Friday, 26 February 2021
प्रसंगावधानी सिमा
बंजारा समाजाचे वास्तव मांडणारा कथासंग्रह म्हणजे -'शिकार'.
Thursday, 18 February 2021
कवीमनाचा आरसा असणारा काव्यसंग्रह म्हणजे बिंब-प्रतिबिंब..
Saturday, 13 February 2021
*वीरांगना झलकारीबाई*
Thursday, 11 February 2021
*अंतर्मनाला स्पर्श करणारा काव्यसंग्रह म्हणजे -अंतर्मन*
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील तुरोरी या खेडेगावातील हिराचंद गुंडाप्पा देशमाने यांचा अंतर्मन हा कविता संग्रह नुकताच वाचनात आला. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ माणसाला अंतर्मुख करून विचार करायला लावणारे आहे तर मल पृष्ठावर कवी हिराचंद देशमाने यांचे खेड्यातील आयुष्य,परंपरा,संस्कार, सदाचरण, साधेपणा व नातेसंबंध जोडत प्रेम, वात्सल्य, गरीबाविषयीची कणव, निर्मोही जीवन आणि उदात्त अशी ओढ सांगणारी आहे.या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती फेब्रुवारी २००६ साली प्रकाशित झाली आहे.प्रकाशिका सौ.अनिता देशमाने असून मुद्रक जयंती ऑफसेट ,सोलापूर येथून झाले आहे. या काव्यसंग्रहाला दत्ता हलसगीकर यांची प्रस्तावना लाभली असून श्री सी.एन भातलोंढे सरांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे पण यातील कविता लाखमोलाच्या आणि काळजाला स्पर्श करणा-या आहेत.
"आईचं हृदय आकाशाहुन विशाल
आम्ही आनंदाने बागडतो खुशाल
आई देवता थोर
आम्हासाठी कष्ट ते अपार...!!"
वरील ओळी मध्ये कवी आपल्या आईच्या विशाल ह्रदयाची महती सांगतो आहे. आईचं काळीज आकाशाएवढे विशाल असतं आईचे ह्रदय जगात एकमेव आहे.जिथे अनेक गुन्हे माफ होतात. आईच्या ह्रदयाच्या पंखाखाली तिचे लेकरं आनंदाने बागडत असतात.आई म्हणजे साक्षात देवताच आहे. तीच आपल्यासाठी रात्रीचा दिवस करून अपार कष्ट करते असे कवीला वाटते.
"घरोघरी टी.व्ही दादा
संस्कारावर पडला पडदा
आई बाबा शब्द विसरला
मम्मी-पप्पा लागला म्हणायला...!!"
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येक घरात टीव्ही दादा बसलेला आहे.सान- थोरापासून सर्वजणच तासन-तास त्या टीव्हीच्या समोर बसलेले असतात. त्यामुळे टीव्हीवर दाखवणारे सिरीयल पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव लहान मुलांच्या मेंदूवर पडत असून आज प्रत्येक मुल स्वतःच्या आईला माय किंवा आई न म्हणता मम्मी आणि बाबांना पप्पा म्हणत आहेत. खरंतर थडग्याला मम्मी म्हणलं जातं. इतका वाईट परिणाम या टी.व्ही.चा होताना दिसतो आहे. त्यामुळे सुसंस्कारित असलेल्या कवीच्या हळव्या मनाला ही सल बोचताना दिसते आहे.
"कष्टकरी देशाचा कणा
जाणा कष्टकऱ्यांना
माना कष्टकऱ्यांना
पूजा कष्टकऱ्यांना
मोल द्या त्यांना.....!!"
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि कष्टकरी हा या देशाचा कणा आहे,त्याचबरोबर श्रमिकांचा देश आहे. या देशात अनेक लोक फार कष्ट करतात. कष्टक-यांमुळेच तर मोठमोठाले बंगले बांधले जातात. ज्या हातांनी मजूर विटा रचत असतात आणि बंगले तयार होतात पण मजुरांच्या वाट्याला मात्र झोपडीच असते. कष्टकरी रात्रंदिवस शेतात कष्ट करतो म्हणून सर्वांना अन्नधान्य मिळते. म्हणून कवी म्हणतो मोलमजुरी करणाऱ्या लोकांची मन जाणायला शिका त्यांना मान द्या. कष्टकऱ्यांची पूजा करावी असे कवीला वाटते.
"दुसऱ्याच्या दुःखासी
जाणून समजून घ्यावे
मैत्री असावी दुःख निवारण्याची
दुसऱ्याच्या दुःखावर
मायेची फुंकर घालण्याची....!!"
संवेदनशील मनाच्या कवीला दुसऱ्याच्या दुःखांची खूप चिंता आहे. इतरांचे दुःख पाहून कवी व्याकूळ होतो.इतरांचे दुःख ते माझे दुःख असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. मैत्री अशी असावी की आपला मित्र जर दु:खी असेल किंवा संकटात असेल तर ते दुःख निवारण करणारा, दुःख दूर करणारा मित्र असावा. इतरांच्या दुःखावर मायेची फुंकर मारणारा, मदत करणारा, जिवाला जीव देणारा मित्र असला पाहिजे असे कवीला वाटते.
"ध्येय स्वप्नातील
आशा आकांक्षाची
फुलबाग फुलविण्यासाठी
जीवन जगायचं असतं
दीनदलित ,गोरगरीब
अनाथांचे नाथ होऊन त्यांच्या
आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी
जीवन जगायचं असतं....!!"
मनुष्याच्या जीवनात ध्येय,आशा-आकांक्षा याला फार महत्त्वाचे स्थान असते. आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी उच्च ध्येय गाठण्यासाठी आपल्या आयुष्याची फुलबाग फुलविण्यासाठी जीवन जगायचं असतं. आपल्या आजूबाजूला दीन-दलित,गोरगरीब, मनात कोणी दिसले तर त्यांना मदत करण्यासाठी माणसाने पुढे धावले पाहिजे. तरच आपल्या आयुष्यात आनंद फुलेल यासाठी जीवन जगायचं असतं. असं कवीच्या अंतर्मनाला सदैव वाटतं.
हळव्या मनाच्या संवेदनशील कवीला आजूबाजूच्या लोकांचे दुःख पहावले जात नाही. आपले लाख मुलाचे आयुष्य भरभरून जगा व जगता जगता इतरांनाही मदतीचा हात द्यावे.प्रेम, वात्सल्य,मायेने भरभरून गेलेल्या कवीला एकतर्फी प्रेम नकोसं वाटतं. प्रेम हे हिमपर्वतासारखे उत्तुंग असावं, तर अथांग सागराप्रमाणे महान असावं, जीवाला जीव देणार असावं,तर धुतलेल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ,गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र असावं असा कवीच्या अंतर्मनाला वाटतं.
अंतर्मन या काव्यसंग्रहात एकूण ५१ कविता असून त्या सर्व काळजाला स्पर्श करणार्या आहेत. स्वार्थाने बरबटलेल्या माणसाला अंतर्मुख करायला लावणा-या आहेत. आईप्रति माया, श्रमिकाप्रति प्रेम, नात्यांचा गोडवा, दु:खीतांची चिंता, माहेरची ओढ, जीवन जगण्याची रीत, इतरांचं हित, आपुलकीचा भाव,गरिबीची जाणीव, संस्काराची उणिव सांगणा-या आहेत .
कवी हिराचंद देशमाने यांचा हा पहिला काव्यसंग्रह असून पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा....!!
समीक्षिका, लेखिका,शिक्षिका,संपादिका, कवयित्री
कु. मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जिल्हा .वाशिम
मो.9767663257
