Tuesday, 7 April 2020

समज-गैरसमज

 Date: 5 Apr 2020

*समज- गैरसमज*

    समजून घेतले तर समज...न समजून घेता जो वेगळाच विचार केला जातो तो गैरसमज... तसं पाहिलं तर समज हा शब्द जितका सरळ साधा आहे तितका सोपा नाही.एखाद्याला समजून घेण्याची कला फार कमी लोकांकडे असते...तेच लोकं जिवनात सफल होतात.समोरच्याला समजून घेऊन राहतात.त्यामुळे बरीच भांडणे होत नाहीत.समजून घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतच नाहीत...पण समजून घेणारा व्यक्ती तेवढाच समजदार असायला हवा.... एखादं मोठं कुटुंब असो किंवा मोठी शाळा असो सर्वानी एकमेकांना समजून घेऊन राहिलं की प्रेम,जिव्हाळा,आपुलकी वाढते... आणि चांगले संबंध टिकून राहतात...
       आजकालच्या मोबाईलच्या युगात व धावत्या जिवन शैलीमुळे प्रत्येकाला प्रार्थना, किंवा गीत,गाणे म्हणामला वेळच नाही..अशी माणसं,मुले, काही अंशी स्त्रीया चिडचिड करताना दिसतात..."प्रार्थना हे मनाचं उत्तम स्थान आहे" या उक्तीप्रमाणे जो प्रार्थना म्हणतो किंवा एखादा तरी छंद जोपासतो.तो जास्त चिडचिडा होतं नाही...जे लोक स्वत:ला कामामध्ये गुंतवणूक घेतात..त्यांना एक वेगळं समाधान असतं ते पण चिडचिड करीत नाही... एखाद्या सारखं टि.व्ही पाहणा-या मुलाला पहा...त्याचा स्वभाव चिडचिड करणारा असतो.आणि जे लोकं मानसिक तणावाखाली राहतात..ते ही फार चिडचिडे होत जातात...
       मागच्या महिन्यात मी एक पेपरला बातमी वाचली.की मोबाईल चे रिचार्ज करायला आई पैसे देत नाही म्हणून आईच्या डोक्यात काठी घालून आईचा जीव घेतला...अशा घटना ऐकून मन सुन्न होतं...एक आईच असते आपल्या मुलाला लहानाचे मोठे करण्यासाठी रात्रीचा दिवस करते...हाताचा पाळणा करते...जीवापाड काळजाच्या घडाला जपते...तिथं एकमेकांना जीव लावून प्रेमाने राहणे फार महत्त्वाचे आहे... एकमेकांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे...एकाच घरातल्या सासू सुनेनी एकमेकीला समजून घेतलं तर त्या घराचं नंदनवन होईल... आणि छोट्या छोट्या गोष्टीत न समजून घेतल्याने गैरसमज वाढले तर फार मोठी भांडणं लागायला वेळ लागणार नाही...
      गैरसमज- एखाद्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढून मनात गृह निर्माण करणे म्हणजे गैरसमज... अनेक वेळा पुढचा व्यक्ती स्वत:च्या भल्याकरता कांहीतरी सांगत असतो...तर समोरच्याला वाटतं माझं चांगलं झालेलं बघवत नाही... यावरून गैरसमज निर्माण होतो आणि वाद सुरू होतात...प्रत्येक व्यक्तीने गैरसमज करून घ्याच्या अगोदर दहा वेळा विचार करावा...समोरचा व्यक्ती माझ्याच भल्यासाठी सांगत आहे ना याची शहानिशा  करून तो विषय समोरासमोर क्लीयर केला तर गैरसमज होणारच नाहीत...
     गैरसमज हा खूप घातकी असतो.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले पहायला मिळतात... गैरसमज हा असा रोग आहे.ज्याला जडला तो आतल्या आत कुढत राहतो.त्यामुळे द्वेश,राग,मत्सर,वाढायला लागतो.म्हणून प्रत्येक कृती ही विचारपूर्वकच करायला हवी....प्रत्येकाला समजून घेण्याची गरज आहे....

      एकमेकां समजून घेवू
       सारे आनंदाने राहू
       एकमेकांचा आदर बाळगू
        प्रेमाने चला पाहू....!!
 
         नको कोणता गैरसमज
           नकोत कसली भांडणं
           विचारांचे आदानप्रदान
            द्यावं सुखाचं चांदणं.....!!

      या वरील उक्तीप्रमाणे एकमेकांना  समजून घेऊन राहीलं तर एकमेकांचा आदर केला..तर घराचं नंदनवन व्हायला वेळ लागत नाही.. आणि गैरसमज करून घेतलं तर एकत्र कुटुंब पध्दतीत रहायला फार अवघड होवून जाते....मानव हा विचार करणारा विचारशील प्राणी आहे... म्हणून समजून घेण्याची भावना आपल्या सर्वामध्ये रूजली पाहिजे... समजून घेण्याची एक कला आहे...ती प्रत्येकाने शिकली पाहिजे...ज्या घरात दोन भाऊ एकमेकांना समजून घेतात..तिथे जगातली कोणतीच ताकद त्यांना वेगळं करू शकत नाही... समजून घेऊन राहिलं तर एक आदर्श कुटुंब म्हणून त्या घराकडे बघितलं जातं...
       समज के समजना भी एक समजदारी है। चला तर मग सर्वानी गैरसमजच्या जाळ्यातून बाहेर पडुया...एक समजदार,शिस्तप्रिय नागरिक बनू या.....

           
*©️®️कवयित्री/लेखिका:- कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*

---
Shared using https://www.writediary.com/getapp

Saturday, 8 February 2020

मी आणि मूल्यवर्धन

 Date: 26 Jul 2019

*मूल्यवर्धनने जाणिव-माझ्या जबाबदा-यांची*

     मूल्यवर्धन हा विषय जितका महत्वाचा आहेत तितकाच फायद्याचा सुद्धा आहे.आज प्रत्येक शाळेमध्ये मुल्य रूजवण्यांचे कामं प्रत्येक शिक्षक करत आहे.त्याचा परिणाम खूप चांगला विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे.बालवयातच योग्य ते संस्कार रूजवण्याची खरी गरज आहे...मूल्य हे रूजवावी लागतात...एखाद्या विद्यार्थ्यांने जर चोरी केली त्याला चोरी करू नको म्हणून सांगत बसण्यापेक्षा चोरी करणं योग्य की अयोग्य हे समजून सांगायला हवे.त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन हा उपक्रम जाणिवपूर्वक दिल्यामुळे शिक्षकांना सुध्दा एक दिशा मिळाली आहे.प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकांनुसार वेगवेगळे उपक्रम या एकाच पुस्तिकेत आढळून येतात.नवनवीन गोष्टी वाचून त्यावर सकारात्मक विचार करायला लावणारी प्रश्न ही खरोखरच विचार करायला लावणारी आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य विचार करण्याची सवय लागते.
     मूल्यवर्धनने जाणिव माझ्या जबाबदारीची या विषयानुसार विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदा-या समजू लागल्या आहेत...मतदान करणे ही एक जबाबदारी आहे.ते समजून देण्यासाठी वर्गस्तरावर वर्गमंत्रीमंडळ निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.त्यासाठी निवडणूक पारदर्शक पध्तीने पार पडण्यासाठी मोठ्या माणसांचे मतदान कसे असते हे समजण्यासाठी शाळेत प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली.त्यात मंत्रिमंडळासाठी इच्छूक उमेदवारांची नांवे फळ्यावर लिहीण्यात आली.जसे वर्गमंत्री, स्वच्छतामंत्री,शिक्षणमंत्री, शिस्तमंत्री, आरोग्यमंत्री, पर्यावरण मंत्री इ.पदासाठी अर्ज मागवण्यात आली.पुर्ण वर्गासमोर निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या मतदारांची नांवे लिहीण्यात आली.मतदान करण्यासाठी वर्ग खोलीचे नियोजन करून मतदान पेटी तयार करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना रांगेत येऊन,हाताला शाई लावायच्या टेबलजवळ येऊन थांबत असे हाताला शाई लावल्यानंतरच पुढच्या टेबलावर एक उंच रिकामा खोका मतदाराच्या नावासमोर टीक मार्क करण्यासाठी ठेवला होता. तिथे टीकमार्क करूनच चिठ्ठीची घडी घालून मतदान पेटीमध्ये चिठ्ठी टाकायची.असे करत संपूर्ण वर्गाचे मतदान झाल्यावर इतर विद्यार्थ्यांची मदत घेवून.इयत्ता चौथीचे विद्यार्थी मतमोजणी करत त्यांचे मत फळ्यासमोरील नावासमोर लिहीत असत.पुर्ण प्रक्रीया पार पडल्यानंतर ज्याला सर्वात जास्त मत पडले तो वर्गप्रमुख झाला...प्रत्येक दोन उमेदवारामधून चुरशीचा सामना करत ज्याला जास्त मत तो त्या त्या मंत्रीपदासाठी मुख्य व उप अशी निवड प्रक्रिया खूप पारदर्शक पध्तीने पार पडली.
    मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष राहिल्यामुळे लोकशाही पध्दतीने कसे मतदान करतात याची कल्पना विद्यार्थ्यांना झाली.विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली.नागरिक शास्त्र व माझी जबाबदारी यांची ओळख नव्याने झाली.
       नियम पाळूया...शाळेचे नियम या इयत्ता पहिलीच्या मूल्यवर्धन गीतामधून शाळेचे व स्वयंशिस्तीचे नियम गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रूजले आहेत.हे गीत परिपाठाच्या वेळी दररोज घेत असल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेला दिसून येत आहे.पुर्वी कोणाचा वाढदिवस असला की शाळेच्या मैदानात कितीही सांगून चाॅकलेटची कागदं ग्राउंड वर पडलेली दिसत होती.आता या गीतामुळे एकही कागद मैदानावर दिसत नाही.एकही विद्यार्थी शाळेच्या गणवेशाशिवाय येत नाही....
     वर्ग आपुला स्वच्छ ठेवू या
      घालूनी गणवेश शाळेत येवू या
       मित्राच्या सोबत मैत्री टिकवू या
       नियम पाळू या ...आपण नियम पाळूया 
       शाळेचे सारे आपण नियम पाळूया 
या ओळीमुळे शाळा स्वच्छ, दप्तर स्वच्छ राहायला लागले...जे कामं हजार वेळा सांगून होत नव्हते ते फक्त या गीतामुळे झाले.आणि आपला वर्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली...आणि ती मूल्य आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये रूजली गेली आहेत....

     *शब्दांकन-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे* 
     *जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव* 
     *केंद्रशाळा-तोंडगाव* 
      *ता.जि.वाशिम....*
      *पीन -444505*

Monday, 9 December 2019

तीन शब्दांवरून गोष्ट तयार करणे....

 Date: 9 Dec 2019
    आजचा उपक्रम- तीन शब्दावरुन गोष्ट तयार करणे.....
       *सज्जन माणूस,चोर,संत*

        एका गावात  एक सज्जन माणूस रहात होता. तो खूप साधा निर्मळ मनाचा होता. कसल्याही परिस्थितीत सत्याने वागणारा असा तो सज्जन माणूस होता. एकेदिवशी त्या माणसाच्या घरी एका रात्री एक चोर घरात शिरतो तेवढ्यात त्या माणसाला जाग येते... चोर त्याच्या गळ्याला सुरी लावतो. आणि चोर धमकावतो माझं सोनं व्यवस्थित ठेव म्हणून एक सोन्याचा गाठोडं त्या सज्जन माणसाकडे देतो माझ्यामागे पोलीस लागले आहेत. मी काही दिवसाने येऊन हे सोनं परत घेऊन जातो असे तो चोर सजनाला बजावतो सज्जन फार घाबरलेला असतो त्यामुळे त्याचं सोन्याचा गाठोडं गपचूप ठेवून घेतो दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले तरी चोर काही येत नाही. मग ही गोष्ट सज्जन माणूस एका संताला सांगतो काही दिवसांनी चोर सज्जन माणसाच्या घरी येतो. तोपर्यंत सज्जन माणसाने सोन्याचा गाठोडं त्या संताकडे सुखरूप ठेवण्यासाठी नेहून ठेवलेलं असतं. सज्जन माणूस खूप घाबरतो चोराला पाहून आणि एकदम चोराला म्हणतो मी तुमच्या सोन्याला हात सुद्धा लावलेला नाहीये चला आपण महाराजांकडे जाऊ या आणि त्यांच्याकडून सोनं तुम्हाला घेऊन मी देतो असं म्हणून सज्जन व चोर संताकडे  निघतात. संत महाराजा कडे गेल्यानंतर संत चोराला विचारतात का रे बाबा तू इतके दिवस कुठे गेला होता का आला नाहीस? चोर महाराजाला सांगतो की महाराज महाराज माझी मुलगी खूप आजारी पडली होती आणि म्हणून मी लवकर येऊ शकलो नाही. मी जेवढं चोरून धन जमा केलो होतो. ते सगळं दवाखान्यासाठी खर्च झालंय असं चोर संताला सांगतो. संत चोराला म्हणतात हे बघ गड्या ज्या हाताने तू चोरी केलीस त्या हातात हे फुकटचं धन कसं राहणार? चोर आचंबित होतो म्हणजे म्हणजे काय तुम्हांला काय म्हणायचं आहे असं चोर संताला विचारतो. तेवढ्यात संत चोराला म्हणतात "जैसी करणी वैसी भरणे"  म्हणजे काय असं चोर संताना विचारतो. संत म्हणतात अरे फुकटंचं तू लोकांचं धन,पैसा अडका चोरलं म्हणून तुझ्या जवळ ते टिकलं नाही जे कष्टाच असतं तेच टिकतं.... आणि त्यावर चोर मग विचार करू लागला चोराला ही खरच वाटलं कारण त्यांनी आत्तापर्यंत जेवढं कमावलं होतं ते सर्वच्या सर्व धन दवाखान्याच्या खर्चासाठी गेलं... चोर विचार करू लागला आणि महाराजांना म्हणाला यापुढे मी कधीही चोरी करणार नाही... सज्जन माणसाला खूप आनंद झाला व संतांना सुद्धा खूप आनंद झाला संतांनी जसा उद्देश केला तसा त्या चोरांनी आईला आणि त्या चोरांमध्ये परिवर्तन झाले. सोन्याने भरलेली थैली चोरांनी संतांच्या चरणी ठेवली आणि म्हणाला महाराज या सोन्याचं काय करायचे आहे ते करा हे धन मला आता नको आहे. संत म्हणाले मलासुद्धा कसले फुकटचे धन नको आहे आणि त्यावर चोरांनी त्या गावांमध्ये एक छान मंदिर बांधले व्यायाम शाळा काढली. मुलांसाठी वाचनालय सुरु केले. आणि चोराचा एक चांगला सज्जन माणूस झाला....

    *तात्पर्य:  चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलं की वाईट माणसांमध्ये सुद्धा बदल होतो...*

*लेखिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*


Sunday, 1 December 2019

चालू राजकीय घडामोडी...

Date: 1 Dec 2019

*स्पर्धेसाठी*

*विषय- चालू राजकीय घडामोडी*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*राजकारणाचे डावपेच, साऱ्यांनी आता ओळखले*
*दोन महिने चालले, राजकारणाची डाळ शिजवले...!!*

*पुन्हा येईन.... पुन्हा येईन म्हणतच डौलाने आले*
*विश्वासाचा पत्ता अजितदादा एकदम गुल झाले.....!!*

*राष्ट्रपती राजवट होती, झाली  राज्यात लागू*
*मंत्रिपदासाठी भुकेजलेले खुर्ची लागले मागू......!!*

*एके दिवशी सकाळीच, झाला एक गौप्यस्फोट*
*दोघांच्या भांडणात मग, तिसऱ्याचाच झाला स्फोट....!!*

*जनता बिचारी पहाटे पहाटे खळबळून सारी उठली*
*जो तो टिव्ही समोर, मोाईलवरही पाही बातमी कुठली...!!*

*त्या दिवशीचा पेपर सुध्दा झाला त्या दिवशीच जुना*
*साऱ्या मंत्र्यांनी लोकशाहीला लावला ना चुना......!!*

*एकमेकांचे दुश्मन, गळ्यात गळे टाकू लागले*
*खोटे खोटे हसु शपथ घेताना मग वाकू लागले....!!*

*जनता सारी बिचारी गेली हो पार गोंधळून* 
*खोटे गुन्हे बाजुला करत, अजित दादा आले वळून....!!*

*कसला तो गनिमी कावा, कसा कळेल जनतेला*
*उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन जागले ममतेला....!!*

*शेवटी एक निर्णय झाला, रडक्यांचे ही डोळे पुसले*
*स्वार्थासाठी जगणारे नेते, लोकही मग मनात हसले....!!*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*©®कवयित्री- मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✒✒✒✒✒✒✒✒✒

Sunday, 6 October 2019

*भारतातील पहिली महिलां संपादिका...तानुबाई बिर्जे....

*सातवे पुष्प- तानुबाई बिर्जे*
======================
*(भारतातील पहिल्या महिला स्त्री संपादिका....)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महात्मा फुलेंचे सहकारी व शेजारी देवराव ठोसर यांची कन्या व सावित्रीबाई फुले यांची मानसकन्या तानुबाईंचा जन्म १८७६ मध्ये पुण्यात झाला. त्यांचं शिक्षण वेताळपेठेतील महात्मा फुलेंच्या शाळेत झालं, तर २६ जानेवारी १८९३ रोजी पुण्यामध्ये वासुदेव लिंबोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधकीय पद्धतीने त्यांचा विवाह झाला. वासुदेव बिर्जे यांनी बडोदा सरकारमध्ये त्यांनी १८९४ ते १९०५ अशी अकरा वर्षे ग्रंथपाल म्हणून कार्य केलं. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ‘दिनबंधु’ हे वृत्तपत्र १८९७ मध्ये पुन्हा सुरू केलं. कृष्णाजी भालेकर यांनी १ जानेवारी १८७७ रोजी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बंद पडलं होतं. १८८० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी ते मुंबईतून सुरू केलं. त्यानंतर १८९७ मध्ये बिर्जे यांनी त्याची जबाबदारी घेतली व ते १९०६ पर्यंत चालवलं, मात्र १९०६ मध्ये प्लेगने त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते वृत्तपत्र पुन्हा बंद पडते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पती निधनानंतर डगमगून न जाता प्रबोधनाचे कार्य तानुबाई बिर्जे यांनी पुढे चालू ठेवले. तानुबाईचे वडील देवराव ठोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधकच होते. महात्मा फुले यांच्या घराशेजारीच त्यांचं घर होतं. त्यामुळे फुले दांपत्याचा सहवास तानुबाईंना लहानपणीच मिळाला.

‘दिनबंधु’चे पहिले संस्थापक-संपादक कृष्णाजी भालेकर यांनी १८७७ मध्ये सुरू केलेल्या या वृत्तपत्राचं नंतरच्या काळात संपादन तानुबाई बिर्जे यांनी उत्कृष्टरीत्या केलं होतं. त्या भारतातील पहिल्या महिला संपादक ठरल्या. परंतु भारतातीलच नव्हे तर जगातील त्या पहिल्या संपादक असाव्यात, असा निष्कर्ष काढला जात आहे. त्या काळात भारतातील पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांचं नाव गाजलं.

वडील ठोसर व पती बिर्जे यांच्या संस्कारातून तयार झालेल्या तानुबाईंनी ‘दिनबंधु’ चालवायला घेतले आणि जगातल्या पहिल्या संपादक बनण्याचा लौकिक मिळवला. हे वृत्तपत्र त्यांनी १९०६ ते १९१२ पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे चालवून संपादिका म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. तानुबाईंनी त्यांच्या संपादकपदाच्या कारकीर्दीत ‘दिनबंधु’मध्ये सत्यशोधक चळवळीच्या वृत्तांवर भर दिला. समाजाला आत्मभान यावे म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची वचने ‘दिनबंधु’मध्ये छापली. तुकाराम महाराजांचे अभंग अग्रलेखाच्या शिरोस्थानी प्रसिद्ध करून तानुबाईंनी एका अर्थाने ‘दिनबंधु’चे उद्दिष्ट कथन केले होते.

एक अत्यंत यशस्वी, सक्षम संपादक म्हणून त्यांचे नाव मराठी पत्रकारितेच्या इतिहासात नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल.
    सलाम त्यांच्या धाडसाला आणि सलाम त्यांच्या पत्रकारीतेला....🙏🙏🙏🙏

*शब्दांकन-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*