*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज*
सर्वधर्मसमभाव हे या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल, १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला.त्यांचे पुर्ण नांव माणिक बंडोजी इंगळे असे होते.त्यांच्या गुरुचे नांव अडकोजी महाराज असे होते....अडकोजी महाराजांनी त्यांचे माणिक है नांव बदलून तुकडोजी असे ठेवले.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल? याविषयीची जी उपाययोजना महाराजांनी सुचविली होती. ती अतिशय परिणामकारक ठरली.ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे,ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट, कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केले.
भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल. अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल? याविषयी त्यांनी चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्याच्या स्थितीची पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे ग्राम विकासाच्या मूलभूत समस्यांचा विचार केला.
तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी प्रभावी खंजिरी भजनातून विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. म्हणून त्यांनी कारावासही भोगला. कुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते. हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज खरी समाजाला आहे. सर्वधर्मसमभाव सर्वांनी सारखा जपला पाहिजे पण आजच्या काळात प्रत्येक जण माझा धर्म कसा मोठा? मी कसा मोठा? हे दाखविण्यात गुंतला आहे. लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचे वेगवेगळे रंग ही वाटून घेतले आहेत.आणि राष्ट्रपुरुष सुद्धा वाटून घेतले आहेत. जे थोर पुरुष त्यांनी कधीही कोणत्याही धर्माबद्दल तिरस्कार केला नाही. सर्वधर्मसमभावाची भावना पुरस्कृत केली. आज त्याच महामानवांना आजच्या समाजाने वाटून घेतले आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटायचे की देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे रक्षण करू शकतील.पण आजच्या समाजातील तरुण हे व्यसनाच्या आहारी गेलेले दिसत आहेत. व्यायाम करून बलोपासक तर दूरच सर्व तरुण मंडळी त्या मोबाईलच्या आभासी दुनियेत टिकटॉक बघण्यात तासन्तास गुंतलेली आहेत.समाजाचे तर सोडाच, देशाचे पण यांना घेणेदेणे राहिलेली नाही. त्यामुळेच तर देशात दर मिनिटाला एका मुलीवर अन्याय, अत्याचार होतो आहे. सुसंस्कार पोरका झाल्यासारखा वाटत आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात स्वतः सोडून येणारी ही आजच्या काळातली पिढी आहे. काही अपवाद असतीलही पण खरंच आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे.
आजच्या काळातल्या तरुण पिढीने त्यांचे १०१ मौलिक विचार जरी वाचून आत्मसात केले. तरी खूप झाले. केवळ मूर्ती पुजेच्या मागे न लागता आपले ध्येय प्राप्तीकरिता मुख्य चरित्राचे चिंतन करून त्याचे गुण अंगी बाणवणे. ही खरी पूजा आहे. त्यामुळे मनाचा संकल्प दृढ होऊन वृत्ती ध्येयरूपी तदाकार होते. हे आजच्या समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही मनुष्यमात्रात जेंव्हा कांही कमतरता दिसून येईल तेंव्हा त्याचा उपवास करू नका. त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या. आणि त्याचा जन्म सफल करा. याच्या इतके पुणे जगात दुसरे नाही... कसं वागावं? कसं जगावं? कसं राहावं? हे जर आजच्या समाजातील लोकांना समजत नसेल तर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता वाचून आचरण त्याप्रमाणे करावे तेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
धर्म हा धंदा म्हणून आचरणाचा विषय नव्हे, किंवा ते एक विचित्र पुढेही नव्हे, तर तो व्यष्टीसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो. म्हणूनच त्यांची मूलतत्त्वे अबाधित असतात. मानवाने प्रत्येक धर्माची जी मूलतत्वे आहेत. ते मुलतत्वे अभ्यासावेत. ती उन्नतीकरिता दिलेली आहेत. पण आज माणूस मुलतत्वे बाजूला सारून ती मुलतत्वे किंवा महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी धर्म किंवा त्याच्या धर्मातील महापुरुष डोक्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.
अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे तुकडोजी महाराज यांच्या विचारांची खरी गरज आजच्या समाजाला आहे आज अंधश्रद्धेपायी मोठमोठे खून होताना ,निष्पाप जनावरे बळी जाताना दिसताहेत स्वतःची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणसाने पाहिले पाहिजेत. भारत देशाच्या रक्षणासाठी युवकांनी सदैव तयार असले पाहिजेत.
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
मो.९७६७६६३२५७