सातारा जिल्ह्यातील आदर्श शिक्षिका ते कवयित्री शुभांगी विलास पवार( कंदी पेढा ) यांचा 'हिरकणी' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अजिंक्य प्रकाशन, वाशिम यांनी, तर प्रकाशक ॲड जयमला भगत यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती २५ मार्च २०२० रोजी प्रकाशित झाली. स्त्रीचं जगणं सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे हिरकणी. या काव्यसंग्रहाचे मुल्य केवळ १५० रुपये असून यातल्या अनेक कविता स्त्रीला प्रेरणा देणाऱ्या व स्त्री जीवनाचे यथार्थ चित्रण करणा-या आहेत. या काव्यसंग्रहाला अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा लागल्या असून प्रस्तावना अंजली श्रीवास्तव करमाळा यांची लाभली आहे.
शुभांगी विलास पवार या मुळात शिक्षिका असल्याने वाचन व लेखन हा त्यांचा अंगच आहे. स्त्री मनातील वादळे काही स्त्रियांना कागदावर लिहून व्यक्त करायला आवडतं. तर कांही स्त्रियांना नटायला थटायला आवडतं,काही स्त्रियांना शॉपिंग करायला आवडतं तर कांही स्त्रियांना फिरायला जायला आवडतं.कांही स्त्रियांना स्वतःच्या भावनांना शब्दबद्ध करून मोती गुंफायला आवडतं. अशीच होती गुंफलेल्या आहेत शुभांगी पवार या कवयित्रीने. सुंदर साध्या शब्दात व्यक्त झाल्या आहेत. प्रत्येक स्त्री ही स्वत:साठी फार कमी जगते. ती दुसर्यासाठीच जगते.सदैव घरच्यांची काळजी घेण्यातच आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडत स्त्री जगत असते.
कुठवर सहन करायचं?
असं दास्यत्वाचं जगणं
हास्याची मुखवटे चढवून
कृत्रिमपणे वागणं....!!
वरील ओळीतून कवयित्री शुभांगी पवार यांनी स्त्रीचं दास्यत्व कधी संपेल? कुठवर स्त्रीनेच सगळं सहन करायचं? स्त्रीला अजून कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरी चेहऱ्यावर मात्र हास्याचा मुखवटा लावून कृत्रिमपणे जगायचं असतं.अशा काळीज चिरणाऱ्या या ओळी वाचकाच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत.
खरं सांगा ना मला आई बाबा तुम्ही
तुम्हाला कसं काहीच आपलेपण वाटलं नाही
माझं गर्भातील अस्तित्व 'मुलगी' म्हणून खोडताना
तुमच्या डोळ्यात टिपूसभरसुद्धा पाणी का हो दाटलं नाही.
वरील ओळीतून कवयित्री शुभांगी विलास पवार यांनी तमाम गर्भपात करणार्या बाबांना हा प्रश्न विचारला आहे.केवळ मुलगी म्हणून जर मुलीचा गर्भपात किंवा हत्या करत असाल तर तो ही तुमचाच अंश आहे ना. तिची हत्या करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मुलगी म्हणून माझं अस्तित्व खोडताना. माझी गर्भातच हत्या करत असताना तुमच्या डोळ्यांत टिपूसभर सुद्धा पाणी दाटले नाही. असं कोवळ्या कळ्यांना गर्भातच खुडून टाकणाऱ्या सर्व कळ्यांच्या वतीने कवयित्रीने खडा सवाल केला आहे. वरील ओळी स्त्रीची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकणाऱ्या व प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकणा-या आहेत.
जातीभेदाचे मूळ सगळ्यांच्या
डोक्यात घट्ट रुजलय
त्याचबरोबर रूढीचे तणही
चांगलंच माजलय...!!
अजूनही लढतोय लढाई
माणसातील मानवतेसाठी
शोधतोय औषध
जातरुपी दानवतेसाठी....!!
आज आपण पाहतो भारत देश माझा आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.असे म्हणणारे लोकं जातीभेदाचे मूळ आपल्या डोक्यात घालून आपल्याला जाती धर्मांना भडकवण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. प्रत्येकाने आपापले झेंडे पकडले आहेत. त्यांचे रंगही वाटून घेतले आहेत. एवढेच काय तर महापुरुष सुध्दा वाटून घेतले आहेत. येणार्या पुढच्या पिढीलाही ते शिकवणार आहेत. त्याच बरोबर रूढीचे तन सुद्धा चांगलेच माजलेले दिसते. कुणीतरी माणसांतील माणूसपण जपणारा आहे का? माणसातील मानवतेसाठी कुणी औषध शोधणार आहे का? जातरूपी दानवतेसाठी औषध मिळालं तर बरं होईल असं जळजळीत वास्तव तमाम जातीचे स्तोम मांडणाऱ्या मनुष्य नावाच्या प्राण्याला कवयित्री शुभांगी पवार यांनी प्रश्न विचारला आहे.
हिरकणी बनून आपल्या बाळासाठी
ती झाली अमर
आजची नारी रोजच
लढते आव्हानांचे समर....!
इतिहासकालीन हिरकणीचा इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात हिरकणी गडावर दूध घालायला गेली आणि गडाचे सर्व दरवाजे बंद झाले होते. हिरकणी लहान बाळाला घरी सोडून गडावर दूध घालायला गेली होती आणि सायंकाळ होताच गडाचे सर्व दरवाजे बंद झाले तेंव्हा हिरकणी गडाच्या आतच राहिली आणि बाळाच्या प्रेमापोटी अवघड बुरुज उतरून खाली आली. छत्रपती शिवरायांनी या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले. तेंव्हाच्या हिरकणीचा संघर्ष ते आजच्या हिरकणीचा होणारा दररोजचा संघर्ष काही वेगळा नाही.आजच्या काळातल्या हिरकणी सुद्धा दररोज वेगवेगळी आव्हाने पेलत आहेत. स्त्रियांचा संघर्ष, बाईच बाईपण सांगण्याचा प्रयत्न शुभांगी पवार यांनी केला आहे.
निष्पाप त्या कळीला
काय कळलं होतं जग
उमगल्या आधीच जाणवली
भोगवाद्यांच्या वासनांची
किळसवाणी धग...!!
वरील ओळींमधून कवयित्री शुभांगी पवार यांनी एखाद्या मुलीवर वयात येण्याअगोदरच अत्याचार होतो. तीला जगही कळलं नव्हतं. आणखीन ऐन तारुण्यात येण्याअगोदरच वासनांध कुत्र्यांनी तिच्यावर हात मारला. असे कितीतरी उदाहरणे आपण पाहतो. कोपर्डी, निर्भया अशा किती मुलींना हैवानांनी शिकार बनवून त्यांचे आयुष्य संपवले आहे. अशा लोकांची चीड संवेदनशील मनाच्या कवयित्री वरील ओळीतून व्यक्त करतात.
जीवन जगण्याची कला
शिकायला हवी माणसानं
क्षुल्लक त्या अपयशाने
खचू नये उगी माणसानं...!!
जीवन जगण्याची एक कला असते. ती साधता आली म्हणजे जिवनाच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. माणसाला कितीही अपयश आले तरी माणसाने कधीच खचून जाऊ नये.वा कधी हारही मानू नये.सतत प्रयत्न केले पाहिजे. तो प्रयत्न करतो तो यशस्वी होतो.असा खूप छान संदेश कवयित्री शुभांगी पवार यांनी दिला आहे.
खुर्चीचे डोहाळे,स्वार्थाची परिभाषा,झोपडीत या माझ्या, स्वार्थ, मोल पाण्याचे, कुठवर सहन करायचं, बाप, निष्पाप कळी, हिरकणी, गाव तसं भलं, सलगी, धरसोड नात्यांची इत्यादी कविता अत्यंत वाचनीय आहेत.
संवेदनशील मनाच्या कवयित्री शुभांगी पवार यांनी अनेक सामाजिक, शिक्षण व्यवस्थेला बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या मुक्तीवर काव्यमाला गुंफलेल्या आहेत.
कवयित्री शुभांगी विलास पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम