आज प्रत्येकजण मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. मी त्याच्यापेक्षा चांगला. माझाच मोठा बंगला. माझाच मुलगा चांगला. असा खोटा आभास निर्माण करण्याच्या मागे लागला आहे. माणसाच्या अस्तित्वापेक्षा जेव्हा आभास मोठा वाटायला लागतो. तेंव्हा माणूस स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो. अशी अस्तित्व विसरलेली माणसं मग स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहायला तयार नसतात अशाच विचारसरणीला साहित्यातून आरसा दाखवण्याचे काम अहमदनगर जिल्ह्यातील कवयित्री विद्या प्रकारच्या जाधव यांनी केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कवयित्री विद्या प्रकाश जाधव (वीप्रजा) यांचा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती १फेब्रुवारी २०२१रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी नावाला साजेसे अतिशय सुंदर चित्र रेखाटले आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना व पाठराखण ज्येष्ठ कवी गीतकार हनुमंत चांदगुडे सरांची लाभली आहे. तसेच या काव्यसंग्रहात एकूण 77 कविता असून मूल्य केवळ दीडशे रुपये आहे यातल्या सर्वच कविता वाचकाच्या मनाचा तळ शोधणा-या आहेत आणि माणसाला भेटली रूप. आरशातील प्रतिबिंब या प्रमाणे स्वच्छ दाखवणा-या आहेत.
भेगाळल्या भूमीच्या या
कशा भेगाळल्या भेगा
फाटलेल्या नशिबाच्या
सांगा कशा शिवू रेघा.....!!
शेतकरी, कष्टकरी रात्रंदिवस शेतात कष्ट उपसतो. काळ्याआईची सेवा करतो म्हणून शेतकर्याला अख्या जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतकरी आहे म्हणून जग आहे. त्याच्यामुळे सर्वांना धनधान्य व पोटभर खायला मिळते पण शेतकऱ्याचे जीवन म्हणजे अनेक वादळं, संकट झेलणार , अत्यंत हलाखीचे जीवन शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो. मरमर करतो.आपल्या हाडाची काडं करून धान्य पिकवतो आणि ऐन वेळी पाऊस दगा देतो. वादळ अति अतिवर्षण, रोगराई इत्यादी गोष्टींनी शेतकरी हवालदिल होतो भेगाळल्या जमीनीत अपार मेहनत करतो फाटलेल्या नशिबाच्या सांगा कशा शिवू रेघा म्हणून कवयित्रीने शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट वरील गोळीतून विशद केले आहे.
पाकळीत जपलेला सुगंध
फुलातून उडून गेला
जन्मदात्या काळजाचा तुकडा
आश्रमात सोडून गेला....!
मुलं लहान असताना आई-वडिलांवर त्यांचा खूप जीव असतो. बालपणी जगातली सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे आई वडीलच असतात. आणि एकदा का मुलं मोठी झाली की त्यांच्या पंखात बळ येतं आणि अचानक उडून जातात. मुलाचे स्वतःचे लग्न झालं की हळूहळू मुलांना आई-वडील नकोसे वाटायला लागतात.आणि एक दिवस मुलगाच आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा असून त्यांना आश्रमात सोडून येतो. असे भयाण वास्तव वरील ओळीतून चित्रित करणाऱ्या या ओळी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.
प्रेमावर निस्वार्थ होते मी
तुझ्यासाठी घार होते मी
बेड्या टाकुनी पायात माझ्या
केलस ठार मला तू
कारण तू तर वासनेचा बळी...!!
आजच्या काळात निस्वार्थी प्रेम मिळणे फारच कठीण होत चालले आहे. पण कवयित्री विद्या जाधव यांनी निस्वार्थी प्रेम व प्रेमासाठी वाट्टेल ते सहन करण्याची तयारी दाखवली, स्त्रीजातीला अनेक बंधने लादली जातात. जगताना मन मारून अनेक वेळा स्त्री जगत असते कारण नरदेह तर वासनेचा बळी असतो.अशी खंत वरील होळीतून कवयित्रींनी व्यक्त केली आहे
शाब्दिक खेळ खेळला माझ्याशी
नको नको म्हणता लढलास माझ्याशी
विषारी तुझ्या जीव्हेने केला घात
वेदनेचे घरे पडले हृदयाच्या आत...!!
संशयासारखे दुसरे विश नाही. संशय हा कॅन्सरपेक्षाही भयंकर असतो. ज्याच्या सुखी संसारात संशय आला की सुखी संसार पार विस्कळित होऊन जातो. साधे संशयाची जरी पाल चुकचुकली तर पती-पत्नीमध्ये अति भांडण कधी लयाला जातात आणि क्षणात घटस्फोटावर प्रकरण येतं हे कळत सुद्धा नाही. सापाच्या विषापेक्षाही जिभेने दिलेली जिव्हारे घात पार माणसांच्या पार हृदयावर अनेक वार करून तुकडे-तुकडे करून टाकतात म्हणून बोलताना विचार करून बोलावे असे वरील ओळीतून कवयित्री सांगण्याचा प्रयत्न करते आहे.
कवयित्री विद्या जाधव यांना सामाजिक भान, कर्तव्याची जाण, समाजाचे वास्तव, निसर्गाशी लढा, प्रेमभाव, संवेदनशीलता, स्त्रीमनाची घालमेल,स्त्री-स्वातंत्र्य, मैत्रीभाव, प्रेम, शेतकऱ्याविषयी कळकळ, गरिबांची जाणीव इतरांचे दुःख या सार्या गोष्टी प्रकाश टाकणा-या कविता मनाला खूपच भावते 'नुसतेच कविता लिहिणं'ही कविता वाचकाच्या मनात घर केल्याशिवाय राहत नाही. कवयित्री( विप्रजा) यांचा माणूसपण, कर्माची मशाल, बापाची आठवण, न समजलेली आई,रंग जीवनाचे, विचार मंथन, कर्तव्य बजावणार, संशय, माणसं अशीच असतात, तू तर वासनेचा बळी , स्त्री जन्मा तुझी कहाणी , गर्भ कळी आणि आरसा गमावलेली माणसं अशा अनेक कविता अत्यंत वाचनीय व अर्थ गर्भित आहेत.
आरसा गमावलेली माणसं या काव्यसंग्रहात एकूण 77 कविता असून बांधणी अतिशय उत्कृष्ट आहे. माणसाला माणसाचे खरे रूप दाखवणारा हा काव्यसंग्रह प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच आहे. या काव्यसंग्रहातील सर्वच रचना जरी साध्या-सोप्या असल्या तरी त्यामध्ये असलेल्या भावार्थ अगदी खराखुरा, प्रेमळ आहे हे दिसून येते कवयित्री विद्या प्रकाश जाधव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका /कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परि.प्राथमिक.शाळा. कोकलगाव
ता. जि. वाशिम