*व-हाडी काव्य रचना*
*अष्टाक्षरी रचना*
*विषय-माती*
काळी माती माझी माय
उभ्या आयुष्य सपान
पिक डोलतया रानी
धनी चालतो जोमानं.....
काळी माती मऊ मऊ
पिकविते हिरेमोती
शेतकरी सुखी होण्या
घाम शेतात गाळती....
माती माझी माय हाय
लेणं उभं आयुष्याचं
सुख लागे पोराबाळा
मोल जाणावं मातीचं.....
जन्म घेई मायपोटी
काळीमाती खरी माय
जिच्या घरी तिचा वास
त्योच चार घास खाय.....
राबराबे शेतकरी
कष्ट उपसतो रानी
काळीमाती त्याले माय
गातो सुखाची रं गाणी.....
काया काया मातीमधी
घाम गाळीतो रं बळी
बळी पोशिंदा जगाचा
घास उतरतो गळी....
कष्ट करूनिया धान
जवा आणलं घरात
चार घास सुखाचे रे
तवा जाती रे पोटात....
पोरंबाळं माझी माय
तुझ्यामुळं जगताती
काय तुले सांगु लेका
मह्या मातीची महती ....
*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
No comments:
Post a Comment