Sunday, 4 April 2021

वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना ऑथर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित...

 *वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना स्टोरी मिररचा ऑथर ऑफ द इयर 2020 या पुरस्काराने सन्मानित*

          लाखो वाचक असलेल्या वेबसाईट वर भारतातून लाखो वाचक,लेखक सहभागी होत असतात.स्टोरी मिरर या वेबसाईटवर लेखकाला हवे तसे कथा,कादंबरी, कविता,क्योट्स असे लिखाण करण्यासाठी एक मुक्त अशी हक्काची जागा आहे.मिनाक्षी नागराळे यांनी 2020 या वर्षात या साईटवर अनेक कथा,कविता,क्योट्स मराठी भाषेमधून लिहीलेल्या आहेत.आजपर्यंत त्यांनी स्टोरी मिरर चर्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.अनेक पुस्तके बक्षिसही मिळाली आहेत.अनेक व्हॉव्हचर त्यांना मिळाले आहेत.त्यांचे साहित्य हजारो लोकांची पसंतीस उतरले आहे.स्टोरी मिररच्या माध्यमातून साहित्याचा प्रवास सुखद न नवनवीन स्पर्धेच्या माध्यमातून घेतल्याने लेखकाला नविन उर्जा मिळते.असं त्या सांगतात..
         बेस्ट ऑथर ऑफ द इयर 2020 च्या पुरस्काराच्या मानकरी वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी पांडुरंग नागराळे (जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव ता.जि.वाशिम) यांनी लिखाणात वर्षभर सातत्य ठेवून भारतातून एडीटर चॉईस व लोकांनी दिलेल्या वोटींमध्ये मराठी भाषेमधून दुसरे स्थान पटकावले आहे.आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.परंतू हा पुरस्कार भारतातून असल्याने मराठी भाषेबद्दलचे त्यांचे प्रेम,मराठीचा गोडवा त्यांच्या नसानसांत भिनला आहे.मराठीवरचे प्रेम दिसून येते.सतत लिहीते राहण्याची जिद्द, आणि वाचकांच्या पसंतीस उतरलेले त्यांचे साहित्य याला न्याय देण्यासाठी,त्यांचा सन्मान करण्यासाठी स्टोरी मिरर या वेबसाईटवरून प्रमाणपत्र व ट्रॉफी पोस्टाने पाठवून मिनाक्षी नागराळे यांना सन्मानित करण्यात आले आहे....
          मिनाक्षी नागराळे या तंत्रस्नेही एक आदर्श शिक्षिका आहेत.शाळेत त्यांचे अनेक उपक्रम सतत राबवित असतात.लॉकडाऊन काळातही त्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जि.प.शाळा.कोकलगाव या शाळेचा कायापालट केला.तसेच त्यांच्यावर लॉकडाऊन काळातील हिरोईन या सदराखाली पत्रकार गजानन धामणे यांनी स्टोरी लिहून प्रकाशित केली. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक,साहित्यीक,व सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असतात.स्टोरी मिररचा भारतातला मराठी भाषेचा सर्वोच्च सन्मान वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी नागराळे यांना मिळाल्यामुळे सर्व साहित्यीक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे....

राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला...!!

 *राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला*
------------------------------------------
      1 मार्च 2020 ला नीरजा चा 4 था वाढदिवस व नीरजा काव्य समूहाचा 3  रा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय नीरजा रचना स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. या स्पर्धेचे असामान्य महत्त्व आहे.' झेप  नीरजेची ' या विषयावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. नीरजा समूहातील अनेक कवी या स्पर्धेत सहभाग घेतला. नवीन काव्य प्रकार असून सुद्धा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हातील कवींनी सहभाग घेऊन विजेते ठरले. विजेत्यांना सन्मान चिन्ह तर उत्तेजनार्थ कवींना सन्मान पत्र देण्यात आले. 2017 पासून समूहाचे काव्य संग्रह प्रकाशन सोहळा व कवी संमेलन मोठ्या उत्साहाने घेण्यात येतो पण कोरोना संकटामुळे 2020 ला घेण्यात आले नाही. त्यामुळे विजेत्यांचे सन्मान चिन्ह घरपोच पाठविण्यात आले.त्यामधे सर्वोत्कृष्ट कवयित्री.मा.लीना साकरकर,कारंजा जिल्हा वाशिम,उत्कृष्ट कवयित्री.मा.मेधा देसाई ,(पुणे ),प्रथम कवयित्री. मा.ऊर्मी घरत, (पालघर), द्वितीय कवयित्री.मा.शामला पंडित,पुणे तर तृतीय सन्मान कवयित्री.मा.मिनाक्षी नागराळे,वाशिम यांना प्राप्त झाले असून सर्वांचे सन्मान मा. प्रशासक नरेन्द्र गुरुदास कन्नाके, वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने सन्मान पूर्वक घरपोच पाठविण्यात आले आहे.समूहात वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. विजेत्यांना सन्मान पूर्वक ई प्रमाणपत्र दिले जाते.रोज उपक्रम असतो त्यावर अनेक कवी आपली नीरजा सेंड केल्या जातात.आलेल्या नीरजा वर रोज मार्गदर्शन केले जाते. कोरोणा काळात सुध्दा सर्वांचे नीरजा घेऊन स्पंदन नीरजा ई दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात आले.यामुळेच समूहात एक वेगळा आनंद मिळतो.तसेच लिहिण्याची ऊर्जा प्राप्त होते. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन .पुढील काळात असेच यश संपादन करावे अशी मा.दुर्गा देशपांडे ,मुंबई,मा.गीता केदारे मुंबई, मा.शितल मोतेवार,नागपूर,या सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन केलेले आहे.

Saturday, 3 April 2021

संस्काराचा खजिना म्हणजे बारीकसारीक गोष्टी

 *संस्काराचा खजिना म्हणजे -बारीकसारीक गोष्टी*

            बालवयातच मुलांना बोधकथा, संस्कारकथा,छान छान गोष्टी खूप आवडतात. गोष्टीमधून योग्य ते संस्कार रुजवले जातात.बालकांच्या भावविश्वाशी निगडित असणाऱ्या प्राण्या-पक्षांच्या,आजोबा-आजींच्या,निसर्गाच्या, परींच्या कथा बालकांना खूप आवडतात.गाण्यापेक्षाही मुलांना कथा जास्त आवडतात.अशाच कथांचं पुस्तक माझ्या वाचनात आले आहे.त्याचं नाव आहे बारीक सारीक गोष्टी. लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख. चपराक प्रकाशन यांनी प्रकाशन केले असून याची प्रथम आवृत्ती १७ सप्टेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे. या कथा संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे आहे. पाहताक्षणी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे आहे. या कथासंग्रहात एकूण पंधरा गोष्टी असून त्याचे मूल्य फक्त ९९रूपये आहे. पण यातल्या सर्वच कथा बालकावर योग्य संस्कार करणा-या आहेत.
              जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखक शिरीष देशमुख यांचा बालबोध करणारा कथासंग्रह बारीक-सारीक गोष्टी या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.कथा छोट्या छोट्या असल्या तरी गहन आशयाच्या आहेत. आज बऱ्याच पालकांच्या तक्रारी असतात की या मोबाईल मुळे मुले बिघडायला लागली आहेत. मुलं खूप हट्टी होत आहेत. त्यांना शिस्त नाही. रागीष्ट झालेत अशी अनेक पालकांच्या तक्रारी असतात पण मुलांवर योग्य वयात योग्य ते चांगले संस्कार करण्याची गरज आहे. बालवयात केले गेलेले संस्कार आयुष्यभर पुरतात, टिकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ होय. मासाहेबांनी शिवरायांवर बालपणीच उत्तम संस्कार केले. स्त्रियांचा आदर करणे रयतेचे रक्षण करणे, रयतेच्या सुखासाठी अपार त्रास सहन करणे, आपले कर्तव्य बजावणे हे सारे संस्कार बालवयातच रामायण-महाभारतातल्या सारख्या कथा सांगून योग्य ते संस्कार पेरले होते म्हणून जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांचे नाव प्रथम येतील अशा संस्कार घडवणाऱ्या या कथा प्रत्येक बालकांनी तर वाचाव्यात पण पालकांनी ही आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
              लेखक शिरीष देशमुख यांनी बालकांना वळण लावणाऱ्या बालकांवर संस्कार घडवणाऱ्या, बालकांच्या व पालकांच्या पचनी पडतील अशा कथांचा खजिनाच वाचकांसमोर ठेवला आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. बुजगावणं या कथेत एक हरिणी आपल्या पाडसांना हिम्मत येण्यासाठी बुजगावणं पाडून दाखवते नंतर सर्व पाडसाची भीती आपोआप दूर होते.बालकांच्या जीवनातला सर्वात मोठा गुरु म्हणजे आई असते तीच जीवनाला योग्य आकार देत असते. हे या कथेतून प्रकर्षानं जाणवतं
            मार्जिन या कथेमध्ये मार्जिन पेक्षा निसर्ग किती मोठा ? तो कोणत्या पद्धतीने वाचवला पाहिजे हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारा यश प्राप्त प्रात्यक्षिकासंह आपल्या प्रिन्सिपल मॅडमला समजावून सांगतो.वेळ प्रसंगी सरांच्या छड्या खाणाऱ्या यशचे निसर्गावर चे प्रेम निसर्ग, वाचवण्याचे उपाय अगदी छोट्या कृतीतूनही धीटपणे सांगणारा यश त्याच्या धाडसाचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही ही कथा वाचल्यानंतर खरंच आपण का मार्जिन सोडतो असा सवाल वाचकाला पडतो.
             शाळेत जायला नको म्हणून रडणारा राजू चित्रकला स्पर्धेत प्रथम येतो आणि आपलं बक्षीस बाबांना दाखवतो तेव्हा राजूच्या रागामुळे घरातलं झालेलं नुकसान, दूध सांडणे, रिमोट फोडणे बाबा समजावून सांगितल्याने राजुचा राग किती वाईट आहे ? ते कळतं. आजकाल मुलांना हल्ली ही भाजी आवडत नाही. ती भाजी आवडत नाही. असे म्हणणाऱ्या मुलांसाठी खास कथा आहे. दाता तला राक्षस या कथेत अनंता सूर बंटीच्या स्वप्नात येऊन ब्रश कर बदल दम देतो.त्याच बरोबर बिस्कीट चहा किती वाईट आहे ते सांगतो. त्यामुळे घाबरलेला बंटी दररोज ब्रश नियमितपणे करतो हे आजच्या प्रश्न करणाऱ्या कंटाळवाण्या मुलांवर खास औषधच आहे.
           आजच्या धावत्या युगात पालकांनी आपल्या मुलाबरोबर वेळ कसा घालवावा याची महती सांगणारा, बालकांच्या भावना पालकांपर्यंत पोचणारी कथा संजू तप करतो या कथेतून शिरीष देशमुख यांनी अगदी मार्मिकपणे मांडली आहे त्यामुळे पालक नक्की जागृत होतील यात संशय नाही. शेतकऱ्याला पोटासाठी सालभर किती कष्ट करावे लागतात. याची प्रचिती देणारी कथा म्हणजे ' पांढरा चिखल' पावसामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ,मुलगा जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा मला सायकल नको म्हणून रडणारा मुलगा व बाप यात मुलांचा समंजसपणा, मोठेपणा दिसून येतो. गारपीठीमध्ये गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलेल्या लोकांना मदत करून खऱ्या अर्थाने शिवजयंती कशी साजरी करतात हे शिव संस्कार या कथेतून घेण्यासारखे आहे हरवलेल्या हरिणीच्या पाडसाला झालेली जखम पाहून तळमळणारा कोवळ्या मनाचा राजा पाडसाला जीवापाड प्रेम करतो.राजा आणि पाडस या कथेमध्ये प्राणीमात्रावर दया कशी करावी?  हे दिसून येते
          भोळ्याभाबड्या यशला पाच रुपयाचा नाना सापडतो. हे पैसे माझी नाहीत मी नको ठेवायला. अशीच सद्सद्लतविवेक बुद्धीने वागणारा सापडलेले पैसे देवाच्या पेटी मध्ये टाकण्यासाठी जातो पण मंदिराबाहेर भुकेने व्याकूळ झालेला मुलगा पाहून भीक मागणाऱ्या मुलाला पैसे न देता त्याला स्वतःचे दोन रुपये टाकून दुकानात जाऊन पाच रुपये ची वही व दोन रुपयाचा पेन देतो. हे या डॉलर या कथेतून त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. इतरांना मदत करणारे भाव- भावना काळजाला स्पर्श करून जाते. माझी आईत्याची आई या कथेतून ग्रामीण भागात राहणाऱ्या कष्ट करून घामाने स्वाभिमानाने प्रामाणिकपणा रे राहणारी महेश ची आई रोहन आपल्या आईबरोबर तुम्हाला करून पाहतो पण रोहनला माहेरची आई परिस्थितीने दरिद्री पण मनाने श्रीमंत असलेली आई अधिक महत्त्वाची वाटते
         रवी च्या बर्थडेला रवी चे चित्र स्केच करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी झिप्री या कथेतून निस्सीम निखळ प्रेम दिसून येतो रविवार माझ्या आवडीचा म्हणणाऱ्यांना रविवार किती कंटाळवाणा आहे तो दिसतो. दररोज रविवार असेल तर सगळी कामं कशी ठप्प पडतात? तेच सोमवारची कहाणी या कथेतून दिसून येते.राजकन्या आणि परीस यांची ही  कथा खूपच मनोरंजक आहे परिसाचा दगड फेकून देणाऱ्या राजकुमारीला परिसराचे महत्त्व कळत नाही तोच दगड लोहारा ला ठेचून बघा करण्यासाठी दिला जातो आणि लोहाराच्या आयुष्याचं सोनं होतं मायेची गोष्ट या कथेमध्ये मुक्या प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारा लहानग्याला दासुच अपार प्रेम दिसून येतं.
           लेखक शिरीष देशमुख यांनी बारीक-सारीक गोष्टी या बाल संग्रहातून विद्यार्थ्यांवर,बालकांवर योग्य संस्कार होतील अशा सर्वच कथांचा खजिना आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या बालका समोर ठेवला आहे. बालवयातच योग्य संस्कार मुलांवर होतात त्यासाठी प्रत्येक बालक व पालकांनी बारीक-सारीक गोष्टी आवर्जून वाचावे असा कथासंग्रह. आज साहित्यामध्ये महिलाचा दगड ठरला आहे. यातल्या सर्वच कथा बालमनाला आवडतील अशा सर्वच कथा चित्ररूप असल्याने व बालकांच्या पुस्तक हाताळण्याच्या दृष्टीने पाणी दर्जेदार प्रतीची असल्याने थेट कथा काळजाला भिडतात. वाचकाला वाचताना जणू चित्र डोळ्यासमोर उभे राहते असे संस्काराचा खजिना प्रत्येक शाळेत घरात आवर्जून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
                लेखक शिरीष देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 

समीक्षिका/लेखिका /शिक्षिका /कवयित्री 
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता. जि. वाशिम
मो.9767663257

Monday, 29 March 2021

पुरस्कार

Sunday, 28 March 2021

शेतीमातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे 'आम्ही माणसं मातीचे'

 *शेती मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे आम्ही माणसं मातीचे*

     भारत हा कृषीप्रधान देश आहे.बळीराजा शेतामध्ये राबराब राबतो. उन्हातानात रात्रंदिवस कष्ट उपसतो. म्हणून अख्या जगाला अन्न मिळते. म्हणून शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. शेतकरी आहेत म्हणून सारी दुनिया आहे.शेतकऱ्याला त्याची काळी माती त्याला मायीसारखी वाटते. शेती शेतकऱ्याचा जीव की प्राण असतो. विदर्भाच्या मातीत जन्मलेले अमरावती जिल्ह्यातील व-हाडी कवी गजानन मते यांचा 'आम्ही माणसं मातीचे' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ शेती- मातीचे आहे. शेतातली झोपडी, झाड,बैलगाडीचे चाक असे सुंदर मुखपृष्ठ आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मेधा पब्लिकेशन हाऊस, अमरावती यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ५ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १२० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता शेती-मातीशी नाळ जोडणा-या आहेत.
         शेतकऱ्यांचे स्वप्न फुलवणाऱ्या, शेतकऱ्याच्या घामाने भिजलेल्या, पावसाचे महत्व सांगणाऱ्या, कुणब्याचं जीणं सांगणाऱ्या,धान्याला कोंब फुटतं, मृगाचा पाऊस,जेंव्हा पालवी फुटते, मृगाचा पाऊस, फुले, बापू तुझ्या देशात, माय, आभाय, आंबा, माती माय रुसलेली,आम्ही माणसं मातीचे अशी मातीचा कळवळा असणारा कुणब्याला माती म्हणजे त्याची माय समजून लिहिलेल्या सर्वच कविता शेती मातीशी नाळ जोडणाऱ्या आहेत कष्टकऱ्यांचे जीणं-मरणं सांगणा-या आहेत.
        
           "रोज घरचाच कसा 
           आला पाऊस पावना 
           पापणीत साठवून 
           सखी बसली साजना...!!

            आठवात पावसाच्या 
             होती धरती अबोल 
             तुवा भिजोल्या वाटेन
             कशी सावरू मी तोल...!!

              कवळ्या फांदीले आली 
              आता कवळीच पान 
              थेंब झेलताना गाती 
               हिरव्या संसाराच गाणं....!!"

          शेतकरी ज्याची देवासारखी वाट पाहतो, ज्याच्यावर शेती अवलंबून असते अशा पावसाची आतुरतेने वाट बघणारा शेतकरी पावसाला  पाहुना म्हणतो. पावसाच्या आठवणीत धरणीमाय अबोल होऊन बसते. पावसाची आतुरता, ओढ,धरणीमायला लागली आहे. पावसाने भिजलेल्या वाटेनं तिचा तोल कशी सावरू या विचारांनी धरणी वाट पाहत बसली आहे.तुझ्या पावसानं मी तृप्त होणार आहे.तुझ्यामुळेच झाडाच्या फांदीला कोवळी पानं फुटतील आणि पावसाचा प्रत्येक थेंब झेलताना हिरव्या संसाराचं गानं गातील असे शेतकरी प्रिय असणारा कवी गजानन मते यांना वाटते. शेतीवरचे निसर्गावरच प्रेम त्यांच्या प्रत्येक शब्दांशब्दातून भरभरून ओसंडत आहे.
             कवी गजानन मते सरांच्या सर्वच कविता अस्सल वऱ्हाडी भाषेमध्ये असल्याने 'आम्ही माणसं मातीचे' हा कवितासंग्रह व-हाडी मेवा आहे. साधी, सरळ, सोपी,व-हाडी भाषा, प्रत्येक कवीता गेय स्वरूपात मांडण्याचा गजानन मते सरांचा हातखंडा दिसून येतो. कांही कविता सहा अक्षरी, तर काही कविता अभंग प्रकारात असल्याने एक वेगळाच साज घातल्या सारख्या भासतात तर काही कविता अष्टाक्षरी या काव्या प्रकारांमध्ये येतं असल्याने आणखीनच खुलून दिसत आहेत.कवी गजानन मते सरांना मनाच्या शेतीवर शब्दांची पेरणी करायला सुरेख जमतं.

            पाणी ना पाऊस
            चिंता कास्तकारा
            हमसून रडे 
            वावराचा धुरा....!

             बिना भरोशाचं 
             कुणब्याचं जीन
             मांडतो बेरीज
             होते उणं-उणं....!!

          व-हाडी मातीचा गंध कवी गजानन मते सरांच्या प्रत्येक शब्दांतून येताना दिसतो. ना कुणाची प्रस्तावना ना कुणाच्या शुभेच्छा. प्रत्येक कविता कवीने बळीराजाच्या ओटीत धान्य भरावं तसं भरले आहेत. कुणाब्याला समर्पित केले आहे.स्वार्थी माणसानेच आज  वृक्षतोड करून निसर्गाची भयानक हानी करून ठेवली आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर कधी पडतच नाही. पावसाची वाट बघणारा शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत बसतो. वेळेवर पाऊस पडला नाही तर चिंता करीत बसतो. शेतकऱ्याला झोप लागत नाही की अन्न गोड लागत नाही. त्याला फक्त पावसाची ओढ लागते. पाऊस पडल्यावर वावराचा( शेताचा) धुरा (बांध ) रडत बसतो. शेतकऱ्याचे जीवनच पावसावर अवलंबून असते.ते जीवन बीन भरोशाचे असतं म्हणजे पाऊस पडेल की नाही याची खात्री नसते. बेरीज मांडत बसला तर राहतं उणं उणं. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा पावसाच्या भरोशावर कर्ज काढून व्याजानं पैसा काढून खत बियाणं साहित्य घेतो. शेत पिकल्यावर परत करू या आशेन का होईना हिंमत धरतो. पण पावसाने जर दगा दिला तर शेतकरी कर्जापायी स्वतःला फास लावायलाही मागं पुढं बघत नाही. शेतकऱ्याच्या जीवाची आर्त हाक कवीने मांडली आहे.

                 सूर्य तळपत आला 
                 हिवं खात पाणी पित
                 वारा सुसाट सुटला 
                 धूळ-माती उडवित....!!

                  आला फुलून पळस
                  शेत-शिवारास लाली
                  सुकलेल्या डोंगराला 
                  हसू फुटलेलं गाली......!!

                   किती सोकू दे जमीन 
                   हारू नको धर तग
                   ऊन वारा तुफानात 
                   सांगे पळस तू जग.....!!

          वरील गोळीतून कवी गजानन मते यांचे शेतकऱ्यावरील नितांत प्रेम व आदर दिसून येते. कडक उन्हाळ्यात सूर्य आग ओकत आहे. अशी उन्हाची तीव्रता असताना इतकी गर्मी विदर्भात असते. वारा बेभान सुटतो. धूळ माती तुडवत याच वसंत ऋतूमध्ये पळस फुलून आला आहे . त्याच पळसाच्या फुलावरची शिवाराला सुद्धा लाली चढली आहे. उन्हाळ्यात कितीही तापलं, डोंगर सुकली तरी पळस मात्र हसत शेतात उभा आहे. पाऊस नाही पडला तर दुष्काळ येतो. जमीन सुकून जाते. पण तू बळीराजा तू हरू नकोस धीर सोडू नकोस. त्यातूनसुध्दा तुफानामध्ये पळस  जगायला सांगते .असल्या तप्त उन्हात पळस डोलाने रंग उधळीत उभा असतो.तसे माणसाने ताठ उभं राहून कष्ट करून जगले पाहिजे. पळस सुद्धा माणसाला तू असं जग म्हणून सांगतो.

        तुझी माय माती | माझी माय माती |
        कुठे जातीपाती | पांघरता ||

       साऱ्या मानवाची माय म्हणजे माती. माणसाचा जन्म जरी आईच्या पोटी घेतला पण शेवटी मनुष्य मातीतच जाणार आहे. या काळ्या माईकडे कधीच भेदभाव नसतो. तिला सारी लेकरे एक समान असतात. तिच्याकडे कोणती जातपात नसते. ना कोणता धर्म नसतो. सर्वांचा रंग एकसारखाच असतो. सर्व सर्वांचे रक्त लालच असते मग मानवाने का भेदभाव करावा असे कवी गजानन मते वरील वरील ओळीतून व्यक्त होताना दिसतात.
                  कवी गजानन मते यांच्या कविता शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणाऱ्या, कष्ट करायला लावणाऱ्या,निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या, समतेचे महत्त्व विशद करणा-या,कुणब्याचं  जिने-मरणं, दुःख, दुष्काळ , अवर्षण विषद करणाऱ्या, गावाची ओढ लावणाऱ्या, वास्तवता मांडणाऱ्या, माय मराठीची महती सांगणाऱ्या, देश धर्मासाठी प्राण पणाला लावणाऱ्या, सर्वच कविता वाचकांच्या थेट काळजाला जाऊन भिडणा-या आहेत.
        
            कवी गजानन मते सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....!!
आम्ही माणसं मातीचे पुस्तक खरेदीसाठी संपर्क.
९४२००७६८६७

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम.
मो.९७६७६६३२५७