Sunday, 6 February 2022

जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे-काव्यमनीषा

 *जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लावणारा काव्यसंग्रह म्हणजे- काव्यमनीषा*

       हे जीवन सुंदर आहे.या ओवी प्रमाणे खरंच जीवन खूप सुंदर आहे. मानवी जीवनात अनेक चढ-उतार येतच असतात. फक्त संकटे, संघर्ष पेलता आले पाहिजे. संघर्षा शिवाय सुख नाही. संघर्ष विना जीवन नाही. ज्यांनी जीवनात अनेक खस्ता खाल्ल्या. त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला. आपले जीवन स्वर्गाहुनी सुंदर बनवू शकतो. फक्त जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. दृष्टिकोन सकारात्मक असला की मानवी मनाला नवीन ऊर्जा मिळते. आणि तिची ऊर्जा सकारात्मकतेकडे घेऊन जाते. अशाच जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणाऱ्या कवयित्री म्हणजे सांगली जिल्ह्याच्या मनीषा रायजादे( पाटील )यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह म्हणजे काव्यमनीषा वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २० मार्च २०२१ रोजी प्रथमावृत्ती प्रकाशित झाली. प्रकाशक वैभव धनावडे यांनी प्रकाशित केले असून प्रकाशन साहित्यसंपदा प्रकाशन, मुंबई यांनी केले आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १३०/ रुपये असून  यातल्या कविता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला लावणा-या आहेत यात शंकाच नाही.
        काव्यमनीषा या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे प्रातःसमयी नैसर्गिक दर्शन घडवणारे सुमेध कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर साकारले आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्रख्यात ज्येष्ठ गझलकार व कवी ए.के. शेख यांची लाभली असून पाठराखण व शुभेच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवी. वीरा राठोड यांच्या लाभल्या आहेत.
     प्रत्येक माणसाला एक सुंदर, संवेदनशील मन असतं. निसर्गाने ती देणगी सर्वांनाच दान दिलेली आहे. भेट दिलेली आहे. त्या मनाला योग्य वळण लावून त्यावर चांगले संस्कार केले तर जिवनाचं सोन झाल्याशिवाय राहत नाही. कवयित्री मनीषा रायजादे या पेशाने शिक्षिका जरी असल्या तरी त्या संवेदनशील मनाच्या कवयित्री सुद्धा आहेत. ज्यातून प्रेम, कारुण्य, सद्भावनेचा स्त्राव त्यांच्या कवितेतून दिसून येतो. कवितेवर त्यांची निस्सीम भक्ती, प्रेम आहे. सांगली जिल्ह्यातल्या( देशींग) हरोली या छोट्याशा गावच्या ग्रामीण भागातल्या कवयित्री. त्यामुळे शेती-माती, सगेसोयरे, माणसातले प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणूसपण, नात्यांचे बंध, जिवाभावाच्या मैत्रिणी, निसर्ग, झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी, माय-मातीचा घट्ट ओलावा या सार्‍यांनी कवयित्री मनीषा रायजादे यांचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. त्यामुळेच त्यांचा काव्यमनीषा बहरत आला.

         अलगत स्वप्नांना असे 
         सजवणारा कवी मी 
         भावना कोमल शब्दांत
          फुलवणारा कवी मी....!!

           समाजाच्या अनेक व्यथा 
           परखडपणे मांडतो मी 
           समतेसाठी, न्यायासाठी 
           झगडणारा अविरत कवी मी..!!

      संवेदनशील मनाच्या कवयित्री मनीषा रायजादे आपल्या स्वप्नांना अलगत आपल्या कवितेमध्ये सजवणारी कवयित्री आहे. कवयित्री स्वतःच्या भावना कोमल शब्दांत कवितेच्या माध्यमातून व्यक्त करते. इतकेच नाही तर समाजाच्या अनेक व्यथा परखडपणे मांडते. समतेसाठी, न्यायासाठी सतत झगडणारी कवयित्री म्हणजे मनीषा रायजादे होय. हे वरील ओळीतून दिसून येते.

          दिव्यातील तेजोमय तेवणारी वात 
          सार्‍याच दुःखावर करतसे मात
          हळुवार नाती सारी तीच फुलवते 
          दोन कुळांचा उद्धार मुलगीच करते...!!

       मुलगी दिव्यातील तेजोमय वात असते. मुलगी सगळ्या दुःखावर मात करणारी असते.मुलगी आई-वडिलांना खूप जीव लावते. मुलगी सासरी जरी गेली तरी तिथून सगळे नाते फुलवते. एक मुलगीच मुलगी, आई, पत्नी, सासू,नणंद, जाऊ, वहिनी, आत्या, बहीण, अशी अनेक रुपे फुलवीत असते. इतकेच नाही तर मुलगी माहेर आणि सासर अशा दोन्ही कुळांचा उद्धार करते. सासरच्या मंडळींनाही सर्वांची मर्जी सांभाळून तिथेच सगळेच नाते फुलवते.असे वरील ओळीतून कवयित्री मनीषा रायजादे व्यक्त होतात.

                जीवन असे संघर्ष 
                सुख दुःखाचा हा खेळ 
                हसत हसत घालायचा 
                जीवनाचा सुंदर मेळ...!!

       कवयित्री मनीषा रायजादे पाटील यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे.सहज सुंदर आहे. जीवनात संघर्ष हे करावेच लागतात.त्याशिवाय जीवन सुखी होत नाही. संघर्षाशिवाय जीवन नाही. संघर्ष व हर्ष हे दोन्ही सुख-दुःखाचे खेळ आहेत.अशा सुंदर जीवनाचा मेळ बनवायचा असेल तर हसत हसत जीवन जगता आले पाहिजे. दु:खाला कवटाळून न बसता दु:खाला सुखाची झालर लावून जीवन जगता आले पाहिजे. त्यासाठी दुःखाला न घाबरता धैर्याने जगता आले पाहिजे. असे कवयित्री मनीषा रायजादे यांना वाटते.
        कवयित्री मनीषा रायजादे यांना शेतकर्‍याबद्दल केवढी आपुलकी आहे. हे बळी पिकवितो मोती या रचनेतून दिसून येते. शेती आणि शेतकरी यांच्या विषयी सखोल ओलावा दिसून येतो. ग्रामीण जीवन जगायला कवयित्रीला आवडते. ग्रामीण जीवन किती सुंदर असतं? ते ग्रामीण जीवन या रचनेतून चित्र डोळ्यासमोर उभं राहतं.कवयित्री साहित्याची गोडी जोपासत, निसर्गाशी मैत्री करत, जीवनाच्या वाटा शोधत, महाराष्ट्राचे गीत गात, गझलेचा हात धरून, पावसात त्याला शोधत, स्त्रीच्या जन्माचे महत्व सांगत, शब्दांची थोरवी गात, शब्दांच्या प्रेमात पडणारी कवयित्री मनीषा वास्तवाचे भान राखीत वास्तव चित्र आपल्या कवितेच्या प्रगल्भतेतून दिसून येते.

                 वाट अहंकारानेच
                 विनाशाची तो चालतो 
                 जन्मदात्या आई बापा 
                 वृद्धाश्रमी तो धाडतो...!!

       आजच्या ग्लोबल दुनियेत माणुसकी वरचेवर पार विरून जात आहे. स्वतःच्या आईवडिलांना आजकालची मुलं सांभाळत नाहीत. अहंकाराने जगणारी मुलं जन्मदात्या आई बापाला वृद्धाश्रमी पाठवत आहेत. हे आजच्या समाजातील भयान वास्तव कवयित्री आपल्या कवितेच्या माध्यमातून वरील ओळीतून चित्रीत करताना दिसून येत आहेत.कवयित्री मनीषा रायजादे यांच्या हरवली माणुसकी, जनसेवा, मी एक, माय मराठी,सासर झाले माहेर, बाप माझा, पंढरीची वारी, स्वाभिमान, जीवनाचे गणित, घे जरासे, सावित्रीच्या लेकी,वृद्धांना मिळावे हक्काचे घर या सर्व कविता अत्यंत वाचनीय आहेत कवयित्रींनी अत्यंत साधी सरळ भाषेचा वापर करून कविता अष्टाक्षरी, गजल, अभंग, षडाक्षरी, ओवी, लावणी इत्यादी प्रकारात गेय स्वरूपात लिहिल्याने वाचकांच्या पसंतीस उतरणा-या आहेत.
      कवयित्री मनीषा रायजादे यांच्या कविता जीवन जगायला शिकवणाऱ्या, स्वाभिमान जागवणा-या, ग्रामीण भागातले दर्शन घडवणाऱ्या, निसर्गाशी नाते जोडणा-या, आई-वडिलांची सेवा शिकवणाऱ्या, देवावरची श्रद्धा जोपासणाऱ्या, वास्तव सांगणाऱ्या,प्रेम रसाने बहरलेल्या, संस्कार पेरणाऱ्या, जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या, माय मराठीची महती सांगणाऱ्या, अशा सर्वच कविता काळजाचा ठाव घेणाऱ्या एकूण ६८ कविता आहेत.
        सर्वांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे काव्यमनीषा होय. कवयित्री मनीषा रायजादे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!

समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता. जि. वाशिम
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 1 February 2022

जगण्यासाठी ऑक्सिजन देणारा काव्यसंग्रह म्हणजे प्रश्न टांगले आभाळाला

 *जगण्यासाठी ऑक्जीजन देणारा गझलसंग्रह म्हणजे "प्रश्न टांगले आभाळाला"*
   
         कविता करणं साधं काम नाही. ज्याच्या अंगात नसानसात शब्द खेळतात, शब्दच प्रेरणा देतात, शब्द जगवतात, जागवतात, शब्दच आधार देतात, शब्द जीवनाला आकार देतात, वळण घेतात, वळण देतात, शब्द जगायला शिकवतात, शब्द जमिनीची मशागत करतात, शब्दच प्रश्न विचारतात आणि उत्तरही देतात,शब्दच नवी उमेद, संजीवनी देतात तसाच गझल संग्रह म्हणजे 'प्रश्न टांगले आभाळाला'
        अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी, गझलकार नितीन देशमुख सर यांचा उत्कृष्ट गझल संग्रह म्हणजे 'प्रश्न चांगले आभाळाला' हा गझलसंग्रह नुकताच वाचनात आला आणि थेट काळजाला जाऊन भिडला. मला गझल येत नाही पण दुसऱ्यांची गझल वाचायला खुप आवडते. गजलेचे काही तंत्र असतात ते आत्मसात करून शुद्ध पद्धतीने गझल लिहिणे हे एका सोनाराने दागिने हाताने घडवून बनवल्या सारखीच मेहनत असते. गझलेचा प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र कविताच असते पण गझल थेट काळजाला भिडते. प्रश्न टांगले आभाळाला या गझलसंग्रहाचे प्रकाशन प्रतिमा पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२० रोजी प्रकाशक दीपक चांदणे यांनी प्रकाशित केली. या गजल संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे उत्कृष्ट डबल कव्हर बांधणी आहे. मुखपृष्ठावरील चित्र मानवाच्या मनात असंख्य प्रश्न,असंख्य भाव, विचार, कविता हजारो स्वप्न होऊन झाड होऊ पाहणारी आहे. या गझलसंग्रहाचे मूल्य केवळ २५० रुपये आहे पण यातली प्रत्येक गझल थेट काळजाला भिडणारी आहे. शब्द न शब्द जगण्याची उमेद वाढवणारा आहे आणि मानवाला ऑक्सिजन पुरवणारा आहे.

    जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणार्‍याला नाही
    जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही

    कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला 
    चिंता याची बघणाऱ्याला,लढणाऱ्या ला नाही

      गझलकार नितीन देशमुख यांचा शब्द न शब्द फक्त वाचणाऱ्याला कळतो,पाहणाऱ्याला नाही. जो माणूस जीवन जगतो जो जीवन जगण्यासाठी अग्निपरीक्षा देतो, जो कष्ट उपसतो, वीतभर पोटाची खळगी भरण्यासाठी अंगभर कष्ट करतो, त्यालाच विस्तव करतो त्यालाच उन्हाचे चटके बसतात. बघणार्‍याला त्याचं काहीच वाटत नाही. जीवन हे फक्त जगणा-यालाच कळते. आपण कसं जीवन जगत आहोत?  पळणाऱ्याला जीवनाचा अर्थ कळत नाही. आणि लढणारा माणूस हरण्याची चिंता करीत बसत नाही. तो फक्त लढतच राहतो. कोण जिंकेल कोण हारेल याची खरी चिंता बघणा-यालाच असते. लढणाऱ्या ला फक्त लढायचं माहिती असतं. असा खोल अर्थ लिहिलेला शेर संवेदनशील मनाचा कवी गझलकार नितीन देशमुख यांच्या ओळीतून दिसून येतो.

     रोज घेतली तरीही त्याला दारू कळली नाही
    दारू कळले विकणाऱ्याला, पडणा-याला नाही.

        वरील शेर म्हणजे दारू पिणाऱ्या माणसाच्या डोक्यातल्या मुंग्या उतरवणारा आहे. दारू पिणाऱ्या माणसाने जर मन लावून हा शेर वाचला तर आयुष्यात कधी पुन्हा दारू पिणार नाही. असा अर्थगर्भित शेर प्रत्येक दारूच्या दुकानासमोर बोर्ड शासनाने लावला पाहिजे. म्हणजे दारूचे व्यसन मुक्ती केंद्राची गरज भासणार नाही. आज समाजात कित्येक लोकं व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारू पिणारे लोक फक्त स्वतःच्याच जीवनाची राखरांगोळी करीत नाही तर अख्ख्या कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करीत असतात.काही रथी-महारथी तर घरातले धान्य विकून दारू पितात. दारू मुळे कॅन्सरसारख्या आजाराला निमंत्रण देतात आणि कुटुंबाची जिम्मेदारी बायको वर टाकून अवेळी मरण पावतात. जो दारू पितो तो कशासाठी पितो कुणास ठाऊक? पिणारा रोज पितो पण त्याला दारू कळत नाही. दारू विकणार्‍याला कळते दारू पिऊन पडणाऱ्या ला नाही असा खोल अर्थ वरील गझलेतून कळतो.
             कवी नितीन देशमुख यांचा गझल लिहिण्याचा फार मोठा वेगळाच हातखंडा आहे. मी आजपर्यंत अनेकांच्या गझल वाचल्या पण नितीन देशमुख सरांची काही औरच बात आहे. त्यांच्या गझल पुन्हा  वाचाव्यात असे वाचकाला वाटते. प्रत्येक वेगवेगळ्या लगावली मध्ये लिहिलेल्या गझल वाचकांच्या कधी अंगवळणी पडतात कळतच नाही.गझलेतील प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता असतो शंभर कविता आणि एक गझल बरोबर असते तेवढी ताकत गझलेत असते.हल्ली कुणीही उठसूठ गझल करायला लागले आहे. थोडसं तंत्र माहीत झाले की झाले गझलकार. पण मोठ्या मनाचा गझलकार, अगोदर उत्तम कवी असला पाहिजे. गझलकार नितीन देशमुख आपल्या नावाच्या समोर गझलकार किंवा कवी हा शब्द लावत नाहीत यातच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. एक से बढकर एक गझल नितीन देशमुख सरांच्या आहेत. गझलसंग्रह वाचावा तर नितीन देशमुख सरांचा गझल संग्रह आवर्जून वाचावा असाच आहे. कुठलाही बडेजावपणा नाही. प्रत्येक गझल वेगवेगळ्या वृत्तात व लगावलीत अगदी सराईतपणे बसवण्याचा देशमुख यांचा वेगळा हातखंडा आहे.त्यांच्या गझलेवर प्रेम करणारी विदर्भातले लाखो वाचक मंडळी आहेत.

      ईश्वराने निर्मिली जर या जगातील माणसांना
      माणसाच्या स्पर्शल्याने, देव अपुला बाटतो का?

     जातीधर्माच्या बेड्या तोडून टाकणारा हा शेर थेट काळजाला भिडला शिवाय राहत नाही. आपण म्हणताना सगळेच म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत पण सोयी करताना किंवा लग्न जमवताना जात पाहिली जाते आपण एकाच ईश्वराची लेकरं आहोत. असं प्रत्येक जण भाषणात तत्वज्ञान मानतो पण तोच मुलाचा प्रेम विवाह करण्यास नकार देतो. या जगातील सर्वच माणसांना जर ईश्वराने निर्माण केले आहे मग माणसाच्या स्पर्शाने देव  बाटतो का ? असा खडा सवाल नितीश देशमुखांनी माणसातल्या माणसाला केला आहे.

      पावसाने हर बळीला प्रश्न हा मुद्दाम केला 
     मी तुला पाऊस देतो, शेतसारा मागतो का?

      आज आपण पाहतो सर्वत्र स्वार्थाने बरबटलेल्या समाजात घासपूस घेतल्याशिवाय कोणत्याच टेबलाला कोणतेच काम होत नाही. राजकारणी समाजाचा पैसा घशात घातल्या शिवाय श्वास घेत नाहीत. संस्थाचालक पैसे उकळले शिवाय नोकरी देत नाही. शेतकरी फासावर गेल्याशिवाय कर्ज माफ होत नाही.अशी अनेक उदाहरणे आहेत स्वार्थ असल्याशिवाय कोणीही कोणालाही कवडीचीही मदत करीत नाही. पाऊस पडतो म्हणून जगाचा पोशिंदा बळीराजा जगतो आणि देशही जगवितो. तो पावसाने जर प्रत्येक बळीला असा प्रश्न केला मी तुला पाऊस देतो शेतसारा मागतो का?  खूप विचार करायला लावणारा प्रश्न वरील गझलेच्या शेरातून नितीन देशमुख यांनी केला आहे. आत्मचिंतन करायला लावणारा हा शेर आहे.
       'प्रश्न टांगले आभाळाला'  हा नितीन देशमुख सरांचा गझलसंग्रहात एकूण 80 दर्जेदार गझल फुलल्या आहेत. प्रत्येक गझल व्यवस्थेला बळी पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करते. जगायला शिकवते लढायला शिकवते. आत्मचिंतन करायला शिकवते. माझ्या वाचनात आजपर्यंत सर्वोत्कृष्ट गझलसंग्रह म्हणजे प्रश्न टांगले आभाळाला हे माझ्या हाती आले आहे हे  मी माझे भाग्यच समजते. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी या गझलसंग्रहाची पाठराखण केलेली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच हा गझलसंग्रह आहे.
            
        कवी गझलकार नितीन देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा

 समीक्षिका/शिक्षिका/लेखिका /कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका जिल्हा वाशिम
मो.9767663257

शब्दसौंदर्याने नटलेला काव्यसंग्रह म्हणजे प्राजक्त

 *शब्दसौंदर्याने नटलेला काव्यसंग्रह म्हणजे- प्राजक्त*

       प्राजक्ताचा सडा अंगणात सर्वत्र पसरतो आणि चोहिकडे सुगंध ज्याप्रमाणे दरवळत राहतो. अगदी तसाच निसर्गसौंदर्याने भरभरून नटलेला काव्यसंग्रह म्हणजे पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती भिसे यांचा दुसरा काव्यसंग्रह 'प्राजक्त' होय. कवयित्री प्रीती भिसे यांचा काव्यसंग्रह खर्‍याखुर्‍या प्राजक्ता प्रमाणेच मनमोहक असून वाचकांच्या जीवनात देखील आनंद पेरणारा, वाचकांचे मंदिर सुगंधित करणारा हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अॅंन्ड डिस्ट्रीब्युटर्स सासवड, पुणे यांनी १ मार्च २०१९ रोजी प्रकाशित केला असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ शंभर रुपये असले तरी प्रत्येक कविता या शब्द सौंदर्याने नटलेल्या वाचकाच्या मनाला गारवा देणा-या आहेत. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे प्राजक्ताची फुले असणारा प्राजक्त निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवतो. वाचकाला वाचनाची गोडी वाढवून जातो.
          कवयित्री प्रीती भिसे या अत्यंत श्रद्धाळू, मायाळू असल्याने त्यांनी शब्द फुलांची परडी सुरुवातीलाच गणेश वंदना ने केली आहे. प्राजक्ताचे फुल जरी नाजूक असले तरी संध्याकाळी पडणारा प्राजक्ताचा सडा पाहून मन हर्षित झाल्याशिवाय राहत नाही. प्रा:त काळी उठल्याबरोबर अंगणात प्राजक्ताचा सडा पाहून जसं मन सुगंधित होते त्याच प्रमाणे प्रीतीताईंच्या कविता वाचून मन सुगंधित होते.

        अल्पायुषी प्राजक्त असा आहे सुंदर देखणा
        श्रीहरीसही मोहवितो हा नाजूकही तेवढा
        दुसऱ्यासाठी सुगंधित अविरत घालतो तो सडे 
        बागेतून प्राजक्त कसा गं सुवासिक दरवळे...!!

         प्राजक्ताचं फूल जेवढं नाजूक आहे. तेवढेच अल्पायुष्यी आहे. पण प्राजक्ताच्या सुगंधाने संपूर्ण परिसर सुगंधित होतो. देवाला सुद्धा खूप आवडतो. तेवढाच नाजूकही असतो. नुसत्या वाऱ्याच्या झुळकेनेसवे प्राजक्ताचा सडा अंगणी पडतो. त्याचा सुवास सर्वांना मोहून टाकतो. वरील ओळीतून कवयित्री प्रीती भिसे व्यक्त होताना दिसतात.

          वाटे माझिया मनाला, स्वच्छंदी पाखरू व्हावे
          माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे 
          दाराच्या जवळ जुई, सुगंधी प्रसन्न वाटे
          अंगणात सुबकशी, रांगोळी नक्षी थाटे
          आईची प्रेमळ हाक,आनंद नभी न मावे
          माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे...!!

              संवेदनशील मनाच्या कवयित्री प्रीती भिसे यांचे मन सदैव माहेरच्या अंगणात घिरट्या घालताना दिसून येतं. कवयित्रीला स्वच्छंदी पाखरू होऊन सतत माहेरी जावं वाटतं. माहेरच्या अंगणात दाराच्या जवळ असलेल्या जुईचा सुगंध घेतल्यावर कवयित्रीला प्रसन्न वाटतं. अंगणातली सुबक अशी रांगोळीची नक्षी कवितेच्या मनात घर करून राहते.  त्यात आईची प्रेमळ हाक ऐकल्यावर कवित्री प्रीती भिसे यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणून कवयित्रीचे मन सारखं माहेरच्या अंगणी गिरट्या घालताना दिसतं.
          कवयित्री प्रितीताई जेवढी निर्मळ तेवढी स्वच्छंदी पाखरू असल्यासारखी आहे. त्यांनी अनेक कविता माती, आकाश, प्रेम, सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या, वेली, झाडे, पशू, पक्षी, डोंगर, वसुंधरा इ.वर केलेल्या आहेत.त्यामुळे कवयित्री प्रीती भिसे यांचे सृष्टीशी खूप छान जवळचे नाते आहे. कवयित्री जेवढ्या हळव्या मनाची आहे. तेवढीच श्रद्धाळू ,मायाळू आहे. हे पहिल्या कवितेतूनच दिसून येते. कवयित्रीला भारत माते विषयी खूप प्रेम आहे.खूप आदर आहे,खूप अभिमान आहे.
      कवयित्री प्रितीताई भिसे यांचा 'जीवनाच्या पायवाटेवर' हा पहिला काव्यसंग्रह वाचकाच्या खूप पसंतीस उतरला आहे. जीवनाच्या पाय वाटेवरून चालताना त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्राजक्त वाचकांच्या पसंतीस उतरणारा आहे. कारण त्यांच्या अनेक कविता छंदबद्ध वृत्तामध्ये असल्याने  चार चॉंद या काव्यसंग्रहाला लागले आहेत. जेवढ्या कविता वृत्तबद्ध किंवा लगावली मध्ये लिहिली जाते. तेवढी कविता सर्वोत्तम व दर्जेदार बनतील यात संशय नाही. या काव्यसंग्रहात कवयित्रीने अनेक छंद वृत्तामध्ये गझल लिहिल्या आहेत.कवयित्री प्रीती ताईंना निसर्ग सौंदर्या प्रमाणेच शब्द सौंदर्याची देणगी परमेश्वराकडून मिळालेली आहे.
    
          आभाळाचे पंख लावू
          प्रयत्नांना देव मोका 
          यश शिखरा भिडून 
          उंच जाई माझा झोका...!!
  
        वरील अष्टाक्षरीमधून गरूडा प्रमाणे उंच भरारी घेणाऱ्याला जमिनीचं ओझं नसतं त्याप्रमाणे प्रितीताईना आभाळाचे पंख लावून प्रयत्नांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी उंच झोका घ्यायचा आहे. अशी जिद्द प्रितीताई यांच्या अष्टाक्षरी ओवीतून दिसून येते. जिद्द चिकाटीला गुरु मानणारी कवयित्री प्रेरणेला साथीदार करून साहित्याचा कल्पतरू बनू पाहात आहे. अहंकारा विषयी अत्यंत चीड असणारी कवित्री संवेदनशील ही तितकीच आहे. त्यांची सांजवेळ,आयुष्यात साथीचे स्थान, फुलाला सुगंध मातीचा, तुळस, शब्द मनोरा, रविकिरण, निवांत क्षण, स्वप्नातली सृष्टी, सृष्टीसौंदर्य निसर्गाचे,नववधू, आठवणी, तुझ्या मुळे बहरलं नातं, अवनी,आकाश यासारख्या कविता अत्यंत वाचनीय होऊन वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येताना दिसतात. काही अष्टाक्षरी काव्य कधी शेलकाव्य, कधी शिरोमणी काव्य, तर कधी गजल होऊन तर कधी भुजंगप्रयात, आनंदकंद तर कधी आनंद ज्वाला वृत्त, उद्धव मात्रा वृत्त, पादाकुलक वृत्त असे वेगवेगळ्या मात्रा वृत्तात मांडण्याचा वेगळाच हातखंडा कवयित्री प्रीती ताईंचा दिसून येतो.
         कवयित्री प्रितीताई चे अनेक रचनातून त्या धार्मिक असल्याचं दिसून येतं. प्रीती ताईच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना जरी प्रदीर्घ असली तरी मुद्देसूद व काव्यसंग्रहाला न्याय देणारी आहे. प्रस्तावना सौ.मीरा भागवत मीतेश्री यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक विजय काकडे, बारामती यांनी मोजक्या शब्दांत पण सुरेखपणे मांडली आहे. या काव्यसंग्रहात एकूण 61 कविता असून त्या प्राजक्त च्या रूपाने सृष्टी सौंदर्यात व साहित्यात वाचकाला शब्द सौंदर्याने नकळत प्राजक्ता सारखा फुलवीत सुगंधित करणा-या आहेत. 
          कवयित्री सौ.प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

मानवी अंतःकरणातील भावभावनांची अखंड ज्योत म्हणजे नंदादीप

 *मानवी अंतःकरणातील भावभावनांची अखंड ज्योत म्हणजे नंदादीप*
          मानवाचे अंत:करण म्हणजे भाव-भावनांनी भरलेले समुद्रच.मानवाला जसे सुख हवे असते तसेच सुखामागून दुःखही येतच असते. मनुष्य आपल्या भावभावना, राग, द्वेष, प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य अशा अनेक गुणांनी युक्त ओतप्रोत भरलेला असतो. निसर्गाने सर्वांना दिलेली देणगीच. प्रत्येकाच्या अंतकरणात वेगवेगळ्या भावना असू शकतात. अशीच एक भावना चंद्रपूर जिल्ह्यातल्या कवयित्री सौ. प्रीती जगझाप यांनी आपल्या जन्मदात्रीच्या नावाने 'नंदादीप' च्या रुपाने भावभावनांचा कल्लोळ व्यक्त केला आहे.
       संवेदनशील मनाच्या कवयित्री सौ. प्रीती जगझाप यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह जरी असला तरी त्यांना वर्ग आठवी पासून कविता लेखनाची आवड आहे.मध्यंतरी काही कालावधीसाठी खंड पडला पण लग्न झाल्यावर कवयित्री आपल्या भावभावना कवितेच्या माध्यमातून पत्र लेखन करू लागल्या. पूर्वी मोबाईल,टेलिफोन अशी सुविधा नसल्याने कवितेच्या मनातील भावना कागदावर उमटू लागल्या. नंतर सौ प्रितीताईनी पतीदेवांची खंबीर साथ व इतर कवींचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे नंदादीप प्रकाशात आला.
          प्रिती जगझाप यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे वडील स्वर्गीय तुळशीराम रामटेके व विठ्ठल रामटेके (काका) यांच्या चरणी हा काव्यसंग्रह अर्पण केला आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समिक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांनी केले असून, मुखपृष्ठ श्रीकृष्ण ढोरे यांनी अतिशय सुंदर नावाला साजेसे  बनवले आहे. या काव्यसंग्रहाची प्रथम आवृत्ती 5 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झाली. नंदादीप या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 120 रुपये असले तरी यातल्या सर्वच कविता जीवनाचा अर्थ सांगणा-या आहेत. यात शंकाच नाही.
       कवयित्री प्रीती जगझाप यांची पहिली कविता आई विषयीचे ऋण व्यक्त करणारी आहे. नंदादीप म्हणजे देवापुढे रोज लावला जाणारा दिवा. शांत जळणारी ज्योती. ती स्वतः जळते पण सर्वांना प्रकाश देते. त्या प्रकाशातुन नवी ऊर्जा, नवी चेतना निर्माण होते.तसेच कवयित्री प्रीती ताईंच्या मनमंदिरी त्यांच्या आई वसल्या आहेत. त्यांच्या आईचे नाव नंदा यांच्या नावाने हा पहिला कविता संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. माझ्या वाचनात आलेल्या कवितासंग्रहापैकी आईच्या नावाने निघणारा हा पहिलाच काव्यसंग्रह वाचून माझे अंत:करण अगदी भरून आले. आजच्या काळात अनेक कवी स्वतःच्याच नावाने काव्य संग्रह संग्रह काढताना मी पाहिले. पण कवयित्री प्रीतीताईंनी आईविषयी कृतज्ञता सदोदित स्त्रवत राहावी या उद्देशाने केलेला हा शब्दप्रपंच. कवयित्री प्रीती जगझाप यांनी आईबरोबरच दुसरे स्थान विद्येची देवता सावित्रीमाई यांना दिले आहे.
       
        सावित्री तू नसतीस तर 
        आजही मी तिथेच 
         खितपत पडले असते 
         सुशिक्षित निरक्षरांचा गर्दीत...!!
   
       पूर्वीच्या काळी स्त्रीवर होणारा अन्याय, त्रास, हाल-अपेष्टा, गुलामी, रांधा वाढा, उष्टी काढा, चूल आणि मूल इतक्याच बंदिवान असलेली स्त्री आज मुक्त विचाराने स्वातंत्र्य आणि अवकाश झेप घेऊ शकते हे फक्त सावित्री मुळेच. सावित्री नसती तर अख्ख्या भारत देशातील स्त्रिया आजही अज्ञानाच्या अंधकारात विझून पडल्या असत्या. अंधारात खितपत पडल्या असत्या. सुशिक्षित निरक्षरांचा गर्दीत. सावित्रीनेच ज्ञानाची कवाडे खुली केली. तिच्यामुळेच आजच्या स्त्रियांच्या पंखात बळ मिळाले आहे. शिक्षणाचे, स्वातंत्र्याचे,अभिमानाचे,अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले आहे.नाही तर या मनुनी काय केलं असतं? कुणास ठावुक? अशी खंत प्रीती ताईंनी वरील ओळीतून व्यक्त केली आहे.
         कवयित्री प्रिती जगझाप यांनी जन्मदात्रीचे ऋण व्यक्त करण्यासाठी पहिली कविता आई. ज्ञानाईचे ऋण मानण्याकरिता दुसरी रचना.सावित्रीच्या चरणी समर्पित केली. तर तिसरी रचना ही आज्जी ही कविता. प्रत्येकालाच एक आज्जी असावी ही आशा प्रज्वलित करते. चौथी कविता अख्ख्या विश्वातील समस्त नारीला नमन करणारी आहे. स्त्रीची शक्ती, तिचा करुणाभाव,तिचे वात्सल्य, तिची रूपे,  तिचा जिव्हाळा, तीच  जगाची स्वामिनी. तुझ्या शक्तीनेच हे विश्व चालते. तू नररत्नांची खाण असे अनेक पैलू समस्त स्त्रीजातीविषयीचा आदर दर्शविणारी आहे.
           सडेतोड विचारांची कवयित्री सौ प्रीती जगझाप यांनी वास्तवाचे भान राखत, सत्याची कास धरत, प्रत्येकाला न्याय देत, वास्तव आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते कौतुकास्पदच आहे. महाराष्ट्राचे गीत गात, मोठेपणा सांगत, आजच्या काळात माणसाची माणुसकी कशी हरवत चालली आहे? ही हरवलेली माणुसकी या कवितेतून कळते तर दुष्काळाचा सामना करणाऱा शेतकरी पाऊस पडल्यावर कसा अहवालदिल होतो ते दुष्काळ या कवितेतून दिसून येते.

       घरी झाली मोठी पण 
       मन झालीत हो छोटी 
        हातो- हाती मोबाइल 
        शब्द नाहीत हो ओठी...!!

       वरील ओळीतून आजच्या काळातील भयान वास्तव कवयित्री प्रीती जगझाप यांनी व्यक्त केले आहे.आज अनेक शहरात, ग्रामीण भागातही मोठमोठाली घरी झालीत पण माणसांची मने मात्र छोटी होत चालली आहेत. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसतो पण या मोबाईलच्या आभासी जगात माणूस माणसापासून कसा दूर चालला आहे? नात्यातला संवादात मुका झाला आहे.कुणाच्याही  ओठी शब्द नाहीत भावना व्यक्त करायला.माणूस बोलतो तो फक्त मोबाईलशीच. तोही मुक्यानेच अशी खंत प्रीती ताईंनी व्यक्त केली आहे.
         हळव्या मनाच्या कवयित्री प्रीती जगझाप यांचे स्त्री मनाशी असलेले गाढ नाते, स्त्रीपूजेच्या त्या उपासक आहेत. त्यांच्या बहुविध कविता या स्त्रीवर आहेत. स्त्री विषयी नितांत आदर त्यांना आहे. व प्रत्येकानेही स्त्रीचा आदर करावा असे कवयित्रीला मनोमन वाटते. त्याच बरोबर त्यांना वृध्दांविषयी आपुलकी आहे.

            मन सुन्न, भावना सुन्न 
            विचार सुन्न सारे 
             कशास हवे वृद्धाश्रम 
             बंद करा सारे....!!

        संवेदनशील मनाची कवयित्री प्रीतीताईंनी वृद्धाश्रम या कवितेतून त्यांचे मन सुन्न होते. विचार सुन्न होतात.कशाला वृद्धाश्रम काढतात सारे? वृद्धाश्रम बंद करा. वृद्धांना आपुलकीचा मायेचा हात द्या.वृध्दच आपल्या घराचा आधार आहेत.वृद्धांना म्हातारपणी पैसाअडका काही हवं नसतं. त्यांना फक्त मायेची ऊब द्या. साथ द्या. हात द्या. त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवा. त्यांच्यासोबत चांगली वागणूक असावी. त्यांना काहीच कमी पडू देऊ नका. तुम्हाला ही काहीच कमी पडणार नाही. अशी आर्त हाक कवयित्री प्रीती जगझाप यांनी वरील ओळीतून व्यक्त केली आहे.
      कवयित्रीचे मन जेवढे हळवे,संवेदनशील आहे तेवढेच पिंपळा सारखे कणखर देखील आहे. त्यांना जेवढा स्त्रियांबद्दल जिव्हाळा आहे, आदर आहे. तेवढीच त्या निसर्गाच्या  पूजक आहेत. निसर्गाशी वेगळे जवळचे नाते आहे. कवयित्रीच्या आतल्या सुप्त भावना,अभिव्यक्ती,शब्द माधुर्य, जिव्हाळा, वृद्धांना बद्दलचा नितांत आदर, मैत्रीभाव, आई बद्दलची माया, आजीचे प्रेम, प्रेमभाव, समाजातील भयान वास्तव, शेतकर्‍याबद्दलची काळजी, प्रेमावरची निष्ठा, गावाची ओढ, जीवनसाथीचे प्रेम, तसेच मासिक पाळी सारख्या विषयाला हात घालत नैसर्गिक देणगी ती. त्यातून केलेले मतपरिवर्तन. जिद्द, चिकाटी,जीवनाचा खरा अर्थ, माय मराठी बद्दलचे प्रेम हे सर्व कवयित्री प्रीतीताईच्या कवितेतून स्पष्टपणे दिसून येते.
      'नंदादीप' या काव्यसंग्रहात एकूण ६६ कवितांचा खजिना आणि त्यात लपलेल्या कवयित्रीच्या भाव-भावना यांचा सुरेख संगम दिसून येतो. एकूण ८० पृष्ठ असलेल्या या काव्यसंग्रहाची पाठराखण डॉक्टर पद्मरेखा धनकर, चंद्रपूर यांनी अतिशय सुरेखपणे केलेली आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असाच हा काव्यसंग्रह म्हणजे 'नंदादीप' होय.
    कवयित्री प्रिती जगझाप यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!

समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका,जिल्हा वाशिम
मो ९७६७६६३२५७

Saturday, 29 January 2022

सावित्रीमाईची सोबतीण-देशातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख

 *सावित्रीमाई फुलेंची सोबतीण-देशातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख*

      क्रांतीज्योती ज्ञानज्योती आद्य भारतीय शिक्षिका व मुख्याध्यापिका ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांची सोबतीण फातिमा शेख यांनी सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचे पवित्र काम केले. जेंव्हा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले या दाम्पत्यांना गोविंदरावांनी घराबाहेर काढलं. या उभयतांचे जीवन वाऱ्यावर होते. अशा तातडीच्या नितांत निकडीची  काळात उस्मान शेख अन त्यांच्या बहिण फातिमाबी शेख यांनी फुले दाम्पत्यांना भरभक्कम साथ दिली. स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था केली.तिथून खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाच्या बहराचा काळ सुरू झाला. सावित्रीआईच्या  कार्यात फातिमाबी शेख यांनी तोलामोलाची साथ दिली. सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचे काम केलं नाही तर सावित्रीमाईंना जेवढा त्रास सहन करावा लागला तेवढाच त्रास सहन करावा लागला पण आज त्याचं  समाजाकडून उपेक्षित राहिल्या.
        फातिमाबीच्या कार्याला उजाळा देण्यासाठी समाजाला फातिमामाईच्या कार्याची ओळख व्हावी. या उदात्त हेतूने ग्रामीण मुस्लीम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक कवी शफी बोल्डेकर यांच्या सहकार्याने कवयित्री अनिसा सिकंदर शेख, पुणे व कवयित्री दिलशाद यासीन सय्यद, अहमदनगर यांच्या कल्पनेतून फातिमाबी शेख  या विषयावर मराठीतला पहिला वहिला प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित केले. दोन भिन्न जिल्ह्यातल्या दोन कवयित्री विचारांनी जेंव्हा एकत्र आल्या तेंव्हा अतिशय देखण्या स्वरूपात फातिमाबी विषयी यांच्या जीवन कार्यावर पहिला ग्रंथ निर्माण झाला. राज्यभरातून व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून 153 च्या आसपास कविता जात आणि धर्मापलीकडे जाऊन या संग्रहात समाविष्ट झाल्या हे खरं वैचारिक सोनं आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
       या काव्यसंग्रहात अभंग,गझल, छंद, मुक्तछंद, पोवाडा, गीत, काव्य आदी विविध प्रकारात कविता समाविष्ट आहेत. सावित्रीमाई फुलेंच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा गंधही नव्हता. मुलगी शिकली की धर्म बुडाला असा समज लोकात पसरलेला होता. स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं. फक्त चूल आणि मूल इतकंच स्त्रीचं अस्तित्व होतं. मानसिक गुलामगिरीत स्त्री-जगत होती. तो काळ धार्मिक रीतिरिवाज, अज्ञानाच्या अंधकाराने दाटलेला होता. हाच अंधकार दूर लोटण्याचे महान कार्य आपल्या महाराष्ट्रातील दोन महान लेकीने केले. सावित्रीमाई आजारी असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा माईने ज्ञानदानाचे काम केले. इतकेच नाही तर सावित्री माय आजारी असताना त्यांची संपूर्ण जबाबदारी फातिमा माईने  स्वतःच्या खांद्यावर पेलली.अशा युगस्त्रीला  कृतज्ञतापूर्वक अभिवादन करणारा हा काव्यसंग्रह होय.
      
        दलितांसाठी रोज लढणारी
        सावित्री होती रणरागिनी 
        जग कल्याणास्तव  झटणारी 
        फातिमा ती शूर विश्वकल्याणी...!!

          बहुजनांना, दलितांना शिक्षण देण्यासाठी सावित्रीमाईनी, ज्योतिबां फुले यांनी आयुष्यभर काटे वेचले. सावित्रीमाईंनी लोकांचा छळ सोसला पण ज्ञानदानाचे पवित्र काम सोडले नाही. सावित्रीमाई रणरागिनी होती. तर जगाचं कल्याण करणारी झटणारी फातिमा विश्वकल्याणी होती या दोन लेकींचं काम जोपर्यंत सूर्य,चंद्र, तारे आहेत तोपर्यंत समाज कधीच विसरणार नाही. उशिरा का होईना समाजावरच्या डोळ्यावरची बांधलेली पट्टी निघाल्या शिवाय राहणार नाही.

     फातिमा तो पेटवली घरोघरी शिक्षणाची पणती 
    अजूनही अंधारात, महापुरुषात नाही तुझी गणती...!!

            या काव्यसंग्रहाच्या संपादिका कवियत्री अनिसा शेख  यांनी वरील ओळीतून फातिमा माईचे कार्य विशद केले आहे. तूच घरोघरी शिक्षणाची ज्योत पेटवली आहेस आणि आज अजूनही महापुरुषांच्या रांगेत तुझं नाव दिसत नाही. याबद्दल अंतःकरणास भिडणारी  खंत वरील ओवीतून  व्यक्त केली आहे.

           काट्यातल्या वाटा 
            खडतर होत्या 
            अक्षर प्रणेत्या 
             त्या काळात.....!!

            फातिमाबीने काट्याचा खडतर रस्ता तुडवीत हाल-अपेष्टा, अन्याय सहन करत, अहोरात्र शिक्षणासाठी चंदनाप्रमाणे झिजणा-या फातिमा बी यांच्याबद्दल कवयित्री दिलशाद सय्यद यांनी त्यांना अक्षर प्रणेत्या म्हणत  आदरभाव वरील ओळीतून व्यक्त केला आहे.

        तोडिल्या कर्मठ रूढी,बंधन
        फुले दांपत्याची प्रतिमा 
        स्त्रीशिक्षणाचा घेतला वसा 
         सात सखी माई फातिमा.....!!

            कर्म रूढी-परंपरा तोडणारी ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी फातिमा बी उस्मान शेख यांना सोबतीला घेऊन त्या काळात शिक्षणाची ज्ञानगंगा देशात आणली. त्यांनाच वसा मैत्री फातिमामाईंनी घेतला. सावित्रीमाईँना शेवट पर्यंत साथ देणारी फातिमा बी आपल्या ध्येयापासून तसूभरही हल्ल्या नाहीत. क्रांतीची मशाल खऱ्या अर्थाने देशात पेटवली. स्त्रिया अशिक्षित होत्या त्या शिक्षण घेऊ लागल्या असे प्रतिपादन कवी प्रदीप जाधव यांनी आपल्या काव्यातून व्यक्त वरील ओळीतून सांगितले आहे.
          युगस्त्री ज्ञानाई, फातिमामाई यांच्या जीवनावरचा पहिला पहिला काव्यसंग्रह नक्कीच समोरच्या पिढीला दिशादर्शक ठरेल यात शंकाच नाही. उत्कृष्ट अशा काव्यसंग्रहाला प्रस्तावना बदिऊज्जमा  बिराजदार, सोलापूर यांची लाभली आहे. तसेच विदर्भाचे ज्येष्ठ लेखक, कथा-कादंबरीकार बाबाराव मुसळे, एॅडवोकेट सिकंदर शेख चांदणी नदाफ( पुणे महानगरपालिका सदस्य महिला व बालकल्याण समिती पुणे ) यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. तर पाठराखण डॉ. श्रीपाल सबनीस (  89 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे) माजी अध्यक्ष यांनी दिली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे जेणेकरून ज्ञानात भर पडेल व फातिमा माई चे कार्य जगाला समजेल असा ज्ञानाचा भूक भागविणारा ग्रंथ म्हणजे फातिमाबी शेख होय.

  प्रकाशन-वेदांत प्रकाशन
  प्रकाशक-सौ् सुप्रिया कुलकर्णी
  प्रथम आवृत्ती-२०२१
   संपादक- अनिसा सिकंदर शेख मो.९२७००५५६६६
                  दिलशात यासिन शेख मो.९८५०९२३९६१
   मूल्य :- २५०रूपये फक्त

समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका,जिल्हा वाशिम 
मोबाईल 9767663257