ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म वाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलां नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.
सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
१ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.
शिका शिका रे विद्या शिका
मनूचे काही ऐकू नका !
कोणी मागे राहू नका
विद्या शिकूया ज्ञान घेऊया
एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!
या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.
फुले असूनी काटे वेचिले
घेतला शिक्षणाचा ध्यास
तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!चे
सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या.
धोंडे मुले देती| नवसा पावती|
लग्न का करती | नारी नर ||
दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
तुझ्या कार्याचा वेलू
मी गगनाला नेईन
तुझ्या विचारांचे गुट्टी
मी विद्यार्थ्यांना देईन
तुझ्या कार्याची भाऊ
किती गाऊ गौरवगाथा
धन्य धन्य ती साऊ
तुझचरणी विनम्र माझा माथा...!!
जय ज्योती....
जय क्रांती....
जय सावित्रीमाई....!!
*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७