मराठी तरुणांच्या मेंदूत शिव संस्कार पेरून त्यांना आदर्श बनवणारा प्रेरणादायी काव्यसंग्रह म्हणजे -शिवगर्जना हा शिवकवी- ईश्वर मते सरांचा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. शिव कवी ईश्वर मते हे मुळातच एक सैनिक शिवरायांच्या विचारांचा पाईक असलेला सच्चा दिलाचा देशभक्त कवी... केंद्रीय पोलिस दलात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत,पण वाचनाची अत्यंत आवड असल्यामुळे आणि देशभक्ती, गझल, शिव कविता आणि विद्रोह हा जणू त्यांच्या रक्ता रक्तात भिनला आहे.थोर इतिहास संशोधक मा.म. देशमुख, डॉ. आ.ह.साळुंके सर,या.अॅड. पुरूषोत्तम खेडेकर साहेब,मा.अशोक राणा, डॉ.जयसिंगराव पवार यांच्या विचारांचा प्रभाव पडलेला हा कवी आहे.
शिवगर्जना या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊ माँसाहेब शिवरायांना परकीय सत्ता उखडून टाकण्यासाठी एक एक गड काबीज करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी, शिवरायांना प्रेरित करणारे चित्र आहे.मावळ्यांसह गडावरचे सुंदर चित्र त्यावर ढाल-तलवार ,ढालीवर स्वराज्याचा सिंह म्हणजे छत्रपती शिवराय अख्ख्या जगाला शूरवीर म्हणून विश्ववंदनीय असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिशय देखणे असे मुखपृष्ठ असून बघताक्षणीच वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे असेच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पंचफुला प्रकाशन औरंगाबाद चे डॉ. बालाजी जाधव सर यांनी केले आहे. तर याची प्रथम आवृत्ती १९ फेब्रुवारी २०१५ रोजी शिवजन्म उत्सवाच्या दिवशी प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाची किंमत फक्त ७० रुपये आहे,पण त्यातल्या कविता या दशलाखमोलाच्या आहेत. प्रत्येक घरातल्या लहान बालकापासून ते तरुणांपर्यंत जर हा काव्यसंग्रह वाचला तर त्याचा मन मेंदू आणि मस्तक जगातल्या कोणत्याच स्त्री कडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. ना इतरांनाही वाईट नजरेने बघू देणार नाही, अन्याय सहन करणार नाही, गुलामगिरी सहन करणार नाही. अशी शिवविचारांचे गुट्टि( बाळकडू) या काव्यसंग्रह मध्ये दिली आहे. खेड्यात राहणाऱ्या शिवकवि ईश्वर मते यांच्यावर संत तुकोबारायांच्या अभंगाचा प्रभाव पडला आणि त्यातूनच शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची रुजवणूक झाली. त्यांनी खूप मोलाचे साथ देणारे शिवश्री संतोषदादा गव्हाणे पाटील व त्यांना कौतुकाची थाप देणारे त्यांचे मित्र शिवश्री नारायण प्रल्हाद काळबांडे कोकलगाव तसेच शिवश्री संदीप गोटे सर तोंडगाव यांची साथ मिळाली.
देशरक्षण्या समर्थ आम्ही
विजयाचा एक अर्थ आम्ही
शिवनिष्ठेचे बळ आम्हांला
रणांगणावर शर्थ आम्ही
जग अवघे अदबीने झुकते
शान अशी शिवतख्ताची
इतिहासाला माहित आहे
धमक मराठी रक्ताची....!!
गुलामगिरीच्या शृंखला तोडून मोगलशाही, पातशाही, निजामशाही,आदिलशाहीला गाडून रयतेचे समतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा व त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या प्राणप्रिय मावळ्यांचा जाज्वल्य इतिहास जगाला ठाऊक आहे. आजही आम्ही मावळे आजच्या काळातले शूर सैनिक तुमचा आदर्श मनात ठेवून सीमेवर रक्षण करतो.तुमच्या शिव निष्ठेचे बळ आज आम्हाला पुरेसे आहे.प्राण गेला तरी हरकत नाही पण आम्ही डगमगणार नाही. रणांगणावर जीवाची बाजी लावून आजही अवघे जग आम्हा भारतीयांना पुढे अदबीने झुकते. अशी शान माझ्या शिवरायांच्या शिवतख्ताची आहे.हे इतिहासालाही ही माहित आहे आणि जगाला ही माहित आहे.अशी धमक आमच्या मराठी रक्ताची अशी शिवगर्जना आपल्या काव्यातून करणारा करणारा शिवकवि हा फक्त कवी नसून तो एक सच्चा दिलाचा शिवरायांचा मावळा आजच्या काळातील देशाचे रक्षण करणारा सैनिक आहे.
विषमतेच्या बुरुजाला सुरुंग लावणारी
मेंदू मधल्या मनुवादाला खिंडार पाडणारी
आम्ही गर्जना शिवगर्जना, शिवगर्जना, शिवगर्जना...
विषमतेच्या बुरुजाला सुरुंग लावून फोडून टाकू इथल्या प्रत्येक मेंदू मधल्या मनुवादाला खिंडार पाडून मनुवाद संपवून टाकण्यासाठी मन आणि मेंदूतील घाण बाजूला सारण्यासाठी मी शिवगर्जना करीत आहे. असे कवी म्हणतो.
ऊठ मर्दा धरतीच्या पुता लेखणीची तलवार कर
शिवशाहीचा वारसा रयतेचा तू उद्धार कर...!!
दुःख मुक्तीचा पथ ज्ञानाचा
सत्यशोधक आणि विज्ञानाचा
भटगिरी बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर प्रहार कर..
उठ मर्दा धरतीच्या पुता लेखणीची तलवार कर
शिवशाहीचा वारसा रयतेचा तू उध्दार कर...!!
आजच्या तरुण मावळ्यांना कवी ऊठ मर्दा या धरतीच्या पुता म्हणजेच या धर्तीच्या लेकरा उठ तुझ्या हातातल्या लेखणीला तू तलवार कर. आज प्रत्यक्ष तलवार घेऊन लढायचे नाही. तर तुझ्या हातातल्या लेखणीने अन्यायावर वार कर. तुला शिवशाहीचा वारसा आहे. तुलाच रयतेचे रक्षण करायचे आहे. तूच रयतेचा रक्षण करू शकतोस असे आव्हान आपल्या तरुणांना करीत आहेत. इतकेच नाही तर तुला जीवनात दुःख मुक्त व्हायचे असेल तर ज्ञानाचा मार्ग स्वीकार. ज्ञानाच्या प्रकाशाने अंधकारमय जीवन नष्ट कर.तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो त्यासाठी तुला सत्यशोधक वृत्तीचा आणि विज्ञानाचा स्वीकार कर. भटगिरी बुवाबाजी लाथाडून टाक. त्याची मूठमाती कर आणि अंधश्रद्धा जाळून टाक तेव्हाच तू पुढे जाशील असे वैचारिक बाळकडू पिलेला कवी तरुणांना म्हणतो.
कसे घडले कसे लढले स्वराज्याचे शिखर चढले
प्रेरणा जिजाऊ स्वातंत्र्याची मावळे वादळासही भिडले
चारही दिशांना गणीम चार ते
कष्टकरी लाचार होते
कुण्याही बळीचा आधार नव्हता
शिव कुळाचे उघडे एकच द्वार होते
जिजाऊंचा छायेत शिवबा संगे मावळे वाढले
प्रेरणा जिजाऊ स्वातंत्र्याची मावळे वादळासही भिडले....!!
गुलामगिरीच्या बेड्या संपविण्यासाठी राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी बाल शिवबाला अगदी बालपणापासूनच युद्धनीतीचे धडे दिले. शस्त्रे चालवण्याची कला अवगत करण्यासाठी जिजाऊंने स्वतः हातात तलवार घेऊन तलवारबाजी करणे, भालाफेक करणे,पळत्या घोड्यावर बसणे, झाडावर चढणे अशा अनेक गोष्टींचे शिक्षण बालपणीच दिले गेले. छत्रपती शिवाजी महाराज बालपणापासूनच खोऱ्यातल्या सवंगड्यांसह स्वराज्याची प्रतिज्ञा करीत आणि स्वातंत्र्याची ज्वाला प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयी उसळत होती. त्यासाठी स्वराज्याचा भक्कम पाया आधार राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची प्रेरणा होती.त्याकाळात सर्वत्र परकिय स्त्रियांचा अन्याय माजलेला होता. हे जिजाऊ माँसाहेबांनी ओळखून स्वराज्याची ज्योत पेटवली.चारही बाजूंना गनिमांचा अन्याय वाढला होता. कष्टकरी जनता, रयत लाचार होती. रयतेला कोणाचा आधार नव्हता. फक्त शिव कुळाचे एकच द्वार दिसत होते. रयतेचे हाल जिजाऊंना पाहवत नव्हते. म्हणून जिजाऊ माँसाहेबांनी गनिमांना संपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सिंहाला जन्म दिला. आणि रयतेच्या सुखासाठी लोककल्याणकारी राज्य निर्मितीचे स्वप्न बघितले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वप्न पूर्ण केले छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई न हरता आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वराज्याचे रक्षण केले. असा जाज्वल्य इतिहास कवीच्या शब्दांशब्दांतून घुमतो आहे.
मावळ्यांची पोर, प्रतापगडाच्या पायथ्याशी, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाले,रामशेजचा पराक्रम अशा अनेक मावळ्यांच्या शौर्याची गाथा आपल्या कवितेतून तरुणांसमोर ठेवणारा हा तीस-पस्तीशीतला हा तरूण आपल्या लेखणीच्या माध्यमातून तरुणांना जागा करतो आहे. माझा जन्मच परिवर्तनासाठी झाला आहे. शिवचरित्र हे एक औषध आहे. तो प्रत्येकाने प्यायलाच हवे. शाहु, फुले, आंबेडकरांचे आपण वारसदार आहोत.क्रांतीविना आमचे जगणेच काय? अशा परखड शब्दांच्या माध्यमातून कवी व्यक्त होतो.
लाथ मारा मनुवादाला काय आवकता भोंदूत
शिवरायांच्या मावळ्यांनो शिवतत्त्व होता मेंदूत...!!
या वरील ओळीत मनुवादाला लाथ मारून गाढून टाका. बुवाबाजी,भोंदूबाबा सोडून द्या, शिवरायांच्या मावळ्यांनो आता तरी जागे व्हा. पाखंडी, ढोंगी लोकांपासून सावध होण्यासाठी शिवतत्व तुमच्या मेंदूत ओता. असे शिवकवि- ईश्वर मते तळमळीने तरुणांना ठणकावून सांगतो आहे. कोणाचीही प्रस्तावना घेणारा हा देशप्रेमी सैनिक शब्दांशब्दांतून इतिहासाच्या शौर्याची गाथा प्रत्येक तरुणांच्या मेंदूत शिरण्यासाठी आपल्या लेखणीची तलवार करून देश रक्षणाचे पवित्र कार्य सीमेवरती करत ५७ कवितांची तोफ शिवगर्जना च्या रूपात तरुणांसमोर मांडतो. असा परिवर्तनवादी विचार प्रत्येकाने अंगीकारण्यासाठी आपल्या मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी, आणि नवीन इतिहास घडवण्यासाठी जुन्या इतिहास माहीत असावा लागतो यासाठी प्रत्येक तरुण,बालक-पालक यांनी आवर्जून हा ग्रंथ (काव्यसंग्रह) वाचावा असाच आहे.
शिवकवि -ईश्वर मते यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शिवशुभेच्छा...
समिक्षिका,लेखिका,संपादिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम