Saturday, 26 June 2021

वड पुजायचा की जगवायचा?

वड पुजायचा की जगवायचा? वैचारिक लेख


*वड पुजायचा की जगवायचा?*

       आपल्या महाराष्ट्र देशात पुर्वीच्या काळापासून वडपूजन करण्याची प्रथा आहे.प्रथा वाईट नाही पण त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याची गरज आहे....या मागचे कारण,वास्तव, आणि आधुनिक विचार करण्याची खरी गरज आज आहे.कुणीतरी लावलेला पाच पन्नास वर्षापुर्वीचा वड पुजायला खूप मोठ्या प्रमाणात शे पाचशे बायका एकाच ठिकाणी वडाची पुजा करण्यासाठी चढाओढ करीत असतात... वेगवेगळ्या प्रकारच्या भारी साड्या घालून, नटूनथटून दिवसभर मिरवत असतात.वडसावित्री हा समजून घेण्याचा विषय आहे.पुर्वीच्या काळी सत्यवानाला जेंव्हा भूरळ आली होती.तेंव्हा सत्यवान बेशुद्ध अवस्थेत पडला होता.सावित्रीला वाटले सत्यवानाचा मृत्यू झाला.तेंव्हा ती परमेश्वराला प्रार्थना करू लागली...देवाचा धावा करू लागली. सत्यवानाच्या सावित्रीने सत्यवानाला ओढत वडाच्या झाडाच्या थंडगार छायेत नेलं.तेंव्हा काळी क्षणातच सत्यवानाला वडाच्या झाडाने सोडलेली शुद्ध हवा भरपूर प्रमाणात मिळाली आणि सत्यवान शुध्दीवर आला.सावित्रीला खूप आनंद झाला.तेंव्हापासून तेंव्हाची सावित्री आजच्या आधुनिक सावित्रीपर्यंत वडाला फे-या मारण्याची व वडाचे पूजन करण्याची प्रथा रूढ झाली.
         कुणीतरी आयत्या लावलेल्या वडाला पूजत बसण्यापेक्षा आजच्या काळातील सावित्रीने या वडसावित्री सणाच्या निमित्ताने का होईना प्रत्येक स्त्रीने प्रत्येक वर्षी एक नविन वड लावला पाहिजे.आणि तो वड जगवला पाहिजे.कांही स्त्रीयांना या निमित्ताने पार्लर मध्ये जाऊन पैशाची उधळपट्टी करून स्वतः:चा डार्क मेक अप करून महागड्या साड्या परिधान करून जगात मी वड सावित्री पूजनाला चालले म्हणून मिरवण्याची भारी हौस...हा सण डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घालण्याचा विषय आहे.आजच्या कोरोनाच्या काळात कितीतरी कुटुंब उध्वस्त झालीत.लाखो लोकं अॉक्सिजन न मिळाल्याने मृत्यूमुखी पडले. वातावरणात वड,पिंपळ, कडुनिंब अशा वनस्पती भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतात.त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. शुद्ध ताजी हवा मिळवायची असेल तर प्रत्येक स्त्रीने वडसावित्रीच्या निमित्ताने का होईना एक वड लावून त्याची पुजा करावी.राहिला प्रश्न हाच पती सात जन्म मिळावा म्हणून स्त्रिया कितीतरी श्रध्देने पूजा करतात.तर सर्वच स्त्रियांचे पती चांगले असतील हे ही आजच्या काळामध्ये सांगता येत नाही.एखाद्या बाईचा दारूडा नवरा असेल तर ती स्त्री याच जन्मी दारूड्या नव-याला कंटाळलेली असते मग ती पुढच्या जन्मी कशाला दारूडा नवरा मिळावा म्हणून पुजा करेल हा ही विषय फार चिंतनाचा आहे.कांही स्त्रिया विधवा महिलांना जाणिवपूर्वक हिच्यात.त्यांच्यासमोर मुद्दाम मोठमोठ्याने बोलत मी सौभाग्यवती म्हणत चला चला वड पुजायला म्हणत मिरवत असतात.बिचा-या विधवा महिलांचं तिथं खच्चीकरण होतं.त्या उदास उदास राहतात.एक महिलाच दुस-या महिलेला नकळत हिणवत असते.खरी महिला तीच जी दुसऱ्या महिलेचं दुःख समजून घेते.खरी सौभाग्यवती तीच जी विधवा स्त्रियांना हळदी कुंकूवासाठी प्रथम बोलावते.जो पर्यंत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक विचार रूजणार नाहीत तो पर्यंत अशा प्रथा बंद होणार नाहीत.चांगले करणारे एखादीच व्यक्ती असू शकते.मग चांगले कार्य करण्यासाठी इतर लोकं बदलतील तेंव्हा मग मी बदलेन हे सोडून द्यावे.चांगल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून सुरुवात करावी...कोवीड काळात ज्या  महिलेचा पती  वारला आहे अशा महिलेला वडसावित्रीनिमित्त आर्थिक मदत केली तर त्या महिलेचा आशिर्वाद नक्कीच मिळेल.

            चल चल सये आज
            करू वडाचे वृक्षारोपण
            आधारवड जिवनाचा
            मिळेल भरपूर  ऑक्सिजन....!!

            वृक्षसंवर्धन करूया गं
             संतुलित राहील पर्यावरण
             वड, पिंपळ, कडुनिंब लावू
             होईल सा-या रोगांचे हरण...!!

             चल चल सये आज
              एक शपथ घेऊया
              प्रत्येकीने एक वड लावून
              त्याला मोठे करूया.....!!

              मिळेल शुद्ध, हवा पाणी
              ऐकू येतील पक्ष्यांची गाणी
               घेऊ आधुनिक विचारसरणी
               पुसू दुखितांच्या डोळ्यांचे पाणी...!!

                चल चल सये आज...वडाला जगवूया...!!

          वड पुजायचा की जगावायचा हे प्रत्येक स्त्रीने ठरवायचे आहे.एखाद्या गावात पाचशे महिला असतील तर त्या प्रत्येकीने ठरवलं की मी वर्षाला एक वड,पिंपळ, कडुनिंब लावणार.तर वर्षाकाठी एका गावात पाचशे वड जगतील...दहा वर्षात पाच हजार वड जगतील.आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल.भरपूर पाऊस पडेल.पक्ष्यांना निवारा मिळेल.नानाविध प्रकारचे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल.अन्यथा परिस्थिती फार भयानक होणार आहे.आज कोरोना काळात ऑक्सिजन विकत घ्यावे लागते.पुढच्या काळात कदाचित ऑक्सिजन' सिलेंडर ची गरज भासणार नाही.पाणी विकत घ्यावे लागणार नाही.भरपूर पाऊस पडेल.दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.सुखसमृध्दी आनंदाने डोलत राहील.मानवाची भरभराट होईल.जंगलतोड करू नका...झाडे लावा झाडे जगवा...मग ही वड सावित्रीच्या निमित्ताने फक्त बायकांनीच लावायची का? अजिबात नाही...पुरूषांनीही जर वडसावित्रीदिवशी एक वड लावला तर फार मोठे नुकसान होणार नाही.उलट पर्यावरण चांगले राखण्यासाठी आपण एक खारीचा वाटा उचललात.यापेक्षा मोठे वास्तव नाही...मोठी प्रतिज्ञा नाही...

लेखिका/कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो. ९७६७६६३२५७

Wednesday, 23 June 2021

राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

*राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला* ------------------------------------------ 1 मार्च 2020 ला नीरजा चा 4 था वाढदिवस व नीरजा काव्य समूहाचा 3 रा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय नीरजा रचना स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. या स्पर्धेचे असामान्य महत्त्व आहे.' झेप नीरजेची ' या विषयावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. नीरजा समूहातील अनेक कवी या स्पर्धेत सहभाग घेतला. नवीन काव्य प्रकार असून सुद्धा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हातील कवींनी सहभाग घेऊन विजेते ठरले. विजेत्यांना सन्मान चिन्ह तर उत्तेजनार्थ कवींना सन्मान पत्र देण्यात आले. 2017 पासून समूहाचे काव्य संग्रह प्रकाशन सोहळा व कवी संमेलन मोठ्या उत्साहाने घेण्यात येतो पण कोरोना संकटामुळे 2020 ला घेण्यात आले नाही. त्यामुळे विजेत्यांचे सन्मान चिन्ह घरपोच पाठविण्यात आले.त्यामधे सर्वोत्कृष्ट कवयित्री.मा.लीना साकरकर,कारंजा जिल्हा वाशिम,उत्कृष्ट कवयित्री.मा.मेधा देसाई ,(पुणे ),प्रथम कवयित्री. मा.ऊर्मी घरत, (पालघर), द्वितीय कवयित्री.मा.शामला पंडित,पुणे तर तृतीय सन्मान कवयित्री.मा.मिनाक्षी नागराळे,वाशिम यांना प्राप्त झाले असून सर्वांचे सन्मान मा. प्रशासक नरेन्द्र गुरुदास कन्नाके, वरोरा जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने सन्मान पूर्वक घरपोच पाठविण्यात आले आहे.समूहात वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. विजेत्यांना सन्मान पूर्वक ई प्रमाणपत्र दिले जाते.रोज उपक्रम असतो त्यावर अनेक कवी आपली नीरजा सेंड केल्या जातात.आलेल्या नीरजा वर रोज मार्गदर्शन केले जाते. कोरोणा काळात सुध्दा सर्वांचे नीरजा घेऊन स्पंदन नीरजा ई दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात आले.यामुळेच समूहात एक वेगळा आनंद मिळतो.तसेच लिहिण्याची ऊर्जा प्राप्त होते. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन .पुढील काळात असेच यश संपादन करावे अशी मा.दुर्गा देशपांडे ,मुंबई,मा.गीता केदारे मुंबई, मा.शितल मोतेवार,नागपूर,या सर्वांनी मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन केलेले आहे.

Tuesday, 22 June 2021

आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈

आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈 आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈 सात रंगांनी सजावे सुखदुःखाचे सोबती मायबाप नित्य पुजावे...!! शांततेचा रंग पांढरा संयमाने सदा रहावे त्याग,समर्पण चित्ती कधी जीवनात पहावे...!! आकाशाचा निळा रंग विशाल ह्रदयासम असावे सागराचे अवखळ पाणी झ-यासम खळखळावे....!! हिरवा शालू नेसून बसली सुंदर दिसते वसुंधरा ओंजळभर दाणे टाकत शेतकरी पोशिंदा खरा....!! विठुराया चरणी साकडे घालून करते नित्य प्रार्थना सर्वांना सुखी ठेव देवा तव शांती मज मिळेल मना...!! पिवळा रंग उठून दिसतो चाफ्यात मिश्रित भावतो नानाविध रंग निसर्गाचे चल इंद्रधनुत दावतो....!! ॠतूप्रमाणे रंग सजती आयुष्यातील इंद्रधनुष्य शोध माणसाच्या कामी पडावे आयुष्याचा घे खरा बोध....!! *मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*