Thursday, 3 March 2022

समाजातील भयाण वास्तव रेखाटणारा काव्यसंग्रह म्हणजे बा स्वातंत्र्या

 *समाजातील भयान वास्तव रेखाटणारा काव्यसंग्रह म्हणजे बा स्वातंत्र्या*

       कविता सहजच केली असं होत नाही किंवा कविता शिकवल्याही जात नाही. मुळात कवीच्या अंगी तसा गुण असावा लागतो. प्रतिभा असावी लागते. आपण समाजाचं काही देणं लागतो.या भावनेतून कविता जेव्हा निर्माण होते. तेंव्हा ती ही समाजाला जागृत करणारी ठरते. असेच समाजाचे वास्तव दर्शन घडवणारा, सडेतोडपणे, निर्भीडपणे आपले अनुभव लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणारा नागपूर जिल्ह्यातील कवी शंकर घोरसे यांचा बा स्वतंत्र्या हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.
       आज आपण पाहतो की अनेक लोक प्रेम कविता, काल्पनिक कविता, स्वप्नवेड्या कविता, पाऊस, फुलपाखरू, पशुपक्षी यांच्यावरच्या कविता करतात पण कवी शंकर घोरसे यांच्या कविता सामाजिक वास्तव, सामाजिक अधोगती, जगासमोर दाखवणा-या आहेत. खापरखेडा नागपूर या वीज केंद्रात औष्णिक विद्युत केंद्रात शंकर घोरसे तंत्रज्ञ असून विद्रोही कवी आहेत. अन्याय व अत्याचाराला वाचा फोडणारा, वास्तवतेचे दर्शन घडवणारा काव्यसंग्रह म्हणजे कवी शंकर घोरसे सरांचा बा स्वातंत्र्या.नागपूर जिल्ह्याचे कवी शंकर घोरसे यांचा 'बा स्वातंत्र्या' या काव्यसंग्रहची प्रथमावृत्ती १० मार्च २०१६ रोजी प्रकाशित झाली. प्रकाशक नाथे पब्लिकेशन लिमिटेड यांनी प्रकाशित केले आहे.तर प्रस्तावना राम भोंडे (शांन्तेय) यवतमाळ यांचे लाभली असून पाठराखण महाकवी सुधाकर गायधनी यांनी केली आहे. या काव्यसंग्रहात एकूण ५९ कविता विचार करायला लावणार्‍या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ एकशे पंचवीस रुपये असून सर्वच कविता वाचकांच्या मनाला थेट भिडणा-या आहेत.
     विकास आणि प्रगती या कवितेतून राजकारण्यांचा डाव खेळणारी माणसं आणि त्यांच्या योजना कागदोपत्री दाखवून जनसामान्यांच्या भावनांचा कसा फालुदा केला जातो. याचे भयानक चित्र खालील ओळी वाचून डोळ्यासमोर उभं राहतं.
        
       ‌गाव तसं दारूमुक्त गावात दारूचा थेंबही नाही
       गावाच्या वेशीवर मात्र
       गर्दी कमी होताना दिसत नाही 
       गावात शंभर टक्के दारूबंदी म्हणून
      आपण शपथेला जागून इथली माणसे
      गावात असताना दारूला शिवत नाही...

          गाव विकासाच्या गप्पा कशा कागदोपत्री थयाथया नाचतात हे विकास आणि प्रगती या कवितेतून स्पष्ट होते. गावाच्या सुरुवातीला हागंदरीमुक्त गाव दारूमुक्त गाव असा फलक दर्शनी भागात लावलेला असतो. आणि गावच्या वेशीवर मात्र गर्दी कमी होताना दिसत नाही. गावात शंभर टक्के दारूबंदी आहे. असं मोठ्या दिमाखात गाव सांगत असतं पण हीच लोक दारूबंदीसाठी घेतलेल्या शपथेला जागताना दिसत नाहीत.असे भयान वास्तव फक्त कागदोपत्री चालणाऱ्या योजनांचा खरपूस समाचार वरील कवितेतून कवी शंकर घोरसे यांनी घेतला आहे.

           हुंडा मागणाऱ्या वर पित्याचा
           देणाऱ्या वधूपित्यांचा 
           हुंड्यासाठी छळणार्‍या, अन जाळणाऱ्या
           सासू, सासरे, नणंद, दीरांचा 
          आणखीन एक सत्कार घ्यायचा आहे....

           समाजामध्ये वरवर चांगली दिसणारी पांढरपेशी माणसं यांचे दोन मुखवटे असतात. एक दाखवायचा अन एक लपवायचा. अशी भिन्न चेहेऱ्याची माणसं चारचौघांत गप्पा मारताना, भाषण करताना आम्ही हुंडा घेतला नाही. आणि घेणारही नाही असे मोठ्या दिमाखाने सांगतात आणि तेच लोक लपून-छपून हुंडा घेतात. अशा लोकांचा सत्कार घ्यायचा आहे. पुण्यासाठी चालणाऱ्या सासू-सासरा नंदन दीराचा हे आणखीन एक सत्कार घ्यायचा आहे.संवेदनशील पण विद्रोही मनाचा कवी शंकर घोरसे यांनी लेखणीला शस्त्र करून अन्यायाविरुद्ध, ढोंगीपणा, खोटी आश्वासने,व ढोंगी चेहरे अनेक गुन्हे करून मोकाट  फिरणाऱ्या सज्जन माणसाच्या विकृतीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे.
      ३० जुलै १९९१ ची काळीकुट्ट रात्र, आक्रोश आणि किंकाळ्या कवीचं मन सुन्न करणारा तो वर्धा नदीचा महापूर. ही कविता वाचल्यावर वाचकाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.

          गावाचं गावपण 
          आणि कित्येक संसार
          चाकासहित मोडले
         अगणित सारथी
         यमसदनी धाडले
         भगीरथाचे सामर्थ्य
         कुणातच नव्हतं म्हणून 
         मी हे सारं ऊघड्या
        डोळ्यानी बघत होतो साक्षीदार बनून...!!

       वरील ओळीतून महापुराचे भयान वास्तव आणि त्यांचे मोडून पडलेले संसार, यमसदनी गेलेले अनेक घरांची सारथी. हे सगळं थांबवण्याचा सामर्थ्य कोणातच नव्हतं. म्हणून कवी उघड्या डोळ्यांनी एक साक्षीदार बनून पाहत होतो अशी कविमनाची खंत साक्षीदार या कवितेतून दिसून येते. आर्थिक मंदी कुठे आहे? सध्या डोळ्यांना दिसत नाही आणि लाखो करोडो चे घोटाळे सरता सरत नाही.असं समाजातलं भयान वास्तव कवी शंकर घोरसे यांनी मंदी या कवितेतून जाब विचारला आहे. आज शिकली सवरलेली माणसं गर्भलिंग निदान करून मुलींना जन्मापूर्वीच मारत आहेत अशी खंत ज्योती सावित्री या कवितेतून दिसून येते. माणसाच्या गरजा निसर्गातील ऊर्जा भागवते. सर्वांनी ऊर्जा संवर्धनासाठी झटले पाहिजे.कोळसा,वायू, पेट्रोल, पाणी, जपले पाहिजे असा संदेश द्यायला कवी विसरत नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी ज्या वाड्यात विद्यादानाचे पवित्र कार्य केले त्यावेळी वाड्याची आज झालेली दयनीय अवस्था कवीला अंधार या कवितेतून व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य गुलाम झालं ही कविता अत्यंत वाचनीय व विचार करायला लावणारी आहे.
       दानाचे महत्त्व अगदी समर्पक ओळीतून प्रत्येक दान कस श्रेष्ठ असतो? ते कवी शंकर घोरसे यांनी स्वतःच्या दाना सह सर्वांनी नेत्रदान असो किंवा रक्तदान,अन्नदान, ज्ञानदान, श्रमदान, न्यायदान, देहदान इत्यादी दान करण्यासाठी समाजाला संदेश देण्याचा कवी प्रयत्न करतात. सरकारी कार्यालयातला संपत्तीच्या मोहापायी टेबलाखालून लाच मागणार्‍या अधिकाऱ्यांची तुलना कवी शंकर बोरसे यांनी बेधडक भीकार्‍याशी केली आहे.
       संस्कृती, मेकअप, निवडणूक,दंड,आत्मविश्वास, स्वातंत्र्य,स्त्री, लेखणीची किमया,संधीसाधू, गिधाडे साक्षर झाली,पुरस्कार,पुतळा,निर्भया, भविष्य, सत्कार, विकास आणि प्रगती,वास्तवाचा विस्तव या कविता अत्यंत वाचनीय व दर्जेदार आहेत. प्रत्येक कविता वाचताना डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहत नाहीत. सरळ साधी पण तिखट भाषा असल्याने कवी शंकर घोरसे यांचे शब्द हृदयाच्या पटलावर थेट जाऊन भिडतात. कवी शंकर घोरसे सरांच्या बहुतांशी कविता या मुक्तछंदातल्या असून काही अभंग काव्य प्रकारात मोडणा-या आहेत. मुक्तछंदातल्या कविता लाईटच्या प्रकाशासारखा थेट माणसाच्या डोक्यात प्रकाश टाकणा-या आहेत. 
          'बा स्वातंत्र्या'या कवितासंग्रहातील कविता सामाजिक जाणिवेला हात घालणाऱ्या, स्वातंत्र्य, हक्क, अधिकार सांगणार्‍या, नैतिक मूल्यांची पेरणी करणाऱ्या, मुर्दाड जमिनीवर माणुसकीचा पाऊस पाडणार्‍या, समाजातील स्वैराचार, सरकारी योजनांचा खोटा पाऊस, डुप्लिकेट माणसांची मुखवटे, हुंडाबंदी सारखी देशाला लागलेली कीड, निसर्ग चक्रातून मानवाला दाखवलेला सूकर मार्ग, निवडणूक असे समाजातील भयान वास्तव रेखाटणारा काव्यसंग्रह म्हणजे बा स्वातंत्र्या. नावातच सर्व काही सार्थ झालेलं. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे 'बा स्वातंत्र्या'
           कवी शंकर घोरसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!

समिक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि. प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Monday, 28 February 2022

हे राष्ट्र देवतांचे... देशभक्तीपर गीत

Monday, 21 February 2022

बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे-गंमत जत्रा

 *बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे-गंमत जत्रा*

         लहान मुलांना प्राण्या-पक्ष्यांच्या,बाहुलीच्या, परींच्या, गोष्टी खूप आवडतात. तसेच बालकविताही खूप आवडतात. खेळणी आणि खेळ या गोष्टी तर बालकांचे भावविश्व समृद्ध करणा-या असतात.खेळण्यातल्या बाहुलीला सजवून तिला नवरी बनू पाहणारी उद्याची त्यांची स्वप्ने किंवा खेळण्यातले विमान घेऊन आकाशी उंच भरारी घेण्याचे त्यांचे स्वप्न, कल्पनाशक्ती उद्याची स्वप्न सत्यात उतरण्याची प्रेरणा देत असते हेही तितकेच खरे.
       सोलापूर जिल्ह्यातल्या बालकवयित्री तथा उपक्रमशील शिक्षिका स्मिता आण्‍णासो मुराळी यांचा गंमत जत्रा हा दुसरा बालकवितासंग्रह नुकताच वाचनात आला. लहान मुलांना आवडेल असे नावाला साजेसे दर्जेदार मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी विद्यार्थ्यांनी कितीही हाताळले तरी टिकतील असे लवचिक पृष्ठे आहेत. प्रकाशक शिवांजली स्वामी, निर्मला पब्लिकेशन सोलापूर यांनी प्रकाशित केली असून याची प्रथम आवृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली. या बालकाव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ७५ रुपये असून यातल्या सर्वच कविता बालगोपालांना आवडणाऱ्या, गुणगुणायला लावणाऱ्या आणि प्रत्येक पहिली दुसरीच्या वर्गात आवर्जून शिकवाव्यात अशाच आहेत.
             संवेदनशील मनाची कवयित्री स्मिता मुराळी यांचे विद्यार्थ्यांशी दृढ नाते आहे. त्यांना विद्यार्थ्यांचा चांगलाच लळा आहे. लहान मुलाप्रति गोडी, आदर, प्रेम, जिव्हाळा करूणा,वात्सल्य आहे. जेंव्हा एखादा कवी किंवा कवयित्री छान छान बालकविता लिहिते तेंव्हा समजून जायचं की ही कवयित्री कविता करताना लहान मुला इतकीच लहान होत असते. तेंव्हा त्या कविता, ते भाव तिच्या कागदावर उमटतात.स्मिता मुराळी यांचा बालविश्व हा पहिला काव्यसंग्रह वाचकाच्या खूप पसंतीस उतरला. गंमत जत्रा हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही. कवयित्री स्मिता मुराळी यांनी हा काव्यसंग्रह त्यांच्या आई श्रीमती विमल मुराळी यांच्या चरणी अर्पिला आहे. लहान मुले झोपेत अनेक छान छान स्वप्न पाहतात. ओरडतात,बोलतात हे काही नवीन नाही जहाज सवारी या बाल कवितेमध्ये समुद्राची छानशी सफर मुले स्वप्नात करतात आणि घरी परत येतात.
         लावून एक झाड ही कविता विद्यार्थ्यांना झाडाचे महत्त्व पटवून सांगते.आणि विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे आवाहन करते.

         मुलांनो एक तरी 
         लावली का झाड? 
         उगीच का म्हणता
         ढगा पाऊस पाड?

          झाडांमुळे मिळते 
          शुद्ध स्वच्छ हवा
          मुलांनो एक तरी 
          झाड तुम्ही लावा!

         वरील ओळी बालमनाला  जाऊन भिडणा-या आहेत. बालकांना विचार करायला लावणा-या आहेत. जाब विचारणा-या आहेत. नुसतंच ये रे ये रे पावसा म्हणता त्यापेक्षा तुम्ही कधीतरी एखादं झाड लावले का?  मग उगीच ढगाला पाऊस पाड म्हणता? असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. झाडांमुळे मानवाला शुद्ध, स्वच्छ, हवा मिळते.शरीर निरोगी राहते. त्यासाठी मुलांनो तुम्ही एक तरी झाड लावा अशा सूचना वरील ओळीतून लक्षात येतात. बालपणी लहान मुलांना आई घास भरवताना चिऊच्या, कावळ्यांच्या, प्राण्यांच्या, फळांच्या, फुलांच्या, कविता, गाणी, गोष्टी, गप्पा सांगत असते. आणि अशाच गप्पा गाणी गोष्टी मुलांना आवडतात. मोबाईलचा अतिवापर चिऊताईचे जीवनमान, आयुष्य कमी करत चालले आहे. मोबाईल चे दुष्परिणाम ही बालकांना चिऊताई या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न कवयित्रींने केला आहे. आज आपण पाहतो मोबाईलच्या आभासी दुनियेत विद्यार्थ्यांचा हसणं, खेळणं, बालपण हिरावून घेतले आहे.बालकांना वेगवेगळे छंद जोपासावे म्हणून कवयित्री स्मिता मुराळी यांनी कवितेतून छान प्रकारे व्यक्त झाल्या आहेत.

            स्वतःसाठी काढू
            थोडा तरी वेळ
            सवडीने खेळू 
            आवडता खेळ

            हल्ली लहान मुले मैदानावर खेळताना दिसत नाहीत. कारण त्यांच्या हातातुन मोबाईल सुटत नाही. स्वतःला मैदानी खेळ खेळण्यासाठी वेळ नाही.पण खेळ खेळायचा म्हणल्यास आवडीच्या खेळासाठी जरूर वेळ काढायला हवा.वरील ओळी शिकवून जातात. छंद जोपासल्यामुळे तुमचा कंटाळा निघून जाईल. तुम्हाला विरंगुळा पण मिळेल. जपूया छंद या कवितेतून कवयित्री बालकांना नाणी,नोटांचा संग्रह करण्यासाठी प्रेरित करतात. तसेच मैदानी खेळ, गडकिल्ले महाराष्ट्राचे दैवत आहेत. ते पहात जा आणि घाट माथ्यावर जाऊन मोकळा श्वास घ्या मोकळ्या गळ्याने मनसोक्त गा असे कवयित्री आवर्जून सांगते.

               पुस्तक वाटतात
               जिवलग मित्र 
               गाणी, गप्पा, गोष्टी
               रंगतदार चित्र 

                मित्र हा आपला 
                वाटतो ज्ञान 
                संगत याची 
                मिटवते अज्ञान.

            पुस्तकासारखा दुसरा खरा मित्र नाही. पुस्तकांनी कित्येकांचे आयुष्य घडवले आहे. पुस्तकच जिवलग मित्र आहेत. पहिले पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकात अनेक रंगतदार चित्र सुद्धा आहेत. पुस्तक हा मित्र सर्वांना ज्ञान वाटतो. जो कोणी पुस्तकाशी संगत धरतो त्यांचे अज्ञान आपोआप मिटते. अशी भावना नाजूक, कोमल मनाच्या कवयित्री स्मिता मुराळींना वाटते. जुळ्या बहिणींची गंमत, अगडबंब चिंगी, प्राण्यांचे शिबीर, वेडा आंबा अशा विनोदी कविता बालकांना आवडल्या शिवाय राहणार नाहीत. त्याच बरोबर लहान विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ होण्याची स्वप्न पेरणा-या कविता बालमनावर कोरली जाते. विज्ञानाचे कुतूहल या कवितेमधून हळूच घडल्याशिवाय राहत नाही. यासारख्या कविता विद्यार्थ्यांना खूप आवडतील अशाच आहेत. अगदी लहान मुलांनाही समजेल अशी साधी सरळ, सोपी भाषा असल्यामुळे आणि प्रत्येक कवितेला अनुसरून चित्र असल्यामुळे बालकवितासंग्रह अधिक उत्कृष्ट बनला आहे. बालवयामध्ये विद्यार्थ्यांना जादूचं खूप आकर्षण असतं. जादुई पेन या कवितेतून पेनातील शाई कधीच संपू नये असं विद्यार्थ्यांना वाटतं. हिरवा डोंगर, बळी पिकवितो मोती, बियाणं, आली थंडी, बोलणारे झाड, सूर्य, नदी इत्यादी निसर्गाविषयीच्या कविता निसर्गप्रेमी बनवायला मदत करतात. निसर्गाविषयीची गोडी निर्माण करणाऱ्या आहेत.
         बळी पिकवितो मोती या कवितेतून कवयित्री शेतकर्‍याबद्दलचे प्रेम, त्यांचे कष्ट, मेहनत, बैलजोडीची साथ इत्यादीचे महत्त्व विशद करते. त्याच बरोबर बालमनावर शेतकऱ्याबद्दल आदर, शेतीमालाला भाव,पीक काढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, कष्टाची जाणीव कवितेच्या माध्यमातून स्मिता मुराळी  व्यक्त करतात. मायेची सावली या कवितेतून कुटुंबाचा आधारस्तंभ बाप असतो. तर मायेची सावली देणारी आई असते. आई-वडील दोघेही रात्रंदिवस मुलंबाळासाठी कष्ट उपसतात. ही जाणीव कवितेच्या माध्यमातून बालमनावर बाल कवयित्री स्मिता मुरळी बाल संस्कार करण्याचा प्रयत्न करतात.
      आज पर्यंत एकवीसाव्या शतकात  बालसाहित्य जेवढ्या प्रमाणात प्रकाशित व्हायला हवे होते, तेवढ्या प्रमाणात ते झाले नाही. बालसाहित्य तयार करणे साधे काम नाही. त्याची परिणामकारकता बालमन घडवत असते. अशा छान छान गोष्टी, कथा, कविता, बालमनावर संस्कार करीत असतात.
         कवयित्री स्मिता मुराळी यांच्या गंमत जत्रा या बालसाहित्याची पाठराखण ज्येष्ठ लेखक बबन शिंदे यांनी केली असून यात एकूण ४० बालकविता बाल दोस्तांना गुणगुणायला लावणा-या आहेत.
     कवयित्री स्मिता मुराळी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

  समिक्षिका /लेखिका /शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
 जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 16 February 2022

मानवी मनाचा तळ शोधणारा काव्यसंग्रह म्हणजे आरसा गमावलेली माणसं

 *मानवी मनाचा तळ शोधणारा काव्यसंग्रह म्हणजे आरसा गमावलेली माणसं*

      आज प्रत्येकजण मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. मी त्याच्यापेक्षा चांगला. माझाच मोठा बंगला. माझाच मुलगा चांगला. असा खोटा आभास निर्माण करण्याच्या मागे लागला आहे. माणसाच्या अस्तित्वापेक्षा जेव्हा आभास मोठा वाटायला लागतो. तेंव्हा माणूस स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो. अशी अस्तित्व विसरलेली माणसं मग स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहायला तयार नसतात अशाच विचारसरणीला साहित्यातून आरसा दाखवण्याचे काम अहमदनगर जिल्ह्यातील कवयित्री विद्या प्रकारच्या जाधव यांनी केले आहे.
      अहमदनगर जिल्ह्यातील कवयित्री विद्या प्रकाश जाधव (वीप्रजा) यांचा पहिलाच काव्यसंग्रह म्हणजे आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती १फेब्रुवारी २०२१रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी नावाला साजेसे अतिशय सुंदर चित्र रेखाटले आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना व पाठराखण ज्येष्ठ कवी गीतकार हनुमंत चांदगुडे सरांची लाभली आहे. तसेच या काव्यसंग्रहात एकूण 77 कविता असून मूल्य केवळ दीडशे रुपये आहे यातल्या सर्वच कविता वाचकाच्या मनाचा तळ शोधणा-या आहेत आणि माणसाला भेटली रूप. आरशातील प्रतिबिंब या प्रमाणे स्वच्छ दाखवणा-या आहेत.

         भेगाळल्या भूमीच्या या 
         कशा भेगाळल्या भेगा 
         फाटलेल्या नशिबाच्या 
         सांगा कशा शिवू रेघा.....!!

     शेतकरी, कष्टकरी रात्रंदिवस शेतात कष्ट उपसतो. काळ्याआईची सेवा करतो म्हणून शेतकर्‍याला अख्या जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतकरी आहे म्हणून जग आहे. त्याच्यामुळे सर्वांना धनधान्य व पोटभर खायला मिळते पण शेतकऱ्याचे जीवन म्हणजे अनेक वादळं, संकट झेलणार , अत्यंत हलाखीचे जीवन शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो. मरमर करतो.आपल्या हाडाची काडं करून धान्य पिकवतो आणि ऐन वेळी पाऊस दगा देतो. वादळ अति अतिवर्षण, रोगराई इत्यादी गोष्टींनी शेतकरी हवालदिल होतो भेगाळल्या जमीनीत अपार मेहनत करतो फाटलेल्या नशिबाच्या सांगा कशा शिवू रेघा  म्हणून कवयित्रीने शेतकऱ्यांची होणारी ससेहोलपट वरील गोळीतून विशद केले आहे.

          पाकळीत जपलेला सुगंध 
          फुलातून उडून गेला
          जन्मदात्या काळजाचा तुकडा 
          आश्रमात सोडून गेला....!

          मुलं लहान असताना आई-वडिलांवर त्यांचा खूप जीव असतो. बालपणी जगातली सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे आई वडीलच असतात. आणि एकदा का मुलं मोठी झाली की त्यांच्या पंखात बळ येतं आणि अचानक उडून जातात. मुलाचे स्वतःचे लग्न झालं की हळूहळू मुलांना आई-वडील नकोसे वाटायला लागतात.आणि एक दिवस मुलगाच आई-वडिलांच्या काळजाचा तुकडा असून त्यांना आश्रमात सोडून येतो. असे भयाण वास्तव वरील ओळीतून चित्रित करणाऱ्या या ओळी वाचकांच्या मनाचा ठाव घेतात.

        प्रेमावर निस्वार्थ होते मी 
       तुझ्यासाठी घार होते मी
       बेड्या टाकुनी पायात माझ्या 
       केलस ठार मला तू 
       कारण तू तर वासनेचा बळी...!!

       
      आजच्या काळात निस्वार्थी प्रेम मिळणे  फारच कठीण होत चालले आहे. पण कवयित्री विद्या जाधव यांनी निस्वार्थी प्रेम व प्रेमासाठी वाट्टेल ते सहन करण्याची तयारी दाखवली,  स्त्रीजातीला अनेक बंधने लादली जातात. जगताना मन मारून अनेक वेळा स्त्री जगत असते कारण नरदेह तर वासनेचा बळी असतो.अशी खंत वरील होळीतून कवयित्रींनी व्यक्त केली आहे

        शाब्दिक खेळ खेळला माझ्याशी 
        नको नको म्हणता लढलास माझ्याशी

        विषारी तुझ्या जीव्हेने केला घात 
        वेदनेचे घरे पडले हृदयाच्या आत...!!

           संशयासारखे दुसरे विश नाही. संशय हा कॅन्सरपेक्षाही भयंकर असतो. ज्याच्या सुखी संसारात संशय आला की सुखी संसार पार विस्कळित होऊन जातो. साधे संशयाची जरी पाल चुकचुकली तर पती-पत्नीमध्ये अति भांडण कधी लयाला जातात आणि क्षणात घटस्फोटावर प्रकरण येतं हे कळत सुद्धा नाही. सापाच्या विषापेक्षाही जिभेने  दिलेली जिव्हारे घात पार माणसांच्या पार हृदयावर अनेक वार करून तुकडे-तुकडे करून टाकतात म्हणून बोलताना विचार करून बोलावे असे वरील ओळीतून कवयित्री सांगण्याचा प्रयत्न करते आहे.
           कवयित्री विद्या जाधव यांना सामाजिक भान, कर्तव्याची जाण, समाजाचे वास्तव, निसर्गाशी लढा, प्रेमभाव, संवेदनशीलता, स्त्रीमनाची घालमेल,स्त्री-स्वातंत्र्य, मैत्रीभाव, प्रेम, शेतकऱ्याविषयी कळकळ, गरिबांची जाणीव इतरांचे दुःख या सार्‍या गोष्टी  प्रकाश टाकणा-या कविता मनाला खूपच भावते 'नुसतेच कविता लिहिणं'ही कविता वाचकाच्या मनात घर केल्याशिवाय राहत नाही. कवयित्री( विप्रजा) यांचा माणूसपण, कर्माची मशाल, बापाची आठवण, न समजलेली आई,रंग जीवनाचे, विचार मंथन, कर्तव्य बजावणार, संशय, माणसं अशीच असतात, तू तर वासनेचा बळी , स्त्री जन्मा तुझी कहाणी , गर्भ कळी आणि आरसा गमावलेली माणसं अशा अनेक कविता अत्यंत वाचनीय व अर्थ गर्भित आहेत.
      आरसा गमावलेली माणसं या काव्यसंग्रहात एकूण 77 कविता असून बांधणी अतिशय उत्कृष्ट आहे. माणसाला माणसाचे खरे रूप दाखवणारा हा काव्यसंग्रह प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच आहे. या काव्यसंग्रहातील सर्वच रचना जरी साध्या-सोप्या असल्या तरी त्यामध्ये असलेल्या भावार्थ अगदी खराखुरा, प्रेमळ आहे हे दिसून येते कवयित्री विद्या प्रकाश जाधव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परि.प्राथमिक.शाळा. कोकलगाव 
ता. जि. वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 11 February 2022

मिनाक्षी नागराळे राज्यस्तरीय माता रमाई पुरस्काराने सन्मानित

*वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय माता रमाई पुरस्काराने सन्मानित*

     वाशिमच्या मिनाक्षी पांडुरंग नागराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील उपक्रमशील शिक्षिका यांना सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना दिनांक ७ फेब्रुवारी रोजी वाशिम येथील स्थानिक अकोला नाका, भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेज, नागार्जुन बौद्ध अल्पसंख्यांक बहु सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने राज्यस्तरीय त्यागमूर्ती माता रमाई पुरस्कार- २०२२ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये राज्यस्तरीय माता रमाई पुरस्कार, संविधानाची उद्देशिका व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालविकास कार्यालयाचे तालुका संरक्षण अधिकारी मा.धनगर साहेब, विशेष अतिथी पंचायत समिती सभापती सौ रेश्माताई योगीराज गायकवाड तर मुख्य अतिथी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त निलेश सोमानी, आकाशवाणी पत्रकार सुनील कांबळे, मुकनायक अध्यक्ष राजीव दारोकार, अशासकीय सदस्य सामाजिक वनीकरण विभाग वैशालीताई खोब्रागडे, पत्रकार संदीप डोंगरे,कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष सोनाजी इंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांना त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याबद्दल माता रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात माता रमाई यांचा फार मोठा वाटा आहे.माता रमाई यांचे संपूर्ण आयुष्य संघर्ष व त्यागांनी भरले होते. त्याच प्रमाणे अनेक स्त्रिया आयुष्य जगत असताना संघर्ष व त्यागामुळे जीवन जगत आपल्या कुटुंबाची धुरा सांभाळत कुटुंब घडविले आहे. अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संघर्षशील महिला वैशालीताई खोब्रागडे, शकुंतला गायकवाड, उषा संतोष भालेराव, शीलाताई गडेकर, मीनाक्षीताई नागराळे, इंदू पट्टेबहादूर, कुसुमताई सोनवणे अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजरत्न संस्थेचे अध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, प्रास्ताविक पी.एस. खंदारे तर आभार भारत व्होकेशनल ट्रेनिंग कॉलेजचे संचालक यशपाणी कंकाळ यांनी मानले.
        मिनाक्षी नागराळे यांनी परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करून स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन आपल्या जिद्दीच्या जोरावर जगत आहेत.त्यामागे त्यांचा प्रामाणिकपणा त्याग व समर्पण आणि विद्यार्थ्याप्रति असणारी निष्ठा यामुळे त्यांना आज पर्यंत पस्तिशीच्या वर राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल मिनाक्षी नागराळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.