Monday, 11 September 2023

शिक्षणाचा खेळखंडोबा -बाजारीपण आणि खाजगीकरण

 *शिक्षणाचा खेळखंडोबा -बाजारीकरण आणि खाजगीकरण*

       शाहू फुले आंबेडकरांनी त्यांच्या काळात शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले.त्या अगोदरच्या काळांमध्ये सर्वसामान्यांना शिक्षणाची दारं खुली नव्हती. स्त्रियांना तर फक्त चूल आणि मुलच होतं. पूर्वीच्या काळी शिक्षण नव्हतं म्हणून तर शिक्षणाची कवाडे गोरगरिबांसाठी खुले करण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्य खर्ची घातलं. बहुजनांची पोरं शिकावीत म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी राहत घर, शेतजमीन सर्व इतरांना वाटून टाकलं.आता कुठे गोरगरिबांची मुलं शिकायला लागली आहेत. वेगवेगळ्या पदावर पोहोचत आहेत. राजश्री शाहू महाराजांनी प्रत्येक मूल ६ ते १४ वयोगटातील शिकलंच पाहिजे असं सक्तीचे शिक्षण केलं. तसा कायदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी अमलात आणला पण सरकारच्या ५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या निर्णयाने अख्खा महाराष्ट्र हादरला.
        सरकारी शाळांचे खाजगीकरण करण्याचा शासनाचा हा कुटिल डाव सर्वसामान्य जनतेच्या खिशाला तर परवडणारा नाहीच. अगोदरच खाजगी शाळा आणि खाजगी शाळांचे बाजारीकरण वाढलं असताना सरकारी शाळा, निम सरकारी शाळा, नगरपरिषद शाळा खाजगी किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना दहा वर्ष द्यायच्या नावाखाली विकायला काढल्या. खरोखर गोरगरीब,मजुरदार, शेतकऱ्यांच्या मुलांचा खेळ खंडोबा करू पाहणार आहे. शासनाचे हे पाऊल चुकीच आहे.गोरगरिबांच्या मुळावर घाव घालणारं आहे. जेंव्हा सरकारी शाळा दत्तक दिल्या जातील तेंव्हा दत्तक घेतलेल्या कंपन्याची/ शाळांची फीस लाखोवर नेऊन ठेवतील. साधी गोष्ट आहे मागे पंधरा दिवसच सरकारी एस.टी महामंडळाच्या बसेस बंद होत्या. तर खाजगी वाहनावाल्यांनी जिथे ५० रुपये भाडे तिकीट होतं तिथं पाचशे रुपये तिकीट केलं. अशीच अवस्था येणाऱ्या काळात होईल. जिथे सरकारी शाळेत गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, मोलमजुरांच्या, श्रीमंतांच्या सर्वांसाठी शिक्षण मोफत आहे.तेच शिक्षण घेण्यासाठी वर्षाला एक लाख रुपये फीस होईल. मग तेंव्हा कोणताही गरीब माणसाच्या ते खिशाला परवडणारी नाही. मजूर, गोरगरीब, शेतकरी लोक एवढी फीस भरणार नाहीत. आपली मुलं शाळेत पाठवणार नाहीत. शिक्षण न घेतल्याने गरिबांची मुलं आपसूकच अज्ञानी राहतील आणि त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढेल, बेकारी वाढेल, बेरोजगार,गुन्हेगारी वाढेल हे सर्व जर थांबवायचे असेल तर समाज जागा होणे फार गरजेचे आहे. सर्व स्तरातून या गोष्टीला विरोध झाला पाहिजे, सर्व नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करून या निर्णयाचा विरोध केला पाहिजे. मागे विद्युतच क़पन्यांच पण खाजगीकरण करण्याचा डाव लोकांनी हाणून पाडला.तसाच हा पण डाव सर्व नागरिकांनी हाणून पाडला पाहिजे.
        जे सत्तेवर आहेत त्यांना लोकांनीच निवडून दिले आहे. लोकांच्या भल्यासाठी... असा गोरगरिबांच्या मुळावर घाव घालण्यासाठी नव्हे. याची जाण सरकारने ठेवायला पाहिजे. अगोदरच महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षापासून नवीन शिक्षक भरती बंद आहे. आजची सध्याची परिस्थिती हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त असताना सेवानिवृत्त शिक्षकांना अर्ध्या पगारावर घेण्याचा नवीन फतवा काढला. ज्यांचे शरीर साथ देत नाही. बुद्धी काम करत नाही. अशा सेवानिवृत्त लोकांना पुन्हा कामावर कशासाठी? जे नवीन तरुण डी.एड् शिक्षण शिकून बेरोजगार आहेत. त्यांना संधी द्या त्यांना शिकवू द्या. नवीन शिक्षक भरती करून शाळा मधल्या भौतिक सुविधांकडे लक्ष देऊन शाळेचा दर्जा आणि शाळा सुधारण्यापेक्षा भलतच करू पाहणाऱ्या शासनाला जाग आणण्यासाठी सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध व्हायला पाहिजे. हा कुटील डाव हाणून पडला पाहिजे. जे शिक्षक २००५ च्या नंतर नोकरीला लागलेत. त्यांचा तर विचारच नाही या शासनाला. आयुष्याची ३० ते ३५ वर्ष ज्ञानदानामध्ये घालवणाऱ्या शिक्षकाला वार्धक्याच्या उंबरठ्यावर भिकेची झोळी घेऊन फिरावे लागेल सर्वांना पेन्शन दिलं पाहिजे तरच शिक्षकाचे कुटुंब वाचेल. वाचणार. फक्त पाच वर्षासाठी आमदार ,खासदार पदावर येतात आणि त्यांना पेन्शन एका मताने लागू करतात मग शिक्षकांचे भविष्य तुम्हाला अंधकारमय दिसत नाही का?
      झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारचा डाव जर हाणून पडायचा असेल तर प्रत्येक सामान्य नागरिकांनी  कडकडून या गोष्टीला विरोध करायला पाहिजे. नाहीतर घाव आपल्याच मुळावर ...
         शिक्षणाचा बाजार करून ठेवलाय. उठा जागे व्हा...!  ही लढाई पण येत्या काळात आपल्याला लढावी लागणार आहे. तरच सहकारी शाळा वाचतील. शाळा वाचल्या तर आपण वाचणार. नाहीतर गरिबांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही.


मिनाक्षी पांडुरंग नागराळे
वाशिम

Saturday, 15 April 2023

माझे चौथे पुस्तक समकालीन समिक्षा

 माझे चौथे पुस्तक -समकालीन समिक्षा एक संशोधन ग्रंथ...पी.एच.डी.करणा-या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 



Sunday, 9 April 2023

भावना...अति लघू कथा

 भावना (अति लघू कथा)

    तो भेटायला येणार म्हणून ती ही आतुरतेने वाट पाहत असते.तेवढ्यात तो येतो.तीला तिच्या भावना दाबता येत नाहीत.मग ती हक्काने बोलते.पण तो येतो एक कर्तव्य म्हणून....फॉरमॅलिटी म्हणून...तो गळ्याला बळच लावून घेतो.पण जिवाला जीव लागत नाही... फक्त शरीराला शरीराचा स्पर्श झाला.आणि तो गेला निघून... भावना हीन...ती ओळखून घेते आणि बसते मग उदास होऊन...तिच्या पुर्वीच्या त्याला आठवत....तो बदललेला असतो खूप तिच्याही येतं लक्षात पण काय करणार? ती हरवून बसलेली असते कायम त्याच्यात...भावनांचं घर बांधून....तिचं आणि त्याचं पहिलं वहीलं प्रेम आठवत.

मिनाक्षी नागराळे वाशिम...

Saturday, 25 March 2023

जगण्याचा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे -जगण्यामधले हेतू काही

 *जगण्याचा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे - जगण्यामधले हेतू काही*

        कोणतीही कलाकृती त्या माणसाचा अविभाव व्यक्त करत असते. मग ती साहित्यकला असेल तर कवीच्या अंतर्मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. अशीच एक कवयित्री जिला लहानपणापासून कविता रचण्याचा छंद होता. शाळेतील शिक्षकांना, बाबांना कविता वाचून दाखवायची आणि शाबासकीची थाप पाठीवर घेऊन आपलं भावा विश्व समृद्ध करणारी यवतमाळ जिल्ह्यातील कवयित्री कविता शिरभाते यांचा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे -जगण्यामध्ये हेतू काही.

       जीवन कधी रखरखत ऊन 
       तर कधी झुळझुळणारा गार वारा 
       कधी गुंतागुंतीचे चक्रव्यू 
       तर कधी लहरीस गवसावा किनारा...!

       हे जीवन सुंदर आहे. या ओळीप्रमाणे सुंदर जीवन जगताना तेवढाच त्याग,कष्ट,मोह,माया,स्वार्थ इत्यादी गोष्टी त्याच जीवनाचे विविध अंग आहेत. जीवनात जसे सुख येथे त्यामागून आपोआप दुःख येते. सुख-दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून दुःखा नंतर सुख आणि सुखानंतर दुःख असे चक्र मानवी जीवनात निरंतर सुरूच राहते. जीवन कधी रखरखतं ऊन तर कधी झुळझुळणारा गार वारा, तर  कधी जीवनामध्ये गुंतागुंतीचे अनेक प्रश्न असतात. तर कधी जीवनाला किनारा गवसतो. कवयित्री कविता शिरभाते यांनी साहित्य विश्वास जगण्यात जगण्यामधले हेतू मनात ठेवून पाहिलं आणि मग पाऊल टाकलं वरील ओळी मनाला सुन्न करत जगण्याचा अर्थ शोधतात.कवयित्रीचे नावच कविता असल्याने कवयित्री आपल्या भावना हळुवार अलगदपणे वरील कवितेतून मांडताना दिसते.
       कवयित्री कविता शिरभाते यांच्या लेखणीचा प्रवासाचा सखी सिद्ध लेखिका या समूहात उगम झाला हे कवयित्रीने पहिल्याच कवितेत प्रामुख्याने नमूद केल्याचे दिसून येते.

               दारिद्र्य माणसांमाणसातील अनुभवांची श्रीमंती देतो 
               जगण्याच्या लढाईत बळ पुरवतं 
                माणसाला अधिक समंजस बनवतं 
                आणि गरज कोणती व जैन कोणती
                यातला फरक शिकवून जातं
                कष्टाच्या स्वप्नात जगणंही असंच 
               पण श्रीमंतीत लोळणाऱ्या राजनेत्यांना ते कसं समजणार?

       दारिद्र्य माणसांमाणसातील फरक दर्शवतो. दारिद्र्य माणसाला जगण्याच्या लढाईत बळ पुरवतो. माणसाला समंजस बनवून शहाणं बनवतं. श्रीमंत लोकांना ओळखायला लावतं खऱ्या श्रीमंतीचे दर्शन घडवत खोट्या श्रीमंतीचा आव आणणा-यांचा पर्दापाष करतो. आयुष्याच्या शाळेत दारिद्र्य प्रत्येक अनुभव काहीतरी शिकून जातं. मूलभूत गरज कोणती आणि चैन कोणती यातला फरक शिकवून जातो. अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्यांचं जगणं कष्टमय आणि दुःखप्रस्त असतं हे शिकवून जातं. पण श्रीमंताला राजनेत्याला दारिद्र्य म्हणजे काय ? हे समजत नाही कारण त्यांचे चटके त्यांना कधीच बसलेले नसतात. ही कवयित्री वरील ओळींमधून विशद करायला विसरत नाही.
           प्रक्षुब्ध जाणीवा असणारी, संवेदनशील मनाची कवयित्री कविता शिरभाते यांनी मतदानाचा हक्क हा आपला अधिकार आहे. आणि तो संविधानाने आम्हांस दिला आहे. माणसाने कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आपले अनमोल मत देशाप्रति निष्ठावान असणाऱ्याला द्यावे.असे आवर्जून सांगतात. जाग माणसा या कवितेतून माणसाने माणसातच माणुसकी शोधायची असते. मन, बुद्धी, विवेकाला सदगुणांची जोड द्यायला सांगितली आहे. दुर्गुणांची होळी करून माणसाने जगलं पाहिजे.माणसा समान वागलं पाहिजे म्हणून अशी आर्त हाक कवयित्री कविता शिरभाते देतात.
     कवयित्री कविता शिरभाते यांच्या काही कविता गजल सदृश्य पाहायला मिळतात. त्यामध्ये अगदी सोप्या भाषेत लय साधलेला दिसून येतो.या कविता अंतर्मनाला भेटल्याशिवाय राहत नाहीत. शब्दांचा फापड पसारा न करता अगदी मोजक्या शब्दात कवयित्री अगदी सोप्या पद्धतीने व्यक्त होताना दिसते.
  
        या अवकाळी पावसानं 
       नकोसं केलंय माझं जगणं 
       शेतावर फुलल्या केळीच्या बागा 
       वेलीवर द्राक्षांनी घेतली जागा 
       संत्री मोसंबीचा जुळलाय धागा 
       अशातच तुझं अवकाळी येणं 
        नकोसं केलंय माझं जगणं....!!

        बळीराजाच्या मुखातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कसं नुकसान होतं? केळीच्या, द्राक्षांच्या बागा, संत्री,मोसंबी इ. बागेमध्ये अवकाळी पावसाने जोडपले की शेतकऱ्याच्या हाती काहीच राहत नाही. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. अगोदरच शेतकरी अंगावर कर्ज काढून शेती पिकवतो. त्यात पण निसर्ग त्याची परीक्षा पाहतो. म्हणून शेतकऱ्याला त्याचं जगणं नकोसं वाटतं अशी आर्त हाक वरील रचनेतून कवयित्री कविता शिरभाते मांडतात.

        काढी मातीतून मोती 
        अन्नदाता कीर्ती थोर 
         पोट भरतो जगाचे 
         निजे उपाशीच पोर....!!

        शेतकऱ्याचं जगणं काय असतं?  पदराला शंभर गाठी मारून, चटणी भाकरी खाऊन तर कधी उपाशी राहून पोटाला चिमट्या देत काळ्या आईची सेवा करणारा शेतकरीच खरा अन्नदाता आहे. तोच जगाचा पोशिंदा आहे. असा जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या कवयित्री कवयित्री शिरभाते यांच्या आहेत. कवयित्री कविता शिरभाते यांच्या कविता माय मराठीचा गोडवा वाढवणाऱ्या, तर जगण्याचा अर्थ शोधणाऱ्या,तर काही कविता काळ्या आईची सेवा करणाऱ्या, शेतकरी राजाच जगणं सांगणाऱ्या, मतदानाचा हक्क बजावणाऱ्या, माणुसकी जागवणाऱ्या, तर कधी बालपणात हरवणाऱ्या आहेत. गझल सुदृश्य कविता तर अत्यंत वाचनीय होऊन जाणाऱ्या व कवी शब्दांमध्ये जास्त मतितार्थ दर्शवणाऱ्या, मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे असे सांगणाऱ्या, तर कधी माणसाचा शोध घेणाऱ्या, तर कधी मखमली प्रीत कशी फुलते? भेट कशी थेट होते ? अशा प्रेम रसात न्हावून निघणाऱ्या कविता वाचकाला वेड लावल्याशिवाय राहत नाहीत.
          कवयित्री कविता शिरभाते यांच्या विरह, गारवा, पावसाळा, कोप निसर्गाचा, अवकाळी पाऊस, बळीराजा, बैलपोळा, दीप पेटवा मनात, पिंडदान, आई, आला पाऊस भरून, श्वास आईचा, स्त्री जाणीव, जन्मदात्री, गणगोत, जिजाऊ-सावित्री, आई मला वाचव गं, कन्यादान, जगाया निघाली, चिमणी ताई,जगण्यामध्ये हेतू काही अशा कित्येक कविता वाचकांच्या काळजात घर करून राहतात.
         कवयित्री कविता शिरभाते यांच्या जगण्यामध्ये हेतू काही या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण ८५ कविता आहेत.  याची पहिली आवृत्ती १४ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित केली.मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय देखण्या स्वरूपात केले असून प्रस्तावना नीलकृष्ण देशपांडे, यवतमाळ यांनी केली असून पाठराखण भीमराव पांचाळे सर यांनी अगदी सोप्या भाषेत करून दिले आहे. कवयित्री कविता शिरभाते यांच्या सर्वच कविता वाचकांच्या पसंतीस पडतील यात तिळमात्र शंका नाही. कविताताई शिरभाते यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

जगण्यामधले हेतू काही- कवयित्री कविता शिरभाते
 प्रकाशक- परिस पब्लिकेशन पुणे 
मुखपृष्ठ- श्री अरविंद शेलार 
पहिली आवृत्ती- १४ नोव्हेंबर २०२१ 
मूल्य केवळ -150 रुपये 
मोबाईल नंबर ९८३४१३८००१

समीक्षिका /लेखिका
 कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कोकलगाव 
तालुका, जिल्हा -वाशिम

Wednesday, 22 March 2023

http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्ह...

http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्ह...:  *बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे- बालगीतांचा खजिना*     चंद्रपूर जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती जगझाप यां...