अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी डॉ. कैलास दौंड यांचा पाचवा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. गावच्या मातीची ओढ असणारा कवी डॉ. कैलास दौंड यांच्या यापूर्वी 'उसाच्या कविता' हा पहिला काव्यसंग्रह त्यानंतर वसाण,भोग ,सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा आणि त्यानंतर पाचवा काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चपराक प्रकाशन, पुणे, प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती १२ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ११० रुपये असून सर्वच कविता गावाची ओढ लावणार्या आहेत.
डॉ. कैलास दौंड हे गाव-खेड्यात राहणारा सामान्य माणूस पण कविता लेखनाचा छंद त्यांना २००१ सालापासून झाला. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातल्या नामवंत मासिक, साप्ताहिक,दिवाळी अंक तसेच अनेक दैनिक वृत्तपत्रातून सतत प्रकाशित होत असतात. या काव्यसंग्रहातील पहिली कविता वाचकाला खूप भावते. शेतकऱ्याचे जगणं कसं असतं ? याचे चित्रण चित्रफिती सारखे डोळ्यासमोरून तरळून जाते.
जमुनिया ढग आभाळात आले
कुणब्याचे मन वावधानी झाले
पावसाचे वारे फिरले बाजारी
कुणब्याची माय पडली आजारी..
जगाचा पोशिंदा असलेल्या कुणब्याला ढग आभाळात आले की कुणब्याच्या मनाची अवस्था सैरवैर होते. बी-बियाणे कशाने आणायचे? खत नांगरणी पेरणी कशाने करायची? या विचाराने शेतकरी हवालदिल होतो. जसे पावसाचे वारे येईल तसे कुणब्याचे मन बाजारी फिरून येते. कारण कुणब्याची माय म्हणजे त्याची शेती. त्यासाठी त्याच्या कडे पैसे नसले की कुणाला बी-बियाणे घेण्यासाठी सावकाराच्या व्याजाचा फास दिसायला लागतो आणि मग दुसरा पर्यायही नसतो. 'कुणब्याचे मन' हे जगण्याचा अर्थ शोधणारी कविता थेट वाचकाच्या काळजाला भिडते.
गोंदलेले मातीवर
बांधांचे चौकोन
तसतसे खुजे झाले
माणसाचे मन
पाणी मातीस शोधते
रुजताना खोल
अख्ख्या नदीला मिळेना
माणसाची ओल....!!
वरील ओळीतून डॉ. कैलास दौंड यांनी खूप अर्थगर्भित मतितार्थ मांडला आहे. नांगरलेल्या मातीवर शेतात जसे बांध घालून त्याचे चौकोन आखले जातात. अगदी त्याप्रमाणेच आज माणसाची मनी देखील खुजी झाली आहेत. माणसाच्या मनाचा खुजेपणा स्पष्ट दिसून येतोय. आज नात्यात देखील प्रेम राहिलेले नाही. पाणी मातीत शिरताना जसे खोल खोल जाते. तसे अख्ख्या नदीत जरी पाहिलं तरी माणसाला माणुसकीची ओल मिळत नाही. माणसामाणसांमध्ये देखील मायेचा ओलावा राहिलेला नाही. अशी खंत वरील ओळीतून कवी कैलास दौंड यांनी केली आहे.
आहे आजव मरणाची आस बाळगणार्या
म्हातारीला चकवून गेला म्हातारा देवाघरी
लेकराच्या हातावर फुटका रुपया ठेवायला
न धजावणारा म्हातारा
म्हातारीच्या हातावर देऊन गेलाय तुरी...
समाजातलं भयाण वास्तव कवी डॉक्टर कैलास दौंड यांच्या कवितेतून दिसून येते.वृद्धपणी नको असलेलं, खंगत चाललेलं शरीर. त्यात म्हातारा म्हातारीच्या जीवाला चुटका लावून देवाघरी निघून जातो. लेकरांच्या हातावर फुटका रुपया ठेवायला न धजावणारा म्हातारा म्हातारीच्या हातावर तुरी देऊन जातो. न सांगताच म्हातारीची नजर चुकवून जातो. आज कित्येकांना वृद्धा मायबाप नकोशी वाटतात. त्या मायबापांनी स्वतः खस्ता खाऊन मुलांना लहानाचं मोठं केलेलं असतं शेवटी तेच मायबाप म्हातारपणी मुलांना ओझे वाटायला लागतात. अशी खंत वरील कवितेतून दिसून येते.
कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अगदी ग्रामीण भागाशी, गावच्या मातीची, गावाची ओढ लावणा-या आहेत. इतकंच नाही तर समाजातील भयाण वास्तव,ढोंगीपण, माणसाचा आशावाद, शेतकऱ्याचे जीणं, नात्यांचा ढोंगीपणा, आटत चाललेला प्रेमाचा झरा, हरवत चाललेली माणुसकी, आटत चाललेली माया, गावाची ओढ सोडून शहराकडे चाललेली माणसं, कोपत चाललेला निसर्ग, वावर पडीत ठेवलं तर काय होईल ? असा विचार करायला लावणाऱ्या ओळी, मराठीची गोडी, स्वतःचा शोधणारा तळ, जीवनातले गूढ, हा गाव तुझा नाही, गावाबद्दल असणारी ओढ, गावचे वातावरण, माणसापेक्षा पक्षी थोर, इथे मानवता शहारली. इत्यादी कविता वाचकाच्या काळजाला हात घालणा-या आहेत. कित्येक पिढ्या गमावल्यानंतर ही कविता माणसाला विचार करायला लावणारी आहे. शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणाऱ्या या सर्वच कविता वाचकाला भावल्या शिवाय राहत नाहीत.
कवी डॉ. कैलास दौंडड यांच्या कविता दुष्काळाचा सामना कसा करावा? आज उजाड होत चाललेली गाव, राजकारणांनी नासत चाललेली गाव, विस्थापितांचे शहराकडे निघालेले लोंढे, यावर प्रकाश टाकणा-या कविता आहेत. लेकी-बाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारे चित्र आणि जाती-जातीत गुरफटत चाललेली माणसं अशा सा-या समस्या भीषण, भयाण वास्तव दर्शवणारे काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते होय.
कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अत्यंत वाचनीय व सत्यता मांडणा-या आहेत.या काव्यसंग्रहाची पाठराखण नागनाथ कोतापल्ले( माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद) यांची लाभली आहे.
कवी डॉ.कैलास दौंड यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
समीक्षिका /लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि. वाशिम