Wednesday, 8 April 2020

"स्वराज्याचे मावळे" तरूणांना स्फुर्ती देणारा काव्यसंग्रह...समीक्षण श्री.सुदाम साळुंके सर

Date: 26 Mar 2020

*"स्वराज्याचे मावळे"* तरूणांना स्फुर्ती व प्रेरणा देणारा काव्यसंग्रह.....

=====================
               शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी.     
     "स्वराज्याचे मावळे " 
या शीर्षकाखाली शिवछत्रपतींच्या तीस  जिगरबाज शूर मावळ्यांच्या शौर्याचे व पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे.    
 वाशिमच्या अजिंक्य प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे.      
    मुखपृष्ठावर सिंहासनारुढ राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज , माँसाहेब जिजाऊ व
सोबत भगव्या पताका हाती घेतलेले स्वराज्याचे मावळे रेखाटले आहे. तर मल पृष्ठावर मीनाक्षी ताईंनी आपल्या कार्याचा परिचय चित्रीत केला आहे. 
       वाशिम जिल्ह्यातील या कवयित्रीने " स्वराज्याचे मावळे "  या  काव्यसंग्रहातून प्रत्येक मावळ्याच्या व्यक्तिवैशिष्टयांचे व त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे अप्रतिम वर्णन केले आहे. 
 " स्वराज्य रक्षक संभाजी " या मराठी ऐतिहासिक  मालिकेचे मुख्य अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे   यांनी  आपल्या संदेशात म्हटले आहे, समाजाला माहित नसणाऱ्या ३० मराठा , मुस्लिम शूर मावळ्यांचा इतिहास आपण   "स्वराज्याचे मावळे " या काव्य संग्रहाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचवणार असल्याबद्दल मिनाक्षीताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.
     प्रस्तुत काव्यसंग्रहाला चित्रपट निर्माते कवी , लेखक , समिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व  असलेले   श्री. संदीप राक्षे  सर यांनी प्रस्तावना  लिहीली आहे. 
   या काव्य संग्रहाचे एक आगळे वेगळे वैशिष्टये म्हणजे यामध्ये शिवरायांच्या जीवनात त्यांच्या लहानपणापासून जीवनभर त्यांच्याशी एकनिष्ठेने राहून आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या प्रत्येक मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहातून केले आहे. 
   या काव्य संग्रहातून कवयित्री मीनाक्षीताई यांनी स्वराज्याच्या कामी शिवाजी महाराजांना साथ देणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील  ३० मावळ्यांना अतिशय मानाचे स्थान देवून यथोचित वर्णन केले आहे. " हर हर महादेव , छ्त्रपती शिवाजी महाराज की " अशा घोषणा दिल्या की आज ही अंगात नव चैतन्य संचारते . त्याच गर्जना देत या मावळ्यांनी शिवरायांच्या साथीन इतिहास घडविला . मावळा म्हटल की घोडयावर स्वार झालेला कमरेला तलवार , पाठीला ढाल असणा-या सरदाराचे चित्र डोळ्यांपुढ उभे राहते . 
           या कवितेचे प्रथम पुष्प स्वराज्यासाठी बलिदान देणारा शूर योध्दा प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवा काशिदचे गुंफले असून शेवटचे पुष्प बेलसरच्या लढाईत मर्दुमकी गाजवणाऱ्या समशेर बहाद्दर बाजी सर्वेराव जेधे यांच्या पराक्रमाचे काव्य पुष्प गुंफले आहे .
      होता जिवा म्हणून वाचला  शिवा अशी ओळख असलेल्या कुस्तीवीर जिवा महाला, आग्ऱ्याच्या कोठडीतील मदारी व  हिरोजी फर्जंद. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणत ज्याने सिंहगडावर पराक्रम गाजवणाऱ्या शूर वीर  तानाजीचे , शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ , औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या संताजी - धनाजी, समुद्र किनारी दरारा असणाऱ्या कान्होजी आंग्रे, घरदार , जमीन विकून रायगड किल्ला बांधणाऱ्या हिरोजी इंदलकर ,संभाजी राजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या कवी कलश यांचे वर्णन काव्यातून केले आहे.

    वेशांतर करी । नकला हो करी।
    बोलण्यात भारी । पडतसे।।

    या वरील ओळींमध्ये बहिर्जी नाईकांची चपळाई लपली आहे..शत्रूच्या समोर त्यांच्या सैनिकात वेशांतर करून जरी बहिर्जी घुसले तरी शत्रूला ते समजत नसे...इतके पटाईत सराईतपणे वेशांतर करून शत्रूच्या छावणीत घुसून खडानखडा माहिती काढणारे बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते...

      शेवटचा श्वास । लढत राहिले ।
      शौर्याने लढले । संताजीही ।

या अभंग प्रकारात ओवलेल्या उक्तीप्रमाणे आपल्या जिवाजी पर्वा न करणारा,स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे धनाजी व संताजी यांनी फार त्वेशाने, शौर्याने शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले...केवढी ती निष्ठा आणि केवढे ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर,जिवाला जीव देणारे मुठभर मावळ्यांना एकत्र घेवून लढणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सा-या विश्वाला वंदनीय,पुजनीय व स्फुर्ती देणारे आहेत...

       वीर, शूरवीर , झुंजार,रण झुंजार  , सरनोबत, समशेर बहाद्दर , रांगडागडी , पैलवान, गुप्तहेर , प्रति शिवाजी असे प्रत्येक शुराचे वर्णन आपल्या काव्यमय उपाधीने करून त्यांच्या कार्याचे वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे. या काव्यसंग्रहामधील स्वराज्याच्या मावळ्यांचे रसमय वर्णन काव्यांजली , अभंग, मुक्त छंद, अष्टाक्षरी या काव्यरचना प्रकारांमध्ये केले आहे. 
 प्रत्येकाकडे "स्वराज्याचे मावळे " हा काव्यग्रंथ  असावा व तो अवश्य वाचावा असे मला वाटते. 

स्वराज्याचे वीर I वीर शौर्यगाथा ॥
टेकविते माथा I मिनाक्षीचा ॥

         या काव्यपंक्ती मधून कवयित्री मिनाक्षी ताईंनी आपला या शूर वीरांबद्दल आदर व्यक्त केला आहे.चिमुकल्या विद्यार्थ्यांना इतिहास जेवढा शिकवावा आणि मिनाक्षी ताईचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे... महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलांदा इतिहासावर काव्य रचले गेले आहे.याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे...प्रत्येक शाळेत व घराघरात बालकांच्या हातात असावे असेच हा "स्वराज्याचे मावळ" हा काव्यसंग्रह आहे...

   मिनाक्षीताईंबद्दल दोन शब्द
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे या एक आदर्श शिक्षिका असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. 
  मिनाक्षीताई नागराळे आमच्या राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या ONLY SUPER ACTIVE समुह प्रशासक आहेत. गेल्या ४/५ वर्षापासून त्या समुहामध्ये काम करत असून त्यांनी  अनेक ऑनलाइन कार्यशाळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना तंत्रज्ञानाचे धडे शिकविले आहे. त्या आमच्या समुहाच्या ONLY SUPER ACTIVE  तंत्रस्नेही प्रशासक असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे (साळुंके) पाटील यांना या संग्रहानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा  ! 


 --- श्री. सुदाम नारायण साळुंके सर
           तंत्रस्नेही  शिक्षक
             समुह प्रमुख - 
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
प्रशासक - प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र 
  कोपरगाव , जि. अहमदनगर 
    मो. 8830334810

Tuesday, 7 April 2020

समज-गैरसमज

 Date: 5 Apr 2020

*समज- गैरसमज*

    समजून घेतले तर समज...न समजून घेता जो वेगळाच विचार केला जातो तो गैरसमज... तसं पाहिलं तर समज हा शब्द जितका सरळ साधा आहे तितका सोपा नाही.एखाद्याला समजून घेण्याची कला फार कमी लोकांकडे असते...तेच लोकं जिवनात सफल होतात.समोरच्याला समजून घेऊन राहतात.त्यामुळे बरीच भांडणे होत नाहीत.समजून घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतच नाहीत...पण समजून घेणारा व्यक्ती तेवढाच समजदार असायला हवा.... एखादं मोठं कुटुंब असो किंवा मोठी शाळा असो सर्वानी एकमेकांना समजून घेऊन राहिलं की प्रेम,जिव्हाळा,आपुलकी वाढते... आणि चांगले संबंध टिकून राहतात...
       आजकालच्या मोबाईलच्या युगात व धावत्या जिवन शैलीमुळे प्रत्येकाला प्रार्थना, किंवा गीत,गाणे म्हणामला वेळच नाही..अशी माणसं,मुले, काही अंशी स्त्रीया चिडचिड करताना दिसतात..."प्रार्थना हे मनाचं उत्तम स्थान आहे" या उक्तीप्रमाणे जो प्रार्थना म्हणतो किंवा एखादा तरी छंद जोपासतो.तो जास्त चिडचिडा होतं नाही...जे लोक स्वत:ला कामामध्ये गुंतवणूक घेतात..त्यांना एक वेगळं समाधान असतं ते पण चिडचिड करीत नाही... एखाद्या सारखं टि.व्ही पाहणा-या मुलाला पहा...त्याचा स्वभाव चिडचिड करणारा असतो.आणि जे लोकं मानसिक तणावाखाली राहतात..ते ही फार चिडचिडे होत जातात...
       मागच्या महिन्यात मी एक पेपरला बातमी वाचली.की मोबाईल चे रिचार्ज करायला आई पैसे देत नाही म्हणून आईच्या डोक्यात काठी घालून आईचा जीव घेतला...अशा घटना ऐकून मन सुन्न होतं...एक आईच असते आपल्या मुलाला लहानाचे मोठे करण्यासाठी रात्रीचा दिवस करते...हाताचा पाळणा करते...जीवापाड काळजाच्या घडाला जपते...तिथं एकमेकांना जीव लावून प्रेमाने राहणे फार महत्त्वाचे आहे... एकमेकांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे...एकाच घरातल्या सासू सुनेनी एकमेकीला समजून घेतलं तर त्या घराचं नंदनवन होईल... आणि छोट्या छोट्या गोष्टीत न समजून घेतल्याने गैरसमज वाढले तर फार मोठी भांडणं लागायला वेळ लागणार नाही...
      गैरसमज- एखाद्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढून मनात गृह निर्माण करणे म्हणजे गैरसमज... अनेक वेळा पुढचा व्यक्ती स्वत:च्या भल्याकरता कांहीतरी सांगत असतो...तर समोरच्याला वाटतं माझं चांगलं झालेलं बघवत नाही... यावरून गैरसमज निर्माण होतो आणि वाद सुरू होतात...प्रत्येक व्यक्तीने गैरसमज करून घ्याच्या अगोदर दहा वेळा विचार करावा...समोरचा व्यक्ती माझ्याच भल्यासाठी सांगत आहे ना याची शहानिशा  करून तो विषय समोरासमोर क्लीयर केला तर गैरसमज होणारच नाहीत...
     गैरसमज हा खूप घातकी असतो.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले पहायला मिळतात... गैरसमज हा असा रोग आहे.ज्याला जडला तो आतल्या आत कुढत राहतो.त्यामुळे द्वेश,राग,मत्सर,वाढायला लागतो.म्हणून प्रत्येक कृती ही विचारपूर्वकच करायला हवी....प्रत्येकाला समजून घेण्याची गरज आहे....

      एकमेकां समजून घेवू
       सारे आनंदाने राहू
       एकमेकांचा आदर बाळगू
        प्रेमाने चला पाहू....!!
 
         नको कोणता गैरसमज
           नकोत कसली भांडणं
           विचारांचे आदानप्रदान
            द्यावं सुखाचं चांदणं.....!!

      या वरील उक्तीप्रमाणे एकमेकांना  समजून घेऊन राहीलं तर एकमेकांचा आदर केला..तर घराचं नंदनवन व्हायला वेळ लागत नाही.. आणि गैरसमज करून घेतलं तर एकत्र कुटुंब पध्दतीत रहायला फार अवघड होवून जाते....मानव हा विचार करणारा विचारशील प्राणी आहे... म्हणून समजून घेण्याची भावना आपल्या सर्वामध्ये रूजली पाहिजे... समजून घेण्याची एक कला आहे...ती प्रत्येकाने शिकली पाहिजे...ज्या घरात दोन भाऊ एकमेकांना समजून घेतात..तिथे जगातली कोणतीच ताकद त्यांना वेगळं करू शकत नाही... समजून घेऊन राहिलं तर एक आदर्श कुटुंब म्हणून त्या घराकडे बघितलं जातं...
       समज के समजना भी एक समजदारी है। चला तर मग सर्वानी गैरसमजच्या जाळ्यातून बाहेर पडुया...एक समजदार,शिस्तप्रिय नागरिक बनू या.....

           
*©️®️कवयित्री/लेखिका:- कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*

---
Shared using https://www.writediary.com/getapp

Saturday, 8 February 2020

मी आणि मूल्यवर्धन

 Date: 26 Jul 2019

*मूल्यवर्धनने जाणिव-माझ्या जबाबदा-यांची*

     मूल्यवर्धन हा विषय जितका महत्वाचा आहेत तितकाच फायद्याचा सुद्धा आहे.आज प्रत्येक शाळेमध्ये मुल्य रूजवण्यांचे कामं प्रत्येक शिक्षक करत आहे.त्याचा परिणाम खूप चांगला विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.बालवयातच योग्य ते संस्कार रूजवण्याची खरी गरज आहे...मूल्य हे रूजवावी लागतात...एखाद्या विद्यार्थ्यांने जर चोरी केली त्याला चोरी करू नको म्हणून सांगत बसण्यापेक्षा चोरी करणं योग्य की अयोग्य हे समजून सांगायला हवे.त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन हा उपक्रम जाणिवपूर्वक दिल्यामुळे शिक्षकांना सुध्दा एक दिशा मिळाली आहे.प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकांनुसार वेगवेगळे उपक्रम या एकाच पुस्तिकेत आढळून येतात.नवनवीन गोष्टी वाचून त्यावर सकारात्मक विचार करायला लावणारी प्रश्न ही खरोखरच विचार करायला लावणारी आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य विचार करण्याची सवय लागते.
     मूल्यवर्धनने जाणिव माझ्या जबाबदारीची या विषयानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदा-या समजू लागल्या आहेत...मतदान करणे ही एक जबाबदारी आहे.ते समजून देण्यासाठी वर्गस्तरावर वर्गमंत्रीमंडळ निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.त्यासाठी निवडणूक पारदर्शक पध्तीने पार पडण्यासाठी मोठ्या माणसांचे मतदान कसे असते हे समजण्यासाठी शाळेत प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली.त्यात मंत्रिमंडळासाठी इच्छूक उमेदवारांची नांवे फळ्यावर लिहीण्यात आली.जसे वर्गमंत्री, स्वच्छतामंत्री,शिक्षणमंत्री, शिस्तमंत्री, आरोग्यमंत्री, पर्यावरण मंत्री इ.पदासाठी अर्ज मागवण्यात आली.पुर्ण वर्गासमोर निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या मतदारांची नांवे लिहीण्यात आली.मतदान करण्यासाठी वर्ग खोलीचे नियोजन करून मतदान पेटी तयार करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना रांगेत येऊन,हाताला शाई लावायच्या टेबलजवळ येऊन थांबत असे हाताला शाई लावल्यानंतरच पुढच्या टेबलावर एक उंच रिकामा खोका मतदाराच्या नावासमोर टीक मार्क करण्यासाठी ठेवला होता. तिथे टीकमार्क करूनच चिठ्ठीची घडी घालून मतदान पेटीमध्ये चिठ्ठी टाकायची.असे करत संपूर्ण वर्गाचे मतदान झाल्यावर इतर विद्यार्थ्यांची मदत घेवून.इयत्ता चौथीचे विद्यार्थी मतमोजणी करत त्यांचे मत फळ्यासमोरील नावासमोर लिहीत असत.पुर्ण प्रक्रीया पार पडल्यानंतर ज्याला सर्वात जास्त मत पडले तो वर्गप्रमुख झाला...प्रत्येक दोन उमेदवारामधून चुरशीचा सामना करत ज्याला जास्त मत तो त्या त्या मंत्रीपदासाठी मुख्य व उप अशी निवड प्रक्रिया खूप पारदर्शक पध्तीने पार पडली.
    मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष राहिल्यामुळे लोकशाही पध्दतीने कसे मतदान करतात याची कल्पना विद्यार्थ्यांना झाली.विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली.नागरिक शास्त्र व माझी जबाबदारी यांची ओळख नव्याने झाली.
       नियम पाळूया...शाळेचे नियम या इयत्ता पहिलीच्या मूल्यवर्धन गीतामधून शाळेचे व स्वयंशिस्तीचे नियम गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रूजले आहेत.हे गीत परिपाठाच्या वेळी दररोज घेत असल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेला दिसून येत आहे.पुर्वी कोणाचा वाढदिवस असला की शाळेच्या मैदानात कितीही सांगून चाॅकलेटची कागदं ग्राउंड वर पडलेली दिसत होती.आता या गीतामुळे एकही कागद मैदानावर दिसत नाही.एकही विद्यार्थी शाळेच्या गणवेशाशिवाय येत नाही....
     वर्ग आपुला स्वच्छ ठेवू या
      घालूनी गणवेश शाळेत येवू या
       मित्राच्या सोबत मैत्री टिकवू या
       नियम पाळू या ...आपण नियम पाळूया 
       शाळेचे सारे आपण नियम पाळूया 
या ओळीमुळे शाळा स्वच्छ, दप्तर स्वच्छ राहायला लागले...जे कामं हजार वेळा सांगून होत नव्हते ते फक्त या गीतामुळे झाले.आणि आपला वर्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली...आणि ती मूल्य आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये रूजली गेली आहेत....

     *शब्दांकन-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे* 
     *जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव* 
     *केंद्रशाळा-तोंडगाव* 
      *ता.जि.वाशिम....*
      *पीन -444505*

Monday, 9 December 2019

तीन शब्दांवरून गोष्ट तयार करणे....

 Date: 9 Dec 2019
    आजचा उपक्रम- तीन शब्दावरुन गोष्ट तयार करणे.....
       *सज्जन माणूस,चोर,संत*

        एका गावात  एक सज्जन माणूस रहात होता. तो खूप साधा निर्मळ मनाचा होता. कसल्याही परिस्थितीत सत्याने वागणारा असा तो सज्जन माणूस होता. एकेदिवशी त्या माणसाच्या घरी एका रात्री एक चोर घरात शिरतो तेवढ्यात त्या माणसाला जाग येते... चोर त्याच्या गळ्याला सुरी लावतो. आणि चोर धमकावतो माझं सोनं व्यवस्थित ठेव म्हणून एक सोन्याचा गाठोडं त्या सज्जन माणसाकडे देतो माझ्यामागे पोलीस लागले आहेत. मी काही दिवसाने येऊन हे सोनं परत घेऊन जातो असे तो चोर सजनाला बजावतो सज्जन फार घाबरलेला असतो त्यामुळे त्याचं सोन्याचा गाठोडं गपचूप ठेवून घेतो दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले तरी चोर काही येत नाही. मग ही गोष्ट सज्जन माणूस एका संताला सांगतो काही दिवसांनी चोर सज्जन माणसाच्या घरी येतो. तोपर्यंत सज्जन माणसाने सोन्याचा गाठोडं त्या संताकडे सुखरूप ठेवण्यासाठी नेहून ठेवलेलं असतं. सज्जन माणूस खूप घाबरतो चोराला पाहून आणि एकदम चोराला म्हणतो मी तुमच्या सोन्याला हात सुद्धा लावलेला नाहीये चला आपण महाराजांकडे जाऊ या आणि त्यांच्याकडून सोनं तुम्हाला घेऊन मी देतो असं म्हणून सज्जन व चोर संताकडे  निघतात. संत महाराजा कडे गेल्यानंतर संत चोराला विचारतात का रे बाबा तू इतके दिवस कुठे गेला होता का आला नाहीस? चोर महाराजाला सांगतो की महाराज महाराज माझी मुलगी खूप आजारी पडली होती आणि म्हणून मी लवकर येऊ शकलो नाही. मी जेवढं चोरून धन जमा केलो होतो. ते सगळं दवाखान्यासाठी खर्च झालंय असं चोर संताला सांगतो. संत चोराला म्हणतात हे बघ गड्या ज्या हाताने तू चोरी केलीस त्या हातात हे फुकटचं धन कसं राहणार? चोर आचंबित होतो म्हणजे म्हणजे काय तुम्हांला काय म्हणायचं आहे असं चोर संताला विचारतो. तेवढ्यात संत चोराला म्हणतात "जैसी करणी वैसी भरणे"  म्हणजे काय असं चोर संताना विचारतो. संत म्हणतात अरे फुकटंचं तू लोकांचं धन,पैसा अडका चोरलं म्हणून तुझ्या जवळ ते टिकलं नाही जे कष्टाच असतं तेच टिकतं.... आणि त्यावर चोर मग विचार करू लागला चोराला ही खरच वाटलं कारण त्यांनी आत्तापर्यंत जेवढं कमावलं होतं ते सर्वच्या सर्व धन दवाखान्याच्या खर्चासाठी गेलं... चोर विचार करू लागला आणि महाराजांना म्हणाला यापुढे मी कधीही चोरी करणार नाही... सज्जन माणसाला खूप आनंद झाला व संतांना सुद्धा खूप आनंद झाला संतांनी जसा उद्देश केला तसा त्या चोरांनी आईला आणि त्या चोरांमध्ये परिवर्तन झाले. सोन्याने भरलेली थैली चोरांनी संतांच्या चरणी ठेवली आणि म्हणाला महाराज या सोन्याचं काय करायचे आहे ते करा हे धन मला आता नको आहे. संत म्हणाले मलासुद्धा कसले फुकटचे धन नको आहे आणि त्यावर चोरांनी त्या गावांमध्ये एक छान मंदिर बांधले व्यायाम शाळा काढली. मुलांसाठी वाचनालय सुरु केले. आणि चोराचा एक चांगला सज्जन माणूस झाला....

    *तात्पर्य:  चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलं की वाईट माणसांमध्ये सुद्धा बदल होतो...*

*लेखिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*


Sunday, 1 December 2019

चालू राजकीय घडामोडी...

Date: 1 Dec 2019

*स्पर्धेसाठी*

*विषय- चालू राजकीय घडामोडी*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*राजकारणाचे डावपेच, साऱ्यांनी आता ओळखले*
*दोन महिने चालले, राजकारणाची डाळ शिजवले...!!*

*पुन्हा येईन.... पुन्हा येईन म्हणतच डौलाने आले*
*विश्वासाचा पत्ता अजितदादा एकदम गुल झाले.....!!*

*राष्ट्रपती राजवट होती, झाली  राज्यात लागू*
*मंत्रिपदासाठी भुकेजलेले खुर्ची लागले मागू......!!*

*एके दिवशी सकाळीच, झाला एक गौप्यस्फोट*
*दोघांच्या भांडणात मग, तिसऱ्याचाच झाला स्फोट....!!*

*जनता बिचारी पहाटे पहाटे खळबळून सारी उठली*
*जो तो टिव्ही समोर, मोाईलवरही पाही बातमी कुठली...!!*

*त्या दिवशीचा पेपर सुध्दा झाला त्या दिवशीच जुना*
*साऱ्या मंत्र्यांनी लोकशाहीला लावला ना चुना......!!*

*एकमेकांचे दुश्मन, गळ्यात गळे टाकू लागले*
*खोटे खोटे हसु शपथ घेताना मग वाकू लागले....!!*

*जनता सारी बिचारी गेली हो पार गोंधळून* 
*खोटे गुन्हे बाजुला करत, अजित दादा आले वळून....!!*

*कसला तो गनिमी कावा, कसा कळेल जनतेला*
*उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जागले ममतेला....!!*

*शेवटी एक निर्णय झाला, रडक्यांचे ही डोळे पुसले*
*स्वार्थासाठी जगणारे नेते, लोकही मग मनात हसले....!!*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*©®कवयित्री- मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒✒✒✒✒✒✒✒✒