कविता सहजच केली असं होत नाही किंवा कविता शिकवल्याही जात नाही. मुळात कवीच्या अंगी तसा गुण असावा लागतो. प्रतिभा असावी लागते. आपण समाजाचं काही देणं लागतो.या भावनेतून कविता जेव्हा निर्माण होते. तेंव्हा ती ही समाजाला जागृत करणारी ठरते. असेच समाजाचे वास्तव दर्शन घडवणारा, सडेतोडपणे, निर्भीडपणे आपले अनुभव लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणारा नागपूर जिल्ह्यातील कवी शंकर घोरसे यांचा बा स्वतंत्र्या हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला.
आज आपण पाहतो की अनेक लोक प्रेम कविता, काल्पनिक कविता, स्वप्नवेड्या कविता, पाऊस, फुलपाखरू, पशुपक्षी यांच्यावरच्या कविता करतात पण कवी शंकर घोरसे यांच्या कविता सामाजिक वास्तव, सामाजिक अधोगती, जगासमोर दाखवणा-या आहेत. खापरखेडा नागपूर या वीज केंद्रात औष्णिक विद्युत केंद्रात शंकर घोरसे तंत्रज्ञ असून विद्रोही कवी आहेत. अन्याय व अत्याचाराला वाचा फोडणारा, वास्तवतेचे दर्शन घडवणारा काव्यसंग्रह म्हणजे कवी शंकर घोरसे सरांचा बा स्वातंत्र्या.नागपूर जिल्ह्याचे कवी शंकर घोरसे यांचा 'बा स्वातंत्र्या' या काव्यसंग्रहची प्रथमावृत्ती १० मार्च २०१६ रोजी प्रकाशित झाली. प्रकाशक नाथे पब्लिकेशन लिमिटेड यांनी प्रकाशित केले आहे.तर प्रस्तावना राम भोंडे (शांन्तेय) यवतमाळ यांचे लाभली असून पाठराखण महाकवी सुधाकर गायधनी यांनी केली आहे. या काव्यसंग्रहात एकूण ५९ कविता विचार करायला लावणार्या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ एकशे पंचवीस रुपये असून सर्वच कविता वाचकांच्या मनाला थेट भिडणा-या आहेत.
विकास आणि प्रगती या कवितेतून राजकारण्यांचा डाव खेळणारी माणसं आणि त्यांच्या योजना कागदोपत्री दाखवून जनसामान्यांच्या भावनांचा कसा फालुदा केला जातो. याचे भयानक चित्र खालील ओळी वाचून डोळ्यासमोर उभं राहतं.
गाव तसं दारूमुक्त गावात दारूचा थेंबही नाही
गावाच्या वेशीवर मात्र
गर्दी कमी होताना दिसत नाही
गावात शंभर टक्के दारूबंदी म्हणून
आपण शपथेला जागून इथली माणसे
गावात असताना दारूला शिवत नाही...
गाव विकासाच्या गप्पा कशा कागदोपत्री थयाथया नाचतात हे विकास आणि प्रगती या कवितेतून स्पष्ट होते. गावाच्या सुरुवातीला हागंदरीमुक्त गाव दारूमुक्त गाव असा फलक दर्शनी भागात लावलेला असतो. आणि गावच्या वेशीवर मात्र गर्दी कमी होताना दिसत नाही. गावात शंभर टक्के दारूबंदी आहे. असं मोठ्या दिमाखात गाव सांगत असतं पण हीच लोक दारूबंदीसाठी घेतलेल्या शपथेला जागताना दिसत नाहीत.असे भयान वास्तव फक्त कागदोपत्री चालणाऱ्या योजनांचा खरपूस समाचार वरील कवितेतून कवी शंकर घोरसे यांनी घेतला आहे.
हुंडा मागणाऱ्या वर पित्याचा
देणाऱ्या वधूपित्यांचा
हुंड्यासाठी छळणार्या, अन जाळणाऱ्या
सासू, सासरे, नणंद, दीरांचा
आणखीन एक सत्कार घ्यायचा आहे....
समाजामध्ये वरवर चांगली दिसणारी पांढरपेशी माणसं यांचे दोन मुखवटे असतात. एक दाखवायचा अन एक लपवायचा. अशी भिन्न चेहेऱ्याची माणसं चारचौघांत गप्पा मारताना, भाषण करताना आम्ही हुंडा घेतला नाही. आणि घेणारही नाही असे मोठ्या दिमाखाने सांगतात आणि तेच लोक लपून-छपून हुंडा घेतात. अशा लोकांचा सत्कार घ्यायचा आहे. पुण्यासाठी चालणाऱ्या सासू-सासरा नंदन दीराचा हे आणखीन एक सत्कार घ्यायचा आहे.संवेदनशील पण विद्रोही मनाचा कवी शंकर घोरसे यांनी लेखणीला शस्त्र करून अन्यायाविरुद्ध, ढोंगीपणा, खोटी आश्वासने,व ढोंगी चेहरे अनेक गुन्हे करून मोकाट फिरणाऱ्या सज्जन माणसाच्या विकृतीवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला आहे.
३० जुलै १९९१ ची काळीकुट्ट रात्र, आक्रोश आणि किंकाळ्या कवीचं मन सुन्न करणारा तो वर्धा नदीचा महापूर. ही कविता वाचल्यावर वाचकाच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
गावाचं गावपण
आणि कित्येक संसार
चाकासहित मोडले
अगणित सारथी
यमसदनी धाडले
भगीरथाचे सामर्थ्य
कुणातच नव्हतं म्हणून
मी हे सारं ऊघड्या
डोळ्यानी बघत होतो साक्षीदार बनून...!!
वरील ओळीतून महापुराचे भयान वास्तव आणि त्यांचे मोडून पडलेले संसार, यमसदनी गेलेले अनेक घरांची सारथी. हे सगळं थांबवण्याचा सामर्थ्य कोणातच नव्हतं. म्हणून कवी उघड्या डोळ्यांनी एक साक्षीदार बनून पाहत होतो अशी कविमनाची खंत साक्षीदार या कवितेतून दिसून येते. आर्थिक मंदी कुठे आहे? सध्या डोळ्यांना दिसत नाही आणि लाखो करोडो चे घोटाळे सरता सरत नाही.असं समाजातलं भयान वास्तव कवी शंकर घोरसे यांनी मंदी या कवितेतून जाब विचारला आहे. आज शिकली सवरलेली माणसं गर्भलिंग निदान करून मुलींना जन्मापूर्वीच मारत आहेत अशी खंत ज्योती सावित्री या कवितेतून दिसून येते. माणसाच्या गरजा निसर्गातील ऊर्जा भागवते. सर्वांनी ऊर्जा संवर्धनासाठी झटले पाहिजे.कोळसा,वायू, पेट्रोल, पाणी, जपले पाहिजे असा संदेश द्यायला कवी विसरत नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांनी ज्या वाड्यात विद्यादानाचे पवित्र कार्य केले त्यावेळी वाड्याची आज झालेली दयनीय अवस्था कवीला अंधार या कवितेतून व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य गुलाम झालं ही कविता अत्यंत वाचनीय व विचार करायला लावणारी आहे.
दानाचे महत्त्व अगदी समर्पक ओळीतून प्रत्येक दान कस श्रेष्ठ असतो? ते कवी शंकर घोरसे यांनी स्वतःच्या दाना सह सर्वांनी नेत्रदान असो किंवा रक्तदान,अन्नदान, ज्ञानदान, श्रमदान, न्यायदान, देहदान इत्यादी दान करण्यासाठी समाजाला संदेश देण्याचा कवी प्रयत्न करतात. सरकारी कार्यालयातला संपत्तीच्या मोहापायी टेबलाखालून लाच मागणार्या अधिकाऱ्यांची तुलना कवी शंकर बोरसे यांनी बेधडक भीकार्याशी केली आहे.
संस्कृती, मेकअप, निवडणूक,दंड,आत्मविश्वास, स्वातंत्र्य,स्त्री, लेखणीची किमया,संधीसाधू, गिधाडे साक्षर झाली,पुरस्कार,पुतळा,निर्भया, भविष्य, सत्कार, विकास आणि प्रगती,वास्तवाचा विस्तव या कविता अत्यंत वाचनीय व दर्जेदार आहेत. प्रत्येक कविता वाचताना डोक्यात मुंग्या आल्याशिवाय राहत नाहीत. सरळ साधी पण तिखट भाषा असल्याने कवी शंकर घोरसे यांचे शब्द हृदयाच्या पटलावर थेट जाऊन भिडतात. कवी शंकर घोरसे सरांच्या बहुतांशी कविता या मुक्तछंदातल्या असून काही अभंग काव्य प्रकारात मोडणा-या आहेत. मुक्तछंदातल्या कविता लाईटच्या प्रकाशासारखा थेट माणसाच्या डोक्यात प्रकाश टाकणा-या आहेत.
'बा स्वातंत्र्या'या कवितासंग्रहातील कविता सामाजिक जाणिवेला हात घालणाऱ्या, स्वातंत्र्य, हक्क, अधिकार सांगणार्या, नैतिक मूल्यांची पेरणी करणाऱ्या, मुर्दाड जमिनीवर माणुसकीचा पाऊस पाडणार्या, समाजातील स्वैराचार, सरकारी योजनांचा खोटा पाऊस, डुप्लिकेट माणसांची मुखवटे, हुंडाबंदी सारखी देशाला लागलेली कीड, निसर्ग चक्रातून मानवाला दाखवलेला सूकर मार्ग, निवडणूक असे समाजातील भयान वास्तव रेखाटणारा काव्यसंग्रह म्हणजे बा स्वातंत्र्या. नावातच सर्व काही सार्थ झालेलं. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे 'बा स्वातंत्र्या'
कवी शंकर घोरसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
समिक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.परि. प्राथमिक शाळा कोकलगाव
ता. जि.वाशिम