__________________________________
"नवऊर्जा देणारा काव्यसंग्रह: "वादळातील दीपस्तंभ "
आजच्या तरूणाईला नवऊर्जा प्रदान करून जगायची प्रेरणा देणारा काव्यसंग्रह म्हणजे मु.आर्वी, जि. वर्धा येथील माझे मार्गदर्शक शिक्षक व प्रसिद्ध कवी, समिक्षक अरूण विघ्ने यांचा "वादळातील दीपस्तंभ " ! त्यांचा पहीला काव्यसंग्रह "पक्षी " सन 2000 मध्ये प्रकाशीत झाला .
या काव्यसंग्रहाची प्रस्तावना घाटंजी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक , प्रसिद्ध साहित्तिक क.वि. नगराळे यांनी समर्पक व कवितेला न्याय देणारी लिहीली आहे . मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे . एकेकाळी काही विशिष्ट लोकांना शिक्षणाचा हक्क नव्हता . त्यांची लेखणी ही बंदिस्त होती . पण बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाने हे हक्क बहाल केले आणि पिढ्यांपिढ्याच्या बंदीस्त लेखणीचे बंध तोडलेत .सर्वांसाठी शिक्षण खुले झाले . ही संकल्पना मुखपृष्ठावरील चित्रात चित्रकाराने हुबेहुब साकारली आहे .तलवार ही रक्तरंजीत क्रांती करते पण लेखणी ही रक्तविरहीत क्रांती करते . बाबासाहेबांच्या लेखणीने जगविख्यात रक्तविरहीत क्रांती केली आहे. हा काव्यसंग्रह परीस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केला असून त्यात विविध काव्य प्रकारातील , विविध विषय आणि आशय असलेल्या एकूण 110 कवितांचा समावेश आहे .
अरूण विघ्ने हे हाडाचे शिक्षक असले तरी त्यांच्या कविता शेतक-यांच्या शेतीमातीशी कृतज्ञतेचा भाव जपणा-या ,सैनीकाबद्दल आदरभाव जपणा-या, आई-वडील, बहीण यांच्याबद्दलचा प्रेमभाव जपणारा, वीरांच्या कार्याशी नतमस्तक होणारा, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले , डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे छ.शिवाजी महाराजांविषयी आदरभाव व्यक्त करणारा आहे.
कवींना त्यांचे कवीमन स्वस्थ बसू देत नव्हते .त्यांचे निसर्गाशी आपुलकीचे नाते असल्याने पाणी, शेती, पशु, पक्षी अनेक सजीव, निर्जीव वस्तूवर प्रेम करायला शिकविणारी त्यांची कविता वाचक मनाला भावणारी आहे . परिस्थितीपायी ज्या बालकांना काम करावं लागतं ही त्यांच्याविषयीची मांडलेली व्यथा " बालकामगारांचं शल्य " या कवितेतील हृदय हेलावून टाकणारी आहे .
" पोटाची खळगी भरण्या
बनावं लागतं बाल कामगार
समजू नये कुणी हौस आमची
नाही स्वमर्जीने हे काम करणार ! "
या ओळीतून परिस्थितीशी झुंज देणा-या बाल कामगारांची सल कवींनी खुप भावनीकतेने मांडली आहे .समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे अंधश्रद्धा . या अंधश्रद्धेपायी समाजातील अनेक निष्पाप लोकांचे हकनाक बळी गेलेले आहेत . म्हणून कवी आपल्या "अंधश्रद्धा " या कवितेत म्हणतात ...!
" विज्ञानाच्या कसोटीवर
बघा ती घासून श्रद्धा
स्विकारा तीला डोळंस
मग कशी होईल अंधश्रद्धा ? "
या ओळीतून अंधश्रद्धेची पट्टी बांधून वावरणा-या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातण्याचा प्रयत्न केला आहे. हळव्या मनाच्या कवीमध्ये खुळचटपणाची भावना अजीबात कुठेही दिसून येत नाही .
" उध्वस्त वावरातले रस्ते " या कवितेतून कवी होणा-या भ्रष्टाचारावर वार करतात. त्यांच्या कवितेतून आपल्याला त्यांची विद्रोही भावना दिसून येते . ते म्हणतात..!
" तुम्ही खुशाल बांधा
उध्वस्त वावरात रस्ते
आणि आमच्या करपलेल्या भावनांचे बंगले ...
बंगल्यावर चढवा बिनधोक इमलेच इमले ,
आमच्या उजेडाच्या स्वप्नांच्या कत्तली करून ..!"
गोरगरीब शेतक-यांचा जीव की प्राण म्हणजे त्यांची शेती . आणि शासन ती शेती कवडीमोल भावाने अधिग्रहीत करून त्यांच्या शेतात कुचकामी मोठमोठे रस्ते बांधतात . बिचा-या त्या शेतक-याला भूमीहीन करून माय लेकराला वेगळे केल्याचे पाप जेव्हा येथे घडते, तेव्हा कवींच्या मनात हळहळ, चीड, राग, विद्रोह निर्माण होतो आणि मग अशी कविता जन्मास येते .
अंधारात चाचपडणा-यां लोकांना अरूण विघ्नेंचा " वादळातील दीपस्तंभ " हा कवितासंग्रह प्रकाश देणारा, दिशादर्शक आहे . कवी हे मुळात शिक्षकी व्यवसायातील असल्याने त्यांच्या कविता संस्कार करणा-या, प्रगल्भ चिंतन करायला लावणा-या , अन्यायाविरूद्ध विद्रोह करायला लावणा-या , वादळातील समस्त दीपस्तंभांवर प्रेम करायला लावणा-या आहेत .
" गीत जीवनाचे । गाऊ आनंदानं ।
राहू दोघंजनं । सुखामंदी ।।
मागे हा अरूण । एकची वचन ।
नको अभिमान । मनाठायी ।। "
या अभंगातून कवी जीवनाच्या वाटेवर आनंदानं रहायला, गीत सुखाचे गायला सांगतात .येणा-या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आनंदानं जगून घ्यावं. हा जन्म पुन्हा नाही असं सांगतात . तसेच हळव्या मनाचे कवी स्वतःला कुठलाच अभिमान नको , अभिमानाचा, गर्वाचा लवलेशही नको असं मागनं मागतांना दिसतात .
अस्पृश्यतेच्या नावाखाली अनेक अन्याय, जुलूम अत्याचार केलेल्या व्यवस्थेला कवी 14 आँक्टोबर 1956 चा महीमा सांगण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे .
"महीमा तो काय ।
वर्णावा बाबांचा ।
कोटी वंचितांचा ।
उद्धारक ।। "
या अभंगातून वर्णव्यवस्थेवर कवी कडाडून हल्ला चढवत जनतेला जगण्याची नवी दिशा देणा-या बाबासाहेबांचा परीचय नव्या पिढीला करून देतात .
" अवघे करूया
सिमोल्लंघन अनिष्ट रूढीचे
पापी विचारांचे
मनोभावे !"
या काव्यांजली प्रकारातील रचनेत कवी अनिष्ट रूढी परंपरांवर कडाडून हल्ला चढवितांना दिसतात . हा माणुसपण नाकारणारा विचार मनातून हद्दपार करूया आणि बंधुभावाने सारे मिळून जगूया असा संदेश देतात .
कवी शब्दांचा दीवा हाती घेऊन अंधारातून प्रकाशपर्वाच्या दिशेने वाट शोधीत सक्षमपणे वादळातील दीपस्तंभाप्रमाणे पुढे सरकतो आहे . त्यांच्या अनेक कविता ह्या समाजभान ठेऊन वाईट गोष्टींचा बिमोड करणा-या ठरतात . एकूणच हा काव्यसंग्रह वाचकांच्या मनाला भावणारा आहे . तो दिशादर्शक वाटतो . नव्या पिढीला नवऊर्जा देणारा वाटतो . वाचक निश्चितच याचे स्वागत करतील . असा मला ठाम विश्वास आहे . त्यासाठी कवी अरूणजी विघ्ने यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देते !
कु. मिनाक्षी पांंडुरंग नागराळे
(स.शिक्षिका,कवयित्री,लेखीका, संपादिका)
वाशीम,