दाखविले आहे. शिवा नाईकाच्या सुनेला शेतात साप चावला त्यावेळी घाबरून गेलेला शिवा नाईक गावातल्या सरपंचाकडे सुनेला जीपमध्ये टाकून दवाखान्यात नेण्यासाठी हात जोडून विनंती करतो. तेंव्हा येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्याच पक्षाला मतदान कर म्हणून सांगणारा राजकारणी सरपंच शिवा नाईकाला अंगठा मागतो. तोही परिस्थितीमुळे हतबल झालेला शिवा नाईक आपल्या गरोदर सुनेला वाचविण्यासाठी कोऱ्या कागदावर अंगुठा लावतो. ग्रामीण जीवनातले राजकारणी लोकं व त्यांचा दबाव या कथेतून दिसून येतो.
           'शिकार' ही कथा या कथासंग्रहातील उत्कृष्ट कथा आहे. शिकार करून आपले जीवन चरितार्थ चालविणाऱ्या लोक समूहाची वेदना या कथेतून दिसून येते. शिकल्या सवरलेल्या तुकारामला शिकूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे तो पारंपारिक शिकारी व्यवसायाकडे वळतो. शिकार करणाऱ्या लोकांचे सूक्ष्म वर्णन, मानव विरुद्ध बळी जाणारा पशू हा संघर्ष खूप चपखलपणे डॉक्टर पवारांनी हे विदारक सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी भेदरलेले डुक्कर शेवटी व्यवस्थेचा बळी ठरते.
           'परीक्षा' या कथेतील हरी स्वतः शिकलेला नसतानाही मुलगा नाही म्हणून दुःख न करता मुलांपेक्षा सर्वस्व मानणाऱ्या त्याच्या मुली रूपाली व दीपालीला रक्ताचं पाणी करुन रात्रंदिवस कष्ट करून, स्वतःच्या मुलींना डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहणारा हरी अचानक थ्रेशरच्या मशीन मध्ये जाऊन अपघाती मरण पावतो. पण वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिपाली आपल्या बापाचा मुडदा  घरात पडलेला असताना परीक्षेला जाते. ही घटना सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आहे.मन हेलावून टाकणारी ही सत्य घटना आहे. आपल्या बापाचे शोक करत बसण्यापेक्षा बापाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी,समाजाच्या जाचक रूढी परंपरांना बाजूला सारून दिपाली परीक्षा देण्यासाठी जाते.हे खरंच मोठ्या धाडसाचे व कौतुकाचे एक क्रांतीकारी पाऊल ठरते.
             'शाळा' या कथेत संस्थेवर असलेला आनंदा मास्तर बिन पगारी दिवस काढून मेताकुटीला त्याचा जीव येतो. पंधरा वर्ष एक रुपया पगार न देता राबराबून घेणारा संस्थाचालक शेवटी आनंदाचा अपमान करतो. त्यामुळे नोकरी सोडून आनंदा वडिलांचा परंपरागत व्यवसाय म्हणजेच चांभाराचा व्यवसाय करण्यासाठी बापाची खुंटीला अडकवलेली चपला शिवण्याची पिशवी घेऊन दोन पैसे कमावण्यासाठी निघतो. या कथेमध्ये आनंदा मास्तरचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा ठरतो.
         'तांड्यातली बाई' या कथेतून तांड्याला आलेले आत्मभान, प्रस्थापितांविरोधात निवडणूक लढवणे व ती जिंकणे हा परिवर्तनाचा धागा या कथेतून दिसून येतो. निवडणुकीत दिली जाणारी प्रलोभने, ताणतणाव, जाती समूहाचे दबावगट, सामाजिक समानतेच्या मागणीमुळे होणारा विद्रोह ही कथा दर्शविते. डॉक्टर प्राध्यापक युवराज पवार यांनी तांड्यावरचे हलाखीचे जीवन अनुभवले आहे. त्यामुळे बंजारा समाजात बोलली जाणारी बंजारी भाषा त्यातील संवाद, त्यातले सूक्ष्म वर्णन, सहज हाताळण्याची त्यांची हातोटी, वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वाचण्याची उत्सुकता वाढवते. दांड्याच्या साहित्यात 'शिकार'  हा कथासंग्रह आपला ठसा उमटवणारा 'कोहिनूर' आहे. यात शंकाच नाही.
             लेखक डॉ. प्रा. युवराज पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/ कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Thursday, 18 February 2021

कवीमनाचा आरसा असणारा काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब..

*कवीमनाचा आरसा असणारा काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब*

           लातूर जिल्ह्यातील प्राध्यापक कल्याण राऊत सर यांचा पहिला काव्यसंग्रह बिंब-प्रतिबिंब नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर उगवत्या सूर्याचे प्रतिबिंब विशाल सागरामध्ये पडल्याने सागराचे सोनेरी रूप  व सूर्यकिरणांनी खुलून आलेले नभांगण, सोनेरी झालेले रूप  मनाला मोहिनी घालणारे आहे. प्रकाशक मराठीचे शिलेदार यांनी प्रकाशन केले असून प्रथम आवृत्ती २०२० मध्ये झाली आहे. प्रस्तावना राहुल पाटील यांची असून शुभेच्छा आमदार माननीय अमित विलासराव देशमुख यांच्या लाभले आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त शंभर रुपये असून त्यातील कविता समाज मनाचा आरसा असणाऱ्या वास्तवरुपी अशाच आहेत.
       प्राध्यापक कल्याण राऊत सर यांचा जीवनसंघर्षायातून लेखणीद्वारे शब्द उमटलेले, सुरुवातीपासूनच कवितेची आवड असणारे कवी, स्वतःला साहित्याचा सेवक म्हणतो आई वडिलांप्रति जिवापाड प्रेम करणारा कवी,स्वतःचा संघर्ष आई-बाबा या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतो. सख्या तू भेटला या कवितेतून मित्र जरी मोठा झाला तरी त्याला गरीब मित्राची लाज वाटता कामा नये आणि संपत्तीचा माज ही चढू नये.मित्र म्हणजे सखा सोबती जगात सर्वात जास्त प्रिय असणारे नाते म्हणजे मैत्रीचे जेवढे मजबूत तेवढेच नाजूक. त्याला जीवापाड जपावे. स्वार्थाने बरबटलेल्या दुनियेत फक्त मैत्रीच माणसाला वाचवते असे कवीला वाटते.
             आज आपण पाहतो या मोबाईलच्या जमान्यात मनुष्य प्रत्येक पावलागणिक खोटे बोलत चालला आहे. घरी असला तरी फोनवर बाहेरगावी आहे म्हणून सांगतो. बाहेरगावी असला तर घरी म्हणून सांगतो. या बेगडी दुनियेत माणूसच माणसाला जास्त फसवत चालला आहे. सत्य बोलणे फारच कमी होत चालले आहे. इतकेच नाही तर भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती गोळा करणारे मोठ्या तोऱ्याने मी स्वतःच्या कमाईवर केल्याचे सांगतात.वडीलच मुलांना सांगतात की फोन उचल व सांग की बाबा घरात नाहीत. चांगले संस्कार करायचे सोडून कसे खोटे बोलावे याचे प्रात्यक्षिक दाखवतात. त्यामुळे येणारी पिढी आपोआपच खोटे बोलायला लागली आहे. कितीही संकटे आली तरी माणसाने सदैव खरेच बोलावे असे संवेदनशील असणारा पण सत्याच्या मार्गाने जाणा-या कविला वाटते.

             "आई तू माझी मी तुझा लाल गं
             माझ्यासाठी झेललेस दुःख, झाले तुझे हाल गं
             तळहाताचा करून पाळणा लाविलेस मला पोटी
             राबलीस माझ्यावरसाठी कष्ट दिन रात किती...!!"
 
              आपल्या आईवर जीवापाड प्रेम करणारा कवी आई तू माझ्यासाठी किती राबलीस? किती कष्ट उपसले माझ्यासाठी कष्ट दिनरात केलेस.नेहमी दुःख झेललीस. त्यावेळी तुझे किती हाल गं झाले. तूच तळ हाताचा पाळणा करून मला पोटी लावून घेतलं. आमच्यावर योग्य संस्कार केलेस. मातृत्वाची ओढ असणारा कवी शब्दांच्या माध्यमातून आईचे ऋण व्यक्त करतो. या काव्यसंग्रहाची पहिली पुष्पमाला आपल्या लाडक्या आईस अर्पण करणारा आणि समाजातील युवकांना आईला अनाथ आश्रमात टाकण्यापेक्षा तिच्या सावलीत मोठे व्हा असे आवाहन करतो.
     
             "कोलारच्या खाणीत काम करणारे हात
             खनिजसंपत्ती नवी नवी धुंडाळतात
             तेव्हा अर्थव्यवस्थेची रेल्वे पटरीवर येते 
             भ्रष्टाचार करणारे मात्र हात धुऊन घेतात...!!"

                 कष्ट करणाऱ्या श्रमातून कामगार, शेतकरी किंवा मजूर असो त्यांच्याप्रती कवी प्राध्यापक कल्याण राऊत सर यांना सहानुभूती वाटते. कोलारचा खाणीत रात्रंदिवस कष्ट करणारे हात, पोटासाठी राब राब राबणारी मजूर, खनिजसंपत्ती साठी अथक परिश्रम करतात. शेतात कष्ट करणारा शेतकरी किंवा दोन वेळचे पोटभर घास मिळवण्यासाठी कष्ट करणारा कामगार खाणीवर काम करतात तेंव्हा कुठे देशाची अर्थव्यवस्था चालते पण भ्रष्टाचार करणारे मात्र एसीत बसून हात धुऊन घेतात हे वास्तविक सत्य मांडायलाही कविता भित नाही.

              सावित्रीच्या लेकी आम्ही 
              लागो ना अज्ञाना वारा 
              लढा स्वयं ध्येयाप्रती 
               अन्न वस्त्र आणि निवारा....!!

                 ज्या सावित्री मुळे आजच्या लेकी शिकून-सवरून शहाण्या झाल्यात. अनेक क्षेत्रात उंच भरारी स्त्रियांनी घेतली. पण त्या माईलाच विसरत चालल्या आहेत. शिकलेल्या स्त्रियांनासुद्धा अडाण्यासारखे बुवा, महाराज, वृत्त, वैकल्य, साधू, बापू च्या मागे लागलेल्या दिसतात. अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका. स्वतःच्या ध्येयप्राप्तीसाठी लढा आणि अन्न वस्त्र निवारा मिळवा. स्वतःच्या पायावर स्वावलंबी जीवन जगायला शिका. सावित्री विद्येची खरी देवता आहे तिनेच खरी मानवता शिकवली त्याच मार्गाने चला.... असे कवी राऊत आवर्जून सांगतात.
            डबघाई, आभार, काहूर,रूप पालटले, पत्रावळी समरस्ता, कर्मभूमी, जमीन, माझे अस्तित्व, विद्याधन, प्रिय मृत्यू , धुळवड, पाटलाचं गाव, घाबरलोय, मानलेलं नातं, कोरड्या मातीत, अरे शेतकरी दादा... अशा अनेक रचना विविधांगांनी नटलेल्या वास्तवता दर्शविणाऱ्या, स्वतःचे कर्तव्य सांगणाऱ्या शेती, माती, शेतकरी व त्यांचे कष्ट सांगणाऱ्या सहज साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे थेट काळजाला भिडणाऱ्या कविता आहेत. कवी मनाच्या अंतर्मनातील काव्याचे बिंब शब्दाच्या रूपाने काव्यबद्ध होऊन बिंब-प्रतिबिंब च्या रूपाने वाचकांसमोर आले आहेत सर्वांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब होय या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता मनाला साद घालणा-या आहेत.

           कवी प्राध्यापक कल्याण राऊत सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....

समीक्षिका,लेखिका, कवयित्री, शिक्षिका 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि.वाशिम 
मोबाईल 9767663257

Saturday, 13 February 2021

*वीरांगना झलकारीबाई*

*थोर विरांगना झलकारीबाई*

       देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारी इतिहासकालीन थोर विरांगणा म्हणजे झलकारीबाई. जिचे नाव आजही बऱ्याच स्त्रियांना माहिती नाही. झलकारी बाईचा जन्म उत्तर प्रदेशातील झांसी जवळच्या भोजला या छोट्याशा गावात कोळी समाजामध्ये झाला. वडील सदोवा सिंह आणि आई यमुना देवी यांच्या पोटी २२ नोव्हेंबर १८३० रोजी त्यांचा जन्म झाला. झलकारीबाई खूप छोटी असतानाच बालपणी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी त्यांना मुला प्रमाणे सांभाळले. स्वसंरक्षणाचे सर्व धडे झलकारीबाईना देऊ लागले. तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, भाला फेकणे, अशा सर्व युद्ध कौशल्यात झलकारीबाई पारंगत झाल्या.
           झलकारीबाई शूरवीर, धाडसी, पराक्रमी योद्धा होत्या. एकदा झलकारीबाई जंगलात गेल्या असताना अचानक त्यांच्यासमोर वाघ आला. वाघ भुकेने व्याकुळ झालेला डरकाळी फोडत धावत झलकारी बाईच्या अंगावर चवताळून येणार इतक्यात झलकारीबाईनी कमरेला अडकवलेली कु-हाड वाघावर भिरकावली. तेवढ्यात वाघ रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. स्वतःचे रक्षण करणारी धाडसी स्त्रीचा इतिहास वाचला तरी आजच्या काळातील स्त्रियांच्या अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर एक वेळ चोरांनी एका व्यापार्‍याला  लुटलं होतं. तेव्हा झलकारीबाई वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून त्या चोराच्या दिशेने जाऊन त्यांच्या सोबत लढाई करून सर्व चोरांना सळो-की-पळो करून सोडले. आणि लुटलेला माल तिथेच टाकून आपला जीव मुठीत घेऊन चोर पसार झाले.झलकारीबाईच्या शौर्याचे किस्से पंचक्रोशीत सर्वदूर पसरले होते.
               झलकारी बाईचा विवाह तोफखान्याचे काम करणाऱ्या शूर सैनिक पुरणसिंग यांच्याशी झाला. झलकारी बाईच्या धाडसाचे, शौर्याचे किस्से राणी लक्ष्मीबाई ऐकून होत्या. एकवेळ पूजेच्या समयी दोघींची भेट झाली. आणि काय आश्चर्य राणी लक्ष्मीबाई अचंबित झाल्या. झलकारीबाई दिसायला हुबेहूब त्यांच्यासारखीच होती. नंतर राणी लक्ष्मीबाईने स्त्री लष्करात झलकारीबाई यांना सामील करून घेतले. पुढे झलकारीबाई त्यांची मुख्य सल्लागार बनल्या.
              १८५७ च्या युद्धात जनरल ह्यू रोज या इंग्रज अधिकाऱ्याने अफाट सैन्यानिशी झांसीवर आक्रमण केले.२३ मार्च १८५८ मध्ये सैन्यानिशी झांसीवर आक्रमण करण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी राणी लक्ष्मीबाई पेशव्यांकडून मदतीची अपेक्षा धरत बसल्या होत्या. पण कोणाचीही मदत मिळाली नाही. एवढ्या बलाढ्य सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही. असे राणी लक्ष्मीबाईंना वाटू लागले. कारण तात्या टोपे हे जनरल ह्यु रोज कडून पराभूत झाले होते. बघता बघता इंग्रजांचे सैन्य झाशीमध्ये पोहचले. इतक्यात झलकारीबाई ने राणी लक्ष्मीबाईचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः राणीच्या वेशात समोर आली. व जोरदार लढाई सुरू केली. तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई निसटून पळून जाण्यासाठी वेळ मिळाला.  इकडे युद्धात झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई सारखा वेश परिधान केल्याने व दिसायला हुबेहूब लक्ष्मीबाई सारखी दिसत असल्याने लढाई सुरू केली.आपण राणी लक्ष्मीबाईशींच लढत आहोत याचं भ्रमात इंग्रज राहिले. तेवढ्यात झलकारीबाई जनरल ह्यु रोज यांना भेटण्यासाठी गेल्या. इंग्रजांना मोठा आनंद वाटला की झांसी तर आपल्या ताब्यात आली आहे. पण त्यांची राणी सुद्धा आपल्या ताब्यात आली. तेवढ्यात तिथला एक सैनिक झलकारीबाई यांना ओळखत होता त्यांनी सांगितले की ही राणी लक्ष्मीबाई नसून त्यांची सैनिक झलकारीबाई आहे. तेवढ्यात राणी लक्ष्मीबाई सुखरूप स्थळी जाऊन पोचल्या होत्या.
        जनरल ह्युजने झलकारीबाईना  एक प्रश्न विचारले तो असा ....तुमच्या सोबत काय करायला पाहिजे? त्यावर मनाने खंबीर असणाऱ्या झलकारीबाईने उत्तर दिले की.... मुझे फासी दे दो | झलकारीबाईचे इतके साहस पाहून ह्यु रोज प्रभावित झाला आणि म्हणाला .... "यदि भारत की एक प्रतिशत महिलांये भी उसकी जैसी हो जाये, तो ब्रिटिश सरकार को जल्द ही भारत छोडना पडेगा |
        अशी धाडसी विरांगणा अखेरपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढत राहिली. त्यातच त्यांना वीरमरण आले. जेव्हा इंग्रजांना माहिती झाले की ज्या महिलेने त्यांना युद्धात सळो कि पळो करुन सोडले होते ती महिला राणी लक्ष्मीबाई नसून झलकारी राणी होती. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...भारत सदा ही अशा नारींचा सन्मान सदैव करेल...
            कवी मैथिलीशरण गुप्त यांनी तिच्या शौर्याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे. 

                "जाकर रण में ललकारी थी |
                वह तो झांसी की झलकारी ती |
                गोरों से लढना  सिखा गयी |
                 है इतिहास मे झलक रही 
                 वह भारत की ही नारी थी |"

                   अशा या महान विरांगणेचा भारत सरकारने २२ जुलै २००१ रोजी झलकारी राणीच्या स्मरणार्थ पोस्टात एक तिकीट काढले आहे. त्यांचे स्मारक अजमेर,राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारने एक प्रतिमा आग्रा येथे स्थापन केली आहे. लखनऊमध्ये झलकारीबाई वर एक हॉस्पिटल उघडण्यात आले आहे. अशा या महान विरांगणीचा इतिहास आजच्या काळातील सर्व स्त्रियांना माहीत असला पाहिजे. ८ मार्च जागतिक दिनाच्या निमित्ताने अशा धाडसी विरांगणेला माझा मानाचा मुजरा....!!
       सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

                   झलकारीचे शौर्य घे 
                   घे जिजाऊचे संस्कार 
                   आकाशाला कवेत घे 
                   कर सावित्रीचे स्वप्न साकार....!!

                    घे अहिल्येचा कणखर बाणा 
                    मुक्ता साळवेचे धाडस घे 
                    रमाईचा त्याग शिक जरा
                     ताराराणीची कार्यकुशलता घे....!!

                     अन्यायावर मात करण्या
                      कधी तानुबाई बिर्जे हो तू
                     अंध:काराला दूर सारण्या
                      हो कधी दिव्याची वात तू.....!!

                       फातिमॉं बी सारखी तळमळ ठेव  
                       रख्माबाई राऊत सारखी सेवा कर
                       सावित्रीची खरी लेक हो तू
                       अन्यायावर उठून प्रहार कर....!!

लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
फोन ९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com