पुण्याचे कवी रमेश जाधव सर यांचा काव्यसंग्रह "नाते मनाशी मनाचे" नुकताच वाचनात आला.आज धावपळीच्या युगात सर्वजणच खूप व्यस्त झाले आहेत. सारे जग झपाट्याने धावताना दिसते.धावत्या युगाबरोबर नातेवाईकांना सुद्धा पूर्वीसारखा वेळ नाही. सर्वजण आपापल्या कामात अत्यंत व्यस्त दिसत आहेत. तेव्हा मन हलके करण्यासाठी कित्येक वेळा कवी मनाशीच बोलतो आहे.आपल्या मनातले भाव मनालाच जणूकाही सांगतो आहे. तेच भाव शब्दबद्ध केलेत कवी रमेश जाधव यांनी. या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर पांढऱ्या शुभ्र फुलांचे चित्र आहे. जणू काही ते कवीचे मनच आहे.या काव्यसंग्रहाचे प्रकाशन घनश्याम पाटील असून त्यांचीच काव्यसंग्रहाला साजेशी,सुरेख प्रस्तावना आहे. तर मलपृष्ठावर अमरावतीच्या लेखिका पल्लवी चौधरी यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण ७१ कविता बंद हृदयाची स्पंदने खोलणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती २४ जुलै २०१६ ची असून मूल्य फक्त ८० रुपये आहे. पण यातील कविता थेट काळजाला भिडणार्या आहेत.
अडगळीत पडलेल्या आयुष्याला
दिली एक नवी दृष्टी
दिसली नव्या आयुष्यात
सकारात्मक सुष्टी
काढून टाकली नकारात्मक घाण
फुलणार मनाची रान....!!
वरील ओळी खूप काही सांगून जाणा-या आहेत. माणसाचं आयुष्य जर उसवले असले तरी त्याला नवा दृष्टिकोन आला तर नव्या उमेदीने जगता येतं तरच मानवाच्या आयुष्याच सोनं होतं.तर त्यासाठी माणसांने सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. तरच नवीन ऊर्जा तयार होईल व मनातले मळभ दूर होतील. माणसाने आयुष्यात कितीही संकटे आली तर ती पेलून धरता आली पाहिजे.त्यातून बाहेर पडता आले पाहिजे. मनातले सर्व नकारात्मक विचार काढून टाकता आले पाहिजे. आपले अंतःकरण स्वच्छ असलं पाहिजे. मनातली घाण काढून टाकल्या नंतरच आपल्या मनाचं रान फुलणार आहे. आणि आयुष्य डुलणार आहे. असं कवी रमेश जाधव यांना वाटतं.
अंधाराच्या साम्राज्यात
हाती काही लागत नाही
आपलेच हात रिकामी असल्यावर
कोण आपले स्वागत करीत नाही....!!
आज सर्वत्र श्रीमंतीचा, गर्वाचा अंधार पसरलेला दिसतो. स्वार्थाने बरबटलेली माणसं पाहायला मिळतात. जर एखाद्याचे काही काम असेल तरच ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला गोड बोलण्याचा प्रयत्न करते. काम संपलं की "गरज सरो आणि वैद्य मरो" अशीच अवस्था लोकांची होते. अशा वातावरणात जर गेलं तर आपल्या हाती काहीच लागत नाही आपल्या जवळ धन, पैसा, संपत्ती नसेल तर आपल्याला कुणीच बोलत नाही.आपल्याकडे पैसा नसला आपण अडचणीत असलो तर कोणीच आपले स्वागत करीत नाहीत असे कवी म्हणतो आहे.
अंतरीच्या वेदनांचे
किती आणि कसे आवरू हुंदके
सुपीक नात्यांवर
गैरसमजाचे पडलेत खंदके....!!
अंतर्मनाला जर वेदना झाल्या तर त्याच्या जखमा लोकांना दिसत नाहीत.मनावर अनेक आघात होऊन दुःखाचे हुंदके दाटून येतात आणि नातलग यांच्यामध्ये गैरसमज होऊन मनाच्या रानाला भेगा पडतात. मन व्याकुळ होतं आणि वेदनेची जाणीव मनात जाळं बनून राहते. असे संवेदनशील मनाच्या कवीला वाटते.
मी गेल्यावर कोणी रडू नका
कडू-गोड आठवणी काढू नका
नको ती रक्षा सावडणे
तेंव्हा गरज असेल कुटुंबाला सावरणे
नको ते दहावा, तेराव्याचे विधी
त्यापेक्षा अनाथाश्रमात द्या निधी....!!
मरणाला प्रत्येक जण भितो. आज आपण पाहतो पण हळव्या मनाचा कवी मोठ्या धाडसाने स्वतःची अंतयात्रा काव्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी मेल्यानंतर रडू नका. माझी आठवण काढू नका. माझी रक्षा सावडण्याचा कार्यक्रम ठेवत बसू नका. तेंव्हा खरी गरज आहे. माझ्या कुटुंबाला आधार देण्याची,त्यांना सावरण्याची ते करा. माझे दहावे, तेराव्याच्या विधीवर पैसा खर्च करू नका. त्यापेक्षा तोच पैसा अनाथ आश्रमात द्या. जुन्या रूढी-परंपरांना आणि अंधश्रद्धा ठेवणाऱ्या अनेक पद्धतींना आळा घालण्यासाठी आपल्या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा प्रयत्न कवी रमेश जाधव सरांनी केलेला आहे. आज अंत्यविधी वर किती तरी लोक पैसा खर्च करतात. तो न करता त्याचा उपयोग समाजासाठी करावा अनाथ आश्रमाला तोच निधी देण्यात यावा असे कवीला वाटते.
हल्ली शिक्षणाचा मांडलाय बाजार
डोनेशनचे आकडे ऐकून पालक झाले बेजार...!!
सत्य परखडपणे मांडणारे कवी रमेश जाधव सर म्हणतात आज गल्लीबोळामध्ये शाळा काढून शिक्षणाचा बाजार मांडलाय.खाजगी दुकाने शाळाचं नवरूप घेऊन ठाण मांडून बसल्या आहेत. स्वार्थापोटी गोरगरीब जनतेला लुबाडत आहहेत. एल.के.जी पासून पालक प्रवेश घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभा राहून भली मोठी फी भरून आपल्या मुलाला शाळेत पाठवत आहेत. इतकेच नाही तर पुन्हा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी संस्थाचालकाच्या घशात भरमसाठ पैसा ओतून डिग्र्या घेत आहेत. पुढे तेच पालक लग्नाच्या बाजारात शिक्षणाचा सर्व पैसा वसूल करतात.त्याच्या स्वरूपात अशी अशी टीका केली आहे. आणि ती रास्तच आहे. आज खासगी संस्थांची फीस गगनाला भिडली आहे. तिच्याकडे पाहून भल्याभल्या लोकांचे होश उडून जातात. दोन दोन लाख एका एका वर्षाची फीस आहे. अशा शिक्षणाचा बाजार मांडलेल्या मानसिकतेला जर आळा घालायचा असेल तर सर्वांनी त्याचा विचार करावा. असे कवी आवर्जून सांगतो आहे.
कवी रमेश जाधव यांच्या कविता सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या, समाजहित जपणाऱ्या,मनांची गुंफण करणाऱ्या, हळव्या मनास आधार देणाऱ्या,अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या, शिक्षणाच्या बाजारावर प्रहार करणाऱ्या, जीवनाचे वास्तव अधोरेखित करणाऱ्या, वास्तवाचे भान ठेवणाऱ्या, गैरसमजाचे जाळे दूर करणाऱ्या, वृद्धा विषयी सहानुभूती असणाऱ्या, पोलिसांविषयी आदर असणाऱ्या, मनाशीच मनाचे नाते सांगणाऱ्या....सर्व कविता अंतःकरणाचा ठाव घेतल्याशिवाय राहात नाहीत. बंद हृदयाची स्पंदने खोलत जाणा-या आहेत.
प्रत्येक मानवी मनाने मनातूनच वाचावा असाच हा काव्यसंग्रह आहे..कवी रमेश जाधव सरांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा....!!
समिक्षिका,लेखिका, कवयित्री,शिक्षिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम