Friday, 10 June 2022
http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी...
http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी...: *बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे "धाडसी राम"* बुलढाणा जिल्ह्यातील प्रा...
Tuesday, 31 May 2022
कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी महाराष्ट्रातील समिक्षा केलेल्या पुस्तकांची यादी व लेखकांची नावे...६१ पुस्तक पुर्ण
*कवयित्री मिनाक्षी नागराळे यांनी समिक्षा केलेल्या पुस्तकांची यादी व लेखकांची नावे*
१)वादळातील दीपस्तंभ-अरूण विघ्ने
२)जागल-अरूण विघ्ने
३) शेतकरी जगला पाहिजे- श्रीहरी येशु जाधव, उस्मानाबाद
४) अस्वस्थ स्पंदने-हिराचंद देशमाने, उस्मानाबाद
५)अंतर्मन-हिराचंद देशमाने, उस्मानाबाद
६)आभाळ पेलताना-सौ.सुमताई पवार, उस्मानाबाद
७)डिझेलगाडी-शफी बोल्डेकर, हिंगोली
८)ऐसा घडवू बालक-उषा ढेरे,बीड
९)गाठी ॠणानुबंधाच्या-सौ.संगीता पवार, बुलडाणा
१०) शिवगर्जना-शिवकवी ईश्वर मते-अकोला
११)पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांची गाणी-रामदास राजेगावकर, बुलडाणा
१२)समतेचे महाकाव्य-महाग्रंथ
१३) आयुष्याच्या पानावर-अरूण पुराणिक,पुणे
१४)धाडसी राम-प्रा.देवबा पाटील
१५)नाते मनाशी मनाचे-रमेश जाधव,पुणे
१६) जीवनाच्या पायवाटेवर-प्रिती भिसे,पुणे
१७)चला खेळूया शिकूया-सोपान बंदावणे,पुणे
१८)मौनातील अर्थ-प्रा.त्रिशीला साळवे,धुळे
१९) सृष्टीकाव्य- माधुरी काकडे,पुणे
२०)प्रेमकमळ-देवबा पाटील, बुलडाणा
२१)बदबदी काठची सोनपावलं-रत्नाकर उपासे, उस्मानाबाद
२२) गावठी गिच्चा-सचिन पाटील,सांगली
२३)बिंब-प्रतिबिंब-कल्याण राऊत,लातूर
२४) शिकार(कथासंग्रह)-प्रा.डॉ.युवराज पवार,जळगाव
२५) जीवन संघर्ष-नवनाथ रणखांबे
२६)निष्पर्ण वेदना-शरद कवठेकर
२७)माझे आनंदाचे गाणे-डॉ कैलास दौंड, अहमदनगर
२८) इजू-(आत्मचरित्र)विजय वडवेराव,पुणे
२९)आम्ही माणसं मातीचे- गजानन मते, अमरावती
३०) बारीकसारीक गोष्टी (कथासंग्रह)- शिरीष पद्माकर देशमुख
३१)उजेडाच्या दिशेने निघालो-अरूण विघ्ने
३२) बाभळीचा काटा-विजय वडवेराव
३३)अक्षरबाग मधाळी-विजय वडवेराव
३४)विठुमाऊली की विठोबा-गणेश भाकरे
३५)गायी गेल्या राना-रविंद्र जवादे
३६) शब्दफुलांची शिदोरी-संतोषकुमार उईके, चंद्रपूर
३७) फुलोरा-सतीश खरात, वाशिम
३८)नभाची कोडी-प्रा.देवबा पाटील, बुलढाणा
३९)मी संदर्भ पोखरतोय-पवन नालट
४०) प्रश्न टांगले आभाळाला-नितीन देशमुख, अमरावती
४१)वात्सल्यसूक्त-प्रकाश जडे, सोलापूर
४२)ती अशीच आहे-चित्रा पगारे,मीता नानवटकर
४३)झालं कोरडं आभाळ-गणेश भाकरे, नागपूर
४४) प्राजक्त-प्रिती भिसे,पुणे
४५) नंदादीप-प्रिती जगझाप, चंद्रपूर
४६)फातिमाबी शेख-अनिसा शेख,दिलशाद सय्यद
४७)काव्यमनिषा-मनीषा रायजादे, सांगली
*बाकी*
४८)आरसा गमावलेली माणसं-विद्या प्रशांत जाधव, अहमदनगर(चालू आहे)
४९)गंमत जत्रा-स्मिता मुराळी, सोलापूर
५०) रंगनाथ तिवारी-प्रा.डॉ.दीपक सुर्यवंशी, उस्मानाबाद
५१)बा स्वातंत्र्या-शंकर घोरसे, नागपूर
५३) पिंपळ व्हायचंय मला-अरूण विघ्ने,वर्धा
५४)गावगप्पा (कथासंग्रह)-संजय महल्ले अमरावती
५५)काईमेरा(कादंबरी)-संजय महल्ले,अमरावती
५६)वारसा शिल्पकलेचा-संदीप राक्षे पुणे
५७)मधुसिंधू-माधुरी मगर/काकडे
५८) आगंतुकाची स्वगते-डॉ.कैलास दौंड
५९) अंतरातील मोरपिसे-अरूण पुराणिक पुणे
६०)बुध्द गौरवशाली मार्गदाता,चित्रा पगारे, जळगाव
६१) हिरकणी-शुभांगी पवार,सातारा
बाकी
ओरबीन कादंबरी,गोवा
बाईचं बाईपण जपणारा काव्यसंग्रह म्हणजे-हिरकणी
*बाईचं बाईपण जपणारा काव्यसंग्रह म्हणजे-हिरकणी*
सातारा जिल्ह्यातील आदर्श शिक्षिका ते कवयित्री शुभांगी विलास पवार( कंदी पेढा ) यांचा 'हिरकणी' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अजिंक्य प्रकाशन, वाशिम यांनी, तर प्रकाशक ॲड जयमला भगत यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती २५ मार्च २०२० रोजी प्रकाशित झाली. स्त्रीचं जगणं सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे हिरकणी. या काव्यसंग्रहाचे मुल्य केवळ १५० रुपये असून यातल्या अनेक कविता स्त्रीला प्रेरणा देणाऱ्या व स्त्री जीवनाचे यथार्थ चित्रण करणा-या आहेत. या काव्यसंग्रहाला अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा लागल्या असून प्रस्तावना अंजली श्रीवास्तव करमाळा यांची लाभली आहे.
शुभांगी विलास पवार या मुळात शिक्षिका असल्याने वाचन व लेखन हा त्यांचा अंगच आहे. स्त्री मनातील वादळे काही स्त्रियांना कागदावर लिहून व्यक्त करायला आवडतं. तर कांही स्त्रियांना नटायला थटायला आवडतं,काही स्त्रियांना शॉपिंग करायला आवडतं तर कांही स्त्रियांना फिरायला जायला आवडतं.कांही स्त्रियांना स्वतःच्या भावनांना शब्दबद्ध करून मोती गुंफायला आवडतं. अशीच होती गुंफलेल्या आहेत शुभांगी पवार या कवयित्रीने. सुंदर साध्या शब्दात व्यक्त झाल्या आहेत. प्रत्येक स्त्री ही स्वत:साठी फार कमी जगते. ती दुसर्यासाठीच जगते.सदैव घरच्यांची काळजी घेण्यातच आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडत स्त्री जगत असते.
कुठवर सहन करायचं?
असं दास्यत्वाचं जगणं
हास्याची मुखवटे चढवून
कृत्रिमपणे वागणं....!!
वरील ओळीतून कवयित्री शुभांगी पवार यांनी स्त्रीचं दास्यत्व कधी संपेल? कुठवर स्त्रीनेच सगळं सहन करायचं? स्त्रीला अजून कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरी चेहऱ्यावर मात्र हास्याचा मुखवटा लावून कृत्रिमपणे जगायचं असतं.अशा काळीज चिरणाऱ्या या ओळी वाचकाच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत.
खरं सांगा ना मला आई बाबा तुम्ही
तुम्हाला कसं काहीच आपलेपण वाटलं नाही
माझं गर्भातील अस्तित्व 'मुलगी' म्हणून खोडताना
तुमच्या डोळ्यात टिपूसभरसुद्धा पाणी का हो दाटलं नाही.
वरील ओळीतून कवयित्री शुभांगी विलास पवार यांनी तमाम गर्भपात करणार्या बाबांना हा प्रश्न विचारला आहे.केवळ मुलगी म्हणून जर मुलीचा गर्भपात किंवा हत्या करत असाल तर तो ही तुमचाच अंश आहे ना. तिची हत्या करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मुलगी म्हणून माझं अस्तित्व खोडताना. माझी गर्भातच हत्या करत असताना तुमच्या डोळ्यांत टिपूसभर सुद्धा पाणी दाटले नाही. असं कोवळ्या कळ्यांना गर्भातच खुडून टाकणाऱ्या सर्व कळ्यांच्या वतीने कवयित्रीने खडा सवाल केला आहे. वरील ओळी स्त्रीची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकणाऱ्या व प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकणा-या आहेत.
जातीभेदाचे मूळ सगळ्यांच्या
डोक्यात घट्ट रुजलय
त्याचबरोबर रूढीचे तणही
चांगलंच माजलय...!!
अजूनही लढतोय लढाई
माणसातील मानवतेसाठी
शोधतोय औषध
जातरुपी दानवतेसाठी....!!
आज आपण पाहतो भारत देश माझा आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.असे म्हणणारे लोकं जातीभेदाचे मूळ आपल्या डोक्यात घालून आपल्याला जाती धर्मांना भडकवण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. प्रत्येकाने आपापले झेंडे पकडले आहेत. त्यांचे रंगही वाटून घेतले आहेत. एवढेच काय तर महापुरुष सुध्दा वाटून घेतले आहेत. येणार्या पुढच्या पिढीलाही ते शिकवणार आहेत. त्याच बरोबर रूढीचे तन सुद्धा चांगलेच माजलेले दिसते. कुणीतरी माणसांतील माणूसपण जपणारा आहे का? माणसातील मानवतेसाठी कुणी औषध शोधणार आहे का? जातरूपी दानवतेसाठी औषध मिळालं तर बरं होईल असं जळजळीत वास्तव तमाम जातीचे स्तोम मांडणाऱ्या मनुष्य नावाच्या प्राण्याला कवयित्री शुभांगी पवार यांनी प्रश्न विचारला आहे.
हिरकणी बनून आपल्या बाळासाठी
ती झाली अमर
आजची नारी रोजच
लढते आव्हानांचे समर....!
इतिहासकालीन हिरकणीचा इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात हिरकणी गडावर दूध घालायला गेली आणि गडाचे सर्व दरवाजे बंद झाले होते. हिरकणी लहान बाळाला घरी सोडून गडावर दूध घालायला गेली होती आणि सायंकाळ होताच गडाचे सर्व दरवाजे बंद झाले तेंव्हा हिरकणी गडाच्या आतच राहिली आणि बाळाच्या प्रेमापोटी अवघड बुरुज उतरून खाली आली. छत्रपती शिवरायांनी या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले. तेंव्हाच्या हिरकणीचा संघर्ष ते आजच्या हिरकणीचा होणारा दररोजचा संघर्ष काही वेगळा नाही.आजच्या काळातल्या हिरकणी सुद्धा दररोज वेगवेगळी आव्हाने पेलत आहेत. स्त्रियांचा संघर्ष, बाईच बाईपण सांगण्याचा प्रयत्न शुभांगी पवार यांनी केला आहे.
निष्पाप त्या कळीला
काय कळलं होतं जग
उमगल्या आधीच जाणवली
भोगवाद्यांच्या वासनांची
किळसवाणी धग...!!
वरील ओळींमधून कवयित्री शुभांगी पवार यांनी एखाद्या मुलीवर वयात येण्याअगोदरच अत्याचार होतो. तीला जगही कळलं नव्हतं. आणखीन ऐन तारुण्यात येण्याअगोदरच वासनांध कुत्र्यांनी तिच्यावर हात मारला. असे कितीतरी उदाहरणे आपण पाहतो. कोपर्डी, निर्भया अशा किती मुलींना हैवानांनी शिकार बनवून त्यांचे आयुष्य संपवले आहे. अशा लोकांची चीड संवेदनशील मनाच्या कवयित्री वरील ओळीतून व्यक्त करतात.
जीवन जगण्याची कला
शिकायला हवी माणसानं
क्षुल्लक त्या अपयशाने
खचू नये उगी माणसानं...!!
जीवन जगण्याची एक कला असते. ती साधता आली म्हणजे जिवनाच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. माणसाला कितीही अपयश आले तरी माणसाने कधीच खचून जाऊ नये.वा कधी हारही मानू नये.सतत प्रयत्न केले पाहिजे. तो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो.असा खूप छान संदेश कवयित्री शुभांगी पवार यांनी दिला आहे.
खुर्चीचे डोहाळे,स्वार्थाची परिभाषा,झोपडीत या माझ्या, स्वार्थ, मोल पाण्याचे, कुठवर सहन करायचं, बाप, निष्पाप कळी, हिरकणी, गाव तसं भलं, सलगी, धरसोड नात्यांची इत्यादी कविता अत्यंत वाचनीय आहेत.
संवेदनशील मनाच्या कवयित्री शुभांगी पवार यांनी अनेक सामाजिक, शिक्षण व्यवस्थेला बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या मुक्तीवर काव्यमाला गुंफलेल्या आहेत.
कवयित्री शुभांगी विलास पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
Friday, 27 May 2022
सुख-दु:खाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.
सुख-दुःखाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे*
पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेखक /कवी अरुण पुराणिक यांचा अंतरातील मोरपिसे हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. यापूर्वी त्यांच्या आयुष्याच्या पानावर आणि पाऊलवाट हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अंतरातील मोरपिसे या ललित संग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अंड डिस्ट्रीब्युटर्स पुणे, यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ३० जून २०२१ रोजी प्रकाशित झाली आहे.या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट एक मनमोहक, सुंदर मोरपीस आहे.याचे मूल्य केवळ शंभर रुपये असून प्रस्तावना श्री संजय कुळये (कवी व गझलकार) रत्नागिरी यांची लाभली आहे. अंतरातील मोरपिसे म्हणजे आठवणींचे प्रतीक, आठवणींचा कल्लोळ,आठवणींना उजाळा देणारा लेखसंग्रह, भावभावनांचा कल्लोळ म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.
लेखक/ कवी असणारे अरुण पुराणिक यांनी वयाच्या पंच्याहत्तरी ओलांडले तरीही प्रचंड उर्जेने भरलेले आहेत. अरुण पुराणिक म्हणजे एक वेगळं रसायन आहे. अरुण पुराणिक यांना कविता लेखनाचा छंद पूर्वीपासूनच होता. त्यात व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक लेख,काव्य वाचनात आले आणि त्यांनी रोज एका नवीन विषयाला हात घालत आपल्या लेखनाचा उपयोग ललित लेख करायला सुरुवात केली. पहिल्या ललित लेखांमध्ये श्री गणेश वंदनाचे महत्व, गणेशाची प्रतिष्ठापना कशी केली जाते? सोंडेच्या अग्रभागावरून गणपतीचे पडणारे प्रकार, गणपतीच्या पूजनाचे महत्त्व,गणपती म्हणजे पती किंवा नेता. गणपतीलाच शक्ती विधायक म्हणतात. गौराईचे महत्व, गौरीपूजन, यथासांग पूजाविधी, अरुण पुराणिक यांनी सांगितले आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव याला खूप महत्व दिले गेले आहे. महाराष्ट्रात तर एकामागून एक सणांची मांदियाळी सुरूच असते. ऋतूचक्रा नुसार सण सुध्दा फिरून फिरून येतात. महाराष्ट्रात मराठी नववर्ष हे गुढी पाडव्यापासून सुरू होते. ते वर्षाअखेरीस सण म्हणजे होळी पौर्णिमा व धुलीवंदन हा असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा म्हणतात. हा वर्षातला पहिला व साडेतीन मुहुर्तातला एक सण आहे.
तुळस तुझ्या अंगणीचे या ललित लेखांमध्ये वारकरी संप्रदाय तुळशीचे महत्त्व सांगितले आहे.आईचे महत्व मातृदेवो भव या लेखांमध्ये आईची महती देवासमान आहे असे अरूण पुराणिक यांनी सांगितले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या उक्तीप्रमाणे आई नसलेला देव सुद्धा भिकारी असल्याप्रमाणेच आहे. असे लेखक अरुण पुराणिक म्हणतात.
जसे दुःखामागून सुख येते आणि सुखामागून दुःख हे येतेच.सुख, शांती ही सुखाची परिभाषा या लेखात सुखदुःखाची सरमिसळ चांगल्या पद्धतीने अरुण पुराणिक यांनी सांगितलेली आहे. मनाची अवस्था या लेखात मनाला दार असतं तर..मन कसं सुसाट पळत... पळत एकेकालाही मागे टाकतो आणि दुसर्या क्षणी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन परत आलेलं असतं. मन हे सदैव स्थिर नसतं. अशी मनाची व्याख्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.
कवी अरुण पुराणिक यांनी मनाची अशी व्याख्या सांगितली आहे. अशीच व्याख्या ज्ञानार्जन ललित लेखात ज्ञानार्जनाची व्याख्या सांगितली आहे.ज्ञानार्जन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने जोपासले पाहिजे. ज्ञानाचा वटवृक्ष होऊन त्याच्या फांद्या सर्वत्र पसरण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.त्यामुळे विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. कोणतेही काम करायचे असेल तर तयारी लागते. मी आणि सायकल या लेखामध्ये अरुण पुराणिक यांनी त्यांच्या जीवनातील सायकलचा प्रवास किती सुखकर होता हे सांगितले आहे. आजच्या काळात प्रत्येक मनुष्य कोणाला कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासलेला आहे. आजीचा बटवा या लेखामध्ये छोट्या छोट्या आजारांवर घरगुती उपाय किती महत्त्वपूर्ण असतात? याचे महत्त्व या लेखात सांगितले आहे.
मानवाच्या जन्मात मानवी अवस्थांचे महत्त्व जास्त असते. शेवटची अवस्थामध्ये वृध्दावस्था आणि आजच्या काळात होऊ घातलेली वृद्धाश्रम व याची उकल मानवी अवस्था या लेखात अरुण पुराणिक केल्याशिवाय राहत नाहीत. पण मला वाटतं वृद्धावस्था ही समस्या नाही आपण जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले वृध्दाश्रम निघणार नाहीत. संस्कार आणि नम्रता, आजी आणि आजोबा हे लेख खूप वाचनिय आहेत. पंच्याहत्तरीच्या जवळपास असलेले कवी लेखक अरुण पुराणिक यांना वाचनाचा व लिखाणाचा छंद आहे. हे कौतुकास्पदच आहे. अरुण पुराणिक यांच्या आठवणी म्हणजे अंतरातील मोरपीस होऊन कडू-गोड आठवणीचे अंतरातील मोरपिस होय.
कवी अरूण पुराणिक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता. जि. वाशिम
Wednesday, 25 May 2022
ग्रामिण मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे-आगंतुकाची स्वगते
*ग्रामीण मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे- आगंतुकाची स्वगते*
अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी डॉ. कैलास दौंड यांचा पाचवा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. गावच्या मातीची ओढ असणारा कवी डॉ. कैलास दौंड यांच्या यापूर्वी 'उसाच्या कविता' हा पहिला काव्यसंग्रह त्यानंतर वसाण,भोग ,सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा आणि त्यानंतर पाचवा काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चपराक प्रकाशन, पुणे, प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती १२ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ११० रुपये असून सर्वच कविता गावाची ओढ लावणार्या आहेत.
डॉ. कैलास दौंड हे गाव-खेड्यात राहणारा सामान्य माणूस पण कविता लेखनाचा छंद त्यांना २००१ सालापासून झाला. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातल्या नामवंत मासिक, साप्ताहिक,दिवाळी अंक तसेच अनेक दैनिक वृत्तपत्रातून सतत प्रकाशित होत असतात. या काव्यसंग्रहातील पहिली कविता वाचकाला खूप भावते. शेतकऱ्याचे जगणं कसं असतं ? याचे चित्रण चित्रफिती सारखे डोळ्यासमोरून तरळून जाते.
जमुनिया ढग आभाळात आले
कुणब्याचे मन वावधानी झाले
पावसाचे वारे फिरले बाजारी
कुणब्याची माय पडली आजारी..
जगाचा पोशिंदा असलेल्या कुणब्याला ढग आभाळात आले की कुणब्याच्या मनाची अवस्था सैरवैर होते. बी-बियाणे कशाने आणायचे? खत नांगरणी पेरणी कशाने करायची? या विचाराने शेतकरी हवालदिल होतो. जसे पावसाचे वारे येईल तसे कुणब्याचे मन बाजारी फिरून येते. कारण कुणब्याची माय म्हणजे त्याची शेती. त्यासाठी त्याच्या कडे पैसे नसले की कुणाला बी-बियाणे घेण्यासाठी सावकाराच्या व्याजाचा फास दिसायला लागतो आणि मग दुसरा पर्यायही नसतो. 'कुणब्याचे मन' हे जगण्याचा अर्थ शोधणारी कविता थेट वाचकाच्या काळजाला भिडते.
गोंदलेले मातीवर
बांधांचे चौकोन
तसतसे खुजे झाले
माणसाचे मन
पाणी मातीस शोधते
रुजताना खोल
अख्ख्या नदीला मिळेना
माणसाची ओल....!!
वरील ओळीतून डॉ. कैलास दौंड यांनी खूप अर्थगर्भित मतितार्थ मांडला आहे. नांगरलेल्या मातीवर शेतात जसे बांध घालून त्याचे चौकोन आखले जातात. अगदी त्याप्रमाणेच आज माणसाची मनी देखील खुजी झाली आहेत. माणसाच्या मनाचा खुजेपणा स्पष्ट दिसून येतोय. आज नात्यात देखील प्रेम राहिलेले नाही. पाणी मातीत शिरताना जसे खोल खोल जाते. तसे अख्ख्या नदीत जरी पाहिलं तरी माणसाला माणुसकीची ओल मिळत नाही. माणसामाणसांमध्ये देखील मायेचा ओलावा राहिलेला नाही. अशी खंत वरील ओळीतून कवी कैलास दौंड यांनी केली आहे.
आहे आजव मरणाची आस बाळगणार्या
म्हातारीला चकवून गेला म्हातारा देवाघरी
लेकराच्या हातावर फुटका रुपया ठेवायला
न धजावणारा म्हातारा
म्हातारीच्या हातावर देऊन गेलाय तुरी...
समाजातलं भयाण वास्तव कवी डॉक्टर कैलास दौंड यांच्या कवितेतून दिसून येते.वृद्धपणी नको असलेलं, खंगत चाललेलं शरीर. त्यात म्हातारा म्हातारीच्या जीवाला चुटका लावून देवाघरी निघून जातो. लेकरांच्या हातावर फुटका रुपया ठेवायला न धजावणारा म्हातारा म्हातारीच्या हातावर तुरी देऊन जातो. न सांगताच म्हातारीची नजर चुकवून जातो. आज कित्येकांना वृद्धा मायबाप नकोशी वाटतात. त्या मायबापांनी स्वतः खस्ता खाऊन मुलांना लहानाचं मोठं केलेलं असतं शेवटी तेच मायबाप म्हातारपणी मुलांना ओझे वाटायला लागतात. अशी खंत वरील कवितेतून दिसून येते.
कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अगदी ग्रामीण भागाशी, गावच्या मातीची, गावाची ओढ लावणा-या आहेत. इतकंच नाही तर समाजातील भयाण वास्तव,ढोंगीपण, माणसाचा आशावाद, शेतकऱ्याचे जीणं, नात्यांचा ढोंगीपणा, आटत चाललेला प्रेमाचा झरा, हरवत चाललेली माणुसकी, आटत चाललेली माया, गावाची ओढ सोडून शहराकडे चाललेली माणसं, कोपत चाललेला निसर्ग, वावर पडीत ठेवलं तर काय होईल ? असा विचार करायला लावणाऱ्या ओळी, मराठीची गोडी, स्वतःचा शोधणारा तळ, जीवनातले गूढ, हा गाव तुझा नाही, गावाबद्दल असणारी ओढ, गावचे वातावरण, माणसापेक्षा पक्षी थोर, इथे मानवता शहारली. इत्यादी कविता वाचकाच्या काळजाला हात घालणा-या आहेत. कित्येक पिढ्या गमावल्यानंतर ही कविता माणसाला विचार करायला लावणारी आहे. शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणाऱ्या या सर्वच कविता वाचकाला भावल्या शिवाय राहत नाहीत.
कवी डॉ. कैलास दौंडड यांच्या कविता दुष्काळाचा सामना कसा करावा? आज उजाड होत चाललेली गाव, राजकारणांनी नासत चाललेली गाव, विस्थापितांचे शहराकडे निघालेले लोंढे, यावर प्रकाश टाकणा-या कविता आहेत. लेकी-बाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारे चित्र आणि जाती-जातीत गुरफटत चाललेली माणसं अशा सा-या समस्या भीषण, भयाण वास्तव दर्शवणारे काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते होय.
कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अत्यंत वाचनीय व सत्यता मांडणा-या आहेत.या काव्यसंग्रहाची पाठराखण नागनाथ कोतापल्ले( माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद) यांची लाभली आहे.
कवी डॉ.कैलास दौंड यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
समीक्षिका /लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि. वाशिम
Subscribe to:
Posts (Atom)