*निसर्ग सौंदर्यातील अद्भुत शिल्पकलेचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे वारसा शिल्पकलेचा*
निसर्गाची अत्यंत आवड असणारा निसर्गप्रेमी, प्रवासाची आवड,साहित्याची जाण, गायन, लेखन, प्रवास, भटकंती,गरजूंना मदत करणं, संवेदनशील हाडाचा शिक्षक, अभ्यासू व्यक्तिमत्व, चित्रपट निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पुणे जिल्ह्यातील आमचे मानस बंधू संदीप दादा राक्षे यांचा प्रवास वर्णन असणारे पुस्तक म्हणजे 'वारसा शिल्पकलेचा'हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. तसे राक्षे दादांना गड-किल्ले, जंगल सफारी, शिल्पमंदिरे, पुरातन वास्तू इत्यादी पाहण्याचा छंद आहे. ते पाहून इतर लोकांच्या मनात ते ठिकाण पाहण्याची उत्सुकता जागृत होते. या पुस्तकातील प्रत्येक प्रवास वर्णन मी जेंव्हा फेसबूक वर पाहते. तेंव्हा खरंच दादासोबत आपणही प्रवास करतोय असं वाटते आणि कॅमेरातले चित्र पाहिले की स्वतः पाहिल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. हे मात्र तितकेच खरे.
वारसा शिल्पकलेचा या प्रवासवर्णन पुस्तकाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले असून मुखपृष्ठ अतिशय देखणे नजरेत साठवून ठेवणारे सुप्रसिद्ध चित्रकार 'अरविंद शेलार' सर यांनी कोरीव अशा सुंदर शिल्प मंदिराचे रेखाटले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १० मार्च २०२२ रोजी माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशित झाली असून याचे मूल्य केवळ १८० रुपये असले तरी प्रवास वर्णन करणाऱ्या, भटकंती करणार्या, निसर्गप्रेमी लोकांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरणारी आहे.
सांस्कृतिक दृष्ट्या व इतिहासकालीन प्राचीन मंदिरे म्हणजे भारताचा सांस्कृतिक वारसा जपत जगाला नव्याने ओळख देणारा भारत संतांची भूमी, शूर वीरांची भूमी, समजली जाते इतर देशातील लोकं आपल्या देशात आल्यावर आपल्या भारताची माती आपल्या स्वतःच्या कपाळाला लावतात. निसर्गप्रेमी, कलाप्रेमी, शिल्पवास्तू प्रेमी असणारे संदीप दादा राक्षे यांना निरनिराळ्या शिल्पकलेची, निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, भटकंती करायला, तेथील दृश्य डोळ्यात साठवायला आणि त्यावर सुंदर प्रवासवर्णन लिहायला आवडते. जणू त्यांचा युगानयुगांचा छंदच आहे. असाच छंद वाचकाला पण प्रेक्षणीय स्थळांची उत्सुकता वाढवणारा आहे. संदीप राक्षे यांनी या पुस्तकात ऐतिहासिक वास्तू, शिल्प मंदिरे, गडकिल्ले पाहत असताना प्रामुख्याने तेथील स्थळ, समाज, रूढी,परंपरा,लोक, संस्कृती यांची माहिती करून घेत पुरातन शिल्प मंदिर व स्थापत्य मंदिर यांचा सखोल अभ्यास करीत मंदिराच्या बाह्य अंगावर शिल्पित केलेल्या सुरसुंदरी, मकतोरण, जालवातायन, रंगशीला, विज्ञान, कीर्तीमुख, गजथर,देवकोष्ठ इ. कोरण्याचे प्रयोजन समजून घेऊन त्यावर लिहिण्याचा प्रयत्न संदीप राक्षे करतात. त्यामुळे वाचकाला वाचताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा भास होतो.वारसा शिल्पकलेचा या पुस्तकात एकूण तेरा ठिकाणचे सुंदर प्रवासवर्णन मनाला भुरळ पाडणारे आहेत.
पहिले रम्य ठिकाण म्हणजे पुण्यामधले अद्भुत त्रिशुंड गणेश मंदिर.पुण्यातील सोमवार पेठे पासून जवळच असणारे हे ठिकाण. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला ही पवित्र भूमी. पावन भूमी. अशा ठिकाणचे हे त्रिशुंड म्हणजे तीन सोंड असलेले गणेश मंदिर. जिथे सुवर्ण पाषाण त्रिशुंड गणेशाची शिल्प वास्तू.शिल्प या मंदिराचे एक खास आकर्षण अनेक वेगवेगळ्या शिल्पाकृती चा सुंदर नमुने या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीप राक्षे यांनी फोटोसहीत छापल्याने वाचकाला प्रत्यक्ष शिल्पाकृती पहावयास मिळतात. दुसरे ठिकाण म्हणजे पेडगावचा धर्मवीर गड. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरुळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट किल्ला देखभालीसाठी होता. मोगलांच्या ताब्यातून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोडवून घेतला. या किल्ल्याच्या आत उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आणि त्या मंदिरावर देखणे शिल्प कोरीव काम केलेले दिसते. याच मंदिरात लक्ष्मीनारायणाची अद्भुत कलाकृती दिसते. जिथे किरणोत्सव जूनमध्ये पाहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच वास्तू छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य स्मृती असलेले स्थळ म्हणजे धर्मवीर गड.
तिसरे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गुप्तेश्वर. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धारासुर गावचे गुप्तेश्वर मंदिर. मंदिराची भव्यता व शिल्पाकृती पाहून कोणीही मंत्रमुग्ध होईल यात शंकाच नाही. हे मंदिर चालुक्य काळातील अकराव्या शतकातील. या गुप्तेश्वर मंदिराचे शिखर अजूनही शाबूत दिसते. चौथे ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील कुकडेश्वर शिवालय ९१०व्या दशकात झंझ राजाने बांधलेले कुकडेश्वर शिवालय हे मंदिर हरिश्चंद्रगडावरील शिवालय प्रति बद्रिनाथ-केदारनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिमाभिमुख असलेले हे शिवालय आतून बाहेरून अनेक शिल्पांनी नटलेली आहे. रायगड जिल्ह्यातील कोथळी गडाचा प्रवास वर्णन ऐकून मन भारावून जातं. पण गडाच्या पाय-या चढायला खूप अवघड जातं. गड चढायला लेखकाला संदीप राक्षे सरांना आईचे दूध आठवत होते. त्यात सोसाट्याचा वारा गड चढू देत नव्हता अशा परिस्थितीत द्राक्षे सरांच्या सोबत असलेली बालचमू मंडळी कशीबशी गड चढून वर जाते आणि राक्षे सर खाली धबधब्याजवळ उभे राहतात.कारण निसर्गाच्या समोर माणसाचे काही चालत नाही. धबधब्याजवळ रान हळदीची पिवळीधम्मक फुले मनाला भुरळ घालणारी आहेत. या गडावर अद्भुत आश्चर्य म्हणजे वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरते ठरलेली दगडी भुयार होय.
पुढचे दैवत कोहिंडे बु.गावचा कोहिडेश्वर. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यांमध्ये असणारे कुंडेश्वर महादेवाचे मंदिर. वनराईने नटलेले कुंडेश्वराचे डोंगर सात किलोमीटर घाटाचा रस्ता चढून मग कुंडेश्वराच्या दर्शनाला जावे लागते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे निमगिरी किल्ला. या किल्ल्यावर पूर्वीचे असे काहीच राहिले नाही. वरती फक्त छप्पर वजा मंदिर तयार केलेले आहे. त्यात गजलक्ष्मी व महादेवाची पिंड आहे पण दर्शन घेतल्यावर जी ऊर्जा मिळते ती स्वर्गसुखाचा पेक्षाही श्रेष्ठ आहे. असे संदीप राक्षे दादा सांगतात. या ठिकाणी घनदाट झाडीत ५० वीरगळी एका रांगेत आहेत.वीरगळ म्हणजे एखाद्या व्यक्तीला लढताना रणांगणावर वीरमरण तेथे त्यांच्या स्मृतीत वीरांचे दगडांच्या शिळेवर विशिष्ट प्रसंगाचे शिल्पांकन करून तो पाषाण स्तंभ स्मृती स्वरूपात जतन करणे.
पुढचे ठिकाण आहे ओतूरच्या कपार्दिकेश्वराचे मंदिर. मांडवी नदीच्या तीरावर वसलेले हे तीर्थक्षेत्र पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नव्या दशकात झंझ राजाने हे मंदिर बांधले होते .अप्रतिम शिल्पाकृती व सुंदर नक्षीकाम केल्यामुळे सभागृह अत्यंत देखणे दिसत होते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे पळशीचे विठ्ठल मंदिर. पारनेर तालुक्यातील पळशी गावचे विठ्ठल मंदिर. नागर शैलीतील बांधकाम व शिल्पकाम ज्या अठरा षटकोनी शिल्पजडित स्तंभावर उभे आहे. शाळिग्राम दगडापासून कृष्ण अवतारात बनवलेली मूर्ती अतिशय देखणी, सुंदर रूप,कमरेवर हात, गळ्यामध्ये तुळशीचे हार, कस्तुरी-टिळाच्या आकाराची कुंडले असे मनोहारी रूप माणसाच्या काळजात साठवल्याशिवाय राहत नाही. जांबचे विष्णू मंदिर तसेच काठापुरचा वाघ वाडा डोळ्यात साठवण्याचे ठिकाण. या वाड्यात छोटी छोटी आणि सुंदर नक्षीकाम केलेली ऐतिहासिक वास्तू आणि तिची आजच्या काळात झालेली दुरावस्था. हिंदवी स्वराज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांनी हा वाडा १७५० साली बांधला होता. पानिपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ यांना वीरमरण आले. त्यानंतर मल्हारराव होळकरांनी १७६५ साली सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना दिला. त्यानंतर ते आजपर्यंत हा वाडा वाघ वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. इतक्या मोठ्या वैभवाची साक्ष देणारा हा वाडा आज अखेरचा श्वास घेत असल्याची खंत लेखक संदीप राक्षे व्यक्त करतात.
पुढचे ठिकाण म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आपेगाव. सूर्यदेवाचे किरण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखकमलावर विराजमान झाले. ना भूतो न भविष्यति असा चमत्कार लेखक संदीप राक्षे यांनी अनुभवला. पर्यावरणाची शिल्पकलेची, ऐतिहासिक, पुरातन वास्तूंची, गड किल्ल्यांची आवड असलेला हा अवलिया महाराष्ट्रातला पहिलाच आहे असं मला वाटतं. आज पर्यंत त्यांची अनेक प्रवास वर्णन व फोटो मी त्यांच्या फेसबुक पेजला पाहत होते पण आज त्यांचे पुस्तक वारसा शिल्पकलेचा हे वाचून व आतील चित्र पाहून स्वतः प्रवास केल्याचा अनुभव मला आला. खरंच शासनाने महाराष्ट्राचा अमोल ठेवा म्हणजे ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, पुरातन मंदिरे यांचा जिर्णोध्दार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेही तितकंच खरं आहे.
सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे प्रवासवर्णन असणारे 'वारसा शिल्पकलेचा' हे पुस्तक प्रत्येक घरातील मुलांना वाचण्यास द्यावे.जेणेकरून मुलांना पुरातन वास्तूची जाण होईल. यात खूप सुंदर व सखोल माहिती आमचे माणस बंधू संदीप दादा राक्षे यांनी करून दिली आहे.
संदीप राक्षे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम