Saturday, 19 June 2021

माझ्या कविता

Friday, 11 June 2021

ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा ललितलेख संग्रह म्हणजे गाई गेल्या राना..

 *ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा ललितलेख संग्रह म्हणजे -गाई गेल्या राना*

   अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील लेखक रवींद्र जवादे सर यांचा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा हा ललित लेखसंग्रह आहे.या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गाई रानात जातानाचे मालकासहचे दृश्य दिसत आहे.असे देखणे सुंदर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून प्रकाशन शब्ददिप प्रकाशन मुर्तीजापुर अकोला यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी याची प्रथमाआवृत्ती प्रकाशित केली आहे. या पुस्तकात एकूण 20 ललित लेख ग्रामीण संस्कृतीची ओढ लावणारे आहेत. प्रस्तावना वाशिम चे ख्यातनाम कादंबरीकार जेष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांची लाभली असून पाठराखण अशोक कोतवाल यांनी केली आहे. या पुस्तकाचे मुल्य केवळ २२० रुपये असले तरी सर्व ललित लेखन गावच्या मातीची ओढ लावणारी आहेत.
         प्रसिद्ध लेखक श्री रवींद्र जवादे यांचे यापूर्वी 'ऋतुगंध' व *दिवेलागण ह्या*  दोन ललित लेखसंग्रह प्रकाशित झालेले असून दिवेलागण या ललितलेख संग्रहाला महाराष्ट्रातून आत्तापर्यंत अकरा पुरस्कार लाभले आहेत. दिवसभराचे एक जगणं एक स्थीर वर्तुळ यात आलेला आहे जगणं कुणाचेही असो गाईचं ,बाईचं ,माणसाचा त्याला सुख दुःखाचे अनेक व्यामिश्र पदर असतात.त्यातील ललित लेख महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिवाळीअंक मासिक पक्षी तसेच अनेक वर्तमान पत्राच्या पुरवण्या मधून प्रकाशित झालेले आहेत.
                  पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये एक तरी गाय असायची.अनेकांच्या घरी गोकुळ नांदत असावं जणू ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी गोठ्यातल्या गाईच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आज सकाळच्या समयी संपूर्ण घरभर, गोठा गावभर,ऐकू यायचा, धारा काढताना चा आवाज घरातील थोरामोठ्यांची चाललेली कामाची लगबग, गायीला ढुसण्या देणारे वासरू , दूध पिताना चे दृश्य आणि गाय घरमालकाच्या हाताला जिवेन चाटणारा उमाळा अंगणी पडणारा प्राजक्ताचा सडा, दारात काढलेली सुंदर टिपक्याची रांगोळी,समोर तुळशीवृंदावनात लावलेल्या अगरबत्तीचा घरभर पसरणारा सुवास त्या दारात बसलेल्या मोत्या आणि दुधाची चरवी हातात घेऊन आई घरात आल्या बरोबर मधोमध दोन पायाच्या आत घुटमळणारी मांजर हे सारं काही आजच्या काळात हळूहळू लोप पावत चालले आहे. पाऊस रुपयाचा येतो या ललित लेखांमध्ये पावसाचे अतिशय सुंदर असे वर्णन कवी रवींद्र जवादे सर यांनी केले आहे. पावसाच्या आगमनाने सुगंधित झालेली माती हिरवेगार फुटणारे कोवळे  गवत कुरणे रस्त्याच्या दुतर्फा, बाजूने डोलणारी रानफुलं, अंगणात फुलून आलेला मोगरा, ढगाआड लपलेला चंद्र, सार मनाला भुरळ घालणार आहे.
         
         कशाला काशी जातो रे बाबा 
         कशाला पंढरी जातो ?
          संत सांगती ते ऐकत नाही 
          इंद्रियांचे ऐकतो 
           कोंबडे बकरे खातो रे बाबा 
            कशाला पंढरी जातो?

       ग्रामीण भागात मंदिरामध्ये किंवा कोणाच्याही घरामध्ये भजनाचा वेग वाढलेला असतो. त्या भजनाच्या ओळी संतांनी सांगितलेल्या खूप काही सांगून जातात. वरील ओळीतून कोंबडे बकरे खातो आणि कशाला पंढरीला जातो? असा खडा सवालही वरील ओळीतून गाडगे बाबांनी केला आहे. अशा परिवार परिवर्तनवादी विचारांच्या भजनातून ग्रामीण भागातल्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो. ग्रामीण भागातली शुद्ध,मोकळी हवा संध्याकाळचे गंध वातावरण, गावातल्या गोठ्यातल्या गायी हंबरणा-याचा आवाज, सायंकाळी मंदिरामागे चालणारा हरिपा,गाईचं दूध पिणारे वासरू,गवताचा गुळचट वास, अंगणातल्या तुळशीसमोर आईने लावलेल्या दिव्याचा प्रकाश, शांत मोकळे आकाश सांज काळोखात पसरणाऱ्या मोगर्‍याचा सुवास हे सार सांज ये गोकुळी या ललित लेखसंग्रहात अगदी हुबेहूब डोळ्यासमोर चित्र उभे राहतो.
          आषाढात पडणारा पाऊस घननीळ दिसणारा आभाळ त्याचे झोके घेणारा अल्लड वारा , कोकिळेची सुंदर धून, मातीचा सुगंध दरवळलेला अमृतासारखे पडणारे पावसाचे थेंब. चिंब पावसात मनसोक्त भिजणारी मुलं हे सारं अगदी जसेच्या तसे नभ उतरू आलं या ललित लेखात पाहायला मिळतं ग्रामीण भागातले लेखक रवींद्र जवादे यांनी खूप बारकाईने गाव कुसाच्या ग्रामीण भागातल्या आठवणींना उजाळा देणारे क्षण हुबेहूब पुणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोराचं सुंदर देखणेपण रानात नाचला मोर या ललित लेखात खूप सुंदर पद्धतीने लेखक रवींद्र जवादे सरांनी रेखाटले आहे निसर्गाने मोराला भरभरून दिलेल्या देखणं रूप म्हणजे एक वरदान म्हणजे मोराचा देखणं रूप रंग त्याच्या मोरपिसां-राचा सुरेख रंग कधी अधि मोराचा देखणं रूप त्याच्या जीवावर बेतलं .आजही ग्रामीण भागात माळरानी एक कटाक्ष टाकला किंवा भटकंती केली तर नजरेला मोर पडतातच पावसाळ्यात मात्र मोर जास्त दिसू लागतात असं सुंदर वर्णन लेखकांनी केलेलं आहे.
        लेखक रवींद्र जवादे सरांच्या लेखणीला तोड नाही. प्रत्येक लेख अगदी साधी सोपी पण रसाळ मधुर गोड भाषाशैलीमुळे हा ललितलेख संग्रह संपेपर्यंत हातातून सोडून देऊ नये असच  वाटल्याशिवाय रहात नाही. निस्सीम निसर्गप्रेमी , पशू प्रेमी असलेले संवेदनशील मनाचे लेखक रवींद्र जवादे सर यांनी सुंदर ललित लेख संग्रह लिहिण्यासाठी निसर्गाने खरे दान त्यांना दिले आहे. यात शंकाच नाही ग्रामीण भागातल्या कौलारू घरात पावसाळ्यात पडणारे पावसाचे थेंब,थेम्बाना पकडण्यासाठी भांडे लावण्यासाठी चाललेली धावपळ, पावसाळी रात्र, वाढलेला गारवा, पेटवलेली शेकोटी अंगणाने व घराणे दिलेला जिव्हाळा हे सारे इवलसं घर या ललित लेखसंग्रहात न दिसून येते. ऊन वाऱ्यापासून बचाव करणाऱ्या घराचं कौतुक रवींद्र जवादे सरांनी सुरेखपणे मांडले आहे. 'सर्पाची लागण' या ललित लेखांमध्ये ग्रामीण भागातल्या रानात बांधावर सर्पाची जोडी अचानक दिसल्याने गावकरी चिंतित पडलेली असतात हे खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे.
           लेखक रवींद्र जवादे यांची साधी सरळ भाषा आणि सर गाने निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी वाचकाला भुरळ पाडणारी आहे. ग्रामीण भागातल्या संस्कृतीची ओळख करून देणारी, झऱ्याप्रमाणे खळखळणारी लाभली आहे. शब्द माधुर्य व शब्द सौंदर्याने भरभरून नटलेली असल्याने मन उल्हसित करणारी आहे. गायी गेल्या राणा या ललित लेखसंग्रहात पशुपक्षी आणि मानवी जीवन यांची चित्तवेधक वर्णन वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते . गाई गेल्या राहा ललित लेख संग्रह म्हणजे ग्रामीण लोकसंस्कृतीचा उत्कृष्ट आविष्कारच आहे रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या भाव गर्भित प्रसंगाने वाचक कधी आनंदी होतो तर कधी अस्वस्थ होतो बिबट्याने घातलेला धुमाकूळ पाहून गावातील लोकांनी बिबट्याला मारण्यासाठी काढलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वाचकाच्या अंगावर शहारा आणणा-या आहेत.
        आजच्या इंटरनेटच्या धावत्या काळात हरवून बसलेलं मामाचं पत्र आज खेड्यावर सुद्धा येत नाही. पूर्वी खेड्यापाड्यात पोस्टमास्टर सायकल वर गावोगाव फिरून पत्र वाटप करायचा त्या पत्राची अनामिक ओढ, मायेचा ओलावा, जिव्हाळा, आपुलकी गोडी पत्रातले ते शब्दधन व्हाट्सअप व इंटरनेटच्या आजच्या काळात पार हरवून गेल्याची खंत कवी रवींद्र जवादे यांनी अगदी सुंदर सुरेखपणे मांडली आहे कवी रवींद्र जवादे पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा

 समीक्षिका /लेखिका/ कवयित्री/ शिक्षिका 
कु.मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 27 April 2021

सुखदुःखाच्या वाटा म्हणजे बाभळीचा काटा

 *सुखदुःखाच्या वाटा म्हणजे - बाभळीचा काटा*

       प्रत्येक मनुष्य सुखासाठी झटत असतो आणि सुख शोधत असतो.सुखाच्या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहात असतो. खरंतर सुखाचा मार्ग खूप खडतर असतो त्यातून ही स्वतःच्या जिद्दीने, प्रयत्नाने, दुःखाचे काटे तुडवित, अपयशाचे अडथळे खात शेवटी सुखा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, गझलकार,गायक, शिक्षक असणारे विजय वडवेराव यांचा काव्यसंग्रह "बाभळीचा काटा" नुकताच वाचनात आला. अतिशय देखणे मुखपृष्ठ माय चुलीवर भाकरी थापत आहे. समोर लहान मुल अंगात फक्त चड्डी घालून माय समोर बसले आहे. त्याची गरीबी जणूकांही मुलाच्या अंगाला बाभळीच्या काट्यांप्रमाणे टोचत आहे. असे सुंदर मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून परीस पब्लिकेशन यांनी याची प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित केली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १५० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता जीवनाशी समरस होत काळजाला भिडणा-या,अडथळे ओलांडून यशाकडे नेणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची पाठराखण लोककवी प्रशांत मोरे यांनी केली आहे.
          स्वतःच्या जीवनावर अत्यंत प्रेम करणारा, गरिबीचे चटके अतिशय जवळून सोसणारा, सुखदुःखाच्या वाटा तुटवित यशाचा मार्ग शोधणारा,झोपडपट्टीत राहून सुद्धा आकी व आबा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतून तळमळून अभ्यास करून शिक्षकी पेशात पदार्पण करणारा, हाडाचा पण संवेदनशील मन असणारा कवी विजय वडवेराव यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. यापूर्वी त्यांचा "वेशीवरचा दगड" हा काव्यसंग्रह महाराष्ट्रात बऱ्यापैकी नावारूपाला आला आहे. "बाभळीचा काटा" हा कविता संग्रह म्हणजे वेदनादायी अनुभूतीचे भकास माळरान त्यातच एक नाजूक  रंगीबेरंगी फुलबाग सुद्धा आहे.
    
              तू गं गुलाबाच फूल 
              मी गं बाभळीचा काटा 
               माझं जगणं फाटकं
               तुझ्या मखमली वाटा...

                तुझं पिढ्या न पिढ्याचं
                बागायती गं शिवार
                माझ्या गावकुसापोटी
                सदा भुकेचं निखारं

             वरील ओळीतून कवी प्रियेसीला आपल्या परिस्थितीची जाणीव करून देत आहे. गुलाबाचं फुल सर्वांनाच आवडतं पण त्याचे काटे कोणालाच आवडत नाहीत त्यामुळे कवी आपल्या काव्यातून प्रियेसीला म्हणतो तू गुलाबाचे फुल आहेस तर मी बाभळीचा काटा आहे. माझं जगणं फाटकं आहे. माझी परिस्थिती नाजूक आहे. तुझ्या जीवनाची मखमली वाट आहे. तू पिढ्यानपिढ्या गर्भश्रीमंत आहेस. तुझ्या शेतात बागायती शिवार आहे. तर माझं घर गावकुसाबाहेर आहे.त्यात भुकेचे निखारे आहेत. आणि तेच माझं वास्तव आहे. मनापासून प्रेम करणार्‍या वेड्या मनाच्या कवीला गरीब श्रीमंतीची दरी दिसते. आणि हळव्या मनाचा कवी आपल्या शब्दात मांडताना दिसतो आहे.

                कानी तव्याच्या गाताना 
                माय भाकरीच गाणं 
                 साऱ्या घराच्या भुकेचं 
                 झुले चुलीला तोरण

                 जीव लावाया पिठाला 
                 तिनं सारता काकण 
                  उभ्या आभाळात घुमे
                  तीच भाकरी थापणं....!!

           ग्रामीण भागातली माय चुलीवर जेव्हा भाकरी थापते तेंव्हा तिच्या हातातील काकणाचा आवाज भाकरीच गाणं गातो.साऱ्या घराच्या भुकेचं तिच्या चुलीला तोरण जणू लावला आहे.भाकरी करताना माय पीठ मळताना तिने पिठाला किती जीव लावलेला आहे. तिच्या हातातल्या काकणाला मागे सारत आवाज आणि तीच भाकरी थापणं आभाळात घुमत आहे. एका एका भाकरीसाठी माय किती हाताला चटके  जणू तिच्या हातावर गोंदन केल्याप्रमाणे तरीही अख्ख्या जगाची भूक भागविण्यासाठी माय भाकरी थापत राहते अशी माईचं व भाकरीचं गाणं व ऋण व्यक्त करणारी कविता वाचकाच्या अंतर्मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. संवेदनशील मनाचा कवी विजय वडवेराव यांची प्रत्येक कविता सुखदुःखाची सरमिसळ आहे. त्यात आनंद, दुःख, वेदना विरह,त्याग इत्यादी स्पष्ट दिसतो.

         बाप माझा हाय विठू 
          माई रखुमाई खरी 
          पांडुरंगा सांग मग 
          मी का पहावी पंढरी? 

           कसा राबतोय माझा 
           बघ बाप हा शिवारी 
           टपटप घाम वाजे 
           जसा मृदूंग गाभारी....!!

           आई वडिलांवर अतोनात प्रेम करणारा कवी विजय वडवेराव स्वतः च्या बापाला विठ्ठलाच्या रूपात पाहतो. माझा बाप विठू आहे. आणि माझी आईच रखुमाई आहे. माझ्या घरीच विठ्ठल रुख्माई असताना मी पंढरीला का जावं? असा खडा सवालही त्यांनी वरील ओळीतून व्यक्त केला आहे. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून देवाने घरातच देवासमान आई-वडील प्रत्येकाला दिले आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देवाची खोटी भक्ती करणाऱ्या ढोंगीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन कवी विजयरावांनी कवितेच्या माध्यमातून घातले आहे. माझा बाप शेतात कसा राबराब राबतो. कष्ट करतोय. माझ्या बापाच्या घामाचा टपटप आवाज विठ्ठलाच्या गाभाऱ्यात मृदंग वाजल्याप्रमाणे वाजतो आहे. साऱ्या जगाचा देव जरी पंढरपूरचा पंढरी असेल पण माझा देव माझ्या घरी आहे. माझा बाप स्वतः उपाशी राहून जगाला भाकरी देतो. अशा शब्दांत आपल्या अंतर्मनातील भावना कवीने व्यक्त केल्या आहेत.

          वेदनेच्या चिखलात 
          मूळ धरते कविता 
          ज्याचं काळीज जिवंत 
          त्याला कळते कविता....!!

         वरील ओळीतून कविता म्हणजे काय असते? कविता म्हणजे फक्त अक्षरे किंवा शब्दच नाहीत तर जेंव्हा मनुष्याला खूप दुःख होते, वेदना होते, तेव्हा कवितेचा आपोआप जन्म होतो. त्याच्या हृदयात कविता जन्माला येते. आणि त्याचं काळीज जिवंत आहे. त्यालाच ती कविता कळते. संवेदनशील मनाचा व्यक्तीलाच कवीच्या भावना सहज कळतात. जेंव्हा आपले नातेवाईक, सगेसोयरे सर्वांनी साथ सोडतात तेंव्हा कवीच्या सोबत कविता सुद्धा वनवास भोगले सारखी जगते. जर एखादा कवी एकटा पडला असेल तर त्या कवीला जीव कविता लावते. आणि त्याच्या अंगाखांद्यावर छान कविता खेळते. असे इतकं कवितेचे अनन्यसाधारण महत्त्व कवीच्या जीवनात आहे.
         निसर्ग सौंदर्य, सौंदर्यदृष्टी, साद घालणारा हळवं मन, सखी, प्रियेसी, आई-वडील, सुख-दुःख, गंधाळली रात, कवीनं भोगलेला वनवास, पाऊस, पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, बापाचा विरह, शेतकऱ्यांचे दुःख, कष्ट, बळीराजाचचे दुःख हे सार कवी विजय वडवेराव यांनी आपल्या काव्यातून मुक्तपणे तर काही गेय प्रकारात हळुवारपणे व्यक्त केले आहे. त्यामुळे विजय रावांची प्रत्येक कविता काळजाचा ठाव घेत पुढे जाते. गरिबीचे चटके भोगणारा कवी विजय वडवेराव यांनी अपार मेहनत, जिद्द, कष्ट, शिकण्याची हौस, गरिबी, दुःख हे सारे सोबतीचे प्रवासी घेऊन शिक्षक, गायक, कवी, लेखक ते गझलकार पर्यंतचा सारा प्रवास सुखदुःखाच्या वाटा तुडवित उदयाला आला आहे. "बाभळीचा काटा" प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच हा कवितासंग्रह आहे. कवी विजय वडवेराव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समीक्षिका /लेखिका/शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता.जि. वाशिम
मो.9767663257

Sunday, 18 April 2021

*जगाचा पोशिंद्याला सुखी ठेवण्यासाठी विठुरायाला साकडे घालणारा कविता संग्रह म्हणजे "विठू माऊली की विठोबा!"*

 Date: 15 Apr 2021

*जगाचा पोशिंद्याला सुखी ठेवण्यासाठी विठुरायाला साकडे घालणारा कविता संग्रह म्हणजे "विठू माऊली की विठोबा!"*

       महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ज्या विठू माऊलीची पूजा केली जाते. त्या विठू माऊलीला कुणब्याच्या आयुष्यात एक वेगळे स्थान आहे. ते वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागातून मोठ्या उत्साहात दिसते. अशा वातावरणातून लहानाचा मोठा झालेला अर्थात कुणब्याच्या घरात जन्माला आलेले मलकापूर, अकोल्याचे कवी गणेश शिवराम भाकरे यांचा चौथा कवितासंग्रह "विठुमाऊली की विठोबा!" हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय सुंदर समर्पक नावाला साजेसे घाम गाळणाऱ्या शेतकरी राजाचे, हाती विळा व एका खांद्यावर कुदळ घेऊन विठ्ठला सारख्या बळीराजाचे देखणे चित्र रेखाटले आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शब्ददीप प्रकाशन, अकोला यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती २४ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाशित झाली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १७० रुपये असून यात या सर्वच कविता विठुरायाच्या चरणी साकडे घालणाऱ्या आहेत.
              शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले कवी गणेश भाकरे यांचा पहिला कवितासंग्रह "मी" दुसरा कवितासंग्रह "आसवांची शाई" याला महाराष्ट्रातून १४ विविध पुरस्कार मिळाले आहेत. तिसरा कवितासंग्रह प्रकाशाचा दिवा बालकवितासंग्रह झाला.याला महाराष्ट्रातून विविध १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. असा हाडाचा कवी असणारा पण रेमंड लिमिटेड छिंदवाडा डिव्हिजन या नामांकित कंपनीत कामाला असून हे साहित्याचा छंद जोपासणारे आहेत. कवी गणेश भाकरे यांच्या साहित्यावर प्रेम करणारा साहित्यीक गोतावळा, गाव मातीतीलं गणगोत, हाताच्या बोटावर मोजता न येण्यासारखी आहेत. एका नामवंत कंपनीत कामाला असूनही कवी गणेश भाकरे यांचे चार कवितासंग्रह दर्जेदार स्वरुपात वाचकांच्या समोर ठेवण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे यांच्या किशोर मासिकातून सलग २९ महिने प्रकाशित झाल्या.अनेक पुरस्कार मिळाले यावरून साहित्यावरचे त्यांचे नितांत प्रेम व आस्था दिसून येते.
              शेतकऱ्या बद्दल अत्यंत जिव्हाळा, आपुलकी, प्रेम असणारे कवी गणेश भाकरे यांनी शेतकऱ्याचं जगणं-मरणं शेतकऱ्याचे कष्ट, कष्टकरी लोकांच्या व्यथा, विठुरायाशी संवाद साधत विठुरायाच्या चरणी साकडे घालत देशाच्या सीमेवर पहारा देणाऱ्या जवान सैनिक व घाम गाळून देश जगवणा-या जगाचा पोशिंदा म्हणजेच बळीराजाला अर्पण केले आहेत. कवी गणेश भाकरे यांच्या सर्वच कविता माणसाला जगायला शिकवणाऱ्या, माय बापाला  पांडुरंग रूपात पाहणाऱ्या, शेतकऱ्याला कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, लबाडांची बिंग फोडणाऱ्या, थकल्या देहाचं जीन सांगणाऱ्या, अभंगातून विठुरायाला विनवणी करणाऱ्या,गावाची महती सांगणाऱ्या, कुणब्याची महती सांगणाऱ्या, जीवनाचा वेध घेणाऱ्या, संस्कार पेरणाऱ्या, शेतकऱ्यांना प्रति आदर व्यक्त करणाऱ्या, आईची महती सांगणाऱ्या, जगाचं दुःख, दारिद्रय, शेतकऱ्याचे गा-हाणं अभंगातून विठ्ठलाला सांगणाऱ्या सर्वच कविता काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत.

       वार्ता कळताच मित्रा आलं डोळ्यांत रे पाणी
       कसा टाळूनिया गेला सांग शेवटच्या क्षणी
       चिंबचिंब आसवांनी केले ओलेचिंब घावं 
       पोटासाठी आलो होतो मित्रा सोडूनिया गाव
       जुन्या आठवणी झाल्या साऱ्या पापणीत गोळा 
        तुझी माझी आठवली  मित्रा गावातली शाळा,....!!


      मित्रांवर अतोनात प्रेम करणारा कवी गणेश भाकरे यांचा मित्र अचानक सोडून गेलेल्या भावना वरील ओळीतून दाटून आलेल्या दिसतात. मित्राचा विरह दिसून येतो. मित्र गेल्याचे दुःख वरील ओळी ओळीतून व्यक्त होते. दुःखाच्या वेळी, संकटाच्या वेळी मित्राचा फार मोठा आधार असतो. जगात मित्राला खूप मोठे स्थान आहे. आपण प्रत्येक गोष्ट कोणालाही सहज सांगू शकत नाही पण मित्रांकडे शेअर करु शकतो. अशी हक्काची जागा म्हणजे मित्र. सदैव सोबत असणारा मित्र शेवटच्या क्षणी अचानक निघून गेल्याने कवी गणेश भाकरे यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पोटासाठी शहरात आलेला मित्र म्हणजे कवी गणेश भाकरे यांचा मित्र गावातच होता पण शहरात आलेल्या हळव्या मनाच्या कवी गणेश भाकरे यांना बालपणीच्या आठवणी मनात गोळा झाल्या दोघांही मित्रांची एक शाळा आठवली आणि मित्रावरचे उत्कट प्रेम वरील ओळीतून दिसून येते.

        शेणा-मातीच्या घरात झाला अन्नाविना अंत 
        सांग लाडक्या विठ्ठला तुला का नाही रे खंत...!!

      गरीबी फार वाईट असते ज्यानं गरिबी भोगली त्यालाच गरिबीचं महत्व कळतं.परिस्थिती फार वाईट असते. गरिबीला पण मन असतं पण दररोज तो मन मारून जगत असतो. गरिबाला आहे वाटतं आपण चांगलं काम चांगले केले पाहिजे. कपडे चांगले घालावे ,चांगले राहावे पण गरीबाची बीड एकाही त्याला सुटू देत नाही आपल्या देशात श्रीमंत -गरीब अशी साखळी निर्माण झाली आहे.श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातो आहे.आणि गरीब आणखी गरीब होत जातोय. गरीब व श्रीमंत यांच्यामधली दरी फार मोठी आहे. गरीब गरिबाला रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते. भूक जगू देत नाही.गरिबी मरु देत नाही ...!! अशी काहीशी अवस्था असते गरीबाच्या घरी शेणा मातीच्या घरात अन नसल्यामुळे अंत झाला विठ्ठला तू सर्वांचा मायबाप आहेस तुला त्याची खंत नाही का रे असा खडा सवालही कवी गणेश भाकरे यांनी पंढरीच्या विठ्ठलाला केला आहे

           "राहू दे तुझी रे 
            कृपा आम्हावर 
             देऊननिया सर 
                .....पावसाची....!!

              वरील अभंगाच्या ओळीतून विठुरायाच्या चरणी शेतकऱ्यासाठी साकडे घालणारा संवेदनशील मनाचा कवी गणेश भाकरे म्हणतो आहे. कवी गणेश भाकरे यांनी विठ्ठलाला हात जोडून विनंती केली आहे खूप पाऊस पाड तुझी कृपा आम्हावरी राहू दे. अशी हाक दिली आहे. शेतकऱ्याचा आयुष्यात पावसावर पाऊस अवलंबून असतं पाऊस नाही झाला तर अवर्षणाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्याला दुसरे काही वैभव नको असतं. फक्त त्याचे हिरवे रान बघितलं की शेतकरी राजा आनंदाने डोलतो. शेतकरी विठुरायाच्या चरणी फक्त चतकोर भाकरीची भूक मिटवण्यासाठी विनंती करतो तरी गणेश भाकरे शेतकऱ्याचे पुत्र असल्याने शेतकऱ्याचं जगणं-मरणं शेतकऱ्यांचे कष्ट जवळून पाहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या शब्दात दाटून येतात.

           "कुण्या कवितेत मांडू
           दुःख आयुष्याच माझं
            कशी लेकरांना झाली 
            माय जन्मदाती ओझं!"

            वरील अष्टाक्षरी तून कवी गणेश भाकरे यांनी आजच्या काळातील मुलांना जन्मदात्री कशी ओझी वाटत आहे याची खंत वरील ओळीतून व्यक्त केली आहे. जी आई पोटच्या लेकराला नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात ठेवते. जन्मल्यानंतर बाळाला सतरा धारा दूध पाजते, लेकरासाठी आयुष्यभर मरमर करते,राब राब राबते हाडाची काड करते. लेकरू शिकावं म्हणून पदराला शंभर गाठी मारते. तीच माय घरात उपाशी झोपते. कांही मुलं तर लग्न झाले की आई-वडिलांना वेगळं काढून देतात किंवा सरळ वृद्धाश्रमात ठेवतात. अशा निष्ठुर झालेल्या मुलांसाठी आईचे महत्व,आईच दुःख, वेदना , कवी आपल्या काव्यातून जड अंतकरणाने मांडतो.

         बांधावर नाही | आधाराला बाप 
         कोणी दिला शाप | असा मला...!!

       वरील अभंगाच्या  ओळीतून बाप नसल्याचे दुःख शेतकरी पुत्राने छान मांडली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या डोईवर वर बापाचे छत्र हरवतो तो अभागी मुलगा बांधावर गेला की त्याला त्याचा बाप आठवतो बापाचा वीर जीवघेणा वाटतो म्हणून तो देवालाच कुणी शाप मला दिला म्हणून आपल्या कवितेतून व्यक्त होतो.
         विठोबा या काव्यसंग्रहातील सर्वच कविता थेट काळजाला जाऊन भिडतात.तातल्या बर्‍याच कविता शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंधित आहेत.तर काही कविता शहरात राहायला गेलेल्या पोराच्या आठवणीने डोळ्यांत पाणी येणाऱ्या गावाकडच्या मायबापाच्या आहेत. बऱ्याच कविता विठ्ठलाची संवाद साधणाऱ्या , विठ्ठलाच्या चरणी साकडे घालणारे आहेत, तर काही कविता आणि शिष्य दुष्काळ विरह शेती ,शेतकरी यांच्याशी निगडित आहेत .तरी गणेश भाकरे यांना त्यांच्या आईला जे दुःख पटकन समजते ते दुःख विठुरायाला का समजत नाही?  तूच सांग विठोबा तुला काय म्हणून "विठू माऊली की विठोबा" अशा शब्दात कवी व्यक्त होतात आणि पांडुरंगा चरणी साकडे घालतात... साऱ्या जगाचा तुच निर्मितीकार आहेस.म्हणून काव्यरूपी हाक देतात . तूच दुसऱ्यांचे दुःख नाही सकर म्हणून विठुराया चरणी प्रार्थना करतात.
      कवी गणेश भाकरे यांच्या विठुमाऊली की विठोबा हा काव्यसंग्रह सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे कवी गणेश म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.9767663257

Wednesday, 7 April 2021

तिमिरातूनी तेजाकडे नेणारा काव्यसंग्रह म्हणजे-मी उजेडाच्या दिशेने निघालो.*

*तिमिरातूनी तेजाकडे नेणारा काव्यसंग्रह म्हणजे-मी उजेडाच्या दिशेने निघालो.*

          वर्धा जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने यांचा चौथा काव्यसंग्रह मी उजेडाच्या दिशेने निघालो नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ तिमिरातुनी तेजाकडे म्हणजेच अंधारातून उजेडाकडे नेणारे आहे. नावाला साजेसे सुंदर मुखपृष्ट प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून दर्जेदार बांधणी व प्रकाशन मध्यमा प्रकाशन नागपूर यांनी दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी याची प्रथमावृत्ती प्रकाशित केली आहे.या काव्यसंग्रहाला प्रस्तावना डॉ.भूषण रामटेके यांची लाभली असून मलपृष्ठावर डॉक्टर प्रमोद मुनघाटे यांनी पाठराखण केली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ २२० रुपये आहे पण यातल्या सर्वच कविता प्रकाशाच्या दिशेने नेणा-या आहेत.
            वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी हरिभाऊ विघ्ने यांचा पहिला कवितासंग्रह पक्षी, वादळातील दीपस्तंभ, जागल असे तीन कवितासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. त्यानंतर  'मी उजेडाच्या दिशेने निघालो'  हा चौथा कवितासंग्रह काळोखातून उजेडाच्या दिशेने नेत स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय, करुणा, प्रेम, मैत्री, अहिंसा या मूल्यांची ओळख करून देणारा आहे. जाती भेदभाव दूर करून कामगार कष्टकरी,शेतकरी, पीडित, शोषित, वंचित लोकांना आपल्या हक्काची ओळख करून देणारा आहे.

        ज्योतिबा
        तुम्ही झुगारलेत गुलामगिरीचे बंध
        तोडलेत जातीभेदाचे साखळदंड 
        आणि घातलात पाया स्त्रीशिक्षणाचा 
         रूढी-परंपरांना तोडून 
         तुम्ही वंचितांचे,उपेक्षितांचे,शोषितांचे, अस्पृश्यांचे,
        क्रांतीबा  आणि क्रांतीमा होऊन ओढलात आसूड
         तत्कालीन व्यवस्थेवर 
          तुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रात गगनचुंबी भरारी
          तुमचा वारसा चालवीत बाबासाहेबांनीही त्याला
          कायद्याने बळकटी दिली 
          आणि शिक्कामोर्तब झाले सर्वांगीण विकासावर...

                    बहुजन समाजाला पूर्वी शिक्षणाचा गंधही नव्हता तेंव्हा क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरीचे बंधने तोडून जातीभेदाचे साखळदंड तोडून सर्वांना शिक्षणाचे बाळकडू पाजले.स्त्री शिक्षणाचा पाया फुले दांपत्यांनी रचला. सावित्री ज्योतिबा यांनी अखंड आयुष्य दुसऱ्यासाठी घालविले. ज्ञानाचा दीपक लावला. जुन्या, रुढी,परंपरांना तोडून वंचितांना, शोषितांना, उपेक्षितांना,अस्पृश्यांना शिक्षण दिले.सर्वांचे क्रांतिबा आणि क्रांतीमा ठरलात. तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले.आज सावित्रीज्योती यांच्यामुळे स्त्रिया आज सर्वच क्षेत्रात गगनचुंबी भरारी घेतात. पुर्वीच्या काळी स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतक्यातच अडकवून ठेवलं जात होतं. ज्योतीबांच्या विचारांचा वारसा चालवणार्‍या बाबासाहेबांनी कायद्याने ज्योतीबांच्या विचाराला बळकटी दिली. त्यामुळेच आज सर्वांगीण विकास होतोय असे परिवर्तनवादी विचार  करणारा कवी अरुण विघ्ने आपल्या पहिल्या कवितेतूनच क्रांतीज्योती महात्मा फुले सावित्री आई व बाबा साहेबांच्या चरणी काव्यफुले वरील ओळीतून अर्पण करताना दिसतात.
       
               दिव्यांनी ठरवावं आपापलं 
               कुठे कुठे पेटून प्रकाशायचं 
               कुठला अंधार करावा नाहीसा 
               आणि कुठे आपसूक विझायचं ....

                प्रकाशातच पेटतात दिवे सारे 
                त्याच महत्त्व कसं समजायचं 
                काळोखात पेटलेल्या एका पणतीचं 
                अस्तित्व तरी कशाला मोजायचं....!!

       परिवर्तनवादी विचारांचा कवी अरुण विघ्ने यांच्या सर्वच कवितांची उंची व खोली खऱ्या विचारवंताला विचार करायला भाग पाडतात. खोल आशयसमृद्ध असणाऱ्या कविता काळजापर्यंत आतल्या उजेडाकडे नेतात.अंधारात गुरफटलेल्या व्यक्तीला प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रत्येक कविता दिव्याप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहे. दिव्यांनी ठरवायचं कुठे पेटवून प्रकाशायचं? कुठला अंधार नाहीसा करायचा आणि कुठे आपणच विझायचं.. प्रत्येक माणसाने सुद्धा स्वतः ठरवायचा आहे आपणही दिवा होऊन अंधाराला चिरत इतरांना मार्ग दाखवायचं. कुठे विझायचं हे सुद्धा मानवाने ठरवावं. प्रकाशात तर सारेच पेटून उठतात त्याचं महत्त्व फार नसतं. पण काळोखात पेटलेल्या एका पणतीचे अस्तित्व का नाही मोजता येतं? असा खडा सवाल कवी अरुण विघ्ने आपल्या काव्यातून करताना दिसतात.

          मायी माय भिमाबा
         करी जात्यात दयन
         उखयात मिरच्यावाणी 
         करी कुप्रथाचं कांडण....!!

         भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या मातेच्या पोटी झाला त्या भिमाबाईने किती खस्ता खाल्ल्या ? किती कष्ट भोगले? किती हाल सोसले? हे कवी अरुणजी आपल्या काव्यातून स्पष्ट करतात. भीमाईनं जात्यावर दळण दळते. उखळात मिरच्या जशा ठेचल्या जातात त्याप्रमाणे कुप्रथांना कांडते. रूढी-परंपरांना कुटतात. दाने जात्यात टाकत चंद्र भुकेचा रांधत म्हणजेच पोटासाठी, भाकरीसाठी दळण दळते. या अष्टाक्षरी काव्यातून कवीने जातीभेदावर प्रहार केला आहे. अनिष्ट रूढी परंपरांना संविधानाने तोडलं आहे.

              हे करूणाकार बुद्धा 
             अखिल विश्वाचा प्रवास करून 
              लाखो खाचखळग्यातून चालताना 
             तृष्णेच्या कोटी कोटी दगडाला ठेचाळून
              रक्तबंबाळ होऊन थकलेली माझी पावलं 
              आता तुझाच अष्टांग मार्ग चोखाळणार आहे बुध्दा
             बोधिवृक्षाखाली विसावणार आहेत कायमची
              भरकटलेली पावलं तुझ्याकडेच येत आहेत शांतिदूता
            मी उजेडाच्या दिशेने निघालो आहे...

        अख्ख्या जगाला शांतीचा संदेश देणारे करूणाकार गौतम बुद्ध विश्वाचा प्रवास लाखो खाचखळग्यातून करतात तेव्हा तृष्णेच्या कोटी दगडांना ठेचाळत रक्तबंबाळ झालेली पावलं तुझाच अष्टांग मार्ग स्वीकारणार आहेत. तुझ्याच बोधीवृक्षाखाली विसावणार आहेत. भरकटलेली पावलं तू दाखवलेल्या दैदिप्यमान उजेडाकडे निघत आहेत. हे शांतिदूता आता तू जगाला शांततेचा संदेश देतो. त्याच प्रकाशमान उजेडाच्या दिशेने मी सुद्धा निघालो आहे. असे कवी वरील ओळीतून व्यक्त होतो.

           धागा माणुसकीचा, शिवतो फाटलेली नाती 
          आणि दुभंगलेली मने अविरत 
           धागा एकतेचा, ठेवतो असंख्य फुलांना एकत्र जोडून 
           एकमेकांशी नात्यासारखा घट्ट...

                 माणुसकीच्या धाग्याने फाटलेली नाती आणि दुभंगलेली मने शिवणारा धागा हो.एकतेच्या धाग्याने अनेक फुलांना एकत्र जोडून एकमेकांशी घट्ट जोडणारा धागा हो. प्रेमाच्या धाग्याने असंख्य अक्षरे, शब्द शब्द बनवून, भावभावनांना,प्रेमाला कवितेत गुंफणारा कवी समतेच्या धाग्यांनी जात,धर्म, पंथ,देश, वर्ण यांना जोडून समूह बनविणारा कवी समतेचा धागा हो म्हणून कवितेच्या माध्यमातून दिशा दाखवित आहे.
       कवी अरुण विघ्ने यांच्या कविता माणसाला जातिभेद दूर सारून समतेच्या, न्यायाच्या, वेदनेच्या, स्वातंत्र्य, समता, बंधुता याचे महत्त्व विषद करणाऱ्या, माणसाला माणसासम वागायला शिकवणाऱ्या शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालविणाऱ्या, देशप्रेम, सावित्री,भिमाई,रमाई चा त्याग सांगणाऱ्या, विषमतेवर प्रहार करणाऱ्या, शांततेचा संदेश देणाऱ्या, बुद्धाच्या मार्गाकडे नेणाऱ्या, मानव मुक्तीचा जाहीरनामा सांगणाऱ्या,उपेक्षितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या व्यथा मांडणाऱ्या, संविधानाचे गाण गाणाऱ्या, गाडगे बाबांचे कार्य सांगणाऱ्या, महामानवाचा संदेश सांगणाऱ्या, अंधाराकडून उजेडाकडे नेणाऱ्या एकूण ८३ कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत. माणसाला माणूसपण आणि शहाणपण शिकवणा-या आहेत.
      वाचणा-यांच्या डोक्यात दैदिप्यमान प्रकाश टाकणाऱ्या, तिमिरातुनी तेजाकडे नेणाऱ्या असून वर्‍हाडी भाषेचा आस्वाद घेणाऱ्या सर्वच कविता प्रत्येकानं आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
             प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!

 समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता.जि.वाशिम
मो.9767663257