कार्येषु दासी करणेषु मंत्री
रुपेषु लक्ष्मी क्षमाया धरित्री
भोज्येषु माता शयनेषु रभ्भा
षटकर्मयुक्ता कुलधर्मपत्नी
कार्यप्रसंगात मंत्री, गृह कार्यात दासी भोजन बनवताना माता, रती प्रसंगात रंभा, लक्ष्मीच्या रूपात धर्मकार्यासाठी अनुकूल क्षमा करताना धरतीप्रमाणे असे स्त्रियांचे वर्णन संस्कृत पुराणात केलेले आहे. पण आता एकविसाव्या शतकात याहीपुढे जाऊन स्त्रिया प्रत्येक क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत.अगदी आकाशाला सुद्धा गवसणी घातली आहे. अशाच आहेत आमच्या उपक्रमशील व तंत्रस्नेही समूहाच्या शिक्षिका. शाळेत जाऊन फक्त मुलांना शिकविणे एवढेच आपले काम नसून, आपल्या पुढे असणारे चिमुकले बालक हे या देशाचे आधारस्तंभ आहेत असा विचार करून त्यांना घडवण्यासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. सतत नावीन्याचा ध्यास आणि माझ्यातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना कसे देता येईल याचा विचार त्या करतात. गेली दोन महिने मी या व्हाट्सअप समूहाला जोडले गेले यातील प्रत्येक शिक्षिके मध्ये वेगळेपण दडले आहे.
समूह प्रशासिका आहेत कु. मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे ज्या स्वतः उपक्रमशील शिक्षिका सोबतच उत्तम कवयित्री, लेखिका व तंत्रस्नेही सुद्धा आहेत. त्यांची अनेक पुस्तके व कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कोरोना काळात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या जीवनावर 'थोर क्रांतिकारक' नावाचे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये असे क्रांतिकारक की जे समाज व शासनाकडून उपेक्षित राहिले आहेत, अशांची नोंद त्यांनी या पुस्तकात घेतली आहे. तसेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांसोबत आपल्या सर्वस्वाचे बलिदान करणारे मावळे यांच्या जीवनावर 'स्वराज्याचे मावळे' नावाचा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला या काव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. स्वराज्यातील मावळ्यांच्या जीवनावर अशा प्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक काव्यसंग्रह आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत.
14 मे पासून त्यांच्या मार्गदर्शनात समूहातील इतर शिक्षिका यांनी मिळून अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. 'जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करूनी सोडावे सकलजन'
या उक्तीप्रमाणे या सर्व शिक्षिका इतर मैत्रिणींना आपल्या जवळचे ज्ञान वाटण्याचे काम करतात. यामध्ये
1ब्लेंड कोलाज-मीनाक्षी नागराळे
2 ऑनलाइन टेस्ट तयार करणे-सोनाली साळुंखे
3 फ्लिप बुक तयार करणे-सुचिता कुलकर्णी
4 पोस्टर तयार करणे गायत्री शिंदे
5 पीडीएफ तयार करणे-सोनाली साळुंखे
6 फेसबुक वरील व्हिडीओ डाऊनलोड करणे-सुनीता पवार
7 लोगो तयार करणे-मीनाक्षी नागराळे
अशाप्रकारे विविध विषयावरील सात कार्यशाळा त्यांनी घेतल्या. लॅाकडाऊन मुळे सर्व मंडळी घरात बसून कंटाळले आहेत पण या सर्व शिक्षिका रोज नवनवीन शिकतात व शिकवतात. कार्यशाळेची वेळ तीन ते पाच च्या दरम्यान ठेवतात म्हणजेच घरातील सर्व कामे आटोपून यांना कार्यशाळेला हजर होता येईल. प्रत्येकीच्या मागे घरातील भरपूर काम आहे. सुट्टी असल्यामुळे सर्व मंडळी घरी, विविध पदार्थ बनवून सर्वांना खाण्यासाठी देणे ,कामवाल्या बाया बंद असल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे. हे सर्व करून उरलेल्या वेळेमध्ये काही तरी नवीन शिकण्याचा ध्यास खरंच कौतुकास्पद आहे. कार्यशाळेच्या नंतर दोन-तीन दिवसातच त्या कार्यशाळेत झालेल्या विषयावर एक स्पर्धा आयोजित करतात. नंतर दोन-तीन दिवसांमध्ये त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करणे, सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देणे हे सर्व नियोजन करण्यासाठी त्यांचा कितीतरी वेळ यासाठी त्या खर्ची घालतात.सर्वजणी ठरलेल्या वेळी ऑनलाईन येऊन प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडतात. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नियोजित करतात. सर्वांचे टाळ्या वाजून स्वागत करतात. सावित्रीचा फोटो गृप वर टाकतात.लगेच फोटोला हार घालतात. सर्वजणी टाळ्या वाजवतात प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या सखीला पेढा किंवा स्वीट पदार्थ पाठवतात. हे सर्व पाहताना मला फार मज्जा वाटते. किती उत्साहाने करतात हे सर्व. याबरोबरच उन्हाळाभर रोज विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेणे व होमवर्क देणे हे काम सुद्धा त्यांचे सुरूच आहे गुगल फॉर्म वर अनेक टेस्ट सोडवायला त्यांनी दिलेले आहेत. होमवर्क पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल वरच व सन्मानचिन्ह सुद्धा पाठवतात.म्हणजे स्वतः सतत बिझी व विद्यार्थ्यांनाही सतत बिझी ठेवतात. यापैकी अनेक शिक्षिकांचे युट्युब चॅनल सुद्धा आहेत स्वतःच्या शाळेचे ब्लॉग सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत, भरपूर व नवनवीन उपक्रम राबवतात. बऱ्याच शिक्षिका लेखिका, कवयित्री व विविध पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत स्त्रियांबद्दल ची लोकांची धारणा होती की स्त्रियाच स्त्रियांना मागे ओढतात पण हे चुकीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी ज्या उदात्त हेतूने मुलींच्या शिक्षणासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याचे सार्थक होत आहे असे वाटते. शिक्षकांच्या तुलनेत शिक्षिका या जास्त प्रयत्नशील व कृतीशील आहेत सतत नवनवीन प्रयोग करणे ज्ञानरचनावाद, हसत खेळत शिक्षण, या ना त्या मार्गाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्या प्रयत्न करतात .ज्याप्रमाणे आई ही पहिली गुरु असते त्याप्रमाणे शिक्षिका गुरु आणि आई अशा दोन्ही भूमिका निभावत असतात व विद्यार्थ्यांना परिपूर्ण करतात. या समूहातील शिक्षका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातील आहेत. सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव नाशिक ,अमरावती, वाशिम अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या सर्व शिक्षिका एकत्र येऊन आपल्या ज्ञानाचा वसा एकमेकींना देत आहेत हेच तर अपेक्षित होते सावित्रीबाईंना.
'हमे भी हवा के साथ चलना आ गया
हमे भी रुख बदल ना आ गया
हमे जो ठोकर लगी रस्ते मे
जमाने को संभलना आ गया
रहो होशियार अब दरिया की मॊजो
किनारो को भी उछलना आ गया'
मैत्रिणींनो सलाम तुमच्या कार्याला.
*सौ.हर्षा अविनाश पसारकर*
*प्राचार्य विठाबाई पसारकर विद्यामंदिर केकत उमरा*
