Saturday, 28 November 2020

तरूणांवर शिवसंस्कार पेरून आदर्श बनवणारा प्रेरणादायी काव्यसंग्रह म्हणजे - शिवगर्जना

 *तरुणांवर शिवसंस्कार पेरून आदर्श बनवणारा प्रेरणादायी काव्यसंग्रह म्हणजे - शिवगर्जना*

         मराठी तरुणांच्या मेंदूत शिव संस्कार पेरून त्यांना आदर्श बनवणारा प्रेरणादायी काव्यसंग्रह म्हणजे -शिवगर्जना हा शिवकवी- ईश्वर मते सरांचा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. शिव कवी ईश्वर मते हे मुळातच एक सैनिक शिवरायांच्या विचारांचा पाईक असलेला सच्चा दिलाचा देशभक्त कवी... केंद्रीय पोलिस दलात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत,पण वाचनाची अत्यंत आवड असल्यामुळे आणि देशभक्ती, गझल, शिव कविता आणि विद्रोह हा जणू त्यांच्या रक्ता रक्तात भिनला आहे.थोर इतिहास संशोधक मा.म. देशमुख, डॉ. आ.ह.साळुंके सर,या.अॅड. पुरूषोत्तम खेडेकर साहेब,मा.अशोक राणा, डॉ.जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला हा कवी आहे.
            शिवगर्जना या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब शिवरायांना परकीय सत्ता उखडून टाकण्यासाठी एक एक गड काबीज करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी, शिवरायांना प्रेरित करणारे चित्र आहे.मावळ्यांसह गडावरचे सुंदर चित्र त्यावर ढाल-तलवार ,ढालीवर स्वराज्याचा सिंह म्हणजे छत्रपती शिवराय अख्ख्या जगाला शूरवीर म्हणून विश्ववंदनीय असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय देखणे असे मुखपृष्ठ असून बघताक्षणीच वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे असेच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पंचफुला प्रकाशन औरंगाबाद चे डॉ. बालाजी जाधव सर यांनी केले आहे. तर याची प्रथम आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१५ रोजी शिवजन्म उत्सवाच्या दिवशी प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाची किंमत फक्त ७० रुपये आहे,पण त्यातल्या कविता या दशलाखमोलाच्या आहेत. प्रत्येक घरातल्या लहान बालकापासून ते तरुणांपर्यंत जर हा काव्यसंग्रह वाचला तर त्याचा मन मेंदू आणि मस्तक जगातल्या कोणत्याच स्त्री कडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. ना इतरांनाही वाईट नजरेने बघू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही, गुलामगिरी सहन करणार नाही. अशी शिवविचारांचे गुट्टि( बाळकडू) या काव्यसंग्रह मध्ये दिली आहे. खेड्यात राहणाऱ्या शिवकवि ईश्वर मते यांच्यावर संत तुकोबारायांच्या अभंगाचा प्रभाव पडला आणि त्यातूनच शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची रुजवणूक झाली. त्यांनी खूप मोलाचे साथ देणारे शिवश्री संतोषदादा गव्हाणे पाटील व त्यांना कौतुकाची थाप देणारे त्यांचे मित्र शिवश्री नारायण प्रल्हाद काळबांडे कोकलगाव तसेच शिवश्री संदीप गोटे सर तोंडगाव यांची साथ मिळाली.
     
       देशरक्षण्या समर्थ आम्ही 
       विजयाचा एक अर्थ आम्ही 
       शिवनिष्ठेचे बळ आम्हांला
       रणांगणावर शर्थ आम्ही 
       जग अवघे अदबीने झुकते 
        शान अशी शिवतख्ताची
        इतिहासाला माहित आहे 
        धमक मराठी रक्ताची....!!

                 गुलामगिरीच्या शृंखला तोडून मोगलशाही, पातशाही, निजामशाही,आदिलशाहीला गाडून रयतेचे समतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा व त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या प्राणप्रिय मावळ्यांचा जाज्वल्य इतिहास जगाला ठाऊक आहे. आजही आम्ही मावळे आजच्या काळातले शूर सैनिक तुमचा आदर्श मनात ठेवून सीमेवर रक्षण करतो.तुमच्या शिव निष्ठेचे बळ आज आम्हाला पुरेसे आहे.प्राण गेला तरी हरकत नाही पण आम्ही डगमगणार नाही. रणांगणावर जीवाची बाजी लावून आजही अवघे जग आम्हा भारतीयांना पुढे अदबीने झुकते. अशी शान माझ्या शिवरायांच्या शिवतख्ताची आहे.हे इतिहासालाही ही माहित आहे आणि जगाला ही माहित आहे.अशी धमक आमच्या मराठी रक्ताची अशी शिवगर्जना आपल्या काव्यातून करणारा करणारा शिवकवि हा फक्त कवी नसून तो एक सच्चा दिलाचा शिवरायांचा मावळा आजच्या काळातील देशाचे रक्षण करणारा सैनिक आहे.

            विषमतेच्या बुरुजाला सुरुंग लावणारी
            मेंदू मधल्या मनुवादाला खिंडार पाडणारी
          आम्ही गर्जना शिवगर्जना, शिवगर्जना, शिवगर्जना...

               विषमतेच्या बुरुजाला सुरुंग लावून फोडून टाकू इथल्या प्रत्येक मेंदू मधल्या मनुवादाला खिंडार पाडून मनुवाद संपवून टाकण्यासाठी मन आणि मेंदूतील घाण बाजूला सारण्यासाठी मी शिवगर्जना करीत आहे. असे कवी म्हणतो.

           ऊठ मर्दा धरतीच्या पुता लेखणीची तलवार कर
           शिवशाहीचा वारसा रयतेचा तू उद्धार कर...!!
            दुःख मुक्तीचा पथ ज्ञानाचा 
           सत्यशोधक आणि विज्ञानाचा 
           भटगिरी बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर प्रहार कर..
           उठ मर्दा धरतीच्या पुता लेखणीची तलवार कर
           शिवशाहीचा वारसा रयतेचा तू उध्दार कर...!!

              आजच्या तरुण मावळ्यांना कवी ऊठ मर्दा या धरतीच्या पुता म्हणजेच या धर्तीच्या लेकरा उठ तुझ्या हातातल्या लेखणीला तू तलवार कर. आज प्रत्यक्ष तलवार घेऊन लढायचे नाही. तर तुझ्या हातातल्या लेखणीने अन्यायावर वार कर. तुला शिवशाहीचा वारसा आहे. तुलाच रयतेचे रक्षण करायचे आहे. तूच रयतेचा रक्षण करू शकतोस असे आव्हान आपल्या तरुणांना करीत आहेत. इतकेच नाही तर तुला जीवनात दुःख मुक्त व्हायचे असेल तर ज्ञानाचा मार्ग स्वीकार. ज्ञानाच्या प्रकाशाने अंधकारमय जीवन नष्ट कर.तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो त्यासाठी तुला सत्यशोधक वृत्तीचा आणि विज्ञानाचा स्वीकार कर. भटगिरी बुवाबाजी लाथाडून टाक. त्याची मूठमाती कर आणि अंधश्रद्धा जाळून टाक तेव्हाच तू पुढे जाशील असे वैचारिक बाळकडू पिलेला कवी तरुणांना म्हणतो.
 
               कसे घडले कसे लढले स्वराज्याचे शिखर चढले
               प्रेरणा जिजाऊ स्वातंत्र्याची मावळे वादळासही भिडले
           चारही दिशांना गणीम चार ते 
             कष्टकरी लाचार होते
             कुण्याही बळीचा आधार नव्हता 
             शिव कुळाचे उघडे एकच द्वार होते 
             जिजाऊंचा छायेत शिवबा संगे मावळे वाढले
             प्रेरणा जिजाऊ स्वातंत्र्याची मावळे वादळासही  भिडले....!!

         गुलामगिरीच्या बेड्या संपविण्यासाठी राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी बाल शिवबाला अगदी बालपणापासूनच युद्धनीतीचे धडे दिले. शस्त्रे चालवण्याची कला अवगत करण्यासाठी जिजाऊंने स्वतः हातात तलवार घेऊन तलवारबाजी करणे, भालाफेक करणे,पळत्या  घोड्यावर बसणे, झाडावर चढणे अशा अनेक गोष्टींचे शिक्षण बालपणीच दिले गेले. छत्रपती शिवाजी महाराज बालपणापासूनच खोऱ्यातल्या सवंगड्यांसह स्वराज्याची प्रतिज्ञा करीत आणि स्वातंत्र्याची ज्वाला प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयी उसळत होती. त्यासाठी स्वराज्याचा भक्कम पाया आधार राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची प्रेरणा होती.त्याकाळात सर्वत्र परकिय स्त्रियांचा अन्याय माजलेला होता. हे जिजाऊ माँसाहेबांनी ओळखून स्वराज्याची ज्योत पेटवली.चारही बाजूंना गनिमांचा अन्याय वाढला होता. कष्टकरी जनता, रयत लाचार होती. रयतेला कोणाचा आधार नव्हता. फक्त शिव कुळाचे एकच द्वार दिसत होते. रयतेचे हाल जिजाऊंना पाहवत नव्हते. म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी गनिमांना संपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सिंहाला जन्म दिला. आणि रयतेच्या सुखासाठी लोककल्याणकारी राज्य निर्मितीचे स्वप्न बघितले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वप्न पूर्ण केले छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई न हरता आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वराज्याचे रक्षण केले. असा जाज्वल्य इतिहास कवीच्या शब्दांशब्दांतून घुमतो आहे.
         मावळ्यांची पोर, प्रतापगडाच्या पायथ्याशी, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाले,रामशेजचा पराक्रम अशा अनेक मावळ्यांच्या शौर्याची गाथा आपल्या कवितेतून तरुणांसमोर ठेवणारा हा तीस-पस्तीशीतला हा तरूण आपल्या लेखणीच्या माध्यमातून तरुणांना जागा करतो आहे. माझा जन्मच परिवर्तनासाठी झाला आहे. शिवचरित्र हे एक औषध आहे. तो प्रत्येकाने प्यायलाच हवे. शाहु, फुले, आंबेडकरांचे आपण वारसदार आहोत.क्रांतीविना आमचे जगणेच काय? अशा परखड शब्दांच्या माध्यमातून कवी व्यक्त होतो.

         लाथ मारा मनुवादाला काय आवकता भोंदूत
         शिवरायांच्या मावळ्यांनो शिवतत्त्व होता मेंदूत...!!

     या वरील ओळीत मनुवादाला लाथ मारून गाढून टाका. बुवाबाजी,भोंदूबाबा सोडून द्या, शिवरायांच्या मावळ्यांनो आता तरी जागे व्हा. पाखंडी, ढोंगी लोकांपासून सावध होण्यासाठी शिवतत्व तुमच्या मेंदूत ओता. असे शिवकवि- ईश्वर मते तळमळीने तरुणांना ठणकावून सांगतो आहे. कोणाचीही प्रस्तावना घेणारा हा देशप्रेमी सैनिक शब्दांशब्दांतून इतिहासाच्या शौर्याची गाथा प्रत्येक तरुणांच्या मेंदूत शिरण्यासाठी आपल्या लेखणीची तलवार करून देश रक्षणाचे पवित्र कार्य सीमेवरती करत ५७ कवितांची तोफ शिवगर्जना च्या रूपात तरुणांसमोर मांडतो. असा परिवर्तनवादी विचार प्रत्येकाने अंगीकारण्यासाठी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी, आणि नवीन इतिहास घडवण्यासाठी जुन्या इतिहास माहीत असावा लागतो यासाठी प्रत्येक तरुण,बालक-पालक यांनी आवर्जून हा ग्रंथ (काव्यसंग्रह) वाचावा असाच आहे.

        शिवकवि -ईश्वर मते यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शिवशुभेच्छा...

समिक्षिका,लेखिका,संपादिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६८६६३२५७

Tuesday, 24 November 2020

'स्त्रीशक्तीची जाणिव करुन देणारा काव्यसंग्रह म्हणजे'_"आभाळ पेलताना"

 *स्त्रीशक्तीची जाणिव करुन देणारा काव्यसंग्रह म्हणजे-आभाळ पेलताना*

       सौ सुमनताई व्यंकटराव पवार चाकुर तालुका उमरगा जिल्हा उस्मानाबाद (माहेर व्हंताळ) येथील ग्रामीण भागातली कवयित्री यांचा 'आभाळ पेलताना' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ स्त्रीमनाला ध्येयाचे पंख लावून उंच आकाशात भरारी घेणारे आहे. त्या पुढे आभाळ ठेंगणे वाटावे असेच साजेसे चित्र साकारले आहे. स्त्री मनाला स्फूर्ती देणारे असेच चित्र आहे. पहिला जीवनाच्या वाटेवर आणि दुसरा आभाळ पेलताना प्रकाशक काव्यमित्र प्रकाशन पुणे,राजेंद्र श्रीमंत सगर यांनी प्रकाशित केलेला देखणा काव्यसंग्रह. मलपृष्ठावर सुमन ताई यांचा अल्पपरिचय तर अंतरंगी प्रेरणास्थान त्यांचे पती व्यंकटराव  पवार,अभिप्राय राम सदानंद सनातन (माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती माहूर )व डॉक्टर नीला सत्यनारायण यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहाची पहिली प्रथमावृत्ती ११ मार्च २०१८ ला प्रकाशित झाली.
        ग्रामीण भागातली कवयित्री संसार गाडा सांभाळून जेमतेम अकरावीपर्यंत शिक्षण झालेली पण मनातले भाव कागदावर उमटवत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकत सर्व महिलांना प्रेरणा देणारा काव्यसंग्रह तयार झाला. सुमन ताईंना बालवयापासूनच गायनाची आवड असल्याने कवितेला चालना मिळाली. गायन आणि कविता एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्याला गाण्याचा छंद असतो त्याच्या मुखात कविता खेळत असते फक्त त्याला शब्दालंकाराचा साज चढवून शब्दबद्ध करता आली पाहिजे.

               "स्त्री शिक्षणाचा पाया रोवुनी
              पुण्यात पहिली शाळा काढूनी
              कष्ट घेतले फुले कुटुंबानी
             आदर्श घ्यावा सावित्रीचा
              उध्दार झाला स्त्रीजातीचा
              उगवला दिवस तव जयंतीचा...!!"

            विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कृतज्ञतापूर्वक पहिलीच कविता सुमंनताईंनी शब्दांजली अर्पण केली. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणा-या फुले दांपत्यांनी अपार त्रास सहन करत पुण्यात आनेक शाळा काढल्या असून त्यामुळे आज महिला सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. आय.पी.एस ते आय.ए.एस पर्यंत आणि विमान चालकापर्यंत महिलांनी बाजी मारली आहे. प्रगतीचे पंख लावूनी जणूकाही आभाळ पेलत आहेत. असे कवयित्रीला वाटते अशा थोर सावित्रीचा आदर्श प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे सावित्रीमाईमुळेच स्त्री जातीचा उध्दार झाला असे कवयित्रीला वाटते.

            टी.व्ही आला घरोघरी 
            अभ्यासाला आळस करी
            नव युवकांना नम्र विनंती 
            अभ्यासावर लक्ष द्या जास्ती...!!

         आज प्रत्येक घरात टीव्ही किंवा मोबाईलच्या आहारी लहान मुले-मुली गेलेली दिसत आहेत. आई-वडील दोघेही सर्विसला असतात. मुले शाळेतून लवकर घरी येतात आणि टी.व्ही.च्या समोर बसतात. सर्व चॅनल्स कार्टूनचे लावून बसतात वाचन आणि अभ्यास याकडे आजची पिढी काळजीपूर्वक लक्ष देत नाही म्हणून कवयत्री नम्र विनंती करते की अभ्यासावर लक्ष केंद्रित करा.

      सारा संसार स्त्रियाविणा
       कसा भासे उदास 
       तुझ्याविना कोण फिरविल 
       मायेचा हात 
       क्षणाची पत्नी ग तू
       अनंत काळाची माता 
       उमलण्याआधीच कळीचा 
        घोट का गं घेता?

                संवेदनशील मनाच्या कवयित्रीला  मुली गर्भातच मारण्याचं दुःख होतं सारा संसार स्त्रीयांमुळेच फुलतो. स्त्रीया नसणाऱ्या घराकडे पाहवले पण जात नाही.ना त्या घराला चैतन्य राहत नाही. स्त्रीशक्तीला ओळखा. स्त्री ही एका क्षणाची पत्नी असली तरी ती अनंत काळाची माता असते. तिच्यामुळेच घराला घरपण येतं. घर अंगण फुलून  येतं. तिच्यामुळे सर्वांना मायेचा हात फिरतो तिची अनेक रूपे आहेत. ती कोणाची पत्नी, तर कोणाची आई, कुणाची बहीण तर कुणाची मावशी, कोणाची आत्या तर कोणाची मामी तर कोणाची आजी अशा अनेक रूपात स्त्री दिसते. मग तिला उमलण्याआधीच त्या कोवळ्या मुलीचा घोट का घेता? तिला गर्भातच का मारता?  असा सवाल आपल्या लेखणीतून कवयित्री कळकळीने करते.

          दोन मनाचे मिलन,पडले लग्नाचे बंधन 
          पती पाहिजे पण सासू-सासर्‍यांची अडचण
           माय लेकराची नाळ कोण तोडू शकत नाही
           आज कालच्या मुलींना काहीच कसे कळत नाही
           नाटकी सोंगे करून असे काही जमत नाही...!!

               आज कालच्या मुलींना नवरा पाहिजे पण सासू-सासरे म्हणलं की नको वाटतं.मुलगी माहेर सोडून सासरी गेल्यावर सासर हेच माहेर बनतं पण काही मुलींना सासू-सासरे नकोसे वाटतात. चार-सहा महिने झाले की लगेच सासू-सासऱ्यांचा पासून विभक्त राहतात. माय लेकराची नाळ तोडून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात किंवा शहरात जाऊन राहतात आणि तिथेच आपला संसार थाटतात.सासू-सासरे अडचण वाटतात मग त्यांना कोणी वृद्धाश्रमात पाठवतात म्हणून कवयित्री म्हणजे आजकालच्या मुलींना काहीच कसं कळत नाही. नाटकी सोंगे करून काही जमत नाही ...अशा ओळीतून विभक्त राहणाऱ्या मुलींना आपल्या ओळीतून कवयित्रीने चांगलेच फटकारले आहे.

          स्वतः सासू-सासर्‍यांची सेवा करणारी कवयित्री खूपच हळव्या मनाची आहे. त्यांनी रेशीम धागा या कवितेतून भावा बहिणीचे उत्कट प्रेम, नात्यांचे महत्त्व सांगितले आहे,तर मजेशीर भारुड सुद्धा वाचावंसं वाटतं, हिंदू-मुस्लीम ऐक्य दाखवणारा संवाद पण छानच रचला आहे. पूर्वी आजोळी किती धम्माल मस्ती होती हे दिस आजोळीचे  या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.तर बलसूर वळण रस्त्यावर कडदोरा गावचे भाविक एका भजनासाठी जात असताना अपघातात मरण पावतात त्यांच्याबद्दल शब्दांची सुमनांजली आपल्या काव्यातून अर्पण करणारी कवयित्री हळव्या मनाची नक्कीच आहे. या काव्य संग्रहातल्या सर्व रचना प्रेम, संस्कार, वळण लावणाऱ्या, आपुलकीची ओळख असणाऱ्या, मनाला यशाचे  पंख लावून गगन भरारी घेणाऱ्या आहेत. या पुस्तकाचे मूल्य फक्त शंभर रुपये आहे.पण यातल्या कविता खूप प्रेरणादायी आहेत.
        कवयित्रीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

    समीक्षिका लेखिका संपादिका शिक्षिका कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशीम
मो.९७६७६६३२५७

Sunday, 22 November 2020

अंतर्मनाला स्पर्श करणारा काव्यसंग्रह म्हणजे- अंतर्मन....

Monday, 9 November 2020

*विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य फुलविणारा बालकवितासंग्रह म्हणजे ऐसा घडवू बालक*

 *विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य फुलविणारा बालकवितासंग्रह म्हणजे ऐसा घडवू बालक*

        बीड जिल्ह्यातील हाडाची शिक्षिका,सावित्रीच्या विचारांचा वारसा चालवणारी, तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे यांचा नुकताच प्रकाशित झालेला  "ऐसा घडवू बालक"  हा बालकवितासंग्रह माझ्या वाचनात आला.याचे प्रकाशन अजिंक्य प्रकाशन वाशिम यांनी प्रकाशित केलेला असून काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर नावाला साजेसे बालकांचे मॅडम समवेत असलेले छायाचित्र असून याची पहिली आवृत्ती ५ सप्टेंबर 2020 रोजी प्रकाशित झालेली असून याचे मूल्य फक्त 120 रुपये आहे. या पुस्तकाला शुभेच्छा डॉ. गोविंद नांदेडे साहेब(पूर्व शिक्षण संचालक पुणे) तसेच संदीप राक्षे (गुडमॉर्निंग मराठी चित्रपटाचे निर्माते)सरांच्या शुभेच्छा आणि कचरू चांभारे सर(मुख्याध्यापक)बीड यांची प्रस्तावना लाभली आहे.आपल्या देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते कसे असावे ? विद्यार्थ्यांमध्ये कोणती मूल्य रुजवावे ? विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आपली मुले सुसंस्कारीत घडावीत म्हणून प्रत्येक शिक्षक प्रयत्नशील असतो. कवी मनाची उषाताई संवेदनशील व मूल्यसंस्कार रुजवून चांगल्या विचारांचे खतपाणी घालून आदर्श विद्यार्थी कसे घडवावे त्यासाठी सतत धडपड करणारी आहे.त्यांच्या स्वप्नातले विद्यार्थी कसे असावेत? हे हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर समजते.
         विद्यार्थ्या प्रती प्रेम, आदरभाव, संवेदनशील मन, बालमनाची पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवताना झालेली बालमनाची घालमेल, शाळेतल्या बाई म्हणजे जणूकाही मुलांची आईच, स्वच्छतेचे महत्व काव्यातून पटवून देणाऱ्या कविता खरोखरच काळजाला स्पर्शून जातात.मुळात कवयित्री खूप संवेदनशील मनाची आहे तिला सतत मुलात राहायला आणि गायला आवडतं.

          मनासारखे शिक्षण मिळते 
          धावतच शाळेत जायचं 
         पुस्तक,गणवेश मोफत येथे
          दुकानात कशाला जायचं ? 
          वेळोवेळी साहित्य मिळते 
          लिहाया आणि वाचाया
         आई आवर गं  शाळेला निघाया 
         बाई आल्या असतील 
         मुलांना शिकवाया......!!

      बालवयातच इयत्ता पहिलीला शिकवायला जर बाई (शिक्षिका )असतील तर नव्याने दाखल होणारी मुले रडत नाहीत. कारण त्यांना बाई या आई सारख्याच वाटतात. कवयित्रीचे मन अगदी बालवयातच घेऊन जातं. आज ग्रामिण भागातील सर्वच पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे ओढला जातो आहे कारण तिथे मनासारखे शिक्षण मिळते. बालकांच्या मनावर ना बर्डन असते ना ताण असतो. तिथे हसत-खेळत मोफत,ज्ञानरचनावादी,शिक्षण मिळते. पुस्तक, गणवेश, शिष्यवृत्ती आणि खिचडी सुद्धा मिळते मग दुकानात कशाला जायचं? या शब्दांमध्ये कवयित्री आपलं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. दुकानातली विविध पदार्थ खाऊन विद्यार्थी आजारी पडतात त्या काळजी पोटी कवयित्री दुकानात कशाला जायचं म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना बजावते आहे. जिल्हा परिषद शाळेत वेळोवेळी वेगवेगळे साहित्य मिळतील आणि तिथे हसत-खेळत मनोरंजनात्मक शिक्षण मिळते. त्याच बरोबर लिहायला-वाचायला शिकवले जाते .असे उशीर झालेला मुलगा शाळेच्या ओढीने आपल्या आईला काव्यातून म्हणतो आहे. हे बालपणाचे विचार अगदी बालवयातच घेऊन जाणारे आहेत.

         शाळेत आपण जाऊ चला 
         मूल्य सारे शिकू चला
         स्वच्छतेचा मंत्र आपण 
          मना मनात रुजवू चला...!!

      मुल्यसंस्काराबरोबरच कवयित्री विद्यार्थ्यांना स्वच्छतेची कास धरायला ही आवर्जून सांगते. भारतभूमीचे गुणगान ही बाल मनावर ठसवण्याचा प्रयत्न करते. आज धावत्या युगामध्ये वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र कोलमडले असताना कवयित्रीने निसर्गाच्या ऋणात राहून वृक्ष संगोपन करूया रे असं म्हणत बालकांच्या मनावर वृक्ष लागवडीचे महत्व पटवले आहे. वृक्षतोडी बरोबरच पर्जन्य संपले त्यामुळे पाणी संपले हे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न कवयित्री करत आहेत.
          प्रत्येक मूल हे शाळेत जास्त वेळ राहते.शाळा हा मानवी विकासाचा पाया आहे.त्यामुळे शाळेतून त्याच्यावर अनेक मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी मूल्यवर्धनचे महत्त्व, शाळेची गोडी,शाळेतली उपक्रम, शाळा शिकले यामुळेच आयुष्याची पायाभरणी कशी होते? शाळेत हसत खेळत शिक्षण घेतले पाहिजे तरच विद्यार्थ्याचे चैतन्य हे कायम टिकेल असेही आपल्या काव्यातून कवयित्री सांगते.

          विज्ञानाची कास धरू 
          कष्टाचा मंत्र जपू 
          अभ्यासातून ज्ञान घेऊ
          देशाच्या कामी येवू
         भाग्यशाली आपण सारे 
          गौरवगाण गाऊ...!!

        वरील ओळींमधून कवयित्रीने विज्ञानाची कास धरत कष्ट करण्याचा मूलमंत्र दिला आहे. तसेच अभ्यासातून प्रगती साधता येते, ज्ञान मिळवता येते, तसेच बालकांना देशाच्या कामी म्हणजेच देश रक्षणार्थाचे आव्हान देते. आपण किती भाग्यशाली आहोत.असे ताठ अभिमानाने सांगते आहे. सैनिका प्रति प्रेम,आई बापाची तळमळ, पोरगं शिकावं म्हणून विकासाचे गाणे, तो बालवयातल्या आनंद, शाळेत मुलाला नेण्यासाठी बाईंनी मारलेली हाक, पावसाचा आनंद, वृक्षारोपणाची शपथ तर महाराष्ट्र गीता ची शान आणि उषा ताईच्या स्वप्नातला बालक अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत उषेच्या प्रभात समयी प्रमाणे डोंगररांगातून उगवणार्‍या तेजोमयी स्वयंप्रकाशित सूर्यकिरणां सारखांच आहे. सर्व बालक,पालक,शिक्षक यांनी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य फुलंवण्याकरता आवर्जून वाचावा असाच हा "ऐसा घडवू बालक"  बालकवितासंग्रह आहे.माझी सखी कवयित्री उषाताई यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....

     समीक्षिका, लेखिका, संपादिका,शिक्षिका, कवयित्री
     कु. मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
      ता. जि. वाशिम 
      मो ९७६७६६३२५७

Saturday, 31 October 2020

बाल स्वप्नांना गरूड भरारीची झेप घ्यायला लावणारा बालकविता संग्रह - डिझेलगाडी

*समीक्षण पुस्तक परिचय*

*बाल स्वप्नांना गरुड भरारीची झेप घ्यायला लावणारा बालकवितासंग्रह डिझेलगाडी*

          प्रसिद्ध कवी शफी बोल्डेकर मु. पो. बोल्डा.तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचा २०१४ साली प्रकाशित झालेला बालकवितासंग्रह डिझेलगाडी हा माझ्या वाचनात आला. हाती पुस्तक घेतल्यानंतर मी जणू बालवयातच गेल्याचा अनुभव प्रत्यक्षदर्शी आला. लहान मुलांना आवडेल असे बोलके मुखपृष्ठ त्यावर चिमुकल्यांनी एकमेकांच्या कपड्यांना धरून बनवलेली त्यांची झुक झुक गाडी आणि त्याखाली झुक झुक आगीनगाडीचे रंगीत चित्र कोवळ्या बाल मनाला स्पर्श करून जाते. प्रत्येक पृष्ठ दर्जेदार, घट्ट बांधणी, रंगीत कागद वापरून केलेले, लहान मुलांनी किती हाताळले तरी फाटायची भीती नाही अशी दर्जेदार बांधणी.
          मलपृष्ठावर स्वातंत्र्यसैनिक तथा महाराष्ट्र शाहिरा अनुसयाबाई शिंदे यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद अर्पण पत्रिकेवर ग्रामीण भागातले प्रभातसमयीचे चित्र, सानथोरासहित काळजाला भिडणारे, लेकरांच्या सर्व मित्रांना अर्पण केलेल्या त्या ओळी मनाला भुरळ टाकणाऱ्या आहेत. डिझेल गाडी शफी सरांचा तिसरा काव्यसंग्रह जरी असला तरी बालकविता संग्रहित करणारा पहिला बाल काव्यसंग्रह आहे.इतर विषयावर कविता करण्यामध्ये आजकाल बरेच नवीन तरुण मंडळी उतरताना दिसते आहे पण बालकविता करणाऱ्या कवींचे प्रमाण त्या मानाने कमीच त्याचे कारणही तसेच बाल कविता करणा-या कवीला अगदी बालवयातच जावे लागते लहान मुलांच्या इतकेच लहान व्हावे लागते.

    डिझेलगाडी डिझेलगाडी
    जोडी शहर खेडीपाडी
   चला वाचूया थोडी-थोडी 
   स्टेशन,गावे,चौदाखडी....!!

     बदलत्या काळाप्रमाणे कवीसुद्धा डिझेल गाडीचे स्वप्न रंगीत आगगाडी चे महत्व आपल्या काव्यातून सांगतो आहे. कवी हाडाचा शिक्षक असल्यामुळे बालकांच्या अंतर्मनात सहज डोकावू शकले आहेत. आगगाडी ही शहर आणि खेडी यांना जोडत जोडत व माणसं सोडत सोडत जाते. ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा आगगाडी म्हणजेच रेल्वेचे दर्शन होते आणि प्रत्येक रेल्वे स्टेशन वर गावे,स्टेशन, इत्यादीची माहिती नकळत लोकांना होते. जुन्या काळातील आगगाडीचा संबंध कवीने आजच्या काळातील आधुनिकतेशी साधत आधुनिक युगातल्या चौदाखडीशी जोडला आहे.
            एकाच कवितेतून महाराष्ट्राचे व संपूर्ण भारत देशाचे दर्शन घडविणारी ही डिझेल गाडी एकच कविता महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे दर्शन घडवत आपल्या देशाची भारतीय संस्कृती, देवालय, प्रसिद्ध ठिकाणे, प्रत्येक जिल्ह्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य सांगत डिझेल गाडीच्या डब्यात प्रमाणे एकच कविता अख्ख्या भारताचे दर्शन चाळीस कडव्यात करत चोविसाव्या पृष्ठावर थांबते.  
          कवी शक्ती बोडेकर सरांच्या प्रत्येक ओळी मुलांना नवीन माहिती देणारी आणि बालकांच्या बालमनावर संस्कार करणारी व वाचनाची गोडी लावत चित्रासह काळजाला स्पर्श करणारी आणि आशेचे पंख लावणारी आहे.बालवयातच थोरांचे आदर्श पुढे ठेवणारी व देश प्रेमाची गोडी लावणारी आहे, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रवास लहान मुलांना घरातल्या घरात बसून भारत देशाचे भ्रमण करायला लावणारी ही एकच कविता खूप बोलकी आणि आजच्या काळातील तरुण पिढी व बालवयातील मुलांनी वाचावी अशीच प्रेरणादायी आहे.
       
        "मराठी आमची राज्यभाषा 
        मुंबई राजधानी महाराष्ट्र देशा 
        शिवाजी छत्रपती जाणते राजे 
        जगात कीर्ती नाव गाजे 
       भोसले कुळभूषण कुळवाडी 
       झुक झुक झुक झुक डिझेलगाडी...!!"

        वरील कडव्यामध्ये मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे,महाराष्ट्रातले जाणते  छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास अख्ख्या जगाला ठाऊक आहे.अख्या जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गाजते आहे. असे कवी ठणकावून सांगतो आहे. सम्राट अशोका पासून ते चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा, नील आर्मस्ट्रॉंग पर्यंतचा सर्व प्रवास माहिती आपल्या काव्यातून मोती माणकासारखी उधळीत आहेत.इतकेच नाही तर कवी बाल विश्वात जाऊन इको फ्रेंडली घर बनविण्याची सुद्धा स्वप्न पाहतो आहे.
       
        "शौचालय असावच घरोघरी
        झोपायला हवी मऊ लपेडी..."

        झोपायला जशी उबदार ,मऊ हवे तसेच प्रत्येकाच्या घरी शौचालय असावचं असं कवीला वाटतं. बालमनावर स्वच्छतेचे संस्कार रुजविणा-या या ओळी मनाला खूपच भावल्या.तुकारामाची गाथा, शेख महंमद यांची शिकवण, संत कबीर ते एकनाथ, दीक्षाभूमी ते बाबासाहेबांचा संघर्ष, संविधानाचे पाईक ते आग्र्याचा प्रसिद्ध ताजमहाल, स्वातंत्र्याची चळवळ ते देश प्रेमी महात्म्यांची ओळख, जय जवान ते जय किसान, जिजाबाई ते लक्ष्मीबाई, संशोधक ते संशोधना पर्यंत बालमनाच्या डिझेल गाडीतला प्रवास खरोखरच मनाला चेतना आणि प्रेरणा देणारा आहे. सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना (देशाचा खजिनाच) लपलेला हा काव्यसंग्रह आपल्या मुलांच्या हाती आवडीने द्यावा असाच आहे.
           आज समाजात चित्र बदलत चालली आहे कारण जग झपाट्याने बदलत आहे.आज अवघ्या पाच-सहा वर्षापासून चि मुल इंटरनेटच्या जगामध्ये स्वतःला हरवून बसले आहे. लहान-लहान मुले पूर्वी मैदानावरचे खेळ खेळायची आज प्रत्येक मूल आई-बाबांचे बहीण किंवा भावाचे मोबाईल हातामध्ये घेऊन बसताना दिसते आहे. त्याचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक नुकसान तर होतच आहे परंतु प्रत्येक पालकांनी याला वेळीच आवर घालून सतर्क राहिले पाहिजे...बालवयातच असे अनेक बालकवितासंग्रह खरेदी करून आपल्या पाल्यांना वाचायला दिली पाहिजे.
           कवी शफी बोल्डेकरांची साधी सोपी सरळ भाषा अंतर्मनाचा वेध घेत बाह्य जगाचे, देशाचे दर्शन घडवणारी आहे.संपूर्ण पुस्तकात एकच कविता डिझेल गाडीच्या डब्या प्रमाणे जसे स्टेशन बदलत जाते तसे कडवे बदलत नवनवीन माहिती देत, जगातल्या सात आश्चर्याची अभ्यास बालमनावर करणार आहे. यात ग्रामीण भागातली खेडी ते स्वातंत्र्य काळात पडलेली बेडी पर्यंत घेऊन जाते. मला तर वाटते हे पुस्तक प्रत्येक शाळेतच असायला हवे प्रत्येक शिक्षकांनी पहिलीच्या वर्गाला ही संपूर्ण कविता प्रात्यक्षिक व हावभावांनुरूप सादर केली तर परिपाठामध्ये जनरल नॉलेज घ्यायची वेळच येणार नाही. इतके भरभरून शफी सरांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
          या पुस्तकाची किंमत फक्त ५०/ रुपये आहे. ती वाचक,बालक व पालक यांनी जरूर वाचावी अशीच आहे बालमनाला आशेचे स्वप्नांचे पंख लावून गरुड भरारीची झेप घ्यायला लावणारा हा बालकवितासंग्रह डिझेलगाडी आहे. कवीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.....

*समीक्षिका,लेखिका,शिक्षिका,संपादिका, कवयित्री*
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका जिल्हा वाशिम
९७६७६६३२५७