Thursday, 30 April 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज....



*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज*

        सर्वधर्मसमभाव हे या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल, १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला.त्यांचे पुर्ण नांव माणिक बंडोजी इंगळे असे होते.त्यांच्या गुरुचे नांव अडकोजी महाराज असे होते....अडकोजी महाराजांनी त्यांचे माणिक है नांव बदलून तुकडोजी असे ठेवले.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल? याविषयीची जी उपाययोजना महाराजांनी सुचविली होती. ती अतिशय परिणामकारक ठरली.ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे,ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट, कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केले.
         भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल. अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल? याविषयी त्यांनी चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्याच्या  स्थितीची पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे ग्राम विकासाच्या मूलभूत समस्यांचा विचार केला.
     तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी प्रभावी खंजिरी भजनातून विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. म्हणून त्यांनी कारावासही भोगला. कुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते. हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले.
          राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज खरी समाजाला आहे. सर्वधर्मसमभाव सर्वांनी सारखा जपला पाहिजे पण आजच्या काळात प्रत्येक जण माझा धर्म कसा मोठा? मी कसा मोठा? हे दाखविण्यात गुंतला आहे. लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचे वेगवेगळे रंग ही वाटून घेतले आहेत.आणि राष्ट्रपुरुष सुद्धा वाटून घेतले आहेत. जे थोर पुरुष त्यांनी कधीही कोणत्याही धर्माबद्दल तिरस्कार केला नाही. सर्वधर्मसमभावाची भावना पुरस्कृत केली. आज त्याच महामानवांना आजच्या समाजाने वाटून घेतले आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
        राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटायचे की देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे रक्षण करू शकतील.पण आजच्या समाजातील तरुण हे व्यसनाच्या आहारी गेलेले दिसत आहेत. व्यायाम करून बलोपासक तर दूरच सर्व तरुण मंडळी त्या मोबाईलच्या आभासी दुनियेत टिकटॉक बघण्यात तासन्तास गुंतलेली आहेत.समाजाचे तर सोडाच, देशाचे पण यांना घेणेदेणे राहिलेली नाही. त्यामुळेच तर देशात दर मिनिटाला एका मुलीवर अन्याय, अत्याचार होतो आहे. सुसंस्कार पोरका झाल्यासारखा वाटत आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात स्वतः सोडून येणारी ही आजच्या काळातली पिढी आहे. काही अपवाद असतीलही पण खरंच आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे.
          आजच्या काळातल्या तरुण पिढीने त्यांचे १०१ मौलिक विचार जरी वाचून आत्मसात केले. तरी खूप झाले. केवळ मूर्ती पुजेच्या मागे न लागता आपले ध्येय प्राप्तीकरिता मुख्य चरित्राचे चिंतन करून त्याचे गुण अंगी बाणवणे. ही खरी पूजा आहे. त्यामुळे मनाचा संकल्प दृढ होऊन वृत्ती ध्येयरूपी तदाकार होते. हे आजच्या समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही मनुष्यमात्रात जेंव्हा कांही कमतरता दिसून येईल तेंव्हा त्याचा उपवास करू नका. त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या. आणि त्याचा जन्म सफल करा. याच्या इतके पुणे जगात दुसरे नाही... कसं वागावं? कसं जगावं? कसं राहावं? हे जर आजच्या समाजातील लोकांना समजत नसेल तर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता वाचून आचरण त्याप्रमाणे करावे तेव्हा या  सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
         धर्म हा धंदा म्हणून आचरणाचा विषय नव्हे, किंवा ते एक विचित्र पुढेही नव्हे, तर तो व्यष्टीसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो. म्हणूनच त्यांची मूलतत्त्वे अबाधित असतात. मानवाने प्रत्येक धर्माची जी मूलतत्वे आहेत. ते मुलतत्वे अभ्यासावेत. ती उन्नतीकरिता दिलेली आहेत. पण आज माणूस मुलतत्वे बाजूला सारून ती मुलतत्वे किंवा महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी धर्म किंवा त्याच्या धर्मातील महापुरुष डोक्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.
      अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे तुकडोजी महाराज यांच्या विचारांची खरी गरज आजच्या समाजाला आहे आज अंधश्रद्धेपायी मोठमोठे खून होताना ,निष्पाप जनावरे बळी जाताना दिसताहेत स्वतःची सदसद्विवेकबुद्धी  जागृत ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणसाने पाहिले पाहिजेत. भारत देशाच्या रक्षणासाठी युवकांनी सदैव तयार असले पाहिजेत.
      
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 24 April 2020

छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र....!!




*छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र*

    स्वराज्याचे स्वप्न जिजाऊ माँसाहेबांचे पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांसह भक्ती,शक्ती,युक्ती या त्रीसंगमाचा  वापर करून मोठ्या पराक्रमाने, धैर्याने,निकराने परकीय सत्तांशी लढा देऊन ३५०गड किल्ले जिंकून, मोगलशाही, पातशाही,आदिलशाही, निजामशाही,डच, फ्रेंच,पोर्तुगीज अशा सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेल्या महाराष्ट्राच्या मातीत, पवित्र संताच्या भूमीत,धाडसी मातेच्या कुशीत जन्म घेतलेल्या शिवरायांनी सर्व सत्ता धुडकावून लावल्या. शत्रूला सळो कि पळो करून सोडले. ज्यांची कीर्ती अख्ख्या जगाला विश्ववंदनीय आहे अशा महाराष्ट्राच्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बघितला तर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
           महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा अदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. प्रजेवर जुलूम करणारे होते. खूप अन्याय करणारे होते.या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. त्या काळात उघडपणे पूजाअर्चा लोक करू शकत नव्हते. रयतेला  पोटभर अन्न मिळत नसे. सुरक्षित निवारा नव्हता. सर्वत्र अन्याय माजला होता.
          राजमाता जिजाऊंनी हे सर्व पाहिले आणि स्वतःचे स्वराज्य उभ करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बाल शिवबाला सुरुवातीपासूनच युद्धाचे धडे देत तयार केले. सर्वच क्षेत्रात निपुण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने शस्त्र नसतानासुद्धा मूठभर मावळ्यांच्या मदतीने एक एक गड जिंकत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जाती-धर्माच्या सगळ्यांना सोबत घेऊन न्यायाचे, लोकहिताचे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.छत्रपती शिवरायांच्या फौज मध्ये अठरापगड जातीचे लोकं सामील होते. वेळप्रसंगी जिगरबाज मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत स्वराज्यासाठी बलिदान दिले होते.त्यांच्या फोजेमध्ये महार,मांग, मातंग, रामोशी, वडार,चांभार, धनगर, बंडगर, मुस्लिम अशी अनेक अठरापगड जातीतले मातब्बर शूरवीर मावळे सोबत होते. सर्वांच्या मनात एकच होतं ते म्हणजे "स्वराज्य" आपल्या धन्यासाठी व धनी रयतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूला मातीत घालणारे जिगरबाज मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष आजही गड-किल्ले देत आहेत.
         छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा संताचा वारसा लाभलेला. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.प्रत्येक मावळा आपल्या  राजासाठी जिवाची बाजी लावायला तयार असायचे यातच त्यांचे सर्वस्व समजून घ्यायला हवं....छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. त्रासलेल्या रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करून राज्याभिषेक करून घेतला. शेतकऱ्यांच्या काडीलाही कोणी धक्का लावणार नाही असा आदेश जारी केला. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणा-यांचे हात पाय कलम करून न्याय दिला स्त्रियांचा आदर करणार, मान सन्मान करणारे प्रत्येक स्त्रीला मातेसमान पाहणारे छत्रपती जगाच्या पाठीवर दुसरे होणे शक्यच नाही. हिरकणीची गोष्ट समजताच हिरकणी ला साडीचोळी देऊन मान सन्मान केला‌. आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले. वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश जिंकून साडेतीनशे किल्ले जिंकले छत्रपती शिवरायांनी अनेक संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्याजोगे होते.
         छत्रपती शिवरायांनी वनदुर्ग, जलदुर्ग, गिरीदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. राजगड, प्रतापगड,सिंधुदुर्ग या सारखी नवीन किल्ले छत्रपती शिवरायांनी बांधलेले गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था महाराजांनी केली होती प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार,मुजुमदार, सबनीस, कारखानीस हे सुरक्षितेसाठी ठेवले होते. तोफा तयार करून घेतल्या होत्या. तोफा खराब होऊ नये म्हणून त्यावर मेणाचा लेप लावत असत.अनेक आरमार उभे केले.स्वराज्याच्या आरमारातील कोळी, भंडारी,आगरी यासारखे विविध जाती धर्मातील लोक होते... छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर खाते खूप छान होते त्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे होते.
       गनिमी कावा -गनिमी कावा म्हणजे युद्धतंत्र... आपल्या सोयीच्या ठिकाणी शत्रूवर हल्ला करून शत्रु सावरतो न सावरतो तोपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचणे याला गनिमी कावा असे म्हणत. स्वराज्य व्यवस्थित चालावे म्हणून राज्यकारभाराची आठ खात्यात विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. राज्यात प्रजेला अन्न,वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण केल्या स्त्रियांचा सन्मान केला कोणावरी अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. पटकन प्रजेला न्याय दिला जायचा.शेती आणि उद्योगधंद्याचा विकास होऊ लागला प्रजा सुखासमाधानाने राहू लागली.
           गरजू गरीब शेतकऱ्यांना छत्रपती शिवरायांनी बैल जोड्या दिल्या पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता त्या काळात घेतली जायची. जंगले नष्ट होणार नाहीत. याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. आरमारासाठी जहाजे, वल्ले,सॉर्ट इत्यादी तयार करून घेतले.एकही झाड तोडू नये असा हुकूम छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत होते...गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे रयतेचे उत्पन्न वाढले.स्वराज्यात रयतेला कधीही दुष्काळ जाणवला नाही. पावसाळ्यापूर्वी स्थळे व टाक्या बांधून पावसाचे पाणी अडवले जायचे. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत. व सारा माफ करीत असत. सरकारी कोठारातील धान्य रयतेला मोफत वाटून देत असत.प्रत्येकाला रोजगार मिळवून देत असत. बारा बलुतेदारांच्या हाताला काम देऊन रोजगाराची संधी निर्माण करून देत असत त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बलुतेदार व कारागीर सुद्धा सुखी झाले होते.
      स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून बाहेरुन येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला.स्वराज्यात मिठाचा व्यापार वाढला.स्वराज्यात व्यापार उद्योग धंद्याची वाढ केली.कर्नाटकातील गडीच्या रक्षणार्थ "मलमा देसाई" या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिला धाकटी बहीण मानून गडी व गाव सन्मानपूर्वक साडीचोळीसाठी भेट दिले व तिला "सावित्रीबाई" हा किताब दिला... इतकेच नव्हे तर स्वच्छतेविषयी छत्रपती शिवाजी महाराज फार जागरूक होते प्रत्येकाच्या घरात शेजारी स्वच्छता पाहण्यासाठी सूचना केल्या जायच्या.
         मोठ्या बाजारपेठेत कचरा राहणार नाही याची दक्षता घेतली जात असत‌.कचरा जाळून टाकून त्याची राख भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावे अशी आज्ञा केली होती. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दारूगोळा आरमार पर्यावरणाचे संरक्षण, जलव्यवस्थाप,,सागरी व्यापार व्यापार पेठा स्वच्छतेविषयी दक्षता, महिलांचा मानसन्मान, न्याय कायदा सुव्यवस्था, सैनिक त्यांचे धार्मिक धोरण आणि अठरापगड जातीधर्माच्या लोकांना एकत्र ठेवून शेतकऱ्यांना रयतेला प्रजेला सुखी ठेवण्याचे तंत्र आजही महाराष्ट्राला दिशा दर्शक असा आहे. त्याकाळी कोणीही आत्महत्या करीत नसत सर्व प्रजा सुखाने नांदत होती म्हणून तर जगाच्या पाठीवर फक्त छत्रपतीनाच लोककल्याणकारी जाणता राजा असे म्हणतात....
महाराष्ट्राच्या कडेकपारी गड किल्ल्यातून सह्याद्रीच्या कणाकणातून एकच नाद घुमतोय...

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र शूरवीरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा....
आम्ही धन्य धन्य झालो आमचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला....

जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

कवयित्री लेखिका शिक्षिका
कुमारी मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
तालुका जिल्हा वाशिम
मो.९७६७६६३२५७


उर्जा देणारा काव्यसंग्रह म्हणजे वादळातील दीपस्तंभ

 कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी केलेले रसग्रहण ! धन्यवाद ताईंचे !
__________________________________
"नवऊर्जा देणारा काव्यसंग्रह: "वादळातील दीपस्तंभ "

आजच्या तरूणाईला नवऊर्जा प्रदान करून जगायची प्रेरणा देणारा काव्यसंग्रह म्हणजे मु.आर्वी, जि. वर्धा येथील माझे मार्गदर्शक शिक्षक व प्रसिद्ध कवी, समिक्षक अरूण विघ्ने यांचा "वादळातील दीपस्तंभ " ! त्यांचा पहीला काव्यसंग्रह "पक्षी " सन 2000 मध्ये प्रकाशीत झाला .
     या काव्यसंग्रहाची प्रस्तावना घाटंजी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक , प्रसिद्ध साहित्तिक क.वि. नगराळे यांनी समर्पक व कवितेला न्याय देणारी लिहीली आहे . मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे . एकेकाळी काही विशिष्ट लोकांना शिक्षणाचा हक्क नव्हता . त्यांची लेखणी ही बंदिस्त होती . पण बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाने हे हक्क बहाल केले आणि पिढ्यांपिढ्याच्या बंदीस्त लेखणीचे बंध तोडलेत .सर्वांसाठी शिक्षण खुले झाले . ही संकल्पना मुखपृष्ठावरील चित्रात चित्रकाराने हुबेहुब साकारली आहे .तलवार ही रक्तरंजीत क्रांती करते पण लेखणी ही रक्तविरहीत क्रांती करते . बाबासाहेबांच्या लेखणीने जगविख्यात रक्तविरहीत क्रांती केली आहे. हा काव्यसंग्रह परीस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केला असून त्यात विविध काव्य प्रकारातील , विविध विषय आणि आशय असलेल्या  एकूण 110 कवितांचा समावेश आहे .
   अरूण विघ्ने हे हाडाचे शिक्षक असले तरी त्यांच्या कविता शेतक-यांच्या शेतीमातीशी कृतज्ञतेचा भाव जपणा-या ,सैनीकाबद्दल आदरभाव जपणा-या, आई-वडील, बहीण यांच्याबद्दलचा प्रेमभाव जपणारा, वीरांच्या कार्याशी नतमस्तक होणारा,  राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले , डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे छ.शिवाजी महाराजांविषयी आदरभाव व्यक्त करणारा आहे.
कवींना त्यांचे कवीमन स्वस्थ बसू देत नव्हते .त्यांचे निसर्गाशी आपुलकीचे नाते असल्याने पाणी, शेती, पशु, पक्षी अनेक सजीव, निर्जीव वस्तूवर प्रेम करायला शिकविणारी त्यांची कविता वाचक मनाला भावणारी  आहे . परिस्थितीपायी ज्या बालकांना काम करावं लागतं ही त्यांच्याविषयीची मांडलेली व्यथा " बालकामगारांचं शल्य " या कवितेतील हृदय हेलावून टाकणारी आहे .

" पोटाची खळगी भरण्या
बनावं लागतं बाल कामगार
समजू नये कुणी हौस आमची
नाही स्वमर्जीने हे काम करणार ! "

या ओळीतून परिस्थितीशी झुंज देणा-या बाल कामगारांची सल कवींनी खुप भावनीकतेने मांडली आहे .समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे अंधश्रद्धा . या अंधश्रद्धेपायी समाजातील अनेक निष्पाप लोकांचे हकनाक बळी गेलेले आहेत . म्हणून कवी आपल्या "अंधश्रद्धा " या कवितेत म्हणतात ...!

" विज्ञानाच्या कसोटीवर
बघा ती घासून श्रद्धा
स्विकारा तीला डोळंस
मग कशी होईल अंधश्रद्धा ? "

या ओळीतून अंधश्रद्धेची पट्टी बांधून वावरणा-या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातण्याचा प्रयत्न केला आहे. हळव्या मनाच्या कवीमध्ये खुळचटपणाची भावना अजीबात कुठेही दिसून येत नाही .
 " उध्वस्त वावरातले रस्ते " या कवितेतून कवी होणा-या भ्रष्टाचारावर वार करतात. त्यांच्या कवितेतून आपल्याला त्यांची विद्रोही भावना दिसून येते . ते म्हणतात..!

" तुम्ही खुशाल बांधा
उध्वस्त वावरात रस्ते
आणि आमच्या करपलेल्या भावनांचे बंगले ...
बंगल्यावर चढवा बिनधोक इमलेच इमले ,
आमच्या उजेडाच्या स्वप्नांच्या कत्तली करून ..!"

गोरगरीब शेतक-यांचा जीव की प्राण म्हणजे त्यांची शेती . आणि शासन ती शेती कवडीमोल भावाने अधिग्रहीत करून त्यांच्या शेतात कुचकामी मोठमोठे रस्ते बांधतात . बिचा-या त्या शेतक-याला भूमीहीन करून माय लेकराला वेगळे केल्याचे पाप जेव्हा येथे घडते, तेव्हा कवींच्या मनात हळहळ, चीड, राग, विद्रोह निर्माण होतो आणि मग अशी कविता जन्मास येते .
     अंधारात चाचपडणा-यां लोकांना अरूण विघ्नेंचा  " वादळातील दीपस्तंभ " हा कवितासंग्रह प्रकाश देणारा, दिशादर्शक आहे . कवी हे मुळात शिक्षकी व्यवसायातील असल्याने त्यांच्या कविता संस्कार करणा-या, प्रगल्भ चिंतन करायला लावणा-या , अन्यायाविरूद्ध विद्रोह करायला लावणा-या , वादळातील समस्त दीपस्तंभांवर प्रेम करायला लावणा-या आहेत .

" गीत जीवनाचे । गाऊ आनंदानं ।
राहू दोघंजनं । सुखामंदी ।। 

मागे हा अरूण । एकची वचन ।
नको अभिमान । मनाठायी ।। "

या अभंगातून कवी जीवनाच्या वाटेवर आनंदानं रहायला, गीत सुखाचे गायला सांगतात .येणा-या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आनंदानं जगून घ्यावं. हा जन्म पुन्हा नाही असं सांगतात . तसेच हळव्या मनाचे कवी स्वतःला कुठलाच अभिमान नको , अभिमानाचा, गर्वाचा लवलेशही नको असं मागनं मागतांना दिसतात .
   अस्पृश्यतेच्या नावाखाली अनेक अन्याय, जुलूम अत्याचार केलेल्या व्यवस्थेला कवी 14 आँक्टोबर 1956 चा महीमा सांगण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे .

"महीमा तो काय ।
वर्णावा बाबांचा । 
कोटी वंचितांचा ।
उद्धारक ।। "

या अभंगातून वर्णव्यवस्थेवर कवी कडाडून हल्ला चढवत जनतेला जगण्याची नवी दिशा देणा-या बाबासाहेबांचा परीचय नव्या पिढीला करून देतात .

" अवघे करूया
सिमोल्लंघन अनिष्ट रूढीचे
पापी विचारांचे
मनोभावे !"

या काव्यांजली प्रकारातील रचनेत कवी अनिष्ट रूढी परंपरांवर कडाडून हल्ला चढवितांना दिसतात . हा माणुसपण नाकारणारा विचार मनातून हद्दपार करूया आणि बंधुभावाने सारे मिळून जगूया असा संदेश देतात .
     कवी शब्दांचा दीवा हाती घेऊन अंधारातून प्रकाशपर्वाच्या दिशेने वाट शोधीत सक्षमपणे वादळातील दीपस्तंभाप्रमाणे पुढे सरकतो आहे . त्यांच्या अनेक कविता ह्या समाजभान ठेऊन वाईट गोष्टींचा बिमोड करणा-या ठरतात . एकूणच हा काव्यसंग्रह वाचकांच्या मनाला भावणारा आहे . तो दिशादर्शक वाटतो . नव्या पिढीला नवऊर्जा देणारा वाटतो . वाचक निश्चितच याचे स्वागत करतील . असा मला ठाम विश्वास आहे . त्यासाठी कवी अरूणजी विघ्ने यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देते !

कु. मिनाक्षी पांंडुरंग नागराळे
(स.शिक्षिका,कवयित्री,लेखीका, संपादिका)
वाशीम, 
मो. 9767663257

Wednesday, 22 April 2020

शेती-मातीशी नाळ जोडणारा वऱ्हाडी काव्यसंग्रह म्हणजे "जागल"

 Date: 20 Apr 2020

शेती-मातीशी नाळ जोडणारा व-हाडी काव्यसंग्रह म्हणजे-"जागल"

~~~~~~~~`~~~`~~~~~~~~~~~~~~~~~~~~

                 शेतकऱ्याची नाळ मातीशी जोडलेली असते. असा शेतकरी पुत्र असलेला व-हाडी भाषेला आई माननारा, पेशाने जरी शिक्षक असला तरी शेतीशी, शेतातल्या मातीशी नाळ जोडणारा कवी म्हणजे अरुण विघ्ने सर यांचा दुसरा काव्यसंग्रह म्हणजे जागल होय एका शेतकऱ्याचे सर्व स्वप्न निसर्गावरच अवलंबून असते.निसर्गाने साथ दिली तर शेतकरी शेती पिकवू शकतो. आणि त्याच्या भरवशावरच जगू शकतो. म्हणून शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात ....
              कवी अरुण विघ्ने सरांचा  हा व-हाडी  काव्यसंग्रह म्हणजे आपली बोलीभाषा व-हाडीचा गोडवा,सुरेख पद्धतीने मांडला आहे. "जागल" म्हणजे शेतकरी रात्रीला शेतामध्ये पिकांची किंवा धान्याची राखण करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी शेतात बसतो,कुणी गुरंढोरं, जनावरे आपल्या पिकांची हानी करू नये म्हणून राखण करत बसतो ती जागा म्हणजे जागल होय....
             "जागल" या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके व आकर्षक असून त्यावर पौर्णिमेचा चंद्र उगवला आहे.अशा पौर्णिमेच्या रात्रीला शेतकरी शेतावर जागरण करण्यासाठी, धान्यांच, पिकांची राखण करण्यासाठी  शेताला जाताना चित्र आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये वेळूची काठी आणि डाव्या हातामध्ये कंदील आहे. त्याला अंधार या रस्त्यावरून मार्ग दाखवण्यासाठी, स्वतःचे रक्षण करण्यासाठी, शेतकऱ्यांनी आपल्या हातात कंदील घेतले आहे...व हातामध्ये काठी घेतली आहे. एका शेतकऱ्यांना पीक काढायचे म्हणून रात्रंदिवस कष्ट करावे लागतात हेच सांगणारे हे मुखपृष्ठ शेतकऱ्या विषयी आपुलकी, स्नेह, आदर, निष्ठा व कष्टाची जाणीव करून देणारा हा शेतकरी आपल्या हाडांची काडं करून जगाचं पोषण करत असतो.
            प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने सर यांचा जागल या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संवेदना प्रकाशन नागपूर यांनी केले आहे. तर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रेखाटन केली आहे. या काव्यसंग्रहाची किंमत१५०/ रुपये असून त्यात एकूण .१५०.पृष्ठेआहेत...प्रस्तावना प्रसिद्ध वराडी कवी श्री. पुष्पराज गावंडे अकोला यांची लाभली आहे. यात एकूण ८५ व-हाडी कविता निसर्ग व मातीशी नाळ जोडणाऱ्या मराठी पण व-हाडी भाषेत आहेत .सुप्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर नागपूर यांनी पाठराखण शुभेच्छा देऊन केली आहे.
               विदर्भातली बोली भाषा म्हणजे व-हाडी भाषा होय. व-हाडी कविता म्हणजे व-हाडीचा अस्सल बाज, मराठीचा अस्सल साज, व-हाडी भाषा नरम-तलम -मुलायम आणि गुळाइतका गोडवा  भरणारी आहे. कुणीही तिच्या प्रेमात पडावे इतकी मधुर भाषा याच भाषेचा साज चढवत 'जागल' हा काव्यसंग्रह नटला आहे.
  
              *ल्याली श्रृंगार माती*
              *तिले हिरवाकंच शालू*
              *नखशिखांत सजली*
               *मह्या व-हाडीची कालू...!!*

        मातीशी घट्ट नाळ जोडणारा कवी म्हणतो यांनी शृंगार माती. मातीने शृंगार केला आहे. आणि या धरतीने हिरवा शालू जनू घातलाय आणि नव्या नवरीसारखी ही माती नटुन-थटुन बसली आहे. माझ्या व-हाडी ची काळी माती ही अगदी नवीन नवरी सारखीच भासते आहे असे कवीला वाटते.

         अलंकार झाडाझुडपांची 
         कशी दिसते नवी नवरी 
         नाकीडोळी रूपवान
         पोत दव मोत्या नवी कोरी....!!

     ही माती जिच्यावर शेतकरी बळीराजाचे पोट आहे. बळीराजाच्या जीवांवर अख्खं जग पोसतं आहे.अशी ही पावित्र्य माती या पवित्र मातीने झाडाझुडपांचे अलंकार जनु घातले आहेत. नव्या नवरीसारखी नटुन थटुन बसली आहे. नाका डोळ्यांने देखणी,रूपवान असणारी आणि तिच्या पानावरचे दव हे जणू तिच्या गळ्यातली पोतं म्हणजे मंगळसूत्रा प्रमाणेच कविला भासत आहेत. कवीला माती हिरवा साज लेवून नवीन नवरी सारखी दिसत आहे. श्रावण मासात ही माती. ही काळी आई जणू हिरवा शालू घालून नेसून बसते असे सर्वांना वाटते. तीचं अनोखं रूप पाहून मानवाला निसर्गाची भुरळ पडते. आणि या मातीवर झाडंझुडपं येतात ते झाडंझुडपं म्हणजे जनू मातीच्या अलंकाराचं आहेत. त्या अलंकार मुळे नवीन नवरीसारखी ही धरणीमाय शोभून दिसते आहे....

         *आता लागला मिरुगं* 
         *माती ढगाकळं पाहे*
          *कवा येसीन पावसा?*
          *वाट भीरभीर पाहे....!!*

          *येनं येनं गा पावसा*
          *कास्तकार पाहे वाट*
          *तुह्या स्वागताले उभं*
           *माह्य बियानाचं ताट.....!!*

      मराठी भाषेचे हे बोल काळजाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. अशी मृदू,कोमल भाषा एक वेगळा साज लेवून मराठी व-हाडी भाषेत कवींनी मांडली आहे. उन्हाळ्यात मातीची ढेकळं तप्त उन्हात तापून मृग पावसाची वाट बघत असतात. मृग नक्षत्रामध्ये आभाळात ढग दिसायला लागतात.तसे शेतातली ढेकळं आभाळाच्या दिशेने पावसाची वाट बघत असतात.कधी एकदा पाऊस येईल आणि तहानलेल्या मातीला तृप्त करून जाईल अशी आशा मातीला असते. पाऊस राजा कधी येणार? याची वाट माती पाहते. खूप आतुरतेने जसे गोठ्यातले वासरू आपल्या आई ची वाट पाहते तसे शेतकरी राजा आभाळाकडे रोज पावसाची वाट आतुरतेने पाहत असतो. पाऊस यावा म्हणून मनोमन प्रार्थना करीत असतो. बळीराजा बी बियांणे घरी आणून ठेवून पावसाची वाट देवाप्रमाणे पाहत असतो. पावसाच्या स्वागताला हाती बियाणाचे ताट  घेऊन शेतकरी उभा असतो. पाऊस हा शेतकऱ्याचा श्वास आहे. पाऊस आल्यावर शेतकरी जिवंत असतो. दुष्काळ पडल्यानंतर जिवंत असून मेल्या सारखाच असतो....

       माती उगवते झाळं
       धांडे उगवते कणसं 
       या दाण्याची भाकर
       जगवते सारी माणसं...!!

       मातीतच जलमते
       मातीतच पुरते 
       मातीचा थो गोया
       मातीतच जगवते....!!

    मराठी भाषेत झाडाला झाळं म्हणतात...मातीत झाडे उगवतात आणि ही झाडे,फुले,फळे, पाने, औषधी वनस्पती,डिंग,कागद,बिया इत्यादी देतात. ज्या मातीत झाडाचे पोषण होते त्याच मातीच्या जीवावर शेतकरी व जग जगते.म्हणून जन्म देणारी आपली आई जरी असली तरी जगवणारी माती सुद्धा आपली काळी माय आहे दुसरी आईच आहे. आपण या मातीत उगवणाऱ्या पिकावर जीवन जगतो. माती नाही तर काहीच नाही. मातीत धान्य उगवते आणि धान्यावर जगातली सारी माणसं जगतात.
      माणूस जरी मानवाच्या पोटाला जन्माला आला तरी नऊ महिन्यानंतर गर्भाच्या बाहेर आल्यापासूनच जगणं आपलं मातीवरच अवलंबून असतं. आणि शेवटी माणूस मेल्यावर सुद्धा याच काळ्य आईच्या कुशीत जातो. माणूस मातीचा गोळा. शेवटी माती
च जगवते.
    "जागल"  करणारा शेतकरी खूप कष्टाने, घामाने, आपले शेत भिजवतो आणि पिकवतो. त्याला सत्याची, नीतिमत्तेची,चांगल्या विचारांची, पेरणी करतो. त्याची काळजी, घरादाराची लेकीसुना, बाळांची यासाख्या जगाचा पोशिंदा हा शेतकरी स्वाभिमानाचं खत घालून,रक्ताच पाणी करून, विज्ञानाची कास धरून, अपार मेहनत करून, धान्य पिकवत असतो. असा हा मराठी भाषेतला शेतकऱ्याविषयी प्रेम, जिव्हाळा, आदर,पुढच्या तरुण पिढीला शेतीविषयी आवड निर्माण करणारा, व-हाडी मातीला माय म्हणून संबोधणारा व काळ्या मातीच्या प्रति ऋण व्यक्त करणारा काव्यसंग्रह खरोखरच वाचनीय व तरुण वर्गाला दिशादर्शक असा आहे. तो सर्वांनी अवश्य वाचावा असाच आहे. शेतकऱ्याविषयी अतोनात प्रेम असणाऱ्या, संवेदनशील मनाचे कवी अरुण विकणे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....


     लेखिका/समिक्षिका/शिक्षिका/कवयित्री
    कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
     मु.पो.कोकलगाव
    ता.जि.वाशिम
     पीन ४४४५०५
     मो.९७६७६६३२५७

Friday, 10 April 2020

"एका विषाणूने शिकवलं"....!

 *"एका विषाणूने शिकवलं...."*

        आज संपूर्ण जगामध्ये कोरूना covid 19 या विषाणूने थैमान घातले आहे.चीन,अमेरिका, इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. मोठमोठ्या प्रगत राष्ट्रांमध्ये भरपूर प्रमाणात सुख-सुविधा दवाखाने असून सुद्धा हा महाभयंकर आजार आटोक्यात यायला बराच वेळ लागतो आहे. भारतासारख्या देशात लवकरच लॉकडाउन केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. तरीसुद्धा प्रत्येक नागरिकांनी "मीच माझा रक्षक" म्हणून घरात थांबावयाचे आहे. तरच आपण या महामारी विरुद्ध लढा देऊ शकतो. आणि हा महाभयंकर आजार आटोक्यात आणू शकतो.
             आज पहिल्यांदा असे झाले आहे की संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी (पुढे वाढतील ही) जागेवर थांबला आहे. आज सारे प्राणी, पक्षी मुक्तपणे बाहेर निसर्गात संचार करताना दिसतात. पण दुर्दैवी गोष्ट आहे की मनुष्यप्राणी मात्र घरात कोंडून घेतला आहे.आणि ते फार गरजेचे, महत्त्वाचे आहे. सर्वांनी बाहेर जाणे काटेकोरपणे टाळले पाहिजे.तरच आपण निशस्त्र होऊन या कोरोना विरुद्ध लढा देऊ शकतो आणि त्याला हरवू शकतो.
            निसर्गात फार मोठी ताकद आहे.आज वर्षानुवर्षे होत असलेली नैसर्गिक हानी आता भरून निघत आहे. असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. आपण पाहतो कित्येक वर्ष झाली रस्त्यावर गाड्यांचा साम्राज्य, होणारा गाड्यांचा धूर, वाढते प्रदूषण, कारखाने, गर्दी माणसांची वेगळी आणि वाहनांची वेगळी, बाहेर मोठ्या शहरात जीव गुदमरल्यासारखा वाटायचा पण या २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व वातावरण कसे छान,प्रसन्न, स्वच्छ झाले आहे.मोठमोठ्या शहरांमध्ये स्वच्छ वातावरण झाले. नाही कसला धूर, ना दमट हवा, दमट वातावरण नाही,ना  कसले व्यसन, ना कुठले हॉटेल्स उघडे, ना हॉटेल्समध्ये पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी. आज मोठ्या शहरांमध्ये लोक जीवाच्या आकांताने खेडे गावाकडे धाव घेत आहेत.स्वार्थापोटी आई-वडील खेडेगावात सोडून श्रीमंतीची हाव उराशी कवटाळून मृगजळासारखी स्वप्न पाहणारी लोकं शहराकडे धाव घेणारी सुसक्षित मंडळी आज अचानकपणे गावाची आठवण आली आणि गावाकडे निघून आली आहेत.सर्वजण गावी येऊन आई-वडिलांसोबत घरात कुटुंबासमवेत जगताना दिसताहेत हे सारे एका विषाणूने शिकवलं....
            आयुष्यभर पैशासाठी मरमर करणारा माणूस जागेवरच थांबला. आता मानवाला कळून चुकलं की जीवन जगायला खूप काही लागत नाही. फार कमी गरजा आहेत मानवाच्या ...तसं पाहिलं तर अन्न,वस्त्र, निवारा या तीनच मुख्य गरजा आहेत पण खोट्या दिखाव्यापोटी अति पैसा कमावण्याच्या नादात मोठे उद्योगधंदे,कारखाने उभे करण्यासाठी पर्यावरणाशी, निसर्गाशी अन्याय मानवाने केला आहे. मोठी जंगले शेती नष्ट करून त्यावर दहा-वीस मजली  मोठमोठ्या इमारती सिमेंटच्या उभ्या केल्या आहेत. आज केवढी मोठी बंगले ओस पडली आहेत. शहरात कोरोना येईल आणि आमच्या जीवाला धोका होईल हे ओळखून आज ग्रामीण भागात लोकांनी धाव घेतली आहे. आणि हा बाहेरून येणारा रोग आज काही अंशी ग्रामीण भागात सुद्धा पोहोचला आहे.
         ग्रामीण भागात शहरी भागाइतका मोठा धोका नाही. ग्रामीण भागातला शेतकरी आजही शेतीची कामे करतोय. आणि देशाला पुरेल असा धान्य पिकवतो.तोच जगाचा खरा पोशिंदा आहे माझा बळीराजा... काबाडकष्ट करतो आहे. देवाच्या रूपात आज रस्त्यावर पोलीस, डॉक्टर्स, नर्स उभे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून... या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्यासाठी रात्रंदिवस सज्ज आहेत.ज्या मंदिराला जरी कुलूप लागली असली तरी मंदिराच्या ट्रस्ट या संस्था अशा या कोरोनाला  हरविण्यासाठी कोटी ने मदतीचा हात देत आहेत. मोठे अभिनेते, उद्योगपती, दानशूर लोक,खेळाडू या चांगल्या कार्यासाठी सर्वोत्परी मदतीचा हात देत आहेत... हे सारे एका विषाणूंनी शिकवलं....
        आज कितीतरी लोक घरात बसून चांगल्या कामाची सुरुवात करीत आहेत. मुलाबाळांची कमी होत चाललेला संवाद धावत्या युगात सोबत पाळणारा माणूस आणि आईवडिलांसोबत बायकोसोबत वेळ घालवीत आहे. मायेने पाहण्याचा दृष्टीकोण या विषाणूने शिकवला आहे.किती पुरुष मंडळींनी या सुट्ट्या छान उपयोग केलेला दिसतो आहे. प्रत्येकाची वेगवेगळी कला बाहेर पडताना दिसते....
         बऱ्याच जणांनी या लॉकडाऊन च्या काळात घराची स्वच्छता,नीटनेटकेपणा करून घर स्वच्छ, छान ठेवले आहेत. कितीतरी जणांनी रोज नवनवीन पदार्थ करून आपल्या बच्चेकंपनीला आई-वडिलांना पत्नीला खाऊ घातले आहेत. काही जणांनी बगीच्या सुंदर करण्याचा, बाग काम करण्याचा प्रयत्न केला आहे... बाहेरचे हॉटेलमधले पिझ्झा बर्गर नूडल्स हे सर्व खाणे बंद होऊन साधेच घरच्या घरी पदार्थ आवडीने खात आहेत. जिभेचे चोचले पैसे उधळून बंद झाले आहे.
         इतर वेळेस मॉलमध्ये, कपड्याच्या दुकानात, शॉपिंग सेंटर वर हॉटेलवर भरगच्च दिसणारी लोक आज घरात घुसून बसली आहेत. कितीतरी पैसा खर्च करणारे लोक आज त्यांच्या खिशातला एक रुपयाही हल्ला नाही. ना कसला खर्च नाही तर बऱ्याच जणांना पगारही पुरायचा नाही आणि चैनीसाठी कर्ज काढणाऱ्या लोकांना आळा बसला आहे आज लोकांना पैसा हे साधन आहे हे कळाले आहे.. साध्य होणार  मुळीच नाही... आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे हेच खरे सत्य आहे.... तू जीव जपण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे काही हातावरच्या बोटावर मोजण्याइतकी लोक सोडली तर सर्वजण लॉकडाऊनचा नियम पाळत आहेत.इतर राज्यातले जे मजूर लोक लोक अडकून पडले आहेत. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक लोक समोर येऊन माणुसकीचे दर्शन घडवताना दिसताहेत मदतीचा हात देताना दिसत आहेत आणि प्रत्येक जण मनोमन प्रार्थना करीत आहे की हे देशावरचे संकट टळू दे अशी आर्त हाक ईश्वराला देत विनंती करीत आहे...
              एकंदरीत मानवाचा वाढता अतिरेक कमी झाला आहे. कुठेतरी ब्रेक लागला.खर्च कमी झाला.गरजा कमी झाल्या. साध्यासाध्या आधारासाठी दवाखान्यात पळणारी लोक घरच्या घरीच काळजी घ्यायला लागली आहेत.रिकाम्या वेळेत पेंटिंग,चित्रकला ,टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करता येऊ लागल्या. फोर व्हीलर, टू व्हीलर, बसेस रात्रंदिवस पळणाऱ्या गाड्या जाग्यावर थांबल्या आहेत.मनुष इतरांपेक्षा स्वतःची काळजी घ्यायला लागला हे सारे एका विषाणूने शिकवलं......
             गावाला जाऊन मोकळं वातावरण,आपली माणसं, गावाकडची नाती गोती, गावाकडची माती इत्यादीची  नाळ जोडता आली.इतिहासात आतापर्यंत कधीही न थांबलेला पूर्ण भारत एका जाग्यावर थांबला. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये आपुलकीची, भावना वाढीस लागली आहे एकमेकांची काळजी करण्यासाठी संवाद साधू लागली आहेत.अचानक मरण डोळ्यांना दिसताना आपुलकी स्नेह माया प्रेम वाढले आहे. एकमेकांना मदतीची भावना निर्माण झाली डॉक्टर्स, नर्स, पोलीस इत्यादीच्या रूपात देव दिसायला लागला आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे गजबजलेले शहर नकोशी वाटणारी गर्दी,निर्मनुष्य रस्ते बरे वाटायला लागली आहे हे सारं एका विषाणूंनी शिकवलं....!!

©️®️ *लेखिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे*
*वाशिम*