*तिमीरातुनी तेजाकडे नेणारा महाकाव्यसंग्रह म्हणजे- "समतेचे महाकाव्य"*
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील ५००० कवितांचा देशातील सर्वात मोठा आणि महान ग्रंथ म्हणजे "समतेचे महाकाव्य"होय. याचा पहिला खंड नुकताच वाचनात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा धगधगता इतिहास अखंड जगाला ऊर्जा व प्रेरणा देणारा आहे. महामानव डॉ.बाबासाहेबांना मानवंदना देणारा,स्तुत्य उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. हा उपक्रम प्रशासकीय अधिकारी, कवी, पत्रकार, शिक्षक व नागरिक या सर्वांनी राबविलेला उपक्रम म्हणजे समतेचे महाकाव्य हा ग्रंथ जेंव्हा हाती आला माझा माथा नकळत झुकला आणि प्रणाम करून कपाळाला लावला.मी फार भाग्यवान आहे. की माझी कविता या महान ग्रंथात समाविष्ट झाली. या उपक्रमांमध्ये खारीचा वाटा का होईना होता आले हे मी माझे भाग्यच समजते.
समतेचे महाकाव्य या महान काव्यसंग्रहाचा पहिला खंड याचे मुखपृष्ठ अतिशय देखणे त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र त्यावर सुवर्णाक्षरांनी जणू लिहिलेले समतेचे महाकाव्य असे नाव अतिशय देखणे आणि दुहेरी कव्हरचे मुखपृष्ठ असून याची पहिली आवृत्ती १४ एप्रिल २०२० रोजी १४ ठिकाणी प्रकाशित करण्यात आली. या महाकाव्यसंग्रहाचे प्रकाशन सुज्योन अॅग्रो एन्टरप्रायझेस कोथरुड,पुणे येथे झाले असून मूल्य फक्त ६०० रूपये आहे, पण यातील अर्थगर्भित रचना दशलाखमोलाच्या आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे विषमता आणि अन्याय जाळून टाकण्यासाठी पेटलेला एक धगधगता अग्निकुंडच. देशातले सर्वात जास्त शिक्षण घेणारे, अनेक डिग्र्या पदव्या घेणारे, संविधानाचे शिल्पकार, पुस्तक प्रेमी,पुस्तकांसाठी घर बांधणारे, न्याय,समता,बंधुता पेरणारे, ग्रंथप्रेमी,विश्वरत्न बाबासाहेबांचा इतिहास म्हणजे तिमिरातुनी तेजाकडे नेणारा तेजोमय प्रकाश -महाकाव्य संग्रह म्हणजे "समतेचे महाकाव्य" होय.डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देणारा स्तुत्य उपक्रम आहे या उपक्रमाची मूळ संकल्पना जिल्हाधिकारी राजेश खवले साहेब यांनी मांडली. ती मूर्त रूपात साकारण्यासाठी उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे, तहसीलदार विजय लोखंडे,जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, तहसीलदार राहुल तायडे, तहसीलदार प्रताप वाघमारे,ज.वि. पवार प्राध्यापक डॉ. भास्कर पाटील यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेला हा महान ग्रंथ.
समतेचे महाकाव्य या ग्रंथांचा हा पहिला खंड यात एक हजार कवितांचा समावेश आहे.असे एकूण पाच खंड तयार करण्याचा मानस वरील सर्व प्रशासकीय अधिकारी यांचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय खूप मोठा,विशाल, व्यापक आहे आणि तो काव्यरूपात मांडणे हे फार मोठे जिकिरीचे आणि आव्हानात्मक आहे.एखादे ग्रंथ जे सांगू शकत नाही ते विचार एक कविता सांगू शकते. इतकी ताकद काव्यमय रुपात असते. या काव्यसंग्रहाला शुभेच्छा माजी राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील, माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे,माननीय संजय धोत्रे, अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर,पालकमंत्री माननीय बच्चू कडू,मा.खासदार भावनाताई गवळी,या. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब,दिग्दर्शक राजदत्त, अभिनेता मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ इत्यादी मान्यवरांच्या शुभेच्छा आहेत.
हजारो वर्षापासून गुलामगिरी मध्ये कितपत पडलेल्या समाजाला जागं करून त्यांना गुलामगिरीची जाणीव करून देऊन अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे,गुलामगिरीच्या शृंखला तोडून,न्यायाचे,समतेचे गीत गाण्यासाठी हातातल्या लेखणीची तलवार करून लढणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर त्यांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर सर्व राज्यातून कवितांची सलामी देण्यात आली आहे.
जयभीम, जयभीम दलितांच्या नाथा
माणुसकीच्या देवा तू आमचा त्राता....!!
या मंगेश पाडगावकरांच्या ओळी थेट काळजात शिरणाऱ्या आहेत.त्यांनी महामानवाला माणुसकीचा देव म्हटले आहे. तूच आमचा त्राता आहेस. तूच आमचा त्रास कमी करणारा आहेस अशी हाक दिली आहे.
भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतराची वंदना...!!
या ओळीतून सुरेश भट यांनी भिमरायाला आपल्या शब्दांची शब्द सुमने अर्पित केली आहे. त्यांनी मानवंदना आपल्या शब्दांतून दिली आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. आज आमच्या अंतरातून ही मानवंदना देत आहोत. असे कवी म्हणतो आहे.
जग बदल घालुनी घाव | सांगून गेले मला भीमराव |
गुलामगिरीच्या या चिखलात | रुतून बसला का ऐरावत ||
या अण्णाभाऊ साठे यांच्या ओळी काळजाला स्पर्शून जाणा-या आहेत. मला भीमरायांनी सांगून गेले. जग बदलायचे असेल तर तुला घाव घालावे लागेल तरच या गुलामगिरीच्या चिखलातून तू बाहेर पडू शकशिल.नाहीतर एखादा हत्ती चिखलात कसा बसतो? तसा तु ही बसशिल.. इतकी ताकद शब्दांची आहे.दुष्कृत्यांचा मूकनायक, झुंजार तू भीमा, युगंधरा,आव्हान,हे महामानवा, तुझ्या सावलीत वावरताना, वादळातील दीपस्तंभ,रमा थापते भाकर, भिमाचे विचार, भीमा तुझ्या जन्मा ने बाळा, संघर्ष पाण्यासाठी ,भिमसुर्या,आमची मशाल, तो प्रवर्तक,वाचून मोठे व्हा ! भारतीय संविधान, विश्वरत्न, ज्ञानाचा झरा, प्रकाश दीप,मुके बोलू लागले अशा अनेक कविता काळजाला थेट भिडणा-या आहेत.
डॉ. बाबासाहेबांचा अखंड प्रवास सांगणाऱ्या, सागरापेक्षा विशाल असणा-या आहेत.हा प्रवास काव्यात व्यक्त करणे हे साधे काम नाही. कवी फ. मु. शिंदे म्हणतात मुळात कविता करणे इतकी साधी गोष्ट नाही. एखादी घटना गोष्टीत सांगणे सोपे पण कवितेत मांडणे तेवढे सोपे नाही. जेव्हा आभाळ फाटते तेव्हा कादंबरीचा जन्म होतो. जेव्हा जमीन फाटते तेंव्हा कथेचा जन्म होतो. आणि जेव्हा काळीज फाटते तेव्हा कवितेचा जन्म होतो... अशा तब्बल पाच हजार कवितांचा संकल्प खरंच कौतुकास्पद आहे. प्रशंसनीय आहे.प्रत्येक घरात असावा व आग्रहाने वाचावाच असा ग्रंथ हा (काव्यसंग्रह) म्हणजे "समतेचे महाकाव्य" होय. पुढील खंडासाठी खूप खूप शुभेच्छा....
समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७