*छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र*
स्वराज्याचे स्वप्न जिजाऊ माँसाहेबांचे पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांसह भक्ती,शक्ती,युक्ती या त्रीसंगमाचा वापर करून मोठ्या पराक्रमाने, धैर्याने,निकराने परकीय सत्तांशी लढा देऊन ३५०गड किल्ले जिंकून, मोगलशाही, पातशाही,आदिलशाही, निजामशाही,डच, फ्रेंच,पोर्तुगीज अशा सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेल्या महाराष्ट्राच्या मातीत, पवित्र संताच्या भूमीत,धाडसी मातेच्या कुशीत जन्म घेतलेल्या शिवरायांनी सर्व सत्ता धुडकावून लावल्या. शत्रूला सळो कि पळो करून सोडले. ज्यांची कीर्ती अख्ख्या जगाला विश्ववंदनीय आहे अशा महाराष्ट्राच्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बघितला तर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा अदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. प्रजेवर जुलूम करणारे होते. खूप अन्याय करणारे होते.या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. त्या काळात उघडपणे पूजाअर्चा लोक करू शकत नव्हते. रयतेला पोटभर अन्न मिळत नसे. सुरक्षित निवारा नव्हता. सर्वत्र अन्याय माजला होता.
राजमाता जिजाऊंनी हे सर्व पाहिले आणि स्वतःचे स्वराज्य उभ करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बाल शिवबाला सुरुवातीपासूनच युद्धाचे धडे देत तयार केले. सर्वच क्षेत्रात निपुण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने शस्त्र नसतानासुद्धा मूठभर मावळ्यांच्या मदतीने एक एक गड जिंकत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जाती-धर्माच्या सगळ्यांना सोबत घेऊन न्यायाचे, लोकहिताचे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.छत्रपती शिवरायांच्या फौज मध्ये अठरापगड जातीचे लोकं सामील होते. वेळप्रसंगी जिगरबाज मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत स्वराज्यासाठी बलिदान दिले होते.त्यांच्या फोजेमध्ये महार,मांग, मातंग, रामोशी, वडार,चांभार, धनगर, बंडगर, मुस्लिम अशी अनेक अठरापगड जातीतले मातब्बर शूरवीर मावळे सोबत होते. सर्वांच्या मनात एकच होतं ते म्हणजे "स्वराज्य" आपल्या धन्यासाठी व धनी रयतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूला मातीत घालणारे जिगरबाज मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष आजही गड-किल्ले देत आहेत.
छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा संताचा वारसा लाभलेला. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.प्रत्येक मावळा आपल्या राजासाठी जिवाची बाजी लावायला तयार असायचे यातच त्यांचे सर्वस्व समजून घ्यायला हवं....छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. त्रासलेल्या रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करून राज्याभिषेक करून घेतला. शेतकऱ्यांच्या काडीलाही कोणी धक्का लावणार नाही असा आदेश जारी केला. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणा-यांचे हात पाय कलम करून न्याय दिला स्त्रियांचा आदर करणार, मान सन्मान करणारे प्रत्येक स्त्रीला मातेसमान पाहणारे छत्रपती जगाच्या पाठीवर दुसरे होणे शक्यच नाही. हिरकणीची गोष्ट समजताच हिरकणी ला साडीचोळी देऊन मान सन्मान केला. आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले. वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश जिंकून साडेतीनशे किल्ले जिंकले छत्रपती शिवरायांनी अनेक संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्याजोगे होते.
छत्रपती शिवरायांनी वनदुर्ग, जलदुर्ग, गिरीदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. राजगड, प्रतापगड,सिंधुदुर्ग या सारखी नवीन किल्ले छत्रपती शिवरायांनी बांधलेले गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था महाराजांनी केली होती प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार,मुजुमदार, सबनीस, कारखानीस हे सुरक्षितेसाठी ठेवले होते. तोफा तयार करून घेतल्या होत्या. तोफा खराब होऊ नये म्हणून त्यावर मेणाचा लेप लावत असत.अनेक आरमार उभे केले.स्वराज्याच्या आरमारातील कोळी, भंडारी,आगरी यासारखे विविध जाती धर्मातील लोक होते... छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर खाते खूप छान होते त्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे होते.
गनिमी कावा -गनिमी कावा म्हणजे युद्धतंत्र... आपल्या सोयीच्या ठिकाणी शत्रूवर हल्ला करून शत्रु सावरतो न सावरतो तोपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचणे याला गनिमी कावा असे म्हणत. स्वराज्य व्यवस्थित चालावे म्हणून राज्यकारभाराची आठ खात्यात विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. राज्यात प्रजेला अन्न,वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण केल्या स्त्रियांचा सन्मान केला कोणावरी अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. पटकन प्रजेला न्याय दिला जायचा.शेती आणि उद्योगधंद्याचा विकास होऊ लागला प्रजा सुखासमाधानाने राहू लागली.
गरजू गरीब शेतकऱ्यांना छत्रपती शिवरायांनी बैल जोड्या दिल्या पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता त्या काळात घेतली जायची. जंगले नष्ट होणार नाहीत. याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. आरमारासाठी जहाजे, वल्ले,सॉर्ट इत्यादी तयार करून घेतले.एकही झाड तोडू नये असा हुकूम छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत होते...गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे रयतेचे उत्पन्न वाढले.स्वराज्यात रयतेला कधीही दुष्काळ जाणवला नाही. पावसाळ्यापूर्वी स्थळे व टाक्या बांधून पावसाचे पाणी अडवले जायचे. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत. व सारा माफ करीत असत. सरकारी कोठारातील धान्य रयतेला मोफत वाटून देत असत.प्रत्येकाला रोजगार मिळवून देत असत. बारा बलुतेदारांच्या हाताला काम देऊन रोजगाराची संधी निर्माण करून देत असत त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बलुतेदार व कारागीर सुद्धा सुखी झाले होते.
स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून बाहेरुन येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला.स्वराज्यात मिठाचा व्यापार वाढला.स्वराज्यात व्यापार उद्योग धंद्याची वाढ केली.कर्नाटकातील गडीच्या रक्षणार्थ "मलमा देसाई" या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिला धाकटी बहीण मानून गडी व गाव सन्मानपूर्वक साडीचोळीसाठी भेट दिले व तिला "सावित्रीबाई" हा किताब दिला... इतकेच नव्हे तर स्वच्छतेविषयी छत्रपती शिवाजी महाराज फार जागरूक होते प्रत्येकाच्या घरात शेजारी स्वच्छता पाहण्यासाठी सूचना केल्या जायच्या.
मोठ्या बाजारपेठेत कचरा राहणार नाही याची दक्षता घेतली जात असत.कचरा जाळून टाकून त्याची राख भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावे अशी आज्ञा केली होती. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दारूगोळा आरमार पर्यावरणाचे संरक्षण, जलव्यवस्थाप,,सागरी व्यापार व्यापार पेठा स्वच्छतेविषयी दक्षता, महिलांचा मानसन्मान, न्याय कायदा सुव्यवस्था, सैनिक त्यांचे धार्मिक धोरण आणि अठरापगड जातीधर्माच्या लोकांना एकत्र ठेवून शेतकऱ्यांना रयतेला प्रजेला सुखी ठेवण्याचे तंत्र आजही महाराष्ट्राला दिशा दर्शक असा आहे. त्याकाळी कोणीही आत्महत्या करीत नसत सर्व प्रजा सुखाने नांदत होती म्हणून तर जगाच्या पाठीवर फक्त छत्रपतीनाच लोककल्याणकारी जाणता राजा असे म्हणतात....
महाराष्ट्राच्या कडेकपारी गड किल्ल्यातून सह्याद्रीच्या कणाकणातून एकच नाद घुमतोय...
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र शूरवीरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा....
आम्ही धन्य धन्य झालो आमचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला....
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
कवयित्री लेखिका शिक्षिका
कुमारी मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
तालुका जिल्हा वाशिम
मो.९७६७६६३२५७