Wednesday, 22 April 2020

शेती-मातीशी नाळ जोडणारा वऱ्हाडी काव्यसंग्रह म्हणजे "जागल"

 Date: 20 Apr 2020

शेती-मातीशी नाळ जोडणारा व-हाडी काव्यसंग्रह म्हणजे-"जागल"

~~~~~~~~`~~~`~~~~~~~~~~~~~~~~~~~~

                 शेतकऱ्याची नाळ मातीशी जोडलेली असते. असा शेतकरी पुत्र असलेला व-हाडी भाषेला आई माननारा, पेशाने जरी शिक्षक असला तरी शेतीशी, शेतातल्या मातीशी नाळ जोडणारा कवी म्हणजे अरुण विघ्ने सर यांचा दुसरा काव्यसंग्रह म्हणजे जागल होय एका शेतकऱ्याचे सर्व स्वप्न निसर्गावरच अवलंबून असते.निसर्गाने साथ दिली तर शेतकरी शेती पिकवू शकतो. आणि त्याच्या भरवशावरच जगू शकतो. म्हणून शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात ....
              कवी अरुण विघ्ने सरांचा  हा व-हाडी  काव्यसंग्रह म्हणजे आपली बोलीभाषा व-हाडीचा गोडवा,सुरेख पद्धतीने मांडला आहे. "जागल" म्हणजे शेतकरी रात्रीला शेतामध्ये पिकांची किंवा धान्याची राखण करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी शेतात बसतो,कुणी गुरंढोरं, जनावरे आपल्या पिकांची हानी करू नये म्हणून राखण करत बसतो ती जागा म्हणजे जागल होय....
             "जागल" या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके व आकर्षक असून त्यावर पौर्णिमेचा चंद्र उगवला आहे.अशा पौर्णिमेच्या रात्रीला शेतकरी शेतावर जागरण करण्यासाठी, धान्यांच, पिकांची राखण करण्यासाठी  शेताला जाताना चित्र आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये वेळूची काठी आणि डाव्या हातामध्ये कंदील आहे. त्याला अंधार या रस्त्यावरून मार्ग दाखवण्यासाठी, स्वतःचे रक्षण करण्यासाठी, शेतकऱ्यांनी आपल्या हातात कंदील घेतले आहे...व हातामध्ये काठी घेतली आहे. एका शेतकऱ्यांना पीक काढायचे म्हणून रात्रंदिवस कष्ट करावे लागतात हेच सांगणारे हे मुखपृष्ठ शेतकऱ्या विषयी आपुलकी, स्नेह, आदर, निष्ठा व कष्टाची जाणीव करून देणारा हा शेतकरी आपल्या हाडांची काडं करून जगाचं पोषण करत असतो.
            प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने सर यांचा जागल या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संवेदना प्रकाशन नागपूर यांनी केले आहे. तर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रेखाटन केली आहे. या काव्यसंग्रहाची किंमत१५०/ रुपये असून त्यात एकूण .१५०.पृष्ठेआहेत...प्रस्तावना प्रसिद्ध वराडी कवी श्री. पुष्पराज गावंडे अकोला यांची लाभली आहे. यात एकूण ८५ व-हाडी कविता निसर्ग व मातीशी नाळ जोडणाऱ्या मराठी पण व-हाडी भाषेत आहेत .सुप्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर नागपूर यांनी पाठराखण शुभेच्छा देऊन केली आहे.
               विदर्भातली बोली भाषा म्हणजे व-हाडी भाषा होय. व-हाडी कविता म्हणजे व-हाडीचा अस्सल बाज, मराठीचा अस्सल साज, व-हाडी भाषा नरम-तलम -मुलायम आणि गुळाइतका गोडवा  भरणारी आहे. कुणीही तिच्या प्रेमात पडावे इतकी मधुर भाषा याच भाषेचा साज चढवत 'जागल' हा काव्यसंग्रह नटला आहे.
  
              *ल्याली श्रृंगार माती*
              *तिले हिरवाकंच शालू*
              *नखशिखांत सजली*
               *मह्या व-हाडीची कालू...!!*

        मातीशी घट्ट नाळ जोडणारा कवी म्हणतो यांनी शृंगार माती. मातीने शृंगार केला आहे. आणि या धरतीने हिरवा शालू जनू घातलाय आणि नव्या नवरीसारखी ही माती नटुन-थटुन बसली आहे. माझ्या व-हाडी ची काळी माती ही अगदी नवीन नवरी सारखीच भासते आहे असे कवीला वाटते.

         अलंकार झाडाझुडपांची 
         कशी दिसते नवी नवरी 
         नाकीडोळी रूपवान
         पोत दव मोत्या नवी कोरी....!!

     ही माती जिच्यावर शेतकरी बळीराजाचे पोट आहे. बळीराजाच्या जीवांवर अख्खं जग पोसतं आहे.अशी ही पावित्र्य माती या पवित्र मातीने झाडाझुडपांचे अलंकार जनु घातले आहेत. नव्या नवरीसारखी नटुन थटुन बसली आहे. नाका डोळ्यांने देखणी,रूपवान असणारी आणि तिच्या पानावरचे दव हे जणू तिच्या गळ्यातली पोतं म्हणजे मंगळसूत्रा प्रमाणेच कविला भासत आहेत. कवीला माती हिरवा साज लेवून नवीन नवरी सारखी दिसत आहे. श्रावण मासात ही माती. ही काळी आई जणू हिरवा शालू घालून नेसून बसते असे सर्वांना वाटते. तीचं अनोखं रूप पाहून मानवाला निसर्गाची भुरळ पडते. आणि या मातीवर झाडंझुडपं येतात ते झाडंझुडपं म्हणजे जनू मातीच्या अलंकाराचं आहेत. त्या अलंकार मुळे नवीन नवरीसारखी ही धरणीमाय शोभून दिसते आहे....

         *आता लागला मिरुगं* 
         *माती ढगाकळं पाहे*
          *कवा येसीन पावसा?*
          *वाट भीरभीर पाहे....!!*

          *येनं येनं गा पावसा*
          *कास्तकार पाहे वाट*
          *तुह्या स्वागताले उभं*
           *माह्य बियानाचं ताट.....!!*

      मराठी भाषेचे हे बोल काळजाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. अशी मृदू,कोमल भाषा एक वेगळा साज लेवून मराठी व-हाडी भाषेत कवींनी मांडली आहे. उन्हाळ्यात मातीची ढेकळं तप्त उन्हात तापून मृग पावसाची वाट बघत असतात. मृग नक्षत्रामध्ये आभाळात ढग दिसायला लागतात.तसे शेतातली ढेकळं आभाळाच्या दिशेने पावसाची वाट बघत असतात.कधी एकदा पाऊस येईल आणि तहानलेल्या मातीला तृप्त करून जाईल अशी आशा मातीला असते. पाऊस राजा कधी येणार? याची वाट माती पाहते. खूप आतुरतेने जसे गोठ्यातले वासरू आपल्या आई ची वाट पाहते तसे शेतकरी राजा आभाळाकडे रोज पावसाची वाट आतुरतेने पाहत असतो. पाऊस यावा म्हणून मनोमन प्रार्थना करीत असतो. बळीराजा बी बियांणे घरी आणून ठेवून पावसाची वाट देवाप्रमाणे पाहत असतो. पावसाच्या स्वागताला हाती बियाणाचे ताट  घेऊन शेतकरी उभा असतो. पाऊस हा शेतकऱ्याचा श्वास आहे. पाऊस आल्यावर शेतकरी जिवंत असतो. दुष्काळ पडल्यानंतर जिवंत असून मेल्या सारखाच असतो....

       माती उगवते झाळं
       धांडे उगवते कणसं 
       या दाण्याची भाकर
       जगवते सारी माणसं...!!

       मातीतच जलमते
       मातीतच पुरते 
       मातीचा थो गोया
       मातीतच जगवते....!!

    मराठी भाषेत झाडाला झाळं म्हणतात...मातीत झाडे उगवतात आणि ही झाडे,फुले,फळे, पाने, औषधी वनस्पती,डिंग,कागद,बिया इत्यादी देतात. ज्या मातीत झाडाचे पोषण होते त्याच मातीच्या जीवावर शेतकरी व जग जगते.म्हणून जन्म देणारी आपली आई जरी असली तरी जगवणारी माती सुद्धा आपली काळी माय आहे दुसरी आईच आहे. आपण या मातीत उगवणाऱ्या पिकावर जीवन जगतो. माती नाही तर काहीच नाही. मातीत धान्य उगवते आणि धान्यावर जगातली सारी माणसं जगतात.
      माणूस जरी मानवाच्या पोटाला जन्माला आला तरी नऊ महिन्यानंतर गर्भाच्या बाहेर आल्यापासूनच जगणं आपलं मातीवरच अवलंबून असतं. आणि शेवटी माणूस मेल्यावर सुद्धा याच काळ्य आईच्या कुशीत जातो. माणूस मातीचा गोळा. शेवटी माती
च जगवते.
    "जागल"  करणारा शेतकरी खूप कष्टाने, घामाने, आपले शेत भिजवतो आणि पिकवतो. त्याला सत्याची, नीतिमत्तेची,चांगल्या विचारांची, पेरणी करतो. त्याची काळजी, घरादाराची लेकीसुना, बाळांची यासाख्या जगाचा पोशिंदा हा शेतकरी स्वाभिमानाचं खत घालून,रक्ताच पाणी करून, विज्ञानाची कास धरून, अपार मेहनत करून, धान्य पिकवत असतो. असा हा मराठी भाषेतला शेतकऱ्याविषयी प्रेम, जिव्हाळा, आदर,पुढच्या तरुण पिढीला शेतीविषयी आवड निर्माण करणारा, व-हाडी मातीला माय म्हणून संबोधणारा व काळ्या मातीच्या प्रति ऋण व्यक्त करणारा काव्यसंग्रह खरोखरच वाचनीय व तरुण वर्गाला दिशादर्शक असा आहे. तो सर्वांनी अवश्य वाचावा असाच आहे. शेतकऱ्याविषयी अतोनात प्रेम असणाऱ्या, संवेदनशील मनाचे कवी अरुण विकणे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....


     लेखिका/समिक्षिका/शिक्षिका/कवयित्री
    कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
     मु.पो.कोकलगाव
    ता.जि.वाशिम
     पीन ४४४५०५
     मो.९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment