चंद्रपूर जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती जगझाप यांचा नंदादीप या काव्यसंग्रहानंतर दुसरा काव्यसंग्रह म्हणजे बालगीतांचा खजिना नुकताच वाचनात आला. लहान बालकांना बडबड गीते, बालकविता आणि गोष्टी खूप आवडतात. सो प्रीती जगझाप या मुळातच एक प्राथमिक शिक्षक असल्याने त्या बालकांचे भाव विश्व जाणतात. कायम बालकांच्या सानिध्यात राहत असल्याने बालकांच्या आवडीनिवडी, त्यांचा कल ओढा जाणून असल्याने त्यांचा २१ कवितांचा खजिना बालकांचे भावविश्व समृद्ध करेल यात शंकाच नाही. 'बालगीतांचा खजिना' या बालकाव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि बोलके असल्याने व बांधणी उत्कृष्ट असल्याने थोरामोठ्यांना, बालकांना पसंतीस पडणारे आहे. या बालकाव्यसंग्रहाला प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक कवी चंद्रकांत वानखेडे पुणे यांची लाभली असून शुभेच्छा ग्रामगीताचार्य बंडोपंत बडेकर( अध्यक्ष झाडीबोली साहित्य संमेलन भंडारा )यांची लाभली आहे तर पाठराखण सुप्रसिद्ध बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांची लाभली आहे.
लहान बालकांना पावसात भिजायला आणि खेळायला खूप आवडतं. त्यांचे विश्वच वेगळं असतं. लहान बालकांना जसा पाऊस आवडतो तसेच प्राणी सुद्धा खूप आवडतात. प्राणी, पक्षी यांच्या बद्दल कुतूहल व आकर्षण असते. सौ. प्रीतीताईंनी नेमके तेच हेरले आहे. बालकात रममान होणाऱ्या त्या शिक्षिका असल्याने बालकांची आवड, बालकांचे भावविश्व त्या जाणतात त्यामुळेच तर बालगीतांचा खजिना त्यांच्या हाती सापडला आहे. बालकविता करणे इतकं साधं सोपं काम मुळीच नाही. बालकांच्या इतकच लहान व्हावं लागतं. तेंव्हा कुठे अशा बाल साहित्याचा जन्म होत असतो हेही तितकच खरं.
बालपणी बालकांना जादूची छडी आवडते. बाहुली संगे खेळायला आवडते. परींच्या गोष्टी आवडतात. परींच्या कविता आवडतात. कवयित्री प्रीती ताईंनी वर्षाराणी या कवितेतून पावसाचे महत्व विशद केले आहे. पावसात भिजण्याचा बालमनाचा आनंद वर्षाला ती या कवितेतून पहायला मिळतो.
डोळ्यावर बांधून कापडी पट्टी
चला खेळूया धावणी शिपटी
तू धाव आधी मी धावतो मागे
पडले कोणीतरी येऊ नका रागे...!
आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात नवनवे तंत्रज्ञान जसजसे विकसित झाले तसतसे लहान बालकांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण मोबाईलच्या इंटरनेटच्या जमान्यात वावरू लागले. त्यामुळे पूर्वीच्या काळी खेळले जाणारी मैदानी खेळ आज दुरापास्त होत चालले आहेत. आजच्या काळातील बालकांना पारंपारिक खेळाची नावे पण माहिती नाहीत. पूर्वीचे खेळ आता खेळता येत नाहीत किंवा सरसर झाडावरही चढता येत नाही.पूर्वी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळी कोशिंबीर किंवा शिवना पाणी असे खेळ खेळले जात होते. एक जण पुढे धावायचा दुसरा त्याचे मागे धावायचा धावता धावता कोणी पडले तर रागही यायचा नाही. अशा पद्धतीने वरील ओळीतून कवयित्री प्रीतीताईनी पूर्वीच्या काळच्या मैदानी खेळांची ओळख,खेळाचे महत्व आजच्या इंटरनेटच्या काळातील विद्यार्थ्यांना करून दिली आहे.
कवयित्री प्रीती ताईंनी चाचा नेहरू या कवितेतून चाचा नेहरूंचे कार्य त्यांचे आवडनिवड सांगितली आहे.चाचा नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान असून त्यांनी स्वदेशी साठीची लढाई त्यांनी त्यांच्या कवितेतून विशद करण्याचा प्रयत्न केला आहे.
चला मुलांनो गाऊया
भाज्यांची नावे पाहूया
हिरवी हिरवी ताजी ताजी
आवडते मला मेथीची भाजी
पालक चवळी शेपू माठ
सांबराचा सर्वत्र थाट
हिरवीच दिसते शिमला मिरची
काटवल आणतात जिभेवर सिर्शि
भेंडीची आहे मी खूप दर्दी
पांढऱ्या भोंबुड्यावर तुफान गर्दी
चला मुलांनो गाऊया
भाज्यांची नावे पाहूया....!!
वरील कवितेतून भाज्यांची नावे कवयित्रीने नमूद केली आहेत. प्रत्येक भाजी आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे? लहान मुलांना सर्वच भाज्या आवडत नाहीत म्हणून प्रत्येक भाजीचे महत्त्व कवितेच्या माध्यमातून प्रीती ताईने सांगितले आहे.लौकिचा रस हृदयासाठी चांगला असतो तर कारले मधुमेह आजारावर गुणकारी औषध म्हणून काम करते. सुदृढ आणि निरोगी राहायचं असेल तर सर्व बालकांनी सर्वच भाज्या खाल्ल्या पाहिजेत या उद्देशाने कवयित्री गाण्याच्या रूपाने भाज्यांचे महत्त्व विशद करतात.
खेळ , उपक्रम, विज्ञान वही
आठवतात मला माझ्या बाई
ऑनलाईन मला आता करमत नाही
डोळ्यांची होते लाही लाही
जा रे जा रे कोरोना
मैं तुझसे डरू ना....!!
विद्यार्थ्यांना जेवढी शाळा आवडते तेवढ्याच शाळेतल्या मॅडम आवडतात.एकटेपण विद्यार्थ्यांना मुळीच आवडत नाही.लॉकडाऊन काळात शाळांना टाळे बंदी झाली आणि विद्यार्थ्यांना जवळपास दोन वर्ष घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करावा लागला पण विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासाला नंतर खूप कंटाळून गेले होते. विद्यार्थ्यांना केंव्हा एकदा शाळा सुरू होईल आणि शाळेत जाईन असं झालं होतं विद्यार्थ्यांना शाळेतले खेळ, उपक्रम,विज्ञान वही आणि शाळेतल्या बाई आठवत होत्या.मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास करून डोळ्यांची खूप आग होत होती. जा रे कोरोना. आता आम्ही तुला घाबरणार नाही असं प्रत्येकाला वाटू लागलं होतं. कवयित्री प्रीती ताईंनी बालमनाच्या वास्तवतेचं दर्शन वरील ओळीमधून करून दिली आहे.
हिमालयाच्या उंच शिखरावर
फडकत आहे निशाण
हिंद आणि अरबी सागर
ज्याचे करीती गुणगान
प्रिय आमचा भारत देश महान...
वरील ओळीतून कवयित्री प्रीती ताईंनी हिमालयाचे व आपल्या भारत देशाचे गुणगान गायले आहे.हिमालयाच्या उंच शिखरावर आपल्या भारत देशाचे निशान डौलाने फडकते आहे. हिंद आणि अरबी सागर सुद्धा भारत देशाचे गुणगान गातात. प्रिय आमुचा भारत देश महान...भारत देशाचे महती जाणाऱ्या गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा, कावेरी इ. नद्यांच्या देखील उल्लेख वरील कवितेत करताना कवयित्री दिसून येतात. कवयित्री प्रीती जगझाप यांनी बालमनाला भावणाऱ्या अनेक कविता या बालगीतांचा खजिना या बालकाव्यसंग्रहात घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांना आवडणारा पाऊस, परी, खेळ,चाचा नेहरू, आईची माया, भाज्यांची नावे,कोरोना,इकर बिल्ला टिकर बिल्ला,आवडीचे खेळ, शाळा बंद पण शिक्षण सुरू, स्वच्छता, भारत देश महान, विद्यार्थ्यांना आवडणारा फळा, मांजराला आवडणाऱ्या लोण्याचा गोळा, सृष्टी सौंदर्य, फुलपाखरू आणि माझी शाळा अशा अनेक विद्यार्थ्यांच्या बालमनाला स्पर्श करणारा हा बालगीताचा खजिना प्रीती ताईंनी वाचकांच्या हाती दिला आहे. या बालकाव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक व दर्जेदार असल्याने प्रत्येक कवितेनुरूप त्यात चित्र असल्याने आणखीन सुंदर आकर्षक दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या बालमनाला भावणारे आहे हे सर्व वाचकांना आवडेल यात शंकाच नाही.
प्रीती ताईच्या हातून अनेक बालकाव्यसंग्रहाची निर्मिती होवो. त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा...!!
बालकाव्यसंग्रह-बालगीतांचा खजिना -प्रीती जगझाप
प्रकाशन -समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
प्रकाशक- प्रवीण भाकरे
मुखपृष्ठ -संतोष घोंगडे
प्रथम आवृत्ती 15 जून 2022
मूल्य -केवळ साठ रुपये
समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
मु. पो.कोकलगाव
तालुका /जिल्हा- वाशिम
मो.नंबर 9767663257
No comments:
Post a Comment