Tuesday, 22 December 2020

*स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

 *स्त्री जीवनाची अनुभूती अभिव्यक्त करणारा काव्यसंग्रह म्हणजे-जीवनाच्या पायवाटेवर...*

          पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ.प्रीती प्रकाश भिसे यांचा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह वाचनात आला. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर एका स्त्रीचे चित्र आहे. प्रत्येक स्त्री त्या चित्रांमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते. असे देखणे मुखपृष्ठ असून त्याचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन पुणे यांनी केले असून प्रस्तावना नागपूरच्या मीरा मितेश्री यांची लाभली आहे. तर मलपृष्ठावर शितल कुलकर्णी व प्रवीणा कुलकर्णी यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २ ऑक्टोबर २०२० ला झाले असून त्यात ५७ कविता आहेत. प्रत्येक स्त्रीची अनुभूती माझी स्वतःची सहानुभूती आहे.असे वाटणा-या कविता  स्त्रीमनाला स्पर्शून जाणा-या आहेत. या काव्यसंग्रहाचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण त्याचे मूल्य पैशात न मोजता येणारे आहे.
            बालपणी असणारी गोड मुलगी जशी मोठी होत जाते. तिच्या आयुष्याचे पाने अलगदपणे उघडत प्रत्येक गोष्टीत सहभागी होत. बालपणीचा आनंद लुटत अनेक सण समारंभ साजरे करत हळूहळू एक एक पाऊल पुढे सरकते. सासरी गेल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळते. विविधांगी जीवन जगत घरातल्या प्रत्येकाची काळजी घेत, थोरामोठ्यांचा आदर, कुटुंबाची जिम्मेदारी, मुलं-बाळं, नातेवाईक, मित्रपरिवार अशा अनेक पैलूंनी तिचं आयुष्य सुगंधित होऊन जातं. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर वेगळा अनुभव अनुभवत पुढे जाते. अशीच एक कविमनाची गोड स्त्री म्हणजे प्रीती भिसे.
          
                   हिरवाईने नटली वसुंधरा 
                   उधळत मुक्त स्वरूप 
                    पेटवून प्रदूषणाची ठिणगी 
                     मानव करतो तिला कुरूप...!!

             निसर्गावर भरभरून प्रेम करणारी कवयित्री वसुंधरेचे तोंड भरून कौतुक करताना दिसते.हिरवळ कोणाला आवडणार नाही असा एकही माणूस जगाच्या पाठीवर दिसणार नाही. डोंगर-दऱ्या,नद्या-नाले, ओढे,आसमंनती पसरणारा धुंद गारवा, इंद्रधनु ही सर्व निसर्गाची मुक्त उधळण आहे. निसर्ग मानवाला भरभरून देतो पण या उलट माणूस प्रदूषण करून निसर्गाची घडी बिघडवतो. झाडे, जंगल तोडून निसर्गाची हानी करतो. इतक्या सुंदर निसर्गाला हावरट वृत्तीचा माणूसच कुरूप करतो असे कवयित्रीला वाटते.

                 समाजात या सुंदरतेला बहुमान 
                आंतरिक सौंदर्याची झुलती कमान 
                लग्नाच्या बाजारात गोर्‍या रंगाचे मोल
                 नाही बघत गुण कितीही असले अनमोल...!!

           सुंदरता कोणाला आवडत नाही.प्रत्येकालाच आवडते. सुंदरता ही प्रत्येक गोष्टीत लपलेली आहे फक्त ती सौंदर्य शोधणारी नजर पाहिजे. सौंदर्य हे निसर्गात तर, कोणाच्या काव्यात,तर कोणाच्या अभंगात तर कोणाच्या पूजनात,कोणाच्या कलेत तर कोणाच्या पाककलेत, तर कोणाच्या खेळात, तर कोणाचे देशाची सेवा करण्यात लपलेले आहे. आज समाजात जरी सुंदरतेला मान असेल पण आंतरिक सौंदर्य पण माणसाचे सुंदर असले पाहिजे. नाहीतर लग्नाच्या बाजारात गो-या रंगाला महत्त्व देणारी माणसं तया व्यक्तीचे आतले गुण कसे आहेत? हे मात्र पाहत नाही. मनुष्य दिसायला जरी काळा असला तरी चालतो पण त्याच्या आंतरिक सौंदर्य, त्याच्यातले गुण चांगले असले पाहिजेत. असे हळव्या मनाच्या कवयित्री वाटते.कवयित्री बाह्यसौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला जास्त महत्त्व देते.

           शिक्षकी पेशा 
           सन्मान देशा 
           घडवी गुरू 
           भविष्य रेषा 
            गुरू आदर
            मनी सादर
           गुरुची दीक्षा 
           ज्ञान जागर....!!

            देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक म्हणजे गुरू होय. गुरूच्या हाताखालून गेलेल्या प्रत्येक मुलाचे भवितव्य गुरु घडवतो. म्हणून शिक्षकी पेशाला देशात सर्वोच्च मान आहे.गुरु विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो म्हणून सर्वांनी गुरूचा आदर करावा. गुरुला वंदावे.गुरुबद्दल मनात सदैव आदर असावा कारण तोच ज्ञानाचा जागर आहे. गुरूंना मान सन्मान दिला पाहिजे. गुरू मुळेच प्रत्येकाचे आयुष्य घडत असते.याची जाणीव कवयित्री आपल्या पंचाक्षरी कवितेच्या ओळीतून देते.

             उमलते अंकुर प्रवेश 
             घडला ओळख कवी 
             संदीप खरे नामक 
             उजळला हा रवी......!!

             आजच्या काळातील प्रसिद्ध कवी संदीप खरे हे कवयित्रीचे आदर्श आहेत. संदीप खरे यांच्या अनेक कविता कवयित्रीच्या मनात घर करून राहतात. अनेक काव्य पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे. पुण्यगौरव,झीगौरव, काव्यदीप पुरस्कार, आद्यकवी, मुकुंदराज, बालगंधर्व  इत्यादी पुरस्कारांमध्ये संदीप खरे यांनी बाजी मारली.त्यांचा चित्रपट दमलेल्या बाबांची कहाणी व त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व कवयित्रीला खूप आवडते त्यांच्या साहित्याची कवयित्री दीवानी आहे. आयुष्यावर बोलू काही संदीप खरे यांचे अत्यंत गाजलेली कविता कवयित्रीला खूप आवडते. म्हणून कवयित्री आपल्या शब्द सुमनांमध्ये संदीप खरे यांना  गुंतवले शिवाय राहत नाही.

             मराठी भाषेचे अग्रगण्य 
             कवी, लेखक,नाटककार 
             जाणिवेत ते आत्मनिष्ठ
             उत्तम समीक्षक नी कथाकार...!!
      
                  मराठी भाषेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज यांच्या कविता कवयित्रीला खूप भावणाऱ्या आहेत. त्यांच्यामुळे मराठी भाषेला मान मिळाला आहे. वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राजभाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,नाटककार,लेखक,कथाकार,व समिक्षा असणारे वि.वा.शिरवाडकर म्हणजेच टोपणनाव  "कुसुमाग्रज" यांना गुरुस्थानी मानणारी कवयित्री प्रीती की तिच्या कवितेतून मानाचा मुजरा करते.
           आजच्या युगात ऑनलाइन व्यवहार करणारे, घरपोच होम डिलिव्हरी ने मोठ्या शॉपिंग मॉल्स मधून  वेगवेगळ्या वस्तू आज सहज घरपोच मागवत आहेत. त्यामुळे आठवडी बाजाराची मजा कवयित्री दिलखुलासपणे आपल्या काव्यातून मांडते.त्याचबरोबर व्यायामाचे महत्त्व ही सांगते. स्पर्धेच्या युगात थांबला तो संपला पण क्षणभर विश्रांती किती महत्त्वाची आहे हे नमूद करायला कवयित्री अजिबात विसरत नाही. 
                    जीवनाच्या पायवाटेवर आलेली विविध अनुभूती आपल्या अनेक छंदमय येणाऱ्या प्रकारात सुरेखपणे मांडण्याचा प्रयत्न कवयित्री करते.जीवनाच्या पायवाटेवर या कवितासंग्रहातील कविता जगायला शिकवणाऱ्या, जीवनाचा अर्थ शोधणार्‍या, प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या, दातृत्वाची शिकवण देणाऱ्या, अध्यात्माची आवड जपणाऱ्या,  सण आणि संतांचा महिमा सांगणा-या,निसर्गावर भरभरुन प्रेम करणा-या, भक्तीरसात तल्लीन होणाऱ्या, सर्व वाचकांच्या पसंतीस उतरणा-या अशाच आहेत.
         कवयित्री प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा...!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Saturday, 19 December 2020

बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

 *बंद ह्रदयाची स्पंदने खोलणारा काव्यसंग्रह म्हणजे- नाते मनाशी मनाचे*

         पुण्याचे कवी रमेश जाधव सर यांचा काव्यसंग्रह "नाते मनाशी मनाचे" नुकताच वाचनात आला.आज धावपळीच्या युगात सर्वजणच खूप व्यस्त झाले आहेत. सारे जग झपाट्याने धावताना दिसते.धावत्या युगाबरोबर नातेवाईकांना सुद्धा पूर्वीसारखा वेळ नाही. सर्वजण आपापल्या कामात अत्यंत व्यस्त दिसत आहेत. तेव्हा मन हलके करण्यासाठी कित्येक वेळा कवी मनाशीच बोलतो आहे.आपल्या मनातले भाव मनालाच जणूकाही सांगतो आहे. तेच भाव शब्दबद्ध केलेत कवी रमेश जाधव यांनी. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर पांढऱ्या शुभ्र फुलांचे चित्र आहे. जणू काही ते कवीचे मनच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन घनश्याम पाटील असून त्यांचीच काव्यसंग्रहाला साजेशी,सुरेख प्रस्तावना आहे. तर मलपृष्ठावर अमरावतीच्या लेखिका पल्लवी चौधरी यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता बंद हृदयाची स्पंदने खोलणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती २४ जुलै २०१६ ची असून मूल्य फक्त ८० रुपये आहे. पण यातील कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत.

            अडगळीत पडलेल्या आयुष्याला 
            दिली एक नवी दृष्टी 
            दिसली नव्या आयुष्यात 
            सकारात्मक सुष्टी 
             काढून टाकली नकारात्मक घाण
             फुलणार मनाची रान....!!

          वरील ओळी खूप काही सांगून जाणा-या आहेत. माणसाचं आयुष्य जर उसवले असले तरी त्याला नवा दृष्टिकोन आला तर नव्या उमेदीने जगता येतं तरच मानवाच्या आयुष्याच सोनं होतं.तर त्यासाठी माणसांने सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच नवीन ऊर्जा तयार होईल व मनातले मळभ दूर होतील. माणसाने आयुष्यात कितीही संकटे आली तर ती पेलून धरता आली पाहिजे.त्यातून बाहेर पडता आले पाहिजे. मनातले सर्व नकारात्मक विचार काढून टाकता आले पाहिजे. आपले अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. मनातली घाण काढून टाकल्या नंतरच आपल्या मनाचं रान फुलणार आहे. आणि आयुष्य डुलणार आहे. असं कवी रमेश जाधव यांना वाटतं. 

                अंधाराच्या साम्राज्यात 
                हाती काही लागत नाही 
                आपलेच हात रिकामी असल्यावर 
               कोण आपले स्वागत करीत नाही....!!

             आज सर्वत्र श्रीमंतीचा, गर्वाचा अंधार पसरलेला दिसतो. स्वार्थाने बरबटलेली माणसं पाहायला मिळतात. जर एखाद्याचे काही काम असेल तरच ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला गोड बोलण्याचा प्रयत्न करते. काम संपलं की "गरज सरो आणि वैद्य मरो" अशीच अवस्था लोकांची होते. अशा वातावरणात जर गेलं तर आपल्या हाती काहीच लागत नाही आपल्या जवळ धन, पैसा, संपत्ती नसेल तर आपल्याला कुणीच बोलत नाही.आपल्याकडे पैसा नसला आपण अडचणीत असलो तर कोणीच आपले स्वागत करीत नाहीत असे कवी म्हणतो आहे.

                     अंतरीच्या वेदनांचे
                     किती आणि कसे आवरू हुंदके
                    सुपीक नात्यांवर 
                     गैरसमजाचे पडलेत खंदके....!!

           अंतर्मनाला जर वेदना झाल्या तर त्याच्या जखमा लोकांना दिसत नाहीत.मनावर अनेक आघात होऊन  दुःखाचे हुंदके दाटून येतात आणि नातलग  यांच्यामध्ये गैरसमज होऊन मनाच्या रानाला भेगा पडतात. मन व्याकुळ होतं आणि वेदनेची जाणीव मनात जाळं बनून राहते. असे संवेदनशील मनाच्या कवीला वाटते.

               मी गेल्यावर कोणी रडू नका 
               कडू-गोड आठवणी काढू नका 
                नको ती रक्षा सावडणे
                तेंव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे 
                नको ते दहावा, तेराव्याचे विधी 
                 त्यापेक्षा अनाथाश्रमात द्या निधी....!!

             मरणाला प्रत्येक जण भितो. आज आपण पाहतो पण हळव्या मनाचा कवी मोठ्या धाडसाने स्वतःची अंतयात्रा काव्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी मेल्यानंतर रडू नका. माझी आठवण काढू नका. माझी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम ठेवत बसू नका. तेंव्हा खरी गरज आहे. माझ्या कुटुंबाला आधार देण्याची,त्यांना सावरण्याची ते करा. माझे दहावे, तेराव्याच्या विधीवर पैसा खर्च करू नका. त्यापेक्षा तोच पैसा अनाथ आश्रमात द्या. जुन्या रूढी-परंपरांना आणि अंधश्रद्धा ठेवणाऱ्या अनेक पद्धतींना आळा घालण्यासाठी आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न कवी रमेश जाधव सरांनी केलेला आहे. आज अंत्यविधी वर किती तरी लोक पैसा खर्च करतात. तो न करता त्याचा उपयोग समाजासाठी करावा अनाथ आश्रमाला तोच निधी देण्यात यावा असे कवीला वाटते.

                 हल्ली शिक्षणाचा मांडलाय बाजार 
                डोनेशनचे आकडे ऐकून पालक झाले बेजार...!!

              सत्य परखडपणे मांडणारे कवी रमेश जाधव सर म्हणतात आज गल्लीबोळामध्ये शाळा काढून शिक्षणाचा बाजार मांडलाय.खाजगी दुकाने शाळाचं नवरूप घेऊन ठाण मांडून बसल्या आहेत. स्वार्थापोटी गोरगरीब जनतेला लुबाडत आहहेत. एल.के.जी पासून पालक प्रवेश घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभा राहून भली मोठी फी भरून आपल्या मुलाला शाळेत पाठवत आहेत. इतकेच नाही तर पुन्हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी संस्थाचालकाच्या घशात भरमसाठ पैसा ओतून डिग्र्या घेत आहेत. पुढे तेच पालक लग्नाच्या बाजारात शिक्षणाचा सर्व पैसा वसूल करतात.त्याच्या स्वरूपात अशी अशी टीका केली आहे. आणि ती रास्तच आहे. आज खासगी संस्थांची फीस गगनाला भिडली आहे. तिच्याकडे पाहून भल्याभल्या लोकांचे होश उडून जातात. दोन दोन लाख एका एका वर्षाची फीस आहे. अशा शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मानसिकतेला जर आळा घालायचा असेल तर सर्वांनी त्याचा विचार करावा. असे कवी आवर्जून सांगतो आहे.

           कवी रमेश जाधव यांच्या कविता सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या, समाजहित जपणाऱ्या,मनांची गुंफण करणाऱ्या, हळव्या मनास आधार देणाऱ्या,अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणाऱ्या, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या, वास्तवाचे भान ठेवणाऱ्या, गैरसमजाचे जाळे दूर करणाऱ्या, वृद्धा विषयी सहानुभूती असणाऱ्या, पोलिसांविषयी आदर असणाऱ्या, मनाशीच मनाचे नाते सांगणाऱ्या....सर्व कविता अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत. बंद हृदयाची स्पंदने खोलत जाणा-या आहेत.
        प्रत्येक मानवी मनाने मनातूनच वाचावा असाच हा काव्यसंग्रह आहे..कवी रमेश जाधव सरांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा....!!

समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 16 December 2020

कधी उघडेल शाळा...!!

 *कधी उघडेल शाळा*

कधी जाणार कोरोना
कधी उघडेल शाळा
गेले वर्ष हे निघून
येते आठवण बाळा....!!

शाळा पडलिया ओस
नाही करमत आता
येते याद चिमण्यांची
जेव्हा शाळेत मी जाता...!!

केल्या बोलक्या ह्या भिंती
पण लागत नाही लळा
डोळे डोकावून पाही
कधी फुलेल हा मळा....!!

पाखरांची किलबिल
कधी ऐकाया येईल
कधी येतील पाखरे
कधी कोरोना जाईल....!!

वाट पहाते मॅडम
कधी लेकरं येतील
माझी चिमणी पाखरं
हसतील नाचतील....!!

नाही करमत आता
जिव झाला खूप बोरं
कानी येतो तो आवाज
किलकिलणारी पोरं.....!!

खरं सांगू का बाळांनो
मज लागलाय लळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा....!!

कधी वाजेल ती घंटा
आई म्हणे पळा पळा
चिमुकल्या पावलांनी
कधी फुलेल हा मळा....!!

जरी ऑनलाईन शाळा
नाही ती रे खरी मजा
कोरोनाचा हाहाकार
वाटे जिवालाच सजा...!!

थोडा धीर धर बाळा
एक दिवस येईल
जसा आला तसा बघा
असा कोरोना जाईल....!!

खाली खाली वर्गखोल्या
मज बोलतीया शाळा
कुठं हरवली बाळं
माझ्या घेवून ये बाळा....!!

सारे उदासवाने हो
कधी उघडेल ताळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा.....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

अशी मायेची माणसं...!!

अशी मायेची माणसं


अशी मायेची माणसं
कुठं गेलीत निघून
जीव कासावीस होई
फोटो तयांचा बघून....!!

कोण फिरवील हात
मन येतसे भरून
कोण करील गं लाड
गेले दिवस सरून......!!

उसावल्या त्या नात्यांना
कोण शिवून देईल
कसे स्वार्थाने भरले
कधी समज येईल.....!!

कसा ओढतोय जीव
आईवडीलांचा फार
किती खाऊनिया खस्ता
सोसलासा सारा भार ....!!

नाही वेळ कुणा आज
नाही राहिले ते प्रेम
बदलली ती माणसं
सारे झाले आता सेम....!!

काळवेळ बदलला
आपुलकी रे दिसेना
नात्यानात्यांतच तेढ
माणुसकी ना वसेना...!!

नशिबाचा खेळ सारा
जन्मदाते हिरावले
येई सदा आठवण
डोळे आज पाणांवले....!!

अशी मायेची माणसं
पुन्हा कधी भेटतील
साचलेल्या दुःखासही
कधी कवेत घेतील...!!

किती देऊ आर्त हाक
कधी परत येणार
दुरावल्या या जिवाला
कधी जवळ घेणार.....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम

Tuesday, 15 December 2020

बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे- "धाडसी राम"

 *बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे "धाडसी राम"*

         बुलढाणा जिल्ह्यातील प्राध्यापक देवबा पाटील सर यांची धाडसी राम ही बाल कादंबरी नुकतीच वाचनात आली. या बालकादंबरीच्या मुखपृष्ठावर धाडसी असणाऱ्या मुलांचे चित्र म्हणजेच राम चित्र आहे.बालपणी जर मुलांना धाडसाच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या कथा सांगितल्या किंवा बालकथा संग्रह,कादंबरी वाचण्यास दिली तर उद्याचे भावी नागरिक,उद्याची भावी पिढी जी आज बालके आहेत.त्यांना मोबाईलच्या दुनियेतून थोडेसे बाजूला सारून वाचावयास दिले तर नक्कीच भावी पिढीमध्ये धीटपणा, खंबीरपणा,धाडस येईल यात शंकाच नाही. या कादंबरीची द्वितीय आवृत्ती २३ ऑक्टोबर २०१४ ला प्रकाशित झाली. या कादंबरीचे प्रकाशन कादंबिनी प्रकाशन,जळगांव यांनी केले असून त्याची ४८ पुष्ठे आहेत.याचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण यातील प्रसंग आणि रामच्या धाडसाच्या कथा लाखमोलाच्या आहेत.
             लेखक,कवी,शिक्षक असा त्रिवेणी संगम असणारे प्राध्यापक देवबा पाटील यांची एकूण बत्तीस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक साहित्याला नानाविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भौतिक शास्त्राच्या बी.एस.सी अभ्यासक्रमाची २१ इंग्रजी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या "धाडसी राम" या बालकादंबरीला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व सौ कुसुमावती भीमराव जाधव बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीवर प्राध्यापक देवा पाटील यांची निवड झाली आहे. 
            छत्रपती शिवरायांना जिजाऊ मॉंसाहेबांनी बालपणी शूरवीरांच्या, पराक्रमाच्या,शौर्याच्या, रामायण महाभारतातल्य कथा सांगितल्या त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर बनले.जगात शूर वीर म्हणून ओळखले जातात. इतकेच नाही तर एका वीर पुरुषाची आई म्हणून साऱ्या जगाला जिजाऊ माँसाहेब ठाऊक आहेत. अगदी त्याप्रमाणेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसाला निर्जीव खेळणे किंवा टेडि देण्यापेक्षा धाडसी राम सारखे बालकादंबरी भेट दिले तर मुलांना वाचनाची गोडी लागेल.  आज-काल काही मुलं आई-वडील घरी नसले की घरात पण जात नाहीत.भितात.. भीती वाटते असं म्हणतात. स्वप्नात रडतात, बोलतात इत्यादी विचित्र प्रकार घडतात.आजच्या काळातील लहान मुलांना तर पारंपारिक खेळच माहिती नाहीत. सुरपारंब्याचा खेळ, लपंडाव, विटी दांडू खेळणे,लगोरी खेळणे असे किती तरी खेळ कालबाह्य होत चालली आहेत कारण घरातले लहान मुलं टीव्हीवरील कार्टून्स मोबाईल वरील गेम्स मध्येच गुंतलेली आहेत. मैदानी खेळ,व्यायाम, कुस्ती,दंडबैठका इ.गोष्टीकडे  मुलांना व पालकांना वेळच नाही. म्हणून पालकांनी जागृत होण्याची, आपल्या मुलांच्या आरोग्याकडे, त्याच्या व्यायामा कडे ,त्याच्या खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजकाल मुलांची आई म्हणते झाडावर चढू नकोस पडशील. पडशील हा शब्द उच्चारून) भीती घालून दिल्यामुळे खरंच भ्यायला लागते आणि मग पुन्हा तो झाडावर चढण्याचा प्रयत्न  करत नाही शहरातल्या तर बहुतांश मुलांना झाडावर चढता येत नाही.
           या बाल कादंबरीतला राम सारंगपूर गावचा असून त्याची आई राधाबाई व वडील शामराव हे फार परोपकारी वृत्तीचे असतात.कोणालाही संकटात मदत करणारे, आदर्श कुटुंब होते. रामच्या बालपणी खरोखरच रामला चांगले वळण लावण्यासाठी रामचे आई-वडील खूप प्रयत्न करायचे. आई शूरवीरांच्या,शिवरायांच्या गोष्टी कथा सांगायची,संस्कारक्षम गाणी,कविता ,श्लोक पाठ करून घ्यायची त्यामुळे रामचे शब्द सुधारू लागले.बुद्धी तल्लख होत.गेली रामची आई जास्त शिकलेली नव्हती परंतु रामचा घरचा अभ्यास पूर्ण करून घ्यायची. रामच्या वडिलांचे ही गावातल्या शाळेत चांगले योगदान असायचे.
            चाणाक्ष धाडसी रामचे वडील शामराव आणि पारंपारिक व्यायामाची गोडी लावण्यासाठी रामला योगासने प्राणायाम दंड-बैठका,सूर्यनमस्कार,धावणे इत्यादी गोष्टींमध्ये पारंगत केले. धावण्यांमध्ये तर राम कोणालाच ऐकत नसे. शरीर चपळ बनण्यासाठी राम खूप व्यायाम करू लागला. ग्रामीण भागातला राम आई-वडिलांसारखंच परोपकारी वृत्तीचा होता. इतकेच नाही तर खूप संवेदनशील मनाचा होता एकदा शेतातील कपिला गायीचे वासरू रामला लंगडताना दिसले. छोट्याशा वासराच्या खांद्यावरून पोटावरून हात फिरवत फिरवत रामने हळूच वासराच्या खुरात शिरलेला काटा काढला त्यामुळे प्राणिमात्राविषयीचे रामचे प्रेम प्रेम दिसून येते.एकदा राम शेतातील हौदात पडला तेव्हा तेच वासरू उडी मारून रामचा जीव वाचवतो. त्यानंतर रामला पोहणे शिकण्याची उत्कंठा वाढत जाते. आणि राम चांगल्या पट्टीचा पोहणारा होतो सारंगा नदीच्या शेजारी काही बायका धुणं धुण्यासाठी गेल्या असताना त्यातील एका बाईचे मुल नदी शेजारी खेळता-खेळता पाय घसरून नदित पडते. आणि बुटकुळ्या खात असते.त्यावेळी प्रसंगावधानी राम पळण्यात चपळ असलेला पळत जाऊन त्या मुलाचे प्राण वाचवतो अशा धाडसी रामचे गावात सर्वत्र कौतुक होते.
             एक वेळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले . पळत सुटणाऱ्या चोराला पकडण्यासाठी राम एक युक्ती करतो. आणि त्या व्यक्तीमुळे चोराला पकडले जाते त्यामुळे संपूर्ण गाव रामचे कौतुक करतात हा किस्सा लहान मुलांसाठी खूप धाडस निर्माण करणारा व पुढील गोष्टी वाचण्यासाठी उत्कंठा निर्माण करणारा आहे.एखाद्या लहान मुलाने कसे राहावे त्याने कोणकोणते खेळ खेळावेत यासाठी ही बालकादंबरी म्हणजे धाडसी वृत्तीचा जणू खुराकच आहे.
            रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीवरून गोफणीने दगड मारून चोरांना पिटाळून लावणाऱ्या राम व त्याचे सर्वच किस्से कौतुक करण्यासारखे आहेत‌.इतकेच नाही तर गुणवत्ता झालेल्या माकडांना पिटाळून लावण्यासाठी राम नी केलेली भज्याची युक्ती खूप प्रशंसनीय आहे जे काम गावातील भल्याभल्यांना जमले नाही ते काम धाडसी राम करून दाखवतो.गावच्या पाण्यात टाकीत विष टाकणारा माणूस फक्त त्यामुळे कसा पकडतो.असे रामच्या अनेक किस्से बालकांची उत्कंठा वाढवणारे व वाचनाला गोडी लावणारे आहेत.
           वेदपुरच्या डोंगरात राम व त्याचे सवंगडी धबधबा पाहण्यासाठी जातात तिकडे माणसांची वर्दळ मुळीच नव्हती.तितक्यात अतिरेकी येऊन बंदुकीचा धाक दाखवून राम व त्याच्या मित्रांना अतिरेक्यांची टोळी पकडून नेते. एका अंधारकोठडीत हात-पाय बांधून डांबून रामला टाकतात. रात्र झालेली असते मुलांना भूक लागून व्याकुळ झालेले असतात तेव्हा राम ने केलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे.रामने आपल्या तोंडाने दुसऱ्या मुलाच्या हाताची दोरी सोडून एकमेकांच्या दोऱ्या सोडून मुलांचा मनोरा करून त्यावर चढून राम बंद कोठडीच्या झरोक्यातून बाहेर पडतो रात्रभर चालत चालत पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतो पहाट होण्याअगोदर पोलिसांना सोबत घेऊन राम त्याच्या मित्राकडे पोहोचतो पोलिसांनी चौफेर वेढा  घालून पळवलेल्या सर्व मुलांना सुखरूप सुटका करतात सर्व मुलांच्या जीवात जीव आला पण पोटात कावळे ओरडत होते पोलीस इन्स्पेक्टरने ५० बिस्कीटचे पुढे नेले होते ते सर्व मुलांना थर्मास मधला चहा आणि बिस्कीट खायला देतात ही बातमी सारंगपूर गावामध्ये वाऱ्यासारखी पसरते.सगळे धाडसी रामचे कौतुक करतात व त्याच्या स्वागतासाठी वाट पाहत असतात तितक्यात पोलिसांची गाडी गावात येते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसतो तेवढाय इस्पेक्टर येतात.धाडसी रामजी खूप कौतुक करतात आणि राम चे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले जाईल अशी घोषणा करतात.
       आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी "धाडसी राम"ही बाल कादंबरी वाचली तर नक्कीच विद्यार्थ्यांना दुसऱ्याला मदत करण्याची भावना वाढीस लागेल आणि आपली सुद्धा भावी पिढी मोबाईलच्या महाजालात न पडता धाडसी  बनेल यात शंकाच नाही त्यासाठी सर्व पालक शिक्षक यांनी अशी पुस्तके मुलांना भेट म्हणून द्यावीत. प्राध्यापक देवबा पाटील यांचा साहित्यिक प्रवास असाच अविरतपणे चालू राहावा यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा

*समीक्षिका लेखिका संपादिका शिक्षिका कवयत्री*
*कु.मीनाक्षी पांडुरंग नागराळे*
जिल्हा प.प्राथ. शाळा कोकलगाव 
*तालुका -जिल्हा वाशिम*