क्रांतीज्योती ज्ञानज्योती आद्य भारतीय शिक्षिका व मुख्याध्यापिका ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांची सोबतीण फातिमा शेख यांनी सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचे पवित्र काम केले. जेंव्हा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले या दाम्पत्यांना गोविंदरावांनी घराबाहेर काढलं. या उभयतांचे जीवन वाऱ्यावर होते. अशा तातडीच्या नितांत निकडीची काळात उस्मान शेख अन त्यांच्या बहिण फातिमाबी शेख यांनी फुले दाम्पत्यांना भरभक्कम साथ दिली. स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था केली.तिथून खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाच्या बहराचा काळ सुरू झाला. सावित्रीआईच्या कार्यात फातिमाबी शेख यांनी तोलामोलाची साथ दिली. सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचे काम केलं नाही तर सावित्रीमाईंना जेवढा त्रास सहन करावा लागला तेवढाच त्रास सहन करावा लागला पण आज त्याचं समाजाकडून उपेक्षित राहिल्या.
फातिमाबीच्या कार्याला उजाळा देण्यासाठी समाजाला फातिमामाईच्या कार्याची ओळख व्हावी. या उदात्त हेतूने ग्रामीण मुस्लीम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक कवी शफी बोल्डेकर यांच्या सहकार्याने कवयित्री अनिसा सिकंदर शेख, पुणे व कवयित्री दिलशाद यासीन सय्यद, अहमदनगर यांच्या कल्पनेतून फातिमाबी शेख या विषयावर मराठीतला पहिला वहिला प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित केले. दोन भिन्न जिल्ह्यातल्या दोन कवयित्री विचारांनी जेंव्हा एकत्र आल्या तेंव्हा अतिशय देखण्या स्वरूपात फातिमाबी विषयी यांच्या जीवन कार्यावर पहिला ग्रंथ निर्माण झाला. राज्यभरातून व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून 153 च्या आसपास कविता जात आणि धर्मापलीकडे जाऊन या संग्रहात समाविष्ट झाल्या हे खरं वैचारिक सोनं आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
या काव्यसंग्रहात अभंग,गझल, छंद, मुक्तछंद, पोवाडा, गीत, काव्य आदी विविध प्रकारात कविता समाविष्ट आहेत. सावित्रीमाई फुलेंच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा गंधही नव्हता. मुलगी शिकली की धर्म बुडाला असा समज लोकात पसरलेला होता. स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं. फक्त चूल आणि मूल इतकंच स्त्रीचं अस्तित्व होतं. मानसिक गुलामगिरीत स्त्री-जगत होती. तो काळ धार्मिक रीतिरिवाज, अज्ञानाच्या अंधकाराने दाटलेला होता. हाच अंधकार दूर लोटण्याचे महान कार्य आपल्या महाराष्ट्रातील दोन महान लेकीने केले. सावित्रीमाई आजारी असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा माईने ज्ञानदानाचे काम केले. इतकेच नाही तर सावित्री माय आजारी असताना त्यांची संपूर्ण जबाबदारी फातिमा माईने स्वतःच्या खांद्यावर पेलली.अशा युगस्त्रीला कृतज्ञतापूर्वक अभिवादन करणारा हा काव्यसंग्रह होय.
दलितांसाठी रोज लढणारी
सावित्री होती रणरागिनी
जग कल्याणास्तव झटणारी
फातिमा ती शूर विश्वकल्याणी...!!
बहुजनांना, दलितांना शिक्षण देण्यासाठी सावित्रीमाईनी, ज्योतिबां फुले यांनी आयुष्यभर काटे वेचले. सावित्रीमाईंनी लोकांचा छळ सोसला पण ज्ञानदानाचे पवित्र काम सोडले नाही. सावित्रीमाई रणरागिनी होती. तर जगाचं कल्याण करणारी झटणारी फातिमा विश्वकल्याणी होती या दोन लेकींचं काम जोपर्यंत सूर्य,चंद्र, तारे आहेत तोपर्यंत समाज कधीच विसरणार नाही. उशिरा का होईना समाजावरच्या डोळ्यावरची बांधलेली पट्टी निघाल्या शिवाय राहणार नाही.
फातिमा तो पेटवली घरोघरी शिक्षणाची पणती
अजूनही अंधारात, महापुरुषात नाही तुझी गणती...!!
या काव्यसंग्रहाच्या संपादिका कवियत्री अनिसा शेख यांनी वरील ओळीतून फातिमा माईचे कार्य विशद केले आहे. तूच घरोघरी शिक्षणाची ज्योत पेटवली आहेस आणि आज अजूनही महापुरुषांच्या रांगेत तुझं नाव दिसत नाही. याबद्दल अंतःकरणास भिडणारी खंत वरील ओवीतून व्यक्त केली आहे.
काट्यातल्या वाटा
खडतर होत्या
अक्षर प्रणेत्या
त्या काळात.....!!
फातिमाबीने काट्याचा खडतर रस्ता तुडवीत हाल-अपेष्टा, अन्याय सहन करत, अहोरात्र शिक्षणासाठी चंदनाप्रमाणे झिजणा-या फातिमा बी यांच्याबद्दल कवयित्री दिलशाद सय्यद यांनी त्यांना अक्षर प्रणेत्या म्हणत आदरभाव वरील ओळीतून व्यक्त केला आहे.
तोडिल्या कर्मठ रूढी,बंधन
फुले दांपत्याची प्रतिमा
स्त्रीशिक्षणाचा घेतला वसा
सात सखी माई फातिमा.....!!
कर्म रूढी-परंपरा तोडणारी ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी फातिमा बी उस्मान शेख यांना सोबतीला घेऊन त्या काळात शिक्षणाची ज्ञानगंगा देशात आणली. त्यांनाच वसा मैत्री फातिमामाईंनी घेतला. सावित्रीमाईँना शेवट पर्यंत साथ देणारी फातिमा बी आपल्या ध्येयापासून तसूभरही हल्ल्या नाहीत. क्रांतीची मशाल खऱ्या अर्थाने देशात पेटवली. स्त्रिया अशिक्षित होत्या त्या शिक्षण घेऊ लागल्या असे प्रतिपादन कवी प्रदीप जाधव यांनी आपल्या काव्यातून व्यक्त वरील ओळीतून सांगितले आहे.
युगस्त्री ज्ञानाई, फातिमामाई यांच्या जीवनावरचा पहिला पहिला काव्यसंग्रह नक्कीच समोरच्या पिढीला दिशादर्शक ठरेल यात शंकाच नाही. उत्कृष्ट अशा काव्यसंग्रहाला प्रस्तावना बदिऊज्जमा बिराजदार, सोलापूर यांची लाभली आहे. तसेच विदर्भाचे ज्येष्ठ लेखक, कथा-कादंबरीकार बाबाराव मुसळे, एॅडवोकेट सिकंदर शेख चांदणी नदाफ( पुणे महानगरपालिका सदस्य महिला व बालकल्याण समिती पुणे ) यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. तर पाठराखण डॉ. श्रीपाल सबनीस ( 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे) माजी अध्यक्ष यांनी दिली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे जेणेकरून ज्ञानात भर पडेल व फातिमा माई चे कार्य जगाला समजेल असा ज्ञानाचा भूक भागविणारा ग्रंथ म्हणजे फातिमाबी शेख होय.
प्रकाशन-वेदांत प्रकाशन
प्रकाशक-सौ् सुप्रिया कुलकर्णी
प्रथम आवृत्ती-२०२१
संपादक- अनिसा सिकंदर शेख मो.९२७००५५६६६
दिलशात यासिन शेख मो.९८५०९२३९६१
मूल्य :- २५०रूपये फक्त
समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका,जिल्हा वाशिम
No comments:
Post a Comment