Wednesday, 19 January 2022

संघर्षाचे दुसरं नाव म्हणजे-झालं कोरडं आभाळ

 *संघर्षाचे दुसरं नाव म्हणजे- झालं कोरडं आभाळ*

   अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सावत्र आईच्या हाताखाली राहून मोलमजुरी करून शाळा शिकून सीमेवर देशाची सेवा करणारा हिम्मतबाज,जिगरबाज सैनिक कै.लक्ष्मणराव मानकर व त्यांच्या पत्नी कै.मनोरमाबाई मानकर या उभयंताचा मृत्यू झाला. कोरोना कालावधीत अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांचे जावई संवेदनशील मनाचा सच्चा दिलाचा माणूस गणेश भाकरे यांनी सासू-सासऱ्यांचा जीवन प्रवास त्यांचा त्याग, धैर्य, शौर्य, माया, जिव्हाळा, आपुलकी भाव, त्यांचा आदर्श समाजासमोर प्रेरणादायी ठरावा यासाठी केलेला हा शब्दप्रपंच. माणसाला संघर्ष करायला शिकवतो.साहसी बनायला शिकवतो.संघर्षाचं दुसर नाव म्हणजे - झालं कोरडं आभाळ आभाळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २७ ऑक्टोबर २०२१ मध्ये झाले असून प्रकाशन  शब्ददीप प्रकाशन मुर्तीजापुर यांनी प्रकाशित केले आहे. सुंदर मुखपृष्ठ मिलिंद इंगळे यांनी सुरेख व्यक्तिमत्व असलेले बोलके चित्र साकारले आहे .या काव्यसंग्रहात एकूण ८० कविता असलेल्या देखण्या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 170 रुपये असून यातल्या कविता अर्थगर्भित व काळजाला भिडणा-या आहेत.
      संघर्षाशिवाय जीवन नाही. जीवना शिवाय संघर्ष नाही. या उक्तीप्रमाणे बऱ्याच जणांना दोन वेळचे पोटभर जेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. परिस्थिती घडवते आणि बिघडवते सुद्धा. असा प्रेरणादायी प्रवास कवी  गणेश भाकरे यांनी आपल्या आदर्श असणाऱ्या सासु-सासरे (आई-वडीलासमान) असणारे यांना शब्दांच्या मखमली झालरीमध्ये ठेवण्याचा संकल्प केला. प्रत्येक वेळी नातं रक्तातच असावं लागतं असं नाही. आज आपण पाहतो कित्येक पोटची मुलं देखील स्वतःच्या जन्मदात्यांना वृद्धपणी सांभाळत नाहीत. त्यांना वृद्धाश्रम ठेवतात. इथे मात्र संवेदनशील मनाचा जावई कवी गणेश भाकरे यांनी प्रत्येक आठवण शब्दबद्ध करत खरी साहित्याची सेवा केली आहे. खरी शब्द सुमनांजली अर्पिली आहे.
    
            काय केलं आई अण्णा 
            गेले एकामागे एक 
            विसरले कसे सांगा 
            दूर गावातली लेक....!!

             सांगा सासर सोडून 
             येऊ कुणाचे भेटीला 
             असं कसं फेकलं हो
             दूर दिव्याच्या वातीला....!!

           एका मुलीचे आई वडील देवाघरी गेल्यावर जेवढे दुःख होतं तितकच दुःख जावयाला होते हे वरील ओवीतून विषद होते.प्रत्येक जावई आपल्या सासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या रूपात पाहत असेल तर कोणत्याच स्त्रीला हुंड्यासाठी सासरवास होणार नाही. माय बाप गेल्यावर मुलीवर कोसळणारा दुःखाचा डोंगर, दुःखाचा आभाळ कोसळलं की मुलीला आयुष्यभर आभाळ कोरडं झाल्यासारखं वाटतं. त्याची उणीव भासत राहणार. सहचारिणीचे दुःख कवीने आपल्या काव्यातून व्यक्त केले. तसेच यापुढे सासरवाडीला कोणासाठी येऊ असं कसं दिव्याच्या वातीला म्हणजे लेकीला तुम्ही दूर फेकलं अशी खंत कवीमनाला वाटते.

          प्रत्येकाच्या
         मनी भीती 
         नाही दिली 
         मूठमाती
 
         जवळचे 
         खूप दूर 
         जीव गेला
         रिते घर....!!

    कोरूना नावाच्या भयंकर महामारीमुळे अख्खं जग पार हादरून गेलं. लाखो लोक मरण पावले.स्मशानाने भयाण रूप धारण केलं होतं. कोणत्याही व्हाट्सअप समुह उघडला की कुणीतरी जवळचे मित्र व नातेवाईक,ओळखीचे आपल्यातून निघून गेलेली असायची आणि भावपूर्ण श्रद्धांजली ने समूह भरून जायचा. काळजात धस्स व्हायचं. कित्येक लोकांच्या नशिबी माती करण्याचे भाग्य  सुद्धा लाभले नाही. प्रत्येकाच्या मनात भीतीचे वातावरण होतं. जवळचे दूर झाले. जवळचे मेले.जीव गेला तरी  काहीजण मातीला गाठू शकले नाहीत. अशी अवस्था अनेकांची झाली होती. तीच खंत कवी गणेश भाकरे यांनी उपरोक्त ओवी मधून करण्याचा प्रयत्न केला आहे.

            आई गेल्यावर ! सारे दूरदूर 
            खिडक्या आणि दार | बंद केले ||
 
           अंतर ठेवून | राहिले असते 
           कशी ही दिसते | जाता जाता ||

     कोरोना काळ जगाला खूप काही शिकवून गेला. कोरोना महामारीत कोरोनांने आणि खूप लोकं भितीपोटी मेली. स्मशानात भयान वाटणाऱ्या चितेच्या अग्नीतांडव घातलेला स्मशान लोकं जाळायला  पण जागा नव्हती. अशा बिकट परिस्थिती मध्ये काही लोकं भीतीनेच मेले. तर काही लोक इतर आजारांनी मेले.कुणी अटॅकने गेले,कोणी नातेवाईक निसर्गतः जरी मेला तरी कुणी कुणाच्या मातीला जाईना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती कवी गणेश भाकरे यांच्या सासुबाई वारल्यावर झाली होती. आई गेल्यावर सगळे नातेवाईक दूर गेले. सर्वांनी खिडक्या आणि दार बंद केले. कोणीही मैयतीला आले नाही.रिपोर्ट निगेटिव्ह असून सुद्धा. तिला लोक आले नाहीत.अंतर ठेवून आले असते आणि शेवटचे दुरूनच पाहिले असते.अशी खंत कवी गणेश भाकरे यांनी वरील अभंगातून  केली आहे.

             आई अण्णा वैकुंठात 
             आता माहेरात काय 
             पुण्या विटेवरी शोधू
             माथा टेकविण्या पाय...||

             आई-वडील नसल्याचे दुःख जेवढे एका मुलीला होते तेवढे दुःख जगात कोणालाच होत नाही. मुलगी सासरी जरी गेली तरी तिचे डोळे, तिचे अंतकरण, सतत आई-वडिलांकडे माहेरी पिंगा घालत असतं. माय बापा विना कोणत्याच मुलीला माहेरी करमत नाही. पाया पडण्यासाठी कोणती विठ शोधू? असा खडा  सवाल लेकीच्या भावना कवींनी व्यक्त केले आहेत.' जे देखे कवी ते ते न देखे रवी ' या उक्तीप्रमाणे कवी कोणाच्याही भावना व्यक्त करू शकतो. कवी कोठेही पोहचू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संवेदनशील मनाचा कवी गणेश भाकरे होय.
 
              त्यांच्यामुळे वाटे मला
              माझं माहेर पंढरी 
              त्यांच्या भेटीसाठी माझी 
               असते एकादशी वारी....!!

     प्रत्येक मुलीला तिचे माहेर म्हणजे तिच्यासाठी पंढरीच असते. जणू स्वर्गच असतो. आणि त्या स्वर्गातले मायबाप म्हणजे देवच. आई वडिलांच्या भेटीसाठी मुलगी धावत माहेर गाठते. मुलीला तिच्या माहेरची भेट म्हणजे एकादशीची वारीच वाटत असते. हे त्रिकालाबाधित सत्य चार ओळीतून  कोणीच नाकारू शकत नाही.

               मित्रानो
               स्मशानातल्या लिंबाच्या झाडाखाली
               तोंडावर मास्क लावून
               एक एक जरी उभा राहीला असता.   
               निरोप द्यायला तर 
                माजी ऑक्सिजन लेवल 
                किती तरी पटीने वाढली असती.
                माझ्या मायला शेवटचा
                निरोप देताना....!!

     संवेदनशील मनाचे कवी गणेश भाकरे यांना त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या कठीण समयी, त्यांच्या दुःखात सहभागी झाले नाहीत. याची सल कायम त्यांना बोचत राहते. मित्र फक्त सुखात सोबत असून उपयोग नाही तर वेळप्रसंगी संकटात, दुःखात साथ देणारेच खरे मित्र.कवी गणेश भाकरे यांच्या आई सासुबाई वारल्यानंतर मित्रमंडळी दूर दूर जरी उभी राहिली असती स्मशानात. तरी माझी ऑक्सिजन लेवल किती तरी पटीने वाढली असती.असा शेवटचा निरोप देते समयी अशी खंत कवी गणेश भाकरे यांनी केली आहे.
        कोरोनाच्या काळात अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये कवी गणेश भाकरे यांना सासू-सासरे यांच्या निधनानंतर झालेले दुःख. शब्दातून वाट मोकळी करत कांही रचना अष्टाक्षरी तर काही अभंग प्रकारात काही मुक्तछंदातल्या तर काही चाराक्षरीत आहेत. अष्टाक्षरी काव्यप्रकारात गेम साधणा-या रचनांचा कवी गणेश भाकरे यांचा वेगळाच हातखंडा दिसून येतो. सासू-सासरे यांच्या जाण्याने कवीचा मायेचा पसारा हरवल्यासारखं वाटतं. झालं कोरडं आभाळ या पुस्तकाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. प्रत्येक कविता वाचताना आभाळ भरून आल्यासारखं अंतःकरण भरून येतं. अशा या काव्यसंग्रहात ८० कविता वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे- झालं कोरडं आभाळ या शीर्षकावरूनच कवी गणेश भाकरे यांच्या दुःखाची वलयाची कल्पना दिसून येते. आणि नकळत वाचकांची ही डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

     कवी गणेश भाकरे यांच्या पाचव्या काव्यसंग्रहाला व पुढील कारकीर्दीला अनंत शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment