*ग्रामीण भागातला अस्सल व-हाडी तडका म्हणजे गावगप्पा कथासंग्रह*
महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात मराठी, विदर्भात व-हाडी, कोकणात कोकणी, खानदेशात अहिराणी अशा मराठीची बोलीभाषा सर्वत्र वेगवेगळी बोलली जाते. व-हाडातली व-हाडीची एक खास वैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येते ते म्हणजे व-हाडी भाषेतला अस्सल गोडवा, आपली बोली आणि मातीवर निस्सीम प्रेम करणारा व-हाडी बोलीच्या सौंदर्याने नटलेला रसास्वाद व-हाडी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला आणि बोलीला वेगळी ओळख देणारा लेखक म्हणजे संजय महल्ले यांचा ग्रामीण भागातला अस्सल वराडी तडका म्हणजे 'गावगप्पा' कथासंग्रह होय.
अमरावती जिल्ह्याचे लेखक संजय महल्ले यांचा चौथा कथासंग्रह गावगप्पा नुकताच वाचनात आला. व-हाडी मातीशी नाळ जुळलेले लेखक, शहरी भागात जरी वास्तव्यास असले तरी ग्रामीण भागातली अस्सल वऱ्हाडी बोली लेखकाच्या नसानसात भिनली आहे. लेखक संजय महाल्ले यांचा जिथं जावं तिथं हा विनोदी कथासंग्रह, पुरुष हा दुसरा कथासंग्रह, शिक्षणाचा गोरखधंदा हा लेख संग्रह, पांचजन्य या साप्ताहिकातून सन २०१२- १३ साली गावगप्पा हे सदर सुरू केले आणि त्यातूनच गावगप्पा हा उत्कृष्ट कथासंग्रह जन्मास आला. संपूर्ण महाराष्ट्रातून वाचकाने गावगप्पाला प्रचंड प्रतिसाद दिला. अशा या कथासंग्रहाचे प्रकाशन लेखकाचे स्वतःचे प्रकाशन असून ते मेधा पब्लिशिंग पब्लिशिंग हाऊस अमरावती यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती १ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली आहे. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ ग्रामीण भागातील गप्पा मारणाऱ्या कुटुंबाचे असून बांधणी अतिशय दर्जेदार आहे. प्रस्तावना व पाठराखण डॉक्टर संजय लोहकरे यांची लाभली असून या कथासंग्रहाचे मूल्य केवळ १५० रुपये आहे. यातल्या सर्वच कथा वऱ्हाडी बोलीतील अस्सल मार्मिक विनोदी आणि वऱ्हाडी बोलीचे सौंदर्य असल्याने वाचकांचे भान हरपल्याशिवाय राहत नाही.
व-हाडी बोलीतील विनोदी कथाकार संजय महल्ले यांचा गावगप्पा हा मराठी मातीतील दैनंदिन घटना, जगण्याच्या विविध त-हा, जीवन जाणीव, राजकारण, समाजकारण आणि मानवी नात्यातील उसवलेपणा अशा विविध प्रवृत्ती वर लेखकाने प्रकाश टाकला आहे. आग या कथेतून मंत्रालयाला लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळून गेली असं समजल्यावर म्हातारा म्हणतो पण त्यातले मंतरी-मुख्यमंतरी असा राजकारणावर मारलेला खोचक टोला या कथेतून लक्षात येतो. ग्रामीण भागातली मंडळी घरी राहायला साधीसुधी असली तरी त्यांना राजकारणातले सर्व कळते याच कथेतून सून सासूला म्हणते माझ्या ध्यानात एक नाही येऊन राहिलं कवाचं आपल्या घरातला इस्तो बराबर इजला का नाही ते आपण सत-यांदा पाह्यतो मग एवढ्या मोठ्या मंतरालयाले एवढी मोठी आग लागनच कशी? मलेतं वाटते काहीतरी कायबेरच हाय ह्यात. असा खोचक टोला सुनबाई मारताना दिसून येते.दुबार पेरणी या कथेतून दुष्काळाचा सामना करणारा हवालदिल झालेल्या शेतकर्यांचे भयान वास्तव दर्शवले आहे. शेतकरी निसर्गावर कसा अवलंबून आहे? हे कथित होते.दुबार पेरणीसाठी सासर्याला सूनबाईच्या गळ्यातले मनी मोडताना सास-याच्या जीवाची होणारी घालमेल दिसून येते. लहरी पावसाच्या भरोशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची कशी दैना होते ते शेतकऱ्यांची दैना या कथेतून दिसून येते.
ग्रामीण भागातला आपलेपणा, माया, जिव्हाळा, आपुलकी, गोडी, एकमेकांना विचारपूस करणारी लोकं, शहरात राहिली नाहीत असं गड्या आपला गाव बरा या कथेत लेखकाने विलासच्या रुपाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हाच मुलाचा बाप या कथेतून राजकारणांचे डावपेच, राजकारण्यांची अनैतिकता, गाव गप्पातून ग्रामीण भागात कशी रंगते? हे वाचण्यासारखे आहे. मोठ्या मार्मिक शब्दात संजय महल्ले यांनी ते मांडले आहे. कुत्र्याची समाधी या कथेत कुत्र्याची समाधी म्हणूनशिन्या अळ्ळावून राहिले. कुत्र्यावानी लोकं! त्या शिवाजीराजानं सोताच्या जीवाचं रान करूनशिन्या तुमा-आमची अब्रू वाचोली. सराज्य उभारलं ते नाही का आठोत कोनाले...अन त्या एका कुत्र्याचीच पळली सा-याईले.वा रे वा जमाना आन,बेमान लोकं..." 'इमानदार वाघ्या' या कथेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाचं रान करून सगळ्या लोकांची अब्रू वाचवली गनिमासोबत अख्खं आयुष्य लढाया करण्यात घालवलं. स्वतःसाठी न जगता रयतेसाठी जगणारे या जाणत्या राजाला आठवा. कशाला कुत्र्याच्या नादी लागून राहिले? असा खडा सवाल लेखक संजय महल्ले यांनी मोठ्या जाणीवपूर्वक खेदात्मकतेने केला आहे. महादेवाच्या नंदी या कथेत विठ्ठल बैलजोडी विकायला निघालेल्या पाहून त्यावर चिडणारा त्याचा म्हाताऱ्या बापाचा जीव गुंतलेला असतो. म्हातारा बैल जोडी विकायला विरोध करतो तेंव्हा विठ्ठल खूप संतापतो. मग म्हातारा आम्हांला पण विकून टाक. आम्ही आता म्हातारे झाले आहोत. असा मार्मिक सवाल केल्याने प्रत्येक वाचकांच्या डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही. नामशेष होत चाललेली बैलाची जोडी आता सर्वत्र ट्रॅक्टरने जागा घेतली आहे. पण ट्रॅक्टरला तेल घातल्याशिवाय ते चालत नाही पण मुक्या, इमानदार निष्पाप बैलांना सांभाळलं शेतकऱ्याचे जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही.असे दिसून येते.असं मुक्या प्राण्यांचं महत्त्व आणि गरज लक्षात येते.
वाढत्या महागाईमुळे सर्वांचा जीव मेटाकुटीला आला आहे.महागाईमुळे भाव गगनाला भिडले आहेत. 'महागाईचा झटका' या कथेत म्हाताऱ्या बापाची तंबाखू आणायला पैसे शिल्लक न उरल्यामुळे मुलगा विठ्ठल बापाला तंबाखू आणू शकत नाही. वाढत्या महागाईचे चटके विठ्ठल व त्याच्या कुटुंबाला सहन करावे लागतात. जन्मदात्याला तंबाखू न दिल्याने वाढत्या महागाईमुळे न दिल्याचे दुःख लेखकाने अतिशय पारदर्शकपणे मांडले आहेत. 'शिक्षणाचा धंदा' या कथेत लेखक संजय महल्ले यांनी वाढत्या शिक्षण संस्थांचे बाजारीकरण यावर प्रकाश टाकला आहे. शहरातल्या शाळा पैसे उकळण्याचे यंत्र कशा बनत चालल्या आहेत.त्याचबरोबर वाढत्या अपघाताने जाणारे निष्पाप जीवांचे बळी अतिशय संवेदनशीलपणे लेखकांनी या कथेत मांडले आहे.
पाटी-लेखणी या कथेत आजच्या काळात दुरापास्त झालेले पाटी दाखवली आहे. पूर्वीच्या काळी पाटी लेखणी होती. त्यामुळे पूर्वीच्या लोकांची अक्षरे सुंदर मोत्यासारखी होती. पूर्वी पाठीवर काही पण लिहिता आणि पुसून टाकता येत होते. त्यामुळे त्यांना नानाविध नावे, चित्र काढण्याची मुभा असायची. आजच्या चाकोरीबद्ध शिक्षणाने पाठीची जागा वहीने घेतली. त्यात पुस्तकांच्या दप्तरांचे ओझे आणि पाठीवर वहीवर काही चित्र काढण्याची मुभा आज नाही. बंदिस्त झाल्या सारखं लहान मुलांचे जीवन झाल्याने मन्याच्या आजीचं पाटी लेखणीवर लिहित असलेली कल्पना करून स्वतःच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी भिंतीवर मन्याने काढलेले चित्र पाहून आजींना केलेलं मन्याचं कौतुक. त्यात भिंती खराब केल्याची आजच्या काळातील आईची खंत लेखकाने मोठ्या शिताफीने व्यक्त केली आहे.
अस्सल विनोदी कथाकार संजय महल्ले यांचा गावगप्पा हा ४२ कथांचा संग्रह आहे. प्रत्येक कथा वाचताना वाचकाला आपण स्वतः प्रत्यक्षदर्शी त्या कथेत असल्याचा अनुभव येतो. एवढी सहजता व सुंदरता या कथासंग्रहात ठासून ठासून भरली आहे. शहरी भागात राहणाऱ्या लेखकाचेही ग्रामीण मातीशी व इथल्या बोलीशी कशी नाळ जुळलेली आहे ? हे कथासंग्रह वाचताना लक्षात येते. मानवी जीवनाकडे बघण्याचा मिस्कीलपणा, मार्मिक शब्दकळा,शब्द सौंदर्याने नटलेली भाषाशैली आणि लेखकाची विनोदी वृत्ती लक्षात येते.
समाजातलं भयान वास्तव, समाजातील मागासलेपण, सामान्य माणसाचं राजकारण, धर्मकारण, हेवेदावे, जगण्याची ओढाताण, पूर्वीचा काळ, त्यातील माणसाची माया,आपुलकी, जिव्हाळा, नात्यातील गुंता, जीवनात येणारे सुख दुःख, शिक्षणाचं भांडवल करून निघालेल्या शिक्षणाचे बाजारीकरण, खाजगीकरण, राजकारणातील भयान वास्तव,सोवळं या कथेतून अंधश्रद्धेवर केलेली टीका, असे अनेक ज्वलंत प्रश्न, जगण्यातील आव्हाने, जगण्याचे सूक्ष्म निरीक्षण लेखक संजय महल्ले यांनी गावगप्पाच्या माध्यमातून टिपले आहे.
माणसाच्या दैनंदिन जगण्यातला विनोद, स्वभाव वैशिष्ट्ये टिपणे हे संजय महल्ले यांचे खास वैशिष्ट्य असून अस्सल वऱ्हाडी गावरान मेवा म्हणजे गावगप्पा कथासंग्रह आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच कथासंग्रह म्हणजे गावगप्पा...
लेखक संजय महल्ले यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या हातून अनेकानेक साहित्य सेवा घडावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना...!!
समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि. वाशिम
No comments:
Post a Comment