*नवकाव्याची निर्मिती करणारा काव्यसंग्रह म्हणजे -मधूसिंधू*
पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सौ माधुरी काकडे यांनी संपादित केलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह म्हणजे मधुसिंधू.मधुसिंधू हा नवनिर्मिती केलेला नवीन काव्याचा प्रकार पुण्याच्या सो माधुरी काकडे यांनी संपादित केलेला आहे.महाराष्ट्रातील एकूण ३५ कवयित्रींच्या प्रत्येकी १० मधुसिंधू कविता घेऊन बनलेला सर्वच स्त्रीया असलेला हा पहिला काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अनुराधा प्रकाशन पुणे यांनी केली असून मुखपृष्ठ चित्रकार रंजीत वर्मा, नांदेड यांनी अतिशय देखणे रेखाटले आहे.या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती 12 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित झाली असून प्रस्तावना जगन्नाथ शिंदे यांची लाभली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ दोनशे रुपये असले तरी नवीन काव्य, नवीन नव कवींना आवडण्यासारखे आहेत.
सतत नवनिर्मिती करणा-या माधुरी काकडे यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह सुष्टीकाव्य प्रकाशित केला. त्यात सर्व कविता निसर्गावर आधारित आहेत. हा त्यांचा दुसरा प्रातिनिधिक काव्यसंग्रह असून याची निर्मिती त्यांनी केली. यात नवीन काव्यप्रकाराचा शोध माधुरीताईने लावला आहे. अलीकडच्या काळात नवनवीन कवी /कवयित्री एकत्र येत आहेत. त्यांनी अनेक नवनवे शोध लावत, नवीन प्रकार शोधले आहेत.म्हणतात ना.गरज ही शोधाची जननी आहे. असे माधुरीताईने पूर्वीच्या पारंपारिक काव्यप्रकाराचा सखोल अभ्यास करून नवीन काव्य निर्मिती केली आणि त्याला मधुसिंधू हे काव्य नाव दिले. या काव्यप्रकारात एकूण 22 अक्षरे आहेत.त्याचे नियम असे आहेत पहिल्या ओळीत व चौथ्या ओळीत पाच अक्षरी दुसर्या व तिसर्या ओळीत सहा अक्षरे अशी एकूण २२ अक्षरे आहेत.
शपथ घेऊ
वाढदिवसाला
वृक्षारोपणाला
प्राधान्य देऊ....!!
या प्रकारे पहिल्या व चौथ्या ओळीत यमक असावे आणि दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत समान यमकअक्षर असावे.तिसऱ्या व चौथ्या ओळीत विचारांची कलाटणी देण्याचा प्रयत्न केला तर रचनेचा गभितार्थ आणखीन छान दिसून येतो.
प्रत्येक स्त्रीला तिच्या भावना असतात. त्या शब्दरूपाने व्यक्त करायला अनेक जणींना आवडते. आज समाजात आपण पाहतो चुलीपासून ते अवकाशा पर्यंत सर्व जबाबदाऱ्या पेलत स्त्रीने मजल मारली आहे. शिक्षण, शिवार, शेत, राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय एवढेच काय बसचा कंडक्टर ड्रायव्हर पासून ते सीमेवर शत्रूपासून संरक्षण करण्यापर्यंत महिला कार्यरत आहेत. जोपर्यंत साहित्यलेखन राहणाऱ्या अनुभवणाऱ्या हातून लिहिले जात नाही तोपर्यंत साहित्य जिवंत होत नाही मधुसिंधू तर राबणाऱ्या अनुभवसंपन्न महिलांची निर्मिती आहे.
चांगले कर्म
आपल्या हातात
मोद पेरतात
जाणा हे मर्म....!
वरील ओळीतून कवयित्री अनिला मुंगसे असे म्हणतात. चांगले कर्म करणे हे माणसाच्या हातात आहे. ज्याला त्याची जाणीव आहे त्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही.
शब्दास धार
जाण्या तडीपार
करती निर्धार
कष्ट अपार....!!
वरील ओळीतून अनुष्का गोवेकर यांनी मधुसिंधू या काव्यातून खूप छान व्यक्त झाल्या आहेत. आपल्याला जर तडीपार जायचे असेल तर आपल्या शब्दांला धार पाहिजे. आपला निर्धार पक्का पाहिजे. त्यासाठी आपण अपार कष्ट केले पाहिजेत असे कवयित्रीला वाटते.
करा संगीत
प्रकट भावना
शमवी यातना
सुरेल गीत....!!
वरील ओळीतून कवयित्री आशा नष्टे म्हणतात की संगीताने मानवी मनातील भावना प्रकट करता येतात. आपल्या मानवी जीवनातील दुःख संगीताने नाहीसे होते. तानतनाव मनावर असला आणि सुरसंगीत ऐकले तर तणाव हलका होऊन जातो आणि मनाला मनःशांती मिळते. त्यामुळे मानवी मनाचे त्रास, दुःख, नैराश्य कमी होते.
माणूस सुखी
चांगले विचार
चांगला अचार
न होई दु:खी....!!
कवयित्री कीर्ती म्हात्रे म्हणतात की माणसाला जर सुखी राहायचे असेल.समाधानी राहायचे असेल तर मनुष्याच्या ठायी चांगले विचार असले पाहिजेत. त्याचे आचरण शुद्ध व सात्त्विक असले पाहिजे. मनाने तो निर्मळ असला पाहिजे तरच त्याला दुःखाचा लवलेशही लागणार नाही. चांगले विचार असले की माणसाचे चांगलेच होते.
त्याग भावना
ठेवा देशासाठी
कार्य सर्वांसाठी
निश्चयी बना....!!
वरील ओळीतून कवयित्री माया देशमुख म्हणतात की माणसाच्या अंगी त्याग भावना असली पाहिजे. समर्पणाची वृत्ती असली पाहिजे. मानवाने एकजुटीने राहिले पाहिजे. प्रत्येकाचे देशाप्रती काही कर्तव्य आहेत. कांही कार्य आहेत. ते सर्वांनी मनोभावे पूर्ण केली पाहिजेत त्यासाठी निश्चित करण्याचा उद्देश कवयित्री देताना दिसून येतात.
संसार, कष्ट, प्रगती, प्रतिष्ठान आत्या, मावशी, मामा, पोस्टमन , अभियंता, गवळण, पुरुष,पुत्र ,शेतकरी शास्त्रज्ञ आई बहिणाबाई लेख अशा व्यक्ती सापेक्ष मधून मधुसिंधूधरचना त्यांच्या फार सुंदर आणि वाचनीय आहेत. त्याच बरोबर निसर्ग, झाडे, फळे, फुले, प्राणी, पक्षी प्रदूषण अशा निसर्गावर आधारित कविता सुरेख पद्धतीने नटून-थटून आलेले आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्राला पूर्वीपासून संतांची परंपरा लाभली आहे.त्यांची शिकवण माणसाला माणूस बनवते. अशा थोर संतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या अनेक कवयित्रीनी संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मीराबाई, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत गाडगेबाबा अशा अनेक संतावर आधारित मधुसिंधू रचना फार सुरेख रचल्या आहेत. प्राणी,जंगल, वनस्पती, सामाजिक जाणिवेतून समाज,देश, संस्कार, समर्पण, संविधान, संकट, समाजकारण, शिक्षण, प्रतिष्ठा इत्यादी महत्त्वाच्या विषयाला अनेकांनी हात घातला असून मधुसिंधूला 4 चंद्र लावल्या सारखेच भासतात.
मधुसिंधू या नवीन काव्य प्रकारांमध्ये एकूण 35 कवयित्रींनी सहभागी झाल्या आहेत .350 कविता अत्यंत वाचनीय सोप्या, सुलभ, भाषेत लिहिले असल्याने या काव्यसंग्रहाचे मोल वाचकांच्या नजरेत नक्कीच वाढेल यात तिळमात्र शंका नाही सतत नाविन्याचा शोध लावणाऱ्या व इतरांसाठी सतत काहीतरी करू पाहणाऱ्या माधुरी काकडे यांनी नवीन काव्याची निर्मिती करून पुढील पिढीला एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
कवयित्री माधुरी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!
समीक्षिका/ शिक्षिका /लेखिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि. परि. प्राथमिक शाळा कोकलगाव
ता. जि. वाशिम