कोणतीही कलाकृती त्या माणसाचा अविभाव व्यक्त करत असते. मग ती साहित्यकला असेल तर कवीच्या अंतर्मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. अशीच एक कवयित्री जिला लहानपणापासून कविता रचण्याचा छंद होता. शाळेतील शिक्षकांना, बाबांना कविता वाचून दाखवायची आणि शाबासकीची थाप पाठीवर घेऊन आपलं भावा विश्व समृद्ध करणारी यवतमाळ जिल्ह्यातील कवयित्री कविता शिरभाते यांचा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे -जगण्यामध्ये हेतू काही.
जीवन कधी रखरखत ऊन
तर कधी झुळझुळणारा गार वारा
कधी गुंतागुंतीचे चक्रव्यू
तर कधी लहरीस गवसावा किनारा...!
हे जीवन सुंदर आहे. या ओळीप्रमाणे सुंदर जीवन जगताना तेवढाच त्याग,कष्ट,मोह,माया,स्वार्थ इत्यादी गोष्टी त्याच जीवनाचे विविध अंग आहेत. जीवनात जसे सुख येथे त्यामागून आपोआप दुःख येते. सुख-दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून दुःखा नंतर सुख आणि सुखानंतर दुःख असे चक्र मानवी जीवनात निरंतर सुरूच राहते. जीवन कधी रखरखतं ऊन तर कधी झुळझुळणारा गार वारा, तर कधी जीवनामध्ये गुंतागुंतीचे अनेक प्रश्न असतात. तर कधी जीवनाला किनारा गवसतो. कवयित्री कविता शिरभाते यांनी साहित्य विश्वास जगण्यात जगण्यामधले हेतू मनात ठेवून पाहिलं आणि मग पाऊल टाकलं वरील ओळी मनाला सुन्न करत जगण्याचा अर्थ शोधतात.कवयित्रीचे नावच कविता असल्याने कवयित्री आपल्या भावना हळुवार अलगदपणे वरील कवितेतून मांडताना दिसते.
कवयित्री कविता शिरभाते यांच्या लेखणीचा प्रवासाचा सखी सिद्ध लेखिका या समूहात उगम झाला हे कवयित्रीने पहिल्याच कवितेत प्रामुख्याने नमूद केल्याचे दिसून येते.
दारिद्र्य माणसांमाणसातील अनुभवांची श्रीमंती देतो
जगण्याच्या लढाईत बळ पुरवतं
माणसाला अधिक समंजस बनवतं
आणि गरज कोणती व जैन कोणती
यातला फरक शिकवून जातं
कष्टाच्या स्वप्नात जगणंही असंच
पण श्रीमंतीत लोळणाऱ्या राजनेत्यांना ते कसं समजणार?
दारिद्र्य माणसांमाणसातील फरक दर्शवतो. दारिद्र्य माणसाला जगण्याच्या लढाईत बळ पुरवतो. माणसाला समंजस बनवून शहाणं बनवतं. श्रीमंत लोकांना ओळखायला लावतं खऱ्या श्रीमंतीचे दर्शन घडवत खोट्या श्रीमंतीचा आव आणणा-यांचा पर्दापाष करतो. आयुष्याच्या शाळेत दारिद्र्य प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जातं. मूलभूत गरज कोणती आणि चैन कोणती यातला फरक शिकवून जातो. अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्यांचं जगणं कष्टमय आणि दुःखप्रस्त असतं हे शिकवून जातं. पण श्रीमंताला राजनेत्याला दारिद्र्य म्हणजे काय ? हे समजत नाही कारण त्यांचे चटके त्यांना कधीच बसलेले नसतात. ही कवयित्री वरील ओळींमधून विशद करायला विसरत नाही.
प्रक्षुब्ध जाणीवा असणारी, संवेदनशील मनाची कवयित्री कविता शिरभाते यांनी मतदानाचा हक्क हा आपला अधिकार आहे. आणि तो संविधानाने आम्हांस दिला आहे. माणसाने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले अनमोल मत देशाप्रति निष्ठावान असणाऱ्याला द्यावे.असे आवर्जून सांगतात. जाग माणसा या कवितेतून माणसाने माणसातच माणुसकी शोधायची असते. मन, बुद्धी, विवेकाला सदगुणांची जोड द्यायला सांगितली आहे. दुर्गुणांची होळी करून माणसाने जगलं पाहिजे.माणसा समान वागलं पाहिजे म्हणून अशी आर्त हाक कवयित्री कविता शिरभाते देतात.
कवयित्री कविता शिरभाते यांच्या काही कविता गजल सदृश्य पाहायला मिळतात. त्यामध्ये अगदी सोप्या भाषेत लय साधलेला दिसून येतो.या कविता अंतर्मनाला भेटल्याशिवाय राहत नाहीत. शब्दांचा फापड पसारा न करता अगदी मोजक्या शब्दात कवयित्री अगदी सोप्या पद्धतीने व्यक्त होताना दिसते.
या अवकाळी पावसानं
नकोसं केलंय माझं जगणं
शेतावर फुलल्या केळीच्या बागा
वेलीवर द्राक्षांनी घेतली जागा
संत्री मोसंबीचा जुळलाय धागा
अशातच तुझं अवकाळी येणं
नकोसं केलंय माझं जगणं....!!
बळीराजाच्या मुखातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कसं नुकसान होतं? केळीच्या, द्राक्षांच्या बागा, संत्री,मोसंबी इ. बागेमध्ये अवकाळी पावसाने जोडपले की शेतकऱ्याच्या हाती काहीच राहत नाही. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. अगोदरच शेतकरी अंगावर कर्ज काढून शेती पिकवतो. त्यात पण निसर्ग त्याची परीक्षा पाहतो. म्हणून शेतकऱ्याला त्याचं जगणं नकोसं वाटतं अशी आर्त हाक वरील रचनेतून कवयित्री कविता शिरभाते मांडतात.
काढी मातीतून मोती
अन्नदाता कीर्ती थोर
पोट भरतो जगाचे
निजे उपाशीच पोर....!!
शेतकऱ्याचं जगणं काय असतं? पदराला शंभर गाठी मारून, चटणी भाकरी खाऊन तर कधी उपाशी राहून पोटाला चिमट्या देत काळ्या आईची सेवा करणारा शेतकरीच खरा अन्नदाता आहे. तोच जगाचा पोशिंदा आहे. असा जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या कवयित्री कवयित्री शिरभाते यांच्या आहेत. कवयित्री कविता शिरभाते यांच्या कविता माय मराठीचा गोडवा वाढवणाऱ्या, तर जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या,तर काही कविता काळ्या आईची सेवा करणाऱ्या, शेतकरी राजाच जगणं सांगणाऱ्या, मतदानाचा हक्क बजावणाऱ्या, माणुसकी जागवणाऱ्या, तर कधी बालपणात हरवणाऱ्या आहेत. गझल सुदृश्य कविता तर अत्यंत वाचनीय होऊन जाणाऱ्या व कवी शब्दांमध्ये जास्त मतितार्थ दर्शवणाऱ्या, मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे असे सांगणाऱ्या, तर कधी माणसाचा शोध घेणाऱ्या, तर कधी मखमली प्रीत कशी फुलते? भेट कशी थेट होते ? अशा प्रेम रसात न्हावून निघणाऱ्या कविता वाचकाला वेड लावल्याशिवाय राहत नाहीत.
कवयित्री कविता शिरभाते यांच्या विरह, गारवा, पावसाळा, कोप निसर्गाचा, अवकाळी पाऊस, बळीराजा, बैलपोळा, दीप पेटवा मनात, पिंडदान, आई, आला पाऊस भरून, श्वास आईचा, स्त्री जाणीव, जन्मदात्री, गणगोत, जिजाऊ-सावित्री, आई मला वाचव गं, कन्यादान, जगाया निघाली, चिमणी ताई,जगण्यामध्ये हेतू काही अशा कित्येक कविता वाचकांच्या काळजात घर करून राहतात.
कवयित्री कविता शिरभाते यांच्या जगण्यामध्ये हेतू काही या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण ८५ कविता आहेत. याची पहिली आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित केली.मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय देखण्या स्वरूपात केले असून प्रस्तावना नीलकृष्ण देशपांडे, यवतमाळ यांनी केली असून पाठराखण भीमराव पांचाळे सर यांनी अगदी सोप्या भाषेत करून दिले आहे. कवयित्री कविता शिरभाते यांच्या सर्वच कविता वाचकांच्या पसंतीस पडतील यात तिळमात्र शंका नाही. कविताताई शिरभाते यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
जगण्यामधले हेतू काही- कवयित्री कविता शिरभाते
प्रकाशक- परिस पब्लिकेशन पुणे
मुखपृष्ठ- श्री अरविंद शेलार
पहिली आवृत्ती- १४ नोव्हेंबर २०२१
मूल्य केवळ -150 रुपये
मोबाईल नंबर ९८३४१३८००१
समीक्षिका /लेखिका
कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कोकलगाव
तालुका, जिल्हा -वाशिम