Wednesday, 14 November 2018

दिवाळी नंतरचे चार दिवस...

*स्पर्धेसाठी लेख*

*विषय-दिवाळी नंतरचे चार दिवस*

*अगदी खराखुरा स्वतः अनुभवलेला लेख*

दिवाळीच्या सुट्ट्या लागणार या ओढीनेच स्वजिल्ह्यात दिवाळी सणाला जाण्यासाठी  चार दिवस अगोदरच बॅग भरून ठेवलेली. दिवाळी सुट्टी एकदाची लागली रे लागली की बॅग उचलायची आणि गावाला निघायचं...गावाची ओढं काही वेगळीच असते.दिवसभर प्रवास करून सुध्दा मन थकलं नव्हत.पावलं घराच्या दिशेनं आपोआपच वळत होती.घरात प्रवेश केल्याबरोबर अंगणी दिवे लावलेली होती.दिव्यांच्या प्रकाशाने अंगण व मन दोन्ही उजळून दिसत होतं...घरात प्रवेश केल्यावर फराळाचा खमंग वास येत होता.बुंदीचे लाडू हसत होते,करंज्या समाधानानं फुगून बसल्या होत्या.चकल्या मनाला गरगर फिरवत स्वतःकडे ओढत होत्या.शंकरपाळे खळखळून हसून फुटली होती.कुरकुरीत चिवड्याचा खमंग वासनांध घर डोलत होतं अनारशी गालात हसत होती.आणि बालुशाही गड जिंकून आलेल्या राजासारखी ऐटीत बसली होती...फटाक्यांची अतिशबाजी अजिबातच नव्हती...पण दिव्याच्या,लाईटींगच्या माळांनी घर चमकत होती...
      नवख्या माहेरवाशिनीनी माहेरी हजेरी लावली होती.उटण्याचा सुगंध घरभर पसरला होता.सकाळी सकाळी पहाटेला मोती साबणाचा सुवास अंतरमनाला प्रफुल्लित करत होता...बघता बघता लक्ष्मीपुजन झाले.गुडीपाडवा झाला.आणि भाऊबीज ही झाली आणि पाच दिवसात दिवाळी संपलीही...त्यानंतर दिवाळीनंतरचे चार दिवस सर्वत्र शांतता होती.हळूहळू रोशनाई कमी होत होती.
    इकडे मला एक वेगळीच ओढं लागली होती ती म्हणजे माझ्या  *डि.एड्* काॅलेजचं गेट टुगेदर ठरलेलं त्याची एक महिना व्हाॅटस्प ग्रुपवर नियोजन अगोदरच ठरलेलं..मी बॅग भरायला सुरूवात केली.घरातून केंव्हा निघायचं,कुठं थांबायचं? कोणती साडी घालायची?कोणता ड्रेस घालायचा सर्व नियोजन करून लगबगीनं बॅग भरली आणि माझी पावलं ११ नोव्हेंबर ला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्था म्हणजे लठ्ठे ज्यु काॅलेज ऑफ एज्युकेशन आष्टा ता.वाळवा जि.सांगली इकडे निघाली..संध्याकाळी सर्व माजी विद्यार्थी आपापल्या सोईनुसारं येणार होती.रात्र उजाडल्यानंतरचा दिवस म्हणजे गेट टुगेदरचा होता.तब्बल १२ वर्षानी सर्वजण एकमेकांना भेटणार होतो.त्याची एक अनामिक ओढ मित्रमंडळींना तर होतीच पण त्याहीपेक्षा आम्ही जिथे विद्यार्थी म्हणून घडलो त्या आमच्या आदरणीय गुरूजनांना भेटणार होतो.हळूहळू सर्व डि.एड् ची माजी विद्यार्थी
काॅलेजवर जमली सर्वजण मिळून तयारी करू लागली त्यातली काहीजण सुत्रसंचालनाचं नियोजन करत होती तर कुणी शाल,श्रीफळ,गुच्छ,हार इ.ची लीस्ट बनवून ते खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती.मी मात्र माझ्या ग्रंथालय सांभाळणा-या व मुलींच्या हाॅस्टेलवर खूप बारीक नजर ठेवून आम्हांला आईसारखी माया देणा-या आदरणीय पाटील मॅडमला माझे डोळे शोधीत होती.मॅडम ऑफीस मध्ये दिसताक्षणिच अय्या मिनाक्षी कशी आहेस? म्हणून एकदम मिठी मारली आणि मन कसं भरून आलं...त्याचं वर्णन शब्दांत करणं अशक्यच...
      मॅडमसोबत खूप गप्पा मारल्या मग माझ्या सर्व गुरूवर्यानी मला ऑफीसात बोलावून आदराने विचरपूस केली.आदरातिथ्य केले.चहा व नाष्ट्याची सोय आमच्या काॅलेजनीच केली होती.आजी विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या पुतळ्यासमोर सुंदर अशी रांगोळी,फलकलेखन केलं होतं,पाय-यावर सुध्दा खूप छान रांगोळी काढली होती.माझी सर्व मित्रमंडळींनी बारा वर्षानी भेटत होतो.सर्वाच्या चेह-यावर हास्य,समाधान,ओढ,झळकत होती.एकमेकांची विचारपूस केली.ब-याच जणांमध्ये फार बदल दिसत होता.कुणी थोडं जाड झालेली तर कुणी थोडे बारीक झालेली तर कुणाचे केस गेलेले तर मुलांना दाढीमिशा आलेले असे वेगवेगळे चेहरे पण आपापल्या जिल्ह्यात समाधानाने चांगले कार्य करत राहणारे असे सर्वजण भेटलो...
    कार्यक्रमाला सुरूवात झाली.सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुतळ्यास हारार्पण करून सर्वानी मानवंदना केली.व फोटो काढुन त्या गोड आठवणी आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला...आमच्या आदरणीय गुरूजणांनी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.आमच्या वेळी आम्हांला असलेले सर्व शिक्षक आमचे गुरू आमच्या समोर बसले होते प्रत्येकामध्ये बदल दिसत होता.त्यातले सर्वजण रिटायर्ड झाली होती फक्त पाटील मॅडम व पाटील सर हे दोघेच कार्यरत होते.आदरणीय पाटील सर आमचे क्लास टीचर होते ते आता प्राचार्य झाले होते.त्यामुळे ते असेपर्यंतच आम्ही रयत शिक्षण संस्थेला शताब्दीवर्ष व गेट टुगेदरचा संगम याच वर्षी घडवून आणला होता.
      सर्व गुरूवर्याना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सर्वाचा सत्कार करण्यात आला.आजी व माजी अशा दोन्ही गुरूवर्याना सन्मानित केल्याबद्दल आम्हांला फार बरं वाटत होतं.माझा तर आनंद गगणाला मावेनासा झाला होता.कारण सर्व गुरूवर्याच्या चेह-यावर एक वेगळीच चकाकी एक वेगळच तेज दिसत होतं त्यामुळे चेहरा आणखीच खुलत होता.आजी विद्यार्थ्यांनी सुध्दा फार मेहनत घेवून आदर्श असल्याचं सिध्द केलं होतं.आमच्या आजी विद्यार्थ्यांचा सुध्दा काॅलेजच्या वतीने सर्वाचा सत्कार,सन्मान करण्यात आला.आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी जे एका वटवृक्षाखाली ज्ञान घेतलं होतं ते सर्व फांद्या एकत्र येवून काॅलेजसाठी आपापल्या परीने *आर्थिक* कृतज्ञता म्हणून सहकार्य केले.खूप सुंदर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.असं वाटलं आयुष्यातला एक दिवस संपुर्ण गोष्टीचा विसर पडला होता.आमच्या डोळ्यासमोर फक्त डि.एड् चे ते दिवस आणि आठवणी समोर दिसत होत्या...
      बघता बघता चार कधी वाजले समजलेच नाही आणि मग घरी जायची लगबग प्रत्येकाची सुरू झाली.महाराष्ट्रातच्या कानाकोप-यातून आलेली काॅलेजप्रेमी,मैत्रीप्रेमी मुलं परतीच्या प्रवासासाठी निघाली.मी मात्र एकटी लेडीज असल्याने संध्याकाळचा प्रवास टाळला.आणि आमच्या क्लासमधील श्री.पोवार सर यांच्याघरी निघाली.जाता जाता सरांनी पन्हाळा,शूरवीर शिवा काशीद यांची समाधी स्थळ भेट,आणि ज्योतीबाचे दर्शन करून घरी पोहचलो...कोल्हापूरचा ज्योतीबाच्या डोंगरकुशीत वसलेले पोवार सरांचे पोहाळे गांव खूप सुंदर आणि तिथली साधी पण मोठ्या मनाची माणसं दाट घरांमध्ये राहत होती.छोटंसं पण टुमदार गांव ज्योतीबाच्या डोंगरकुशीत वसलेले पण सर्वत्र हिरवाईने नटलेलं मनाला फार आल्हाददायक वाटलं.मी मुळतः मराठवाड्यातली असल्यानं असं गावाशेजारी डोंगर कधी पाहिलाच नव्हता..सरांच्या घराशेजारी हिरवागार ऊस पहायला मिळाला...एक रात्र मुक्काम करून दुस-या दिवशी माझ्या परतीच्या प्रवासासाला निघाले..आणि असा तीन दिवसाचा माझा प्रवास करून न केल्यासारखा वाटत होता कारणं आपल्या काॅलेजला आपण दिलेली  भेट कायम नजरेसमोर दिसत होती त्यामुळेच सारा शीण गेला असावा....

*लेखिका-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*

*लेख आवडला असल्यास जरूर प्रतिक्रिया कळवा प्रवासवर्णन पहिल्यांदाच करण्याचा एक प्रयत्न*

1 comment: