Friday, 27 May 2022

सुख-दु:खाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.

 सुख-दुःखाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे*

                  पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेखक /कवी अरुण पुराणिक यांचा अंतरातील मोरपिसे हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. यापूर्वी त्यांच्या आयुष्याच्या पानावर आणि पाऊलवाट हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अंतरातील मोरपिसे या ललित संग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अंड डिस्ट्रीब्युटर्स पुणे, यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ३० जून २०२१ रोजी प्रकाशित झाली आहे.या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट एक मनमोहक, सुंदर मोरपीस आहे.याचे मूल्य केवळ शंभर रुपये असून प्रस्तावना श्री संजय कुळये (कवी व गझलकार) रत्नागिरी यांची लाभली आहे. अंतरातील मोरपिसे म्हणजे आठवणींचे प्रतीक, आठवणींचा कल्लोळ,आठवणींना उजाळा देणारा लेखसंग्रह, भावभावनांचा कल्लोळ म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.
             लेखक/ कवी असणारे अरुण पुराणिक यांनी वयाच्या पंच्याहत्तरी ओलांडले तरीही प्रचंड उर्जेने भरलेले आहेत. अरुण पुराणिक म्हणजे एक वेगळं रसायन आहे. अरुण पुराणिक यांना कविता लेखनाचा छंद पूर्वीपासूनच  होता. त्यात व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक लेख,काव्य वाचनात आले आणि त्यांनी रोज एका नवीन विषयाला हात घालत आपल्या लेखनाचा उपयोग ललित लेख करायला सुरुवात केली. पहिल्या ललित लेखांमध्ये श्री गणेश वंदनाचे महत्व, गणेशाची प्रतिष्ठापना कशी केली जाते? सोंडेच्या अग्रभागावरून गणपतीचे पडणारे प्रकार, गणपतीच्या पूजनाचे महत्त्व,गणपती म्हणजे पती किंवा नेता. गणपतीलाच शक्ती विधायक म्हणतात. गौराईचे महत्व, गौरीपूजन, यथासांग पूजाविधी, अरुण पुराणिक यांनी सांगितले आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव याला खूप महत्व दिले गेले आहे. महाराष्ट्रात तर एकामागून एक सणांची मांदियाळी सुरूच असते. ऋतूचक्रा नुसार सण सुध्दा फिरून फिरून येतात. महाराष्ट्रात मराठी नववर्ष हे गुढी पाडव्यापासून सुरू होते. ते वर्षाअखेरीस सण म्हणजे होळी पौर्णिमा व धुलीवंदन हा असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा म्हणतात. हा वर्षातला पहिला व साडेतीन मुहुर्तातला एक सण आहे.
              तुळस तुझ्या अंगणीचे या ललित लेखांमध्ये वारकरी संप्रदाय तुळशीचे महत्त्व सांगितले आहे.आईचे महत्व मातृदेवो भव या लेखांमध्ये आईची महती देवासमान आहे असे अरूण पुराणिक यांनी सांगितले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या उक्तीप्रमाणे आई नसलेला देव सुद्धा भिकारी असल्याप्रमाणेच आहे. असे लेखक अरुण पुराणिक म्हणतात.
              जसे दुःखामागून सुख येते आणि सुखामागून दुःख हे येतेच.सुख, शांती ही सुखाची परिभाषा या लेखात सुखदुःखाची सरमिसळ चांगल्या पद्धतीने अरुण पुराणिक यांनी सांगितलेली आहे. मनाची अवस्था या लेखात मनाला दार असतं तर..मन कसं सुसाट पळत... पळत एकेकालाही मागे टाकतो आणि दुसर्‍या क्षणी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन परत आलेलं असतं. मन हे सदैव स्थिर नसतं. अशी मनाची व्याख्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.
            कवी अरुण पुराणिक यांनी मनाची अशी व्याख्या सांगितली आहे. अशीच व्याख्या ज्ञानार्जन ललित लेखात ज्ञानार्जनाची व्याख्या सांगितली आहे.ज्ञानार्जन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने जोपासले पाहिजे. ज्ञानाचा वटवृक्ष होऊन त्याच्या फांद्या सर्वत्र पसरण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.त्यामुळे विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. कोणतेही काम करायचे असेल तर तयारी लागते. मी आणि सायकल या लेखामध्ये अरुण पुराणिक यांनी त्यांच्या जीवनातील सायकलचा प्रवास किती सुखकर होता हे सांगितले आहे. आजच्या काळात प्रत्येक मनुष्य कोणाला कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासलेला आहे. आजीचा बटवा या लेखामध्ये छोट्या छोट्या आजारांवर घरगुती उपाय किती महत्त्वपूर्ण असतात? याचे महत्त्व या लेखात सांगितले आहे.
        मानवाच्या जन्मात मानवी अवस्थांचे महत्त्व जास्त असते. शेवटची अवस्थामध्ये वृध्दावस्था  आणि आजच्या काळात होऊ घातलेली वृद्धाश्रम व याची उकल मानवी अवस्था या लेखात अरुण पुराणिक केल्याशिवाय राहत नाहीत. पण मला वाटतं वृद्धावस्था ही समस्या नाही आपण जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले वृध्दाश्रम निघणार नाहीत. संस्कार आणि नम्रता, आजी आणि आजोबा हे लेख खूप वाचनिय आहेत. पंच्याहत्तरीच्या जवळपास असलेले कवी लेखक अरुण पुराणिक यांना  वाचनाचा व लिखाणाचा छंद आहे. हे कौतुकास्पदच आहे. अरुण पुराणिक यांच्या आठवणी म्हणजे अंतरातील मोरपीस होऊन कडू-गोड आठवणीचे अंतरातील मोरपिस होय.
      कवी अरूण पुराणिक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

 समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि. वाशिम 
मोबाईल ९७६७६६३२५७

No comments:

Post a Comment